माधवराव शिंदेंनी मोठं मन दाखवलं आणि मराठी खासदाराला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळाला
स्व. माधवराव शिंदे म्हणजे काँग्रेसचं तरुण तेजतर्रार नेतृत्व. एकेकाळी त्यांच्या नावाची चर्चा देशाच्या पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून व्हायची. ते देशाचे मोठे नेते तर होतेच शिवाय ग्वाल्हेरचे महाराज देखील होते. ब्रिटिशांच्या काळात २१ तोफांचा मान असणारे हे दिग्गज मराठा सरदार घराणे.
महाराज जिवाजीराव शिंदे यांच्या पाच संतानापैकी एकुलता एक मुलगा म्हणजे माधवराव. त्यांच्या आई म्हणजे महाराणी विजयाराजे यांना सुरवाती पासुन राजकारणात रस होता. १९५७ साली त्या पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आल्या. महाराज जिवाजीराव यांचे अकाली निधन झाले आणि वयाच्या सोळाव्या वर्षी माधवराव शिंदे यांच्यावर ग्वाल्हेर घराण्याच्या राजगादीची जबाबदारी आली.
महाराज पदा सोबत आईचा राजकीय वारसा देखील त्यांच्याकडे आला. मात्र माधवरावांना राजकारणात तितका रस नव्हता. ते क्रिकेट चांगलं खेळायचे. मध्यप्रदेशमध्ये त्यांना खेळताना तत्कालीन कप्तान नवाब टायगर पतौडी यांनी पाहिलं. त्यांना सल्ला दिला की ग्रॅज्युएशन ऑक्सफर्ड विद्यापीठातून पूर्ण कर.
इंग्लंडमध्ये शिकत असताना माधवराव शिंदेंच क्रिकेटमधील प्रेम वाढलं. मात्र जेव्हा ते ग्वाल्हेरला परत आले तेव्हा मात्र विजयराजेंनी त्यांना निवडणुकीसाठी उभं केलं. आईच्या जागी गुना येथे ते खासदारकीला निवडून आले.
इथून माधवराव शिंदे यांची क्रिकेट कारकीर्द संपुष्टात येऊन ते पूर्णवेळ राजकारणी बनले.
मधल्या काळात अनेक राजकीय पायऱ्या चढल्या. स्वतःच्या आईशी म्हणजेच राजमाता विजय राजेंशी मतभेद झाले. विजय राजे भाजपच्या संस्थापिका असतानाही माधवराव काँग्रेसमध्ये गेले व राजीव गांधींच्या टीमचा मुख्य भाग झाले.
राजकारणाच्या घाईगडबडीतही त्यांचा क्रिकेटचा शौक कधी कमी झाला नाही. उलट त्यांनी क्रिकेटच्या प्रशासनात लक्ष घातले. महाविद्यालयीन काळात खेळल्याचा परिणाम त्यांनी बीसीसीआय मध्ये आपली चांगलीच छाप पाडली. पुढे जाऊन ते त्याचे अध्यक्ष देखील बनले.
भारताच्या संसदेची परंपरा आहे कि राजकारणाच्या धामधुमीत विसावा म्हणून अधून मधून खासदारांचे क्रिकेट सामने खेळवले जातात. खुद्द पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू देखील अशा स्पर्धांमध्ये सहभागी झाले होते. पार्लमेंट क्रिकेट टीम म्हणून या संघाला ओळखलं जाई .
पूर्वीच्या काळी के.पी.सिंगदेव, अरुण नेहरू, हरीशास्त्री, माधवराव शिंदे, उदयसिंह गायकवाड असे अनेक खासदार खेळायचे.
माधवराव शिंदे रेल्वेमंत्री असताना रेल्वेची टीम विरुद्ध पार्लमेंटची टीम असा सामना आयोजित करण्यात आला. उत्साहात खासदार अनेक दिवस प्रॅक्टिस करत होते.
