अस्सल राज्यपाल नियुक्त : मा. गो. वैद्य

कला, साहित्य, विज्ञान, क्रिडा, सहकार, समाजसेवा अशा क्षेत्रामधील लोकांना प्रतिनिधित्व मिळावं म्हणून विधानपरिषदेत राज्यपालांमार्फत १२ सदस्यांची नियुक्ती करण्यात येते. लहानपणापासून नागरिकशास्त्राच्या पुस्तकात आपण हेच वाचत आलेलो आहोत.

महाराष्ट्राची स्थापना १ मे १९६० साली झाली. महाराष्ट्रात द्विस्तरीय विधीमंडळ आहे. पैकी विधानपरिषदेत स्थानिक स्वराज्य संस्था, नागरी स्वराज्य संस्था, विधासभेतील आमदारांचे, पदवीधरांचे, शिक्षकांचे प्रतिनिधी निवडून जातात तर राज्यपालांकडून विविध क्षेत्रातील १२ सदस्यांची कलम १७१/ नुसार नियुक्ती होते.

हे सगळं झालं नागरिकशास्त्र, जे आपण विसरून टाकू आणि प्रॅक्टिकल मुद्यांवर येवू…

महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर दर सहा वर्षांनी जे १२ सदस्य निवडले जातात अशा व्यक्तींची आजतागायत एकूण संख्या होते १०६. आत्ता गंम्मत अशी की या १०६ पैकी १२-१३ व्यक्तीच वास्तविक त्या त्या क्षेत्राशी संबधित होत्या.

१०६ मधून निवडक १५-१६ वजा केले तर उर्वरीत ९० जण फक्त राजकीय पुर्नवसनासाठी आमदार झालेले.

असो तर अशाच १५-१६ जणांची माहिती घेण्यासाठी आपण ही सिरीज सुरू करतोय,

याच नाव आहे अस्सल राज्यपाल नियुक्त.

या सिरीजमधलं पाचवे नाव आहे ते जेष्ठ पत्रकार मा. गो. वैद्य

देशाच्या नामवंत पत्रकार- संपादकांपैकी एक. जवळपास १४ वर्षे ते नागपूरच्या ‘तरुण भारत’ दैनिकाचे संपादक होते. तसेच त्यांची दुसरी ओळख म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी मुख्य प्रवक्ते आणि जेष्ठ नेते.

आज ही देशभर प्रवास, सर्व राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्था-संघटनांमधले नेते, गाठीभेटी, विचारविनिमय असा त्यांचा उपक्रम सतत चालू असतात. त्यातुन ते लिहीते होतात. असे हे वयाच्या ९८ व्या वर्षीही ते पत्रकारितेत सक्रिय असणारे माधव गोविंद तथा बाबुराव वैद्य.

मूळ हिंदू विचारधारेवर पोषण झालेले असले तरी एक जाणता पत्रकार म्हणून त्यांचे लिखाण दोन्ही बाजूंचा सारासार विचारवरच असते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे,

लोकशाहीच्या अस्तित्वासाठी दोन पक्ष असणे महत्त्वाचे आहे. अमेरिका, इंग्लंडमध्ये दोन पक्ष आहेत. लोकशाही मजबूत होण्यासाठी विरोधी पक्षाची भूमिका महत्त्वाची आहे. त्यासाठी काँग्रेस पक्ष टिकला पाहिजे, असे मत ते बिनदिक्कत व्यक्त करतात.

मा. गों. चा जन्म ११ मार्च १९२३ ला वर्धा जिल्ह्यातील तोरडा गावाचा. तिसरी पर्यंतच प्राथमिक शिक्षण गावातच झाले. पुढे त्यांच्या मावस काका आंबादास पंत यांनी त्यांना नागपुरात पुढील शिक्षणासाठी आणले. १९३९ साली त्यांनी नागपूरमधीलच मॉरिस कॉलेजमध्ये बी.ए. साठी प्रवेश घेतला. रसायनशास्त्र विषयाला प्रवेश न झाल्याने संस्कृत व गणित हे विषय घेतले.

