धनुष्यबाणापासून उगवत्या सूर्यापर्यंत, सगळी राजकीय चिन्ह या एकाच माणसानं रेखाटली आहेत

घड्याळ चिन्ह आणि पक्ष आत्ता शरद पवारांकडे नाही तर अजित पवारांकडे असेल तसा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. आता शरद पवार यांच्या पक्षाचे चिन्ह वटवृक्ष असेल अशा बातम्या येत आहेत. पण यावरून एक गोष्ट डोक्यात आली की हि चिन्ह बनवले कोणी असतील, चिन्ह असायची तरी कुठली कुठली, आणि निवडणूक आयोग त्याची निवड कशी करायचा.

आता शरद पवारांना नेमकं कुठलं चिन्ह मिळणार हे ठरणार आणि त्यातून वादही होणार, वाद व्हायचा तो होवो पण या चिन्हांबाबतच्या कथा मात्र सगळीकडे सारख्याच असतात.

म्हणजे कुणाला शिट्टी चिन्ह मिळालं, तर तो सगळीकडे शिट्ट्या वाटतो, कुणाला बॅट मिळालं तर बॅट, असं बरंच काही. पण ही चिन्ह वेगवेगळी असली, तर आपल्या रोजच्या आयुष्याशी निगडित असतात, हे मात्र खरं.

पण धनुष्यबाण असो, कमळ असो किंवा उगवता सूर्य या चिन्हांना रेखाटलं कुणी…?   

आता चर्चेत असणारी आणि आपल्याला प्रत्येक निवडणूकीत दिसणारी ही चिन्हं बनवली आहेत एम एस सेठी यांनी. देश स्वतंत्र झाल्यांनतर १९५१ मध्ये भारतातील पहिली निवडणूक होणार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले.

 पण भारतातील लोकं मोठ्या प्रमाणावर निरक्षर असल्याने त्यांना चटकन कळतील अशी चिन्ह तयार करण्याची योजना निवडणूक आयोगाने आखली.

मग या चिन्हांना अगदी बारकाईने स्केच करेल असा कलाकारही निवडणूक आयोगाने निवडला. त्या कलाकाराचं नाव होतं एम एस सेठी. एम एस सेठी हे दिल्लीतल्या सामान्य कुटुंबातील अतिशय साध्या  स्वभावाचे व्यक्ती होते. 

अगदी गुप्तहेरासारखं त्यांनी चाळीस वर्ष गुप्तपणे काम केलं..

एम एस सेठी यांनी एकूण चाळीस वर्ष निवडणुक चिन्ह स्केच करण्यात घालवली. मात्र त्यांनी निवडणुकीची चिन्ह काढली आहेत हे त्यांचे सहकारी वगळता कुणालाही माहित नव्हते. अगदी त्यांच्या कुटुंबातल्या व्यक्तींसुद्धा कळले नाही. इतक्या गोपनीय पद्धतीने सेठी यांनी आपले काम केले होते. 

देशातील पहिली निवडणूक ठरली आणि चिन्हांचा जन्म झाला..

१९५१-५२ दरम्यान देशातली पहिली निवडणूक झाली. परंतु देशातील फक्त १६ टक्के लोकच साक्षर होते. तेव्हा सर्व लोकं गांगरून न जाता त्यांना सहज कळतील अशा वस्तू, प्राणी, फळं, फुलं, कपडे यांची चित्रं निवडणूक चिन्ह म्हणून वापरण्यात यावी असं निवडणूक आयोगानं ठरवलं.

मग काय लागलीच निवडणूक आयोगाने एका चित्रकाराला ड्राफ्टमन म्हणून नियुक्त केलं. हे ड्राफ्टमन म्हणजेच एम एस सेठी. सेठी यांच्या निवडीनंतर निवडणूक आयोगाची एक टीम बनवण्यात आली. या टीमने लोकांच्या दैनंदिन जीवनात सहज वापरल्या जाणाऱ्या वस्तू आणि गोष्टींना शोध घ्यायला सुरुवात केली. 

या गोष्टींमध्ये होते प्राणी, पशु, पक्षी आणि रोजच्या वापरातल्या वस्तू..

यामध्ये वाघ, सिंह, हत्ती यांसारख्या प्राण्यांसह कोंबडी, बदक, मोर यांसारख्या पक्षांचाही समावेश  होता. तेव्हा देशात ग्रामीण लोकसंख्या सगळ्यात जास्त होती त्यामुळे ग्रामीण जीवनाचा भाग असलेल्या गोष्टींना जास्त प्राथमिकता मिळाली यात बैलजोडी, नांगर, गायवासरू यांबरोबर टोपली, झाडू, विळा, सूरी, कुऱ्हाड यांसारख्या वस्तूंनाही प्राधान्य देण्यात आलं होतं.  

१९५१ मध्ये निवडणूक आयोगाचे ड्राफ्टमन म्हणून रुजू झाल्यांनतर १९९२ पर्यंत म्हणजेच ४० वर्ष सेठींनी आपलं काम केलं. या चाळीस वर्षात सेठींनी १०० हुन अधिक चित्र रेखाटली होती. १९९२ मध्ये सेठी निवृत्त झाल्यांनतर निवडणूक आयोगाने ड्राफ्टमन पद कायमचंच बरखास्त करून टाकलं. 

मात्र यानंतर निवडणूक आयोगाने सेठी यांनी काढलेल्या १०० चित्रांना लिस्ट ऑफ फ्री सिम्बॉल घोषित करून या चित्रांना वापरण्यासाठी मुक्त केलं.

पण सेठी यांच्यानंतर सुद्धा काही चिन्ह यात ॲड करण्यात आलीयेत..

१९९६ च्या तामिळनाडू विधानसभेसाठी १०३३ उमेदवार उभे होते. यामुळे निवडणूक आयोगाने त्यांच्या चिन्हाच्या मर्यादेत बदल केला आणि नवीन चिन्ह ॲड केली. 

२०१८ मध्ये निवडणूक आयोगाने प्रकाशित केलेल्या यादीनुसार १६१ मुक्त चिन्ह होती. तर २०१९ च्या अधिसूचनेनुसार त्यात आणखी चिन्ह ॲड करण्यात आली. त्यानंतर निवडणूक आयोगाकडे एकूण १९८ चिन्ह झालीत. 

निवडणूकीचे चिन्ह रेखाटणाऱ्या एम एस सेठींचा एखादा फोटोही निवडणूक आयोगाकडे उपलब्ध नाही. त्यांचा चेहरा किंवा नावही आपल्यासाठी परिचित नसलं, तरी त्यांनी काढलेल्या चिन्हांमुळेच आपल्याला आपला उमेदवार कसा ओळखायचा हे मात्र नक्की कळतं.  

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.