रेल्वेची टीम तशी अनुभवी होती. अनेक खेळाडू रणजी फर्स्ट क्लास, अगदी टेस्ट सामने देखील खेळलेले होते. माधवराव शिंदे खरं तर पार्लमेंट टीममध्ये होते पण रेल्वे मंत्री असल्यामुळे त्यांना त्या टीम कडून खेळणे क्रमप्राप्त होतं .
मॅचचे उद्घाटक स्वतः राष्ट्रपती ज्ञानी झैलसिंग होते. तर पंतप्रधान राजीव गांधी सहपत्नीक हा सामना पाहण्यासाठी हजर राहणार होते.
त्या दिवशी दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानात दोन्ही संघात सामना जोरदार झाला. खासदारांच्या टीमने रेल्वेच्या अनुभवी टीमला चांगलंच झुंजवलं. कोल्हापूरचे खासदार उदयसिंह गायकवाड यांनी जबरदस्त बॅटिंग केली. त्यांना के.पी.सिंग यांनी चांगली साथ दिली. पक्षाचा भेदाभेद सोडून खासदार संसदेला जिंकवण्यासाठी प्रयत्नशील होते.
मात्र रणजी खेळणाऱ्या रेल्वेच्या टीमला ते हरवू शकले नाहीत. अगदी थोडक्यात त्यांचा पराभव झाला.
मॅच चा पारितोषिक वितरण समारंभ राष्ट्रपतींच्या हस्ते होणार होता मात्र उदघाटन झाल्यावर ग्यानी झैलसिंग यांनी काही कारणांमुळे राष्ट्रपती भवनात परतावं लागलं होतं. त्यांच्या जागी त्यांच्या पत्नीने पुरस्कार दिले. माधवराव शिंदेंना मॅच जिंकल्याची ट्रॉफी प्रदान करण्यात आली तेव्हा त्यांनी राष्ट्रपतींच्या पत्नीला लावून प्रणाम केला. त्यावेळी त्यांच्यात असलेली शालीनता व अदब यांचं दर्शन साऱ्यांना झालं.
मॅचचे जे रफेरी होते त्यांनी मॅन ऑफ द मॅच म्हणून माधवराव शिंदे , उत्तम खेळाडू म्हणून उदयसिंहराव गायकवाड आणि उत्कृस्ट बॉलर म्हणून के.पी.सिंग देव यांची नावं जाहीर केली. मात्र हि नावे जाहीर होताच माधवराव स्वतः माईकजवळ आले आणि म्हणाले
“मी रेल्वे मंत्री आहे म्हणून मला मॅन ऑफ द मॅच जाहीर केलंय. खरं तर मन ऑफ द मॅच कोल्हापूरचे खासदार उदयसिंह गायकवाड आहेत. त्यांनी सर्वात जास्त धावा काढल्या व ते बाद हि झाले नाहीत. त्यांच्या धडाकेबाज बॅटिंग मुळे आजचा सामनावीर म्हणून मी त्यांचं नाव जाहीर करतो.”
कोल्हापूर जवळ असलेलं जोतिबा देवस्थान हे शिंदे घराण्याचं कुलदैवत. माधवराव शिंदे त्या निमित्ताने बऱ्याचदा कोल्हापूरला यायचे. प्रत्येक वेळी देवदर्शनाला जाताना उदय सिंहराव गायकवाड त्यांच्या सोबत असायचे. या मैत्रीची आठवण म्हणून आणि खिलाडू वृत्ती म्हणून त्यांनी मॅन ऑफ दि मॅच चा पुरस्कार आपल्या मित्राला दिला.
हे ही वाच भिडू.
- किडनॅप करायला आलेल्या अतिरेक्यांना कोल्हापूरच्या खासदारांनी साफ गंडवलं.
- पंडित जवाहरलाल नेहरू क्रिकेटची बॅट घेऊन मैदानात उतरले होते !
- दिल्लीवर देखील पकड ठेवणाऱ्या शिंदे घराण्याचा इतिहास बंडखोरीचा आहे.
- मध्यप्रदेशाचं एकीकरण घडवून आणणाऱ्या जोतिबाच्या नावानं चांगभल.