अंबानींचा घोटाळेबाज जावई ज्याची सुपारी अबू सालेमने घेतली होती.

जावई म्हणजे अवघड जागेचं दुखणं आहे असं म्हणतात. जर हा जावई भारतातल्या सगळ्यात श्रीमंत घराण्याचा असेल तर. तर काय नाही हे दुखणं सगळ्या जगाचं होऊन बसतं. असच झालंय अंबानीच्या जावयाचं.
नाव माधव पटेल. राहणार दुबई.
करलो दुनिया मुठ्ठी में म्हणणाऱ्या धीरूभाई अंबानी यांच्या मोठ्या भावाचा रमणिकलाल अंबानी यांच्या मुलीचा दादला. आता अंबानींचा जावई म्हटल्यावर तसंच तालेवार घराणं. याचे वडील भागुभाई मोतीलाल पटेल हे सत्तरच्या दशकात इराणमध्ये सर्वात मोठे बिझनेसमन म्हणून ओळखले जायचे.
माधव मात्र वाढला भारतात. त्याच शिक्षण सुद्धा दिल्लीमध्ये झालं. लहानपण एकदम ऐषोआरामीमध्ये गेलं. मात्र जेव्हा इराणमध्ये राजेशाही लोकांनी उलथून लावली तेव्हा तिथून भागुभाई पटेल पळून आले. त्यांचा बिझनेस शाहच्या आश्रयाखाली सुरु होता. लोकांचा राग आपल्यावर निघू नये म्हणून ते जीव वाचवून भारतात आले.
भागुभाई यांनी भारतात हॅमको ग्रुप स्थापन केला.
कॉलेज संपल्यावर प्रत्येक आज्ञाधारक गुज्जू मुलाप्रमाणे माधव पटेल सुद्धा वडिलांच्या बिझनेस मध्ये आला. पण तो बापा पेक्षाही महत्वाकांक्षी होता. भागू भाई जिथून पळून आले होते त्या अरब देशात स्वतःच नाव कमवायचं हे त्याच उद्दिष्ट होतं .
माधव पटेल शारजाला आला. तिथे सोलो इंडस्ट्रीची स्थापना केली. स्मेल्टिंग कारखाना उभारला. माधवच व्हिजन मोठं होत, बनिया दिमाग होता, आधुनिक जगात पैसे कसे कमवायचे याच टेक्निक कळालं होता. वडिलांप्रमाणे एकाच बिजनेस मध्ये तो राहिला नाही. इम्पोर्ट -एक्स्पोर्ट, ट्रेडिंग दलाली सगळ्या प्रकारात हात घातला.
मेटल ट्रेडिंगमध्ये त्याला बादशाह म्हणून ओळखले जाऊ लागले.
काही दिवसातच माधव पटेल गल्फ देशांमध्ये पैसे छापू लागला.
त्याच नाव तिथला बिझनेस टायकून म्हणून घेतलं जाऊ लागलं. भारतात, दुबई मध्ये एवढंच नाही तर लंडन मध्ये देखील त्याने आलिशान महाल विकत घेतले. बडेजाव दिखावा यात तर तो माहीर होताच, आता पैश्यांची झळाळी आणि मज दोन्ही त्याच्या चेहऱ्यावर झळकू लागला.
याच काळात त्याचे लग्न मीना अंबानी हिच्याशी झालं. तेव्हा धीरूभाई अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीने भरारी घेतली होती. छोट्याला छोट्या ऑफिसरपासून ते मंत्री पंतप्रधान पर्यंत सगळे त्यांच्या खिशात असायचे. माधव पटेल याच्यासाठी आपले चुलत सासरे आदर्श होते.
गुजरात मधल्या व्यापारी कुटुंबामध्ये आपल्या नातेवाईकांना मदत करून त्यांना वर आणायची पद्धत आहे. माधव पटेल खटपट्या आहे हे ओळखून त्याला रिलायन्स इंडस्ट्रीच्या डायरेक्टर पदावर घेतलं गेलं.
