मोदींनी गुजरातमध्ये सलग तीन वेळा हॅट्रिक केली पण यांचा विक्रम मोडू शकले नाहीत.
ही १९४० चे दशकातली गोष्ट आहे. मॅट्रिक पास झाल्यानंतर एक मुलगा आपल्या भविष्यासाठी धडपडत होता. त्याला तोच प्रश्न होता जो त्याच्या वडिलांनाही एकेकाळी होता, तो म्हणजे, पुढील अभ्यासासाठी पैसे कोठून येतील?
शेतकरी कुटुंब, वडील फूल सिंग कसेबसे आठवीपर्यंत शिकू शकले होते. पैशाअभावी पुढे शिकता आले नाही. मात्र, या प्रशिक्षणामुळे त्यांना प्राथमिक शाळेत सात रुपये पगार असलेल्या मास्तराची नोकरी मिळाली. इतक्या पैशासाठी घरचा खर्चही क्वचितच चालू शकत होता. तर मग पुढील अभ्यासासाठी पैसे कोठून आणायचे हा प्रश्न होता.
मग त्या मुलाने एका ओळखीच्या व्यक्तीमार्फत गुजरातचे प्रसिद्ध गांधीवादी नेते इंदुलाल याज्ञिक यांची भेट घेतली. इंदू लाल यांनी त्याला मासिक १० रुपये स्टायपेंड देऊ असे सांगितले. राहण्याचे ठिकाण साबरमती आश्रम, गुजरात. अभ्यास पुन्हा सुरू झाला. इंदूलाल याग्निक यांच्या मदतीने ते पत्रकार बनले.
हा पत्रकार म्हणजे गुजरात सह देशाचं राजकारण बदलणारा मुख्यमंत्री माधवसिंह सोलंकी.
माधव सिंह सोलंकी त्यावेळी गांधी आश्रमात राहत होते. लोकनाथ वर्तमानपत्रात नोकरी करत करत त्यांनी वकिलीचा अभ्यास सुरू ठेवला. या वेळी त्यांचा एक वर्गमित्र हमीद कुरेशी होता. कुरेशी लहानपणापासून साबरमती आश्रमात राहत होते. तिथेच माधव आणि हमीद यांची येथे भेट झाली.
अशातच १९५७ च्या विधानसभा निवडणुका आल्या. त्यावेळी गुजरात हे मुंबई रेसिडेन्सीचा भाग असायचा. हमीद यांनी माधव यांना कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा सल्ला दिला. तरुण माधवने हा सल्ला धुडकावून लावला. माधव गरीब कुटुंबातून होता, तो हमीदला म्हणाला,
“मला माझी वकिली पूर्ण करून पैसे कमवायचे आहेत, जेणेकरून मी माझ्या कुटुंबाला मदत करू शकेन.”
बाबू जशभाई पटेल यांना ही माहिती मिळाली. त्या वेळी ते मुंबई प्रेसिडेन्सीचे उपमुख्यमंत्री असायचे. बाबू जशभाई पटेल हे माधवसिंग सोळंकी यांचे सासरे ईश्वरभाई यांचे जवळचे मित्र होते. त्यांनी मुंबईतून ईश्वरभाईंना पत्र पाठवले. पत्रात म्हटले होते,
“या निवडणुकीत तुमच्या जावयाला काँग्रेसकडून उभे राहण्यास भाग पाडले तर कसे राहील?”
सासऱ्याने आणलेल्या पोस्टकार्ड द्वारे माधवसिंग सोलंकी राजकारणात दाखल झाले. बाबूभाई पटेल हे त्याचे लेखक होते. पुढे याच बाबूभाई पटेल यांचे सरकार पाडून माधवसिंग सोळंकी मुख्यमंत्री झाले.
मात्र १९५७ मध्ये पहिल्यांदा विधानसभा जिंकून त्यांच्या राजकारणाची सुरवात बाबुभाई पटेल यांच्या शिफारसीमुळे झाली होती. पुढच्या टर्ममध्ये स्वतंत्र गुजरातच्या पहिल्या मंत्रिमंडळात ते महसूल मंत्री झाले. त्यानंतर १९७५ पर्यंत सलग काँग्रेस सरकारमध्ये मंत्री होते.
१९७५ च्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नव्हते. जनसंघाच्या ६७, कॉंग्रेसच्या (ओ) ७० आणि चिमणभाई पटेल यांच्या किसान मजदूर लोकपक्षाच्या १२ आमदारांमुळे बाबूभाई पटेल राज्याचे मुख्यमंत्री झाले. या युतीला ‘जनता मोर्चा’ असे नाव देण्यात आले.
आणीबाणीनंतर सुमारे नऊ महिन्यांनी चिमनभाई पटेल यांनी आपली निष्ठा बदलली आणि फेब्रुवारी १९७६ मध्ये जनता मोर्चाचे सरकार पडले. हा आणीबाणीचा काळ होता आणि काँग्रेसच्या (ओ) आमदारांची आपली पक्षनिष्ठा झपाट्याने बदलू लागली होती .
