माधवराव पेशव्यांनी चर्च बांधून ख्रिश्चन बांधवांना पुणेकर करुन घेतलं..!

पुण्यात ख्रिश्चन बांधव कधी आले. इतिहासात याच उत्तर शोधायला गेलं तर पेशव्यांच्या पराक्रमाचे संदर्भ मिळतात. तत्कालीन राजकारण हे सत्तेच होतं. धार्मिक रंग देण्याच काम तर राजकारणाच्या उदयानंतर मोठ्या प्रमाणात झालं. पण तत्पुर्वी मराठे सैनिक मुघलांच्या सैन्यात देखील असत तसेच पोर्तुगीज मराठा सैन्यात देखील असत. 

१८ व्या शतकाच्या आसपास जे संदर्भ मिळतात त्यामध्ये पेशव्यांच्या सैन्यात असणाऱ्या पोर्तुगीज सैनिकांची संख्या १०० होती. तसेच गोवन कॅथलिक सैनिक २०० च्या आसपास होते.

तोफखान्याबद्दल असणाऱ्या ज्ञानामुळे सैन्यात फक्त त्यांचा सहभागच नव्हता तर त्यांना महत्वाचे स्थान दिले जात असे. कोणत्याही युद्धात त्यांची कामगिरी ही अतुलनीय असायची. 

इव्हॉल्यून ऑफ आर्टिलरी इन इंडिया या रोमेश बुटालीया यांच्या पुस्तकात लिहलं आहे की, १७ व्या शतकात प्रत्येक युरोपीयन व्यक्तिला भारतमध्ये तोफखाना व दारूकामातील एक्स्पर्ट समजल जात असे. युरोपीन सैनिकांकडे असणाऱ्या बंदुकांमुळे त्यांना विशेष आदर होता. 

पोर्तुगीज अधिकारी डॉम मॅन्युअल डि नोव्हो या साऱ्या सैन्याच्या देखरेखीकडे लक्ष द्यायचा.

हाच अधिकारी कर्नाटक व गोव्यामधून पेशव्यांच्या सैन्यात पोर्तुगीज व ख्रिश्चन सैनिकांची भरती करत असे. पेशव्यांच्या सैन्यात असणाऱ्या पोर्तुगीज सैनिकांची गरज लक्षात घेवून त्याने श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांच्याकडे पुण्यात एका चर्चची मागणी केली. माधवराव पेशव्यांनी देखील ख्रिश्चन सैनिकांची ही गरज ओळखून पुण्यात चर्चची पायाभरणी करण्याच्या दिशेने पाऊल टाकले.

तात्काळ अंमलबजावणी करत सध्याच्या नाना पेठेत चर्च बांधण्यासाठी चार एकर जागा दिली. त्याचसोबतीने नाना फडणवीस यांना सांगून चर्च बांधण्यासाठी आर्थिक मदत देवू केली. 

८ डिसेंबर १७९२ साली सध्याच्या चर्चची पायाभरणी झाली. 

प्राथमिक शेडची उभारणी करण्यात आली. पेशव्यांनी दिलेल्या जागेवर पायाभरणी करून पुण्यात पहिल्यांदा ख्रिसमस साजरा करण्यात आला. ती तारीख होती २५ डिसेंबर १७९२. चर्चच्या स्थापनेसाठी ख्रिश्चन सैन्याने व्यक्तिगत पैसे गोळा केले. माधवराव पेशव्यांनी देखील या चर्चसाठी व्यक्तिगतरित्या सढळ हाताने मदत केली. सुमारे वर्षभरात म्हणजे १७९३ साली चर्चची बांधणी पुर्ण झाली त्यानंतर ८ डिसेंबर हा चर्चच्या स्थापनेचा दिवस व २५ डिसेंबर अर्थात ख्रिसमस मोठ्या उत्साहात पुण्यात साजरा करण्यात येवू लागला. 

इमॅक्युलेट कन्सेप्शन ऑफ मदर मेरी अर्थात सिटी चर्चच्या नावाने पुण्याच्या वैभवात या चर्चने भर पाडली. पुढे ब्रिटीश सत्ता संपुर्ण भारतभर विस्तारल्यानंतर १८५२ मध्ये येथे दगडी इमारत बांधण्यात आली व तब्बल १०० वर्षांनी म्हणजेच १९५२ मध्ये आजचे चर्च आकारास आले. 

८ डिसेंबर २०१७ साली या चर्चला २२५ वर्ष पुर्ण झाली. २२५ वर्ष पुर्ण झाल्याच्या निमित्ताने चर्च व ख्रिस्ती बांधवांमार्फत चर्चमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा प्रमुख पाहूणे म्हणून पेशव्यांच्या वशंजांना बोलवण्यात आले होते.

आपण विसरलो असलो तरी पुणेकर झालेल्या ख्रिस्ती बांधवांनी पेशव्यांचे उपकार कधीच विसरले नाहीत. 

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.