मदरशांच्या नावाखाली मुलांची तस्करी ? नेमकं काय घडतंय…

तारीख १७ मे.

कोल्हापुरातल्या रुईकर कॉलनी भागात काही नागरिकांना एक ट्रक दिसला, या ट्र्कमध्ये साधारण ८ ते १५ वर्षांची ६३ मुलं होती. नागरिकांनी ट्रक थांबवला, या मुलांची विचारपूस केली, तेव्हा बऱ्याच मुलांना आपण कुठे चाललोय याबद्दल ठोस काहीच सांगता येत नव्हतं. यातली बरीचशी मुलं ही बिहारमधली होती. त्यात या नागरिकांना असं समजलं की, ही मुलं देशाच्या वेगवेगळ्या भागांमधून रेल्वेनं कोल्हापुरात आली आणि तिथून ट्रकमधून त्यांना मदरशात नेण्यात येत होतं.

तारीख ३० मे. 

भुसावळ स्टेशनवर दानापूर एक्सप्रेसमधून रेल्वे पोलिसांनी २९ मुलांची सुटका केल्याची बातमी आली. लगेचच त्याच रेल्वेतून मनमाड स्टेशनवर ३० मुलांची सुटका करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. ८ ते १५ वर्षांच्या या ५९ मुलांना बिहारमधून सांगलीतल्या मदरशामध्ये नेण्यात येत होतं, असं सांगण्यात आलं.

या सगळ्यानंतर मदरशांच्या नावाखाली महाराष्ट्रात मुलांची तस्करी सुरु आहे का ? महाराष्ट्रात नेमकं काय घडतंय ? असे आरोप झाले. साहजिकच वातावरण ढवळून निघालं.                    

सगळ्यात आधी खुलासा झाला, कोल्हापूरमधल्या प्रकरणाचा. या मुलांना आजऱ्यातल्या मदरशामध्ये घेऊन जाण्यात येत होतं. बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यातली ही मुलं आजऱ्यातल्या मदरशामध्ये शिक्षण घेतात, ही मुलं इदच्या सुट्टीसाठी घरी गेली होती आणि तिकडून पुन्हा आजऱ्यात येत होती असं स्पष्ट झालं.

पण भुसावळ आणि मनमाडचं काय ?

या प्रकरणाची चर्चा होऊ लागली कारण रेल्वे पोलिसांनी या संदर्भात ५ जणांना ताब्यात घेतलं आणि मानवी तस्करीचा गुन्हा दाखल केला, पण हा खरंच मानवी तस्करीचा प्रकार होता का ? नेमकं काय घडलं? स्थानिक पत्रकार, कार्यकर्ते काय सांगतात आणि नेमका खुलासा काय झालाय ? याची माहिती असणंही तितकंच गरजेचं आहे.    

सगळ्यात आधी बघुयात, घटनाक्रम…            

०१०४० बिहारवरुन पुण्याला येणारी दानापूर एक्सप्रेस. रविवार २८ मेच्या संध्याकाळी ही रेल्वे बिहारमधून सुटली आणि साधारण मंगळवारी दुपारी महाराष्ट्रात आली. या रेल्वेच्या एस-10 डब्यामधून भतेंन्द्रो पाठक नावाचे एक ऍडव्होकेट प्रवास करत होते. त्यांना त्याच डब्यात काही लहान मुलं दिसली, या मुलांसोबत त्यांचे पालक किंवा कुणीच जबाबदार माणूस नव्हतं, बरीचशी मुलं तहानलेली, भुकेजलेली. हे सगळं बघून भंतेंन्द्रो पाठक यांनी रेल्वे बोर्डाला ट्विट करुन माहिती दिली. गाडी भुसावळला थांबणार होती, हे लक्षात घेऊन तिथल्या यंत्रणेला अलर्ट करण्यात आलं. 

दानापूर एक्स्प्रेस जशी पुण्यात पोहोचली तशी पोलिसांनी एस-१० आणि एस-११ या डब्यांची झडती घेतली. ज्यात त्यांना ८ ते १५ वर्ष वयाची २९ मुलं आढळून आली. 

पोलिसांनी या मुलांना ताब्यात घेतलं. या मुलांनी रेल्वेत आणखी मुलं असल्याचं सांगितलं, तेव्हा पोलिसांनी पुढच्या मनमाड स्टेशनलाही रेल्वेची झडती घेतली आणि आणखी ३० मुलांची सुटका केली आणि भुसावळमधून एकाला आणि मनमाडमधून चौघांना अटकही केली. 

पोलिसांच्या प्राथमिक तपासात काय झालं ?

तर ही सगळी मुलं बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातली आहेत. या मुलांना सांगलीच्या मदरशात नेण्यात येत होतं असं सांगण्यात आलं. माध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार या मुलांकडे कुठलंही ओळखपत्र, पालकांचं संमतीपत्र, ज्या मदरशात नेणार आहेत तिथली कागदपत्र असं काहीच नव्हतं. मुलांना आपण नेमके कुठं जातोय, याबद्दल काहीही माहिती नव्हती.

