माधवराव सिंधिया आणि त्यांच्या आयुष्यात घडून गेलेले तीन दुर्दैवी विमान अपघात…

गेल्या महिन्यातच नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते सिंधुदुर्गातील बहुप्रतिक्षित चिपी विमानतळाचं उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येईल असं जाहीर करून टाकलं होतं.

उल्लेखनीय म्हणजे, काही दिवसांपूर्वी शिवसेनेकडून अशाच पद्धतीचा कार्यक्रम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याद्वारे आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आल्यानंतर राणेंनी ही घोषणा केली होती.

राणेंनी जाहीर केल्याप्रमाणे केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते आज उदघाटन सोहळा पार पडला. प्रत्यक्ष उपस्थित न राहता आल्यामुळे त्यांनी ऑनलाईन विमानतळाचे उदघाटन केले.

पूर्वाश्रमीचे काँग्रेस चे असणारे नारायण राणे आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांना भारतीय जनता पक्षाने राज्यसभेची खासदारकी देऊन नंतर  केंद्रात मंत्री केले. नारायण राणे यांना सूक्ष्‍म, लघु आणि माध्यम उद्योग खाते दिले आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांना नागरी उड्डाण खाते दिले.

पण तुम्हाला माहितीये का कि नागरी उड्डाण खात्याशी आणि विमानांशी ज्योतिरादित्य सिंधिया यांचा जुना संबंध आहे ?

ज्योतिरादित्य सिंधिया यांचे वडील माधवराव सिंधिया हे सुद्धा काँग्रेस चे मातब्बर नेते होते.  १९७१ मध्ये मध्यप्रदेश मधील गुना मतदार संघातून त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली. मतदारांनी त्यांना भरगोस मते देऊन निवडून सुद्धा दिले. १९७१ मध्ये जेव्हा ते पहिल्यांदा लोकसभेत निवडून गेले तेव्हा त्यांचे वय हे फक्त २६ वर्षे इतके होते.  त्यांनंतर त्यांनी एकदाही पराभव अनुभवला नाही. ते प्रत्येक निवडणुकीत विजय मिळवत गेले. ते एकूण ९ वेळा निवडणूक जिंकून लोकसभेवर गेले.

माधवराव सिंधिया यांच्या  बद्दल विशेष सांगायचं झालं तर त्यांनी १९८४ च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे दिग्गज नेते व भारताचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा ग्वालियर मतदारसंघातून पराभव केला होता.

विशेष म्हणजे आज ज्या नागरी उड्डाण खात्याचा कारभार ज्योतिरादित्य सिंधिया सांभाळत आहेत त्याच खात्याचे मंत्री म्हणून त्यांचे वडील माधवराव सिंधिया यांनी सुद्धा कारभार बघितला होता. 

माधवराव सिंधिया यांच्या बद्दल सांगायचं झालं तर तीन विमान अपघात त्यांच्या आयुष्यात महत्वाचे ठरले.

पहिला अपघात म्हणजे संजय गांधी यांना झालेला विमान अपघात.

माधवराव सिंधिया यांचं सुरवातीपासून गांधी कुटुंबाशी अगदी जवळकीच नातं होतं. संजय गांधी यांच्याशी त्यांचे मित्रत्वाचे संबंध होते.  २३ जून १९८० रोजी जेव्हा इंदिरा गांधी यांचे सुपुत्र संजय गांधी हे विमानाने उड्डाण घेणार होते त्या दिवशी त्यांच्या सोबत माधवराव सिंधिया हे त्यांच्यासोबत असणार होते. पण त्या दिवशी माधवरावांना उशीर झाला आणि त्यापूर्वीच संजय गांधी यांनी सुभाष सक्सेना यांच्यासोबत विमानाने उड्डाण घेतले. दुर्दैवाने त्या विमानाचा अपघात होऊन संजय गांधी यांचे दुर्दैवी निधन झाले.

नशिबाने माधवराव सिंधिया या विमान अपघातातून वाचले. विमान अपघाताची मालिका त्यांच्या आयुष्यातून सुटली नाही.

१९९१  जेव्हा काँग्रेस सरकार आलं तेव्हा पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांनी त्यांच्यावर नागरी उड्डाण खात्याची जबाबदारी टाकली होती. माधवराव सिंधिया तेव्हा भावी पंतप्रधान म्हणून ओळखले जायचे. पुढे नरसिंह राव यांच्याशी त्यांचे खटके उडण्यास सुरवात झाली होती. अशातच एअर इंडियाच्या एका विमानाचा अपघात.  सुदैवाने त्यामध्ये कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाली नव्हती. तरी माधवराव सिंधिया यांनी त्या घटनेची जबाबदारी स्वीकारत आपला राजीनामा पंतप्रधानांकडे सुपूर्द केला.

विमान अपघातामुळे मंत्र्याने राजीनामा देणे अशी हि भारतातली पहिलीच घटना होती.

यानंतर येतो तिसरा विमान अपघात.

सुदैवाने माधवराव संजय गांधींच्या विमान अपघातातून बचावले होते परंतु नियतीला काही वेगळंच मान्य होते. विमानाचा त्यांच्या आयुष्यातील संबंध अजून  संपलेला नव्हता. दिवस होता ३० सप्टेंबर २००१  चा , एका रॅली ला संबोधित करण्यासाठी जाताना उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथे त्यांच्या विमानाला आग लागली त्यात विमानात असलेल्या ८ जणांचा त्यात होरपळून मृत्यू झाला. गळ्यातील लॉकेट वरून त्यांची ओळख पटवण्यात आली होती.

ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या आयुष्यात नागरी उड्डाण खाते आणि विमाने अनेक अंगाने महत्वाचे राहिलेले आहे.आज नागरी उड्डाण मंत्री म्हणून काम पाहत असताना त्यांना त्यांच्या वडिलांच्या आठवणीने नक्कीच भरून येत असेल.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.