बी. ए. ची परीक्षा नागपूर विद्यापीठातून ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. पुढे संस्कृत विषयात एम. ए. करण्यासाठी त्यांना किंग एडवर्ड मेमोरियल शिष्यवृत्ती मिळाली.

एम. ए. झाल्यावर वैद्य न्यू इरा हायस्कूल(आता, नवयुग विद्यालय) या शाळेत शिक्षक म्हणून लागले. त्याच दरम्यान महामहोपाध्याय वा. वि. मिराशी यांनी डॉ. रघुवीर यांना संस्कृत कोशासाठी दोन मदतनीस हवे आहेत, असे कळल्यानंतर न्यू इरा हायस्कूलमधील नोकरी सोडून त्यांनी संस्कृत कोषाचे काम सुरू केले. मात्र काही कारणाने हे काम सोडावे लागले.

१९४९ साली ते नागपूरच्या हिस्लॉप कॉलेजात संस्कृतचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. ते पुढे १९६६ पर्यंत याच महाविद्यालयात कार्यरत होते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक
मॉरिस कॉलेजमध्ये असताना १९४३ सालापासूनच मा.गो. वैद्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय स्वयंसेवक होते. १९४८ साली गांधीहत्येनंतर संघावर बंदी आली, त्यावेळी त्यांनी भूमिगत राहून काम केले. त्याकाळात ते छान शर्ट, पॅंट, टाय लावून वावरत असायचे. त्यामुळे पोलिसांना संशय आला नाही.

हिस्लॉप कॉलेजमध्ये अध्यापन करत असताना वैद्य यांनी संघाशी असलेली निष्ठा कधीही लपविली नाही. इतकेच नव्हे तर १९५४-५५ साली प्राध्यापकांनी कोणत्याही राजकीय पक्षाशी बांधिलकी ठेवू नये किंवा निवडणुकीत भाग घेऊ नये, या सरकारी फतव्यावर तसा करार करण्याचे बाणेदारपणे नाकारले.

सलग १७ वर्षे हिस्लॉप कॉलेजमध्ये संस्कृतचे अध्यापन केले. त्यांचे मराठी प्रमाणेच संस्कृत-इंग्रजीवर अद्भुत प्रभुत्व होते. त्याच्या जपणूकीसाठी, वाढीसाठी ते अजूनही प्रयत्न करतात.

१९६६ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इच्छेवरुन वैद्य यांनी कॉलेजची नोकरी सोडली आणि पत्रकारितेमध्ये उडी घेतली. वयाच्या ४४ व्या वर्षी १९६६ मध्ये तरुण भारत या संघाचे मुखपत्र असलेल्या मराठी वृत्तपत्रात उपसंपादक म्हणून ते दाखल झाले.

‘तरुण भारत’मधील प्रवासाची सुरुवात….

सुरुवातीच्या काळात भाऊसाहेब माडखोलकर यांच्या मार्गदर्शनात मुद्रित तपासणे, इंग्रजीतुन येणाऱ्या वृत्तसंस्थांच्या वृत्ताचे भाषांतर करणे, प्रादेशिक वार्ताहर आणि इतर वार्ताहरांच्या बातम्या सुधारणे अशी शिकाऊ पत्रकार म्हणून त्यांची जडणघडण झाली.

त्यानंतर जानेवारी १९६९मध्ये माडखोलकर यांच्या निवृत्तीनंतर त्यांनी कार्यकारी संपादक आणि संपादक अशा विविध जबाबदाऱ्या संभाळल्या. संघाचे मुखपत्र आहे म्हणून कॉंग्रेस आणि इतर पक्षांच्या बातम्या छापायच्या नाहीत या तत्वाला त्यांचा पुर्ण विरोध होता.

आपला वाचक वर्ग हा सर्व स्तरातील आणि सर्वपक्षीय आहे. त्यामुळे बातमीशी कोणतीही छेडछाड न करण्याचा दमच त्यांनी वार्ताहरांना भरला होता. जर टिका करायची असेल तर त्यावर सरळ लेख लिहायचा पण बातमी जशी आहे तशीच असली पाहिजे असा त्यांचा आग्रह होता.

