भारतीय मुलाने हॉलीवूडचा सर्वात गूढ सिनेमा बनवला जो बघून आजही अनेकांची टरकते.

भारतीय हॉरर सिनेमे म्हटल तर आपल्या डोळ्यासमोर उभ राहत पांढऱ्या साड्यांमध्ये फिरणाऱ्या चेटकिणी, झाडावर लटकणारे पिशाच्च, रडणारं मांजर, खास टिपिकल बॅकग्राउंड संगीत, आरडाओरडा किंचाळणे.

रामसे बंधूनी आपल्याला हीच भूतं दाखवली. झी हॉरर शो, आहट सारख्या सिरीयल तर बघितल्यावर भीती पेक्षा हसू जास्त येतं.

जगभरात भारतीय हॉरर सिनेमांना कॉमेडी सिनेमाचा दर्जा देतात.

खर तर आपला देश खूप मोठा आहे, आपल्याला प्रचंड मोठा इतिहास आहे. इथे गल्लीबोळात काही ना काही कहाण्या दडल्या आहेत. अनेक पडके वाडे, गढ्या, राजवाडे यांच गूढ वलय प्रत्येकाला आकर्षित करत असते. पण तेच मोठ्या पडद्यावर दाखवायचं झाल तर कोणाला जमत नाही. तरी आजकाल काही वेगळे विषय हाताळले जातात. पण नव्वदच्या दशकात हे निव्वळ अशक्य होतं.

फक्त एकच पठ्ठा निघाला ज्याने भारतातून थेट हॉलीवूडला एन्ट्री मारली आणि २८ व्या वर्षी एक सिनेमा बनवला जो आजही तिथल्या सर्वश्रेष्ठ हॉरर सिनेमा पैकी एक समजला जातो.

या दिग्दर्शकाच नाव मनोज नाईट श्यामलन.

मुळचा मनोज श्यामलन. जन्मला पॉन्डेचरीमध्ये. वडील केरळी तर आई तामिळ. दोघेही प्रथितयश डॉक्टर. तो अगदी छोटा होता तेव्हाच श्यामलन कुटुंब अमेरिकेला शिफ्ट झालं. तिथेच पेन्सिल्वेनिया राज्यातील पेन व्हॅली गावात स्थाईक देखील झाले.

मनोज तिथल्या शाळांमध्ये शिकला. टिपिकल अमेरिकी मुलांप्रमाणे वाढला. पण भारतीय बुद्धिमत्ता शाबूत होती. अमेरिकेत जाणाऱ्या प्रत्येक भारतीय मुलाप्रमाणे तो वर्गात टॉपर असायचा.

पण त्याला सिनेमाची प्रचंड आवड होती. स्पीलबर्गचे सिनेमे तर तो तीर्थयात्रेला गेल्याप्रमाणे जाऊन बघायचा आणि घरी आल्यावर आई दिलेल्या हँडकॅमेऱ्यामध्ये छोटे छोटे व्हिडीओ बनवायचा.

(आजही त्याच्या अनेक सिनेमाच्या सुरवातीला या लहानपणीच्या व्हिडीओचे क्लिप्स तो दाखवतो.)

तरी सगळ्यांना वाटायचं हा सुद्धा आईवडिलांप्रमाणे डॉक्टर होणार. वडिलांची तर प्रचंड इच्छा होती. पण तस झाल नाही. मनोजच्या पाठीशी त्याची आई खंबीरपणे उभी राहिली.

त्याने न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीच्या फिल्म स्कूलमध्ये प्रवेश घेतला. मेरीट स्कॉलरशिपने त्याची निवड झाली होती.

फिल्मस्कूलमध्ये सुरवातीपासून मनोजची हवा होती. त्याच्या सिनेमाच प्रचंड कौतुक व्हायचं. हा पुढे जाऊन कोणी तरी मोठा दिग्दर्शक बनणार हे सर्वांनी ओळखल होतं. तिथे असताना त्याची गूढ विषयांची आवड, त्याचं रात्रभर जागण, त्याच वागण बघून नाईट हे टोपणनाव मिळाल.

मनोज नाईट श्यामलन .

त्याने पास आउट झाल्या झाल्या प्रेयिंग विथ अँगर नावाचा सिनेमा बनवला. हा सिनेमा त्याच्या आयुष्यावर आधारित होता. भारतातून अमेरिकेला आलेल्या मुलाची कहाणी. यात त्याने स्वतःच अभिनय देखील केला होता. घरून पैसे घेऊन बनवलेला हा सिनेमा जास्त ठिकाणी थिएटरमध्ये रिलीज झाला नाही. फक्त फेस्टिव्हलमध्ये फिरला.

या सिनेमाने पैसे कमवले नसले तरी या वीस वर्षाच्या मुलाचं प्रचंड कौतुक झाल.

या पाठोपाठ आला वाईड अवेक. देवाच्या शोधात असलेल्या लहान मुलाची साधी सिम्पल स्टोरी असलेला हा सिनेमा. तसा बरा चालला. महत्वाच म्हणजे मोठ्या दिलं सर्कल मध्ये एम. नाईट श्यामलन या नावाला ओळखमिळाली. यंग आर्टिस्ट अॅवार्ड देखील मिळाले.

