केरळमधल्या ग्रामपचांयतीच्या निर्णयाने दाखवून दिले कि ‘लोकशाहीत जनताच मालक आहे’

या लोकशाहीत जनता जनार्दन मालक आहे. हे अगदी लहानपणापासून आपण ऐकत आलेलो वाक्य. प्रत्येक लोकप्रतिनिधीच्या, सरकारी अधिकाऱ्यांच्या तोंडात, सरकारी कार्यालयात आपल्याला सर्रास हे वाक्य ऐकायला मिळते. पण त्याबाबत सत्य परिस्थिती काय आहे हे सूर्य प्रकाशाइतके स्वच्छ आहे.

मात्र केरळमधील माथुर ग्रामपंचायतीने एक असा निर्णय घेतला आहे, ज्यातून नुसतं बोलून नाही तर दाखवून दिले आहे कि, लोकशाहीत खरंच फक्त जनताच मालक असते. हा निर्णय म्हणजे,

इथून पुढच्या काळात आता ग्रामपंचायतमध्ये कोणालाही सर किंवा मॅडम किंवा साहेब अशा शब्दांचा वापर करायचा नाही.

असा निर्णय घेणारं माथुर हे पहिले गाव बनले आहे. ग्रामपंचायतीच्या कोणत्याही लोकप्रतिनिधीला किंवा सरकारी कर्मचाऱ्याला समोर तर नाहीच पण अगदी पत्रव्यवहार करताना देखील सर आणि मॅडम या शब्दांचा वापर करायचा नाही. पंचायतीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील ग्रामस्थ लिहिणार असलेल्या पत्रात या दोन शब्दांचा वापर करण्याची गरज नाही असा आदेश ग्रामपंचायतीने काढला आहे.

यासाठीची कारण देखील ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आली आहेत.

जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला मिळण्यासाठीच्या अर्जावर सर किंवा मॅडम असं लिहिण्याची गरज नाही असं ग्रामपंचायतद्वारे सांगण्यात आलं आहे. कारण हे दाखले ग्रामपंचायतीकडून मिळवणे हा नागरिकांचा संविधानिक हक्क आहे. यासाठी लोकांना आग्रह करायला लागला नाही पाहिजे. अर्जात लिहिताना देखील गावकऱ्यांनी त्याच भाषेमध्ये लिहावे. उदाहरण म्हणून सांगायचे झाले तर, मी मागणी करतो कि मला उत्पन्नाच्या दाखल्याची गरज आहे.

सोबतच असं देखील सांगण्यात आलं आहे कि, सरकारच्या अधिकृत पत्रात वापरली जाणारी भाषा हि स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून म्हणजे इंग्रजांच्या काळापासून वापरली जात आहे. मात्र स्वातंत्र्याच्या नंतर सामान्य नागरिकांना आपल्या अधिकारांची मागणी करण्यासाठी विनंती करावी लागली नाही पाहिजे. कारण तो त्यांचा हक्क आहे. याच भावनेतून या नियमामध्ये बदल करण्यात आला आहे.

लोकशाहीत जनताच मालक

ग्रामपंचायतीचा हा निर्णय पंचायतीच्या ३१ ऑगस्ट रोजीच्या बैठकीचे घेण्यात आला आहे. माथुर ग्रामपंचायतचे सरपंच प्रविता मुरलीधरन यांनी माध्यमांशी बोलताना या निर्णयाबाबत सांगितले कि, जर कोणत्याही ग्रामस्थाला केवळ सर आणि मॅडम म्हंटले नाही म्हणून सेवा दिली गेली नाही तर याबाबत सरळ माझ्याकडे तक्रार करावी.

प्रविता म्हणाल्या,

मला अनेकदा वाईट वाटते कि जर कोणतेही वृद्ध नागरिक मला म्हणाले कि मॅडम जरा माझी मदत करा. लोक तेच मागतात जो त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे त्यासाठी त्यांना झुकावे लागण्याची गरज नाही. हि वसाहतवादी परंपरा आहे. आणि आता वेळ आली आहे कि या पद्धतीच्या शब्दांचा वापर बंद करून राजा आणि गुलाम या विचारातून बाहेर निघायला हवे. कारण लोकशाहीमध्ये जनताच मालक आहे.

पलक्कडमधील इतर ग्रामपंचायतींना देखील याबाबत शिफारस करण्यात आली आहे.

३१ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायतीच्या अध्यक्षांनी जे आदेश जारी केले आहेत. त्यात म्हंटले आहे की,

भाषा अधिकाऱ्यांना सर आणि मॅडम या शब्दांऐवजी सामान्य लोकांना आपले वाटतील अशा इतर शब्दांची निवड करण्यासाठी सांगण्यात आलं आहे. तो पर्यंत लोक आम्हाला आम्ही ज्या पदावर आहोत, त्या पदनामाने संबोधित करू शकतात. जर वृद्ध नागरिक असतील त्यांनी थेट नावाने हाक मारावी. या आदेशाला पलक्कडच्या अन्य ग्रामपंचायतींकडे देखील त्यांनी तिथं लागू करावा यासाठी शिफारस करण्यात आली आहे.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.