डिसेंबरच्या सुरुवातीला इंदिरा काँग्रेसच्या छावणीतील आमदारांची संख्या ७५ वरून १०४ वर आली.
इंदिरा गांधींच्या सांगण्यावरून माधवसिंग सोळंकी यांनी डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यपालांसमोर सरकार स्थापन करण्याचा दावा केला. २४ डिसेंबर रोजी त्यांनी राज्याचे सातवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
मात्र हे सरकार फार काळ टिकू शकले नाही. इंदिरा गांधी यांनी मार्च 1977 मध्ये लोकसभा निवडणुका जाहीर केल्या. केंद्रात काँग्रेसचा ऐतिहासिक पराभव झाला. मोरारजी देसाई देशाचे नवे पंतप्रधान झाले. त्यामुळे गुजरातमध्ये पुन्हा राजकीय अस्वस्थेची परीस्थिती निर्माण झाली होती. काँग्रेस (ओ) आणि जनसंघ यांच्यामध्ये राजकीय विलीनीकरण झाले. केंद्राच्या धर्तीवर त्याला जनता पक्ष असे नाव देण्यात आले. बंडखोर आमदारांचे घरवापसी सुरू झाली आणि कॉंग्रेस पुन्हा एकदा 75 च्या वर आली.
10 एप्रिल 1977 रोजी माधवसिंग सोळंकी सरकारने सभागृहात बहुमत गमावले आणि ते सत्तेतून बेदखल झाले.
माधवसिंग सोलंकी हे 80 च्या दशकात गुजरातच्या राजकारणाचे स्वरूप बदलणाऱ्या नेत्यांपैकी एक आहेत.
राजकारणात योगायोगाने आलेले माधवसिंग सोळंकी चार वेळा गुजरात राज्याचे मुख्यमंत्री झाले होते. त्यांच्या यशामागचं सिक्रेट म्हणजे, जातीची समीकरणे आपल्या बाजूने साध्य करण्याची त्यांच्याकडे एक अद्भुत क्षमता होती. त्यावेळी त्याचं ‘खाम’ समीकरण हे संपूर्ण देशातील चर्चेचा विषय होता.
काय आहे हे खाम समीकरण?
खाम म्हणजे क्षत्रिय (ओबीसी), हरिजन, आदिवासी आणि मुस्लिम. गुजरातच्या राजकारणातील विजयाचे हे समीकरण माधवसिंग सोळंकी यांची देणगी आहे. आता ही वेगळी गोष्ट आहे की, त्यांनी स्वतःच्या तोंडून ‘खाम’ हा शब्द कधीच उच्चारला नव्हता. या समीकरणाच्या आधारेच 1985 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने विक्रमी 149 जागा जिंकल्या.
एका टीव्ही मुलाखतीत, माधवसिंग सोलंकी यांना असे मजबूत राजकीय समीकरण निर्माण करण्याची कल्पना कुठून मिळाली? असे विचारले असता, सोळंकी यांनी याबद्दल एक मजेदार किस्सा सांगितला,
“इंदिरा गांधी 1980 च्या लोकसभा निवडणुकीत प्रचाराला आल्या होत्या. लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या नावाने मान्यता मिळविण्यासाठी मी त्यांच्याकडे संपर्क साधला. मी सुचविलेल्या सर्व 26 नावांना त्यांनी होकार दिला.
मग मी त्यांना नम्रपणे विचारले, “मॅडम, अजून काही आदेश.”
त्या मला म्हणाल्या,
“हरिजन, आदिवासी, मागासवर्गीय, अल्पसंख्याक आणि स्त्रिया हा काँग्रेसचा सर्वात मोठा जनाधार आहे. त्याला चांगल्या प्रकारे मोबालाईज करा.”
माधवसिंग सोलंकी म्हणतात की त्यांनी खाम हा शब्द कधीही वापरला नाही परंतु हे समीकरण मात्र मोठ्या प्रमाणात वापरले.
याच समीकरणाच्या आधारे 1980 च्या विधानसभा निवडणुका लढवल्या गेल्या. काँग्रेसने राज्यातील भाजपलाही हरवलं. विधानसभेच्या एकूण 182 जागांपैकी 141 जागा काँग्रेसच्या खात्यात गेल्या. माधवसिंग सोळंकी यांनी या निवडणुकीत आनंद जिल्ह्यातील भांद्रां ची सीट विक्रमी 30378 मतांनी जिंकली.
असे बनले मुख्यमंत्री..
