क्रिकेटर व्हायला आलेले मधु दंडवते या घटनेनंतर राजकारणात आले

मधु दंडवते आणि प्रमिला दंडवते, राजकारणातील आदर्श जोडप. समाजवादाची चळवळ त्यांनी आयुष्यभर आपल्या शिरावर वाहिली आणि या पन्नासवर्षाच्या सार्वजनिक जीवनात एकदाही त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा अथवा चुकीच्या वर्तनाचा आरोप त्यांच्यावर झाला नाही.

मधु दंडवते यांचा जन्म २१ जानेवारी १९२४ साली मुंबई येथे झाला. तिथेच त्यांनी भौतिकशास्त्रात एम.एस्सीची पदवी संपादन केली. मुंबईच्याच सिद्धार्थ महाविद्यालयाचे ते उपप्राचार्य आणि फिजिक्स विभागाचे विभागप्रमुख होते.

१९४२च्या स्वातंत्र्यलढ्याच्यावेळी पासून ते चळवळीत उतरले. गोवा मुक्तीसंग्