त्याची हवा एवढी झाली की मुंबईचा अंडर वर्ल्ड डॉन अबू सालेम याने त्याची सुपारी घेतली.
२००२ साली दाऊद इब्राहिमचा शार्प शुटर राजेंद्रकुमार आनंदकट याला अटक झाली तेव्हा त्याने सांगितले की अबू सालेमने त्याला ४ वर्षांपूर्वी माधव पटेलला दुबईत शोधून काढून त्याचा गेम करण्याची सुपारी दिली होती.
असं म्हणतात की सालेमला ४ कोटी मिळणार होते.
पण माधव पटेल लकी ठरला. तो डी कंपनीच्या शार्प शुटरच्या हाती लागला नाही. खुद्द अंबानी यांनी जावयाला वाचवलं असं म्हणतात. खरं खोटं काय माहित. पण तेव्हाच त्यांना कळालं असेल कि जावई थोडा अतिशहाणा आहे.
कारण पुढच्या काहीच काळात माधव पटेलने दुबईच्या बँकेला आजवरच्या इतिहासातला सर्वात मोठा गंडा घातला.
निरव मोदी, विजय मल्ल्या त्याच्या पुढे काहीच नाहीत. माधव पटेलने दुबईपासून युरोपियन बँकांपर्यंत अनेक ठिकाणी कर्जे घेतली होती. इकडून तिकडे पैसे फिरवणे यामध्ये तो माहीर झाला होता. पण यातून व्याजाची रक्कम वाढत गेली, कर्ज पेलवेना झालं, सासर कडच्यांनी सुद्धा हात वर केले. अशातच एक दिवस माधव पटेल आपल्या ऑफिसमध्ये दिवा लावून गायब झाला.ते वर्ष होता १९९९.
जवळपास बँकांचे भारतीय करन्सी मध्ये बघायला गेले तर २०० कोटी रुपये त्याने बुडवले होते.
दुबईवाल्यांचे डोकं हललं. आजवर त्यांना गंडवणारा माणूस जन्मला नव्हता. पण माधव पटेलने ते करून दाखवलं. त्याला शोधण्यासाठी दुबईची पोलीस हात धुवून लागली. पण साहेब त्यांना झुकांडी देऊन गायब झाले ते सापडलेच नाही.
माधव पटेल दुबईच्या सगळ्यात मोस्ट वॉन्टेडच्या यादीत जाऊन बसला होता.
त्यांनी जंग जंग पछाडूनही त्याचा सुगावा लागला नाही. अखेर २००७ साली त्याचा भारतात सुगावा लागला आणि अटक झाली. त्याच्या वडिलांना देखील काही दिवसांपूर्वीच जाळ्यात अडकवण्यात आलं होतं. ते गोवर्धन दास या नावाने दिल्लीमध्ये लपले होते.
सीबीआय आणि इडीने मिळून हि कारवाई केली होती.
या दोघांना दुबई सरकारने तिकडे पाठवून देण्याची मागणी केली होती. त्याच पुढं काय झालं, त्यांना किती शिक्षा झाली, त्यांनी सगळे पैसे परत केले काय वगैरे वगैरे प्रश्नाची उत्तरे इंटरनेट वर शोधून ही सापडत नाही. काय कारण असावे?
हे हि वाच भिडू.
- अशा पद्धतीने अनिल अंबानी यांनी घर जाळून कोळशाचा व्यापार केला
- कोरोनामुळे दोन तास बंद झालेलं शेअर मार्केट अंबानीने तीन दिवस बंद पाडून दाखवलं होतं
- जेव्हा विमानात मुख्यमंत्री शंकरराव चव्हाणांच्या शेजारी धीरूभाई अंबानी येऊन बसतात.
- धीरुभाई अंबानी : जिंकणाऱ्या माणसाच्या पराभवाचा किस्सा.