1980 च्या विजयानंतर काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीसाठी संघर्ष सुरू झाला. मुख्यमंत्री पदासाठी अनेक दावेदार उभे राहिले. माधवसिंग सोळंकी यांच्याशिवाय काँग्रेस मधील दिग्गज नेते रत्तुभाई अदानी हे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीचे प्रबळ दावेदार मानले जात होते. गुजरात कोट्यातून केंद्रातील गृह राज्यमंत्री योगेंद्र मकवाना यांनी हा संघर्ष त्रिकोणी केला. दक्षिण गुजरातमध्ये वर्चस्व असलेल्या जिनाभाई दरजींची पकड बऱ्यापैकी मजबूत होती. दरम्यान, बडोद्याचे माजी राजकुमार फतेहसिंग गायकवाड हेही मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीसाठी दावेदार होते.
त्यामुळे काँग्रेसमध्ये फूट पाडण्याची भीती निर्माण झाली.
माधवसिंग सोलंकी यांनी हा बहुकोनी सत्तासंघर्षात कसं जिंकले ?
येथे त्यांना संजय गांधी आणि इंदिरा गांधी यांच्या जवळीकीचा फायदा झाला. योगेंद्र मकवाना देखील संजय गांधीच्या अगदी जवळ होते. परंतु वयाच्या मानाने अगदी लहान होते, यामुळे त्यांचा पत्ता कट झाला. खरे तर माधवसिंग सोळंकी यांनी निवडणुकीपूर्वीच मुख्यमंत्री होण्याचा दावा केला होता. ते प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष होते, त्यामुळे तिकीट वाटपात त्यांचा सहभाग महत्वाचा होता. सोळंकी यांनी आपल्या जवळपास 80 समर्थकांना तिकिटे वाटली. तेंव्हा काँग्रेस ची लाट होती त्यामुळे ते जवळपास सर्वजण विजयी झाले. यामुळे त्यांची दावेदारी मजबूत झाली.
एक रेकॉर्ड जो मोदी देखील मोडू शकले नाहीत..
2012 च्या गुजरात विधानसभेपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आपल्या पक्ष सदस्यांसाठी मिटिंग घेत होते. पंतप्रधानपदासाठी त्यांची संपूर्ण उमेदवारी या निवडणुकीवर अवलंबून होती. यावेळी आपल्याला कोणत्याही परिस्थितीत माधवसिंग सोळंकी यांचा रेकॉर्ड तोडायचा आहे, असे त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ सदस्यांना सांगितले.
तर मग या निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी ते, माधवसिंग यांचा विक्रम मोडू शकले नाही. 1985 च्या विधानसभा निवडणुकांचा हा विक्रम होता. गुजरातमध्ये त्या वर्षीच्या निवडणुकीत माधवसिंग सोळंकी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसने 182 पैकी 149 जागा जिंकून नवा विक्रम प्रस्थापित केला होता. मोदींना तो विक्रम मोडणे कधीच शक्य झाले नाही.
या विजयात इंदिरा गांधींच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या सहानुभूतीमुळे हे सर्वं शक्य झाले असे काही राजकीय विश्लेषक म्हणतात. माधवसिंग सोलंकी यांनी 11 मार्च रोजी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रातील मथळे असे होते,
“नव्या मंत्रिमंडळात सवर्ण वर्गातून एकही मंत्री नाही.”
माधव सिंग यांनी सत्तेवर येताच आपला अजेंडा स्पष्ट केला होता. त्यांचे सरकार दलित, मागास आणि आदिवासींचे सरकार होते.
‘खाम’ समीकरणाचा अजेंडा त्यांनी पुढे नेण्यास सुरुवात केली. याच खामी समीकरणावर त्यांनी तब्बल चार वेळा गुजरातचा मुख्यमंत्री होण्याचा विक्रम केला. त्याचाय्वर बरेच आरोप झाले. त्यांनी लागू केलेल्या आरक्षणावरून टीका देखील झाली, दंगली झाल्या. पंतप्रधान राजीव गांधींनी त्यांना पदावरून खाली देखील खेचलं.
पण माधवसिंह सोळंकी यांचा करिष्मा असा होता कि त्यांच्या वाचून गुजरात मध्ये राजकारण करणे काँग्रेसला जमलेच नाही.
माधव सिंह सोळंकी यांच्यानंतर इतकी पॉवर असणारा एकमेव नेता गुजरातमध्ये झाला. तो म्हणजे नरेंद्र मोदी. मोदींनी तर सलग तीन वेळा मुख्यमंत्री होऊन थेट पंतप्रधानपदाला गवसणी घातली. अनेक विक्रम केले, कोणताही राजकीय वारसा नसताना देश जिंकून दाखवला. मात्र इतके असतानाही त्यांना एक खंत आयुष्यभर राहील, ते स्वतःच्या घरच्या राज्यात माधवसिंह सोळंकी यांचा विक्रम कधी मोडू शकले नाहीत.
हे ही वाच भिडू.
- गांधीजींचे खासगी डॉक्टर पुढे जाऊन कसे बनले गुजरातचे पहिले मुख्यमंत्री
- अन्यथा १९९६ सालीच गुजरातमध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता
- मोदी एकदा चक्क राजीव गांधींना भेटायला गेले होते, अहमद पटेलांनी गाठ घालून दिली होती..