दिग्दर्शनासोबतच तो लिखाणाच काम देखील करत होता. उंदराचा स्टुअर्ट लिटल हा सुप्रसिद्ध सिनेमा त्याने याच काळात लिहिला. या सोबत घोस्ट रायटिंग केलं. म्हणजे दुसऱ्या लेखकाला लिखाणासाठी मदत. यातून चांगले पैसे कमवले.

मग आला त्याचा तिसरा आणि सर्वात महत्वाकांक्षी सिनेमा,

“द सिक्स्थ सेन्स”

हा एक सुपरनॅचरल विषयावर बनलेला सिनेमा होता.

बऱ्याचदा आपल्याला काही गोष्टींची, संकटाची जाणीव होत असते. पंचेंद्रिय सोडून असलेलं सहावे इंद्रिय यात काम करते अस म्हणतात. यावरच स्टोरी होती. एक लहान मुलगा मेलेल्या माणसां पाहू शकतो, त्यांच्याशी बोलू शकतो ही थीम होती.

ब्रूस विलीस हा त्याकाळचा सुपरस्टार सिक्स्थ सेन्सचा हिरो होता.

या सिनेमाच शुटींग हा देखील एक वेगळाच अभ्यासाचा विषय होता. श्यामलनने एकदम वेगळाच टच संपूर्ण प्रोसेसला दिलेला होता. यामुळेच सिक्स्थ सेन्स बनत असताना त्याची ख्याती इतकी पसरली की या सिनेमाच्या डिस्ट्रीब्युशनसाठी खुद्द डिस्ने कंपनीने  हात पुढे केला.

श्यामलनने थंडगार डोक्याने बनवलेला सिनेमा बघणाऱ्या प्रेक्षकांना थरकाप उडवणारा ठरला. त्यातले अनेक सीन असे होते की लहान मुले कपडे ओले करत होते.

आजवरचा सर्वात भयानक सिनेमा अशी त्याची पब्लिसिटी झाली.

सिक्स्थ सेन्स तुफान गाजला. अमेरिकेत टायटॅनिकच्या खालोखाल ओपनिंग त्याला मिळाली. ४० मिलिअन बजेट असलेल्या या सिनेमाने जवळपास ६०० मिलिअन पैसे कमवले. अमेरिकाचा नाही तर इंग्लंडमध्ये देखील तो बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये १ नंबरला होता.

अवघ्या तीस वर्षांच्या श्यामलनला पुढचा स्पीलबर्ग म्हणून ओळखल जाऊ लागल. ऑस्कर, गोल्डन ग्लोब अशा सगळ्या प्रतिष्ठीत पुरस्कारासाठी नॉमिनेशन मिळाल. अनेक पुरस्कार मिळाले.

पण या सिनेमामुळे एम.नाईट श्यामलन या नावाभोवती गुढतेच वलय देखील निर्माण झालं.

गंमतीची गोष्ट म्हणजे श्यामलन हा स्वतःच एक भूत आहे अशी अफवा सुद्धा पसरली होती. लहानपणी भारतात एका बर्फाच्या तळ्यात त्याचा अॅक्सिडेंट झाला होता व तो तिथे बुडून जवळपास अर्धा तास मृत्यूच्या स्थितीत गेला होता असं सांगितल गेलं.

याच कारणामुळे श्यामलन सिक्स्थ सेन्स या सिनेमाप्रमाणे भुताशी बोलू शकतो व त्यांच्या कथांवर सिनेमे बनवतो असा दावा साय-फाय चॅनेलनी केला. अनेकांना हे खर वाटलं. अनेकांना हा पब्लिसिटी स्टंट आहे अस सुद्धा वाटलं.

पण श्यामलनने त्या चॅनेलविरुद्ध केस करून सगळ्या शंका कुशंकाना संपवून टाकले.

पुढे त्याला अनेक सिनेमे मिळाले. हॉलीवूडच्या आघाडीच्या दिग्दर्शकात त्याचा समावेश झाला. पुढे त्याने  एक्शन सिनेमे बनवले. पण सुपर नॅचरल हॉरर सिनेमा हीच त्याची ओळख बनली. विल स्मिथ, ब्रूस विलीस, सॅम्युअल जॅकसन अशा अनेक सुपरस्टार अभिनेत्यांबरोबर त्याने काम केलं. श्यामलनने अनब्रेकेबल, द व्हिलेज, द हॅपनिंग,आफ्टर अर्थ, ग्लास असे दर्जेदार सिनेमे बनवले. 

 मात्र त्याला सिक्स्थ सेन्सच तुफान यश परत रिपीट करता आलं नाही. 

लोक म्हणतात श्यामलन आउट डेटेड झालाय. त्याच्या भुतांच्या कथांमध्ये कोणाला रस उरला नाही. त्याने निवृत्ती घ्यावी. पण गंमत म्हणजे कालच श्यामलनने वयाची पन्नास वर्षे पूर्ण केली. या वयात लोक आपल्या दिग्दर्शनाची कारकीर्द सुरु करतात. श्यामलन हे अस भूत आहे जे लवकर उतरत नाही. येत्या काही काळात ते परत येणार आणि प्रेक्षकांना झपाटून टाकणार हे नक्की.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.