त्यानंतर पोलिसांनी या मुलांची, त्यांच्यासोबत पकडण्यात आलेल्या ५ संशयितांची वैद्यकीय तपासणी केली आणि एका संशयिताविरुद्ध भुसावळ तर चार संशयितांविरुद्ध मनमाडमध्ये मानवी तस्करीच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी  मानवी तस्करीचा गुन्हा दाखल केल्यानं मात्र वादाला तोंड फुटलं, मदरशांच्या नावाखाली राज्यात मुलांची तस्करी सुरु असल्याचे आरोप करण्यात आले, तर दुसऱ्या बाजूला ही तस्करी नसून फक्त शिक्षणासाठी ही मुलं महाराष्ट्रात आल्याचं सांगण्यात आलं.

पोलिसांनी मानवी तस्करीचा गुन्हा का दाखल केला, याबद्दल या घडामोडींचं वार्तांकन करणारे स्थानिक पत्रकार काय सांगतात ?

‘पोलिसांना जेव्हा ही मुलं सापडली तेव्हा या मुलांना तुमच्यासोबत कोण आहे ? कशासाठी आला आहात ? याची उत्तरं देता आली नाहीत. साहजिकच भाषेचा अडथळा आला आणि मुलं गांगरली सुद्धा होती. काही मुलांनी आमच्यासोबत आणखी मुलं आहेत सांगितल्यावर पोलिसांनी मनमाडवरुनही काही मुलांना ताब्यात घेतलं. ही मुलं रिजर्व्हेशनच्या डब्ब्यात होती. मात्र त्यांना आपल्याबद्दल विस्तृतपणे माहिती देता आली नाही. त्यात पालक सोबत नसल्यानं पोलिसांना संशय निर्माण झाला. ही मुलं अल्पवयीन असल्यानं त्यांची संमती ग्राह्य धरली जात नाही आणि त्यातूनच पोलिसांनी मानवी तस्करीच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला,’ अशी माहिती स्थानिक पत्रकारांनी दिली.

पण अनेक मुस्लिम अभ्यासक आणि कार्यकर्ते हा तस्करीचा प्रकार नसल्याचं सांगत होते.

या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी बोल भिडूनं इतिहास अभ्यासक सर्फराज अहमद यांच्याशी संपर्क साधला, 

ते म्हणाले, 

‘मुळात याला तस्करी म्हणणं हाच मूर्खपणा आहे. ही मुलं शिक्षणासाठी येतात, त्यांचे आईवडील स्वखुशीनं त्यांना मौलानांसोबत पाठवतात. महाराष्ट्रातल्या विद्यापिठांमध्ये ज्या प्रकारे परराज्यातली मुलं शिक्षणासाठी येतात, त्याचप्रमाणे इथल्या मदरशांमध्येही देशभरातून मुलं शिक्षणासाठी येतात. यात गैर काही घडलंय असं मला वाटत नाही. राहिला प्रश्न ओळखपत्रांचा तर देशात प्रवास करताना परवाने काढण्याची गरज आहे का ? या प्रकरणात तस्करी असल्याचं कुठंच दिसत नाहीये, त्यामुळं तस्करीचा गुन्हा कशाच्या अंतर्गत दाखल झाला ? हाच मुख्य सवाल आहे’

या सगळ्यानंतर आणखी दोन घटना उजेडात आल्या, पहिलं म्हणजे यातली बहुसंख्य मुलं पूर्णिया, कटिहार या बिहारच्या भागांमधली आहेत, जिथं मानवी तस्करीचे प्रकार याआधी घडले होते. त्यामुळंच पोलिसांनी सावध पावलं उचलली असं सांगण्यात आलं.

पोलिसांची दोन पथकं सांगली आणि बिहारमध्ये तपासासाठी रवानाही झाली आणि तोपर्यंत यातल्या बऱ्याच मुलांचे पालक भुसावळमध्ये दाखल झाले.

अंतिमतः उजेडात आलेली गोष्ट अशी आहे की…

पूर्णिया, कटिहार या भागातली बरीच मुलं महाराष्ट्रातल्या मदरशांमध्ये शिक्षणासाठी आली आहेत. यातल्या बर्याच मुलांच्या घरची आर्थिक परिस्थिती गरिबीची आहे, कुणाला पालक नाहीयेत, तर कुणाच्या जेवणाची आणि शिक्षणाची वानवा आहे, अशावेळी या मुलांसाठी महाराष्ट्रातले मदरसे आधार ठरतात आणि त्यामुळंच फक्त बिहारचे नाही, तर उत्तरप्रदेश आणि बंगालसारख्या राज्यांमधूनही महाराष्ट्रातल्या मदरशांमध्ये मुलं शिक्षणासाठी येत असतात.

भुसावळमध्ये कित्येक पालक आपल्या मुलांची ओळख पटवून देण्यासाठी आले आहेत, आता या मुलांची ओळख पटवून त्यांना परत पाठवलं जाणार की सांगलीच्या मदरशात दाखल केलं जाणार, हे मदरशाबाबत सुरु असलेली पोलिस चौकशी पूर्ण झाली की स्पष्ट होईल.

हे ही वाच भिडू:

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.