आणीबाणीचा काळ आणि त्या वेळच्या अडचणी आणि त्यातून काढलेले मार्ग हा मा.गो. वैद्य याच्या संपादकीय कारकिर्दीतल्या कायम आठवणीत असणारा काळ होता. आणीबाणीत सेन्सॉरशिप लागू झाल्यावर ‘विनाश काले विपरीत बुद्धी’ हा त्यांचा अग्रलेख डाक आवृत्तीत छापला गेला; पण शहर आवृत्तीत सेन्सॉर अधिकार्‍याने छापू दिला नाही म्हणून अग्रलेखाची तेवढी जागा निषेध म्हणून त्यांनी मोकळी सोडली.

त्या वेळी मा.गो. वैद्य हे ‘नीरद’ या टोपण नावाने ते लेखन करीत. ‘चांगले राज्य चांगल्यांचे राज्य’ हा त्यांचा लेख वाचून दैनिक हितवादचे त्या वेळचे संपादक ए.डी. मणी यांनी त्यांचे आवर्जून अभिनंदन केले होते.

आणिबाणीच्या काळातीलच तुरूंगवासातही ‘उघडे नागडे’ अनुभव वेचतानाही ‘अनुभवाची श्रीमंती’ लाभल्याचा ते उल्लेख करतात. त्यात खास वैद्यशैली असते आणि मोजक्या शब्दांत परिस्थितीचे सत्य दर्शन घडविण्याची हातोटीही प्रत्ययाला येते.

त्यांचे भाष्य हे सदर अनेक वर्ष प्रसिद्ध होते. देशातील विविध वर्तमानपत्रांमध्ये ते छापून येत असायचे. अगदी पुणे-मुंबईतील स्थानिक आवृत्यांपासून ते कोलकत्यामधील टेलिग्राफ या वर्तमानपत्रांमधूनही.

१९७८ ला आमदार….

बाबुराव वैद्य जरी संघाच्या विचारधारेचे असले तरी सामाजिक प्रश्नांवर आणि विविध तत्तकालिन परिस्थितीवर भाष्य करताना प्रसंगी संघावर आणि जनसंघ आणि मित्रपक्षावर देखील टिका केली. त्यांच्या लिखानाप्रसंगी त्यांनी विचारधारा कधीच मध्ये आणली नाही.

त्यांच्या पत्रकारितेतील याच योगदानाची दखल आणि कार्याचा सन्मान म्हणून १९७८ ला शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांची विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त कोट्यातुन वैद्य यांच्या नियुक्तीसाठी शिफारस केली आणि ती मंजूरही झाली. विशेष म्हणजे वैद्य आणि पवार यांची विचारधारा पुर्ण पररस्पर विरोधी होती.

मा. गो. वैद्य यांच्या विधान परिषदेतील कामगिरीवर तत्कालिन सभापती रा. सु. गवई सांगतात, सभागृहात आल्यानंतर वैद्य यांनी अनेक बाबींकडे लक्ष दिले.

१९७८ ला नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात सभापतींनी सरकार विरोधात मोर्चा काढला. यासंबंधित ‘विधानपरिषदेतील व विधानपरिषदेबाहेरील गवई’ हा त्यांचा अग्रलेख प्रचंड गाजला. त्या अग्रलेखामुळे त्यांच्यावर पहिल्याच अधिवेशनात हक्कभंग आणला गेला. पण गवईंनी तो सौम्यपणे स्विकारल्यामुळे मंजूर झाला नाही.

राज्याच्या तत्कालिन मुख्य सचिवांनी प्रशासनात ६० टक्के मराठीचा वापर करु असे आश्वासन देणारे पत्र दिले. याचा वैद्य यांनी सभागृहात चांगलाच समाचार घेतला. मराठीचा वापर करण्याचा प्रश्न हा गुणवत्तेचा प्रश्न आहे. इंग्रजी भाषेचे आकर्षण वाटणारे लोक जोवर प्रशासनात आहेत तोपर्यंत मातृभाषेचा वापर झाला पाहिजे अशी अपेक्षा ही परस्पर विसंगती आहे, असा प्रखर हल्ला त्यांनी चढवला. प्रशासनात मराठी भाषेच्या वापरासाठीचा प्रश्न त्यांनी सातत्याने लावून धरला.

भाषाविषयक विचार मांडताना उर्दू ही संपन्न भाषा आहे, पण तिचा आस्वाद घेण्यासाठी देवनागरी लिपीत हे साहित्य उपलब्ध करून द्यावे असे त्यांनी आग्रहाने मांडले होते.

शेतकऱ्यांची भूमिका स्पष्ट करताना… पावसाच्या लहरीपणामुळे पिकांचे नुकसान, कोरडवाहू शेतकऱ्यांच्या व्यथा व पीक विमा योजनेची आवश्यकता यावर त्यांनी भर दिला होता.

२४ सप्टेंबर १९८२ ला त्यांनी केलेल्या भाषणात शेतकऱ्यांच्या मालकीचे प्रक्रिया-उद्योगधंदे सुरू करता यावेत म्हणून या कारखान्यांना दिलेले भाग भांडवल हे शासनाच्या तिजोरीतून दिलेले असल्यामुळे व त्यावर काहीच मोबदला मिळत नसल्याने शासनाने ते भांडवल परत घेऊन ते नवीन विकास कार्यासाठी उपलब्ध करून द्यावेत असे आग्रहाने सांगितले.

बाबुराव वैद्य यांनी दिनांक १३ मार्च १९८१ रोजी अत्यावश्यक वस्तू व इतर ग्राहकोपयोगी माल व सेवा यांच्या बाबतीत उपभोक्त्यांच्या संरक्षणासाठी विशेष उपयोजनांची तरतूद करण्यासाठी विधेयक मांडले.

या विधेयकाचे समर्थन करताना त्यांनी स्पष्ट केले की, आज ज्या प्रकारची आपली अर्थव्यवस्था आहे. त्या अर्थव्यवस्थेमध्ये ग्राहक हा सर्वात दुर्बल घटक आहे. उत्पादक आणि विक्रेता यांच्याजवळ साधन संपत्ती आहे, संघटना आहे. परंतु अशी संघटना आणि क्षमता ग्राहकांजवळ नाही. उत्पादक सर्व दृष्टीनी संघटित आहेत आणि ते संघटित असल्यामुळे आणि संपन्न असल्यामुळे आकर्षक जाहिरातींच्या द्वारे ग्राहकांच्या मनात गोंधळ निर्माण करु शकतात. त्यामुळे ग्राहकांची चळवळ उभी राहणं महत्वाच असल्याचे त्यांनी नमुद केले.

अशा या हाडाच्या पत्रकाराला १९६६पासून पुढे अनेक वर्षे पत्रकारिता करताना अनेक उत्कृष्ट अग्रलेख, विविध विषयांसाठी पत्रकारिता व समाजसेवेचे अनेक पुरस्कार मिळाले.

१९८४ साली त्यांनी सभागृह आणि तरुण भारत दोन्हीमधून निवृत्ती घेतली. पण त्यानंतरही ते लिहीते राहिले. बदलत्या काळानुसार त्यांनी मुलाच्या मदतीने ब्लॉग सुरु केला. एक पत्रकार म्हणून ते आजही आपले मत मांडत असतात. काही वेळेला ते वादग्रस्त देखील असते. पण त्यांच्या म्हणण्यानुसार ते खरे असते.

२१ – ३० हा पत्रकारितेमधील अगदी उमेदीचा काळ मानला जातो. पण वयाच्या अगदी उत्तरार्धामध्ये पत्रकारितेमध्ये येवून देखील वैद्य उंचीवर जावू शकले. यावरुनच त्यांच्या लेखणीमधील ताकद लक्षात येते. प्रचारक, शिक्षक, पत्रकार, आमदार आणि संघाचे नेते असा त्यांचा प्रेरणादायी प्रवास राहिला. अशाच काही प्रेरणादायी आमदारांची ओळख आपण या सिरीजमधून करुन घेत आहोत.

लवकरच भेटूया पुढच्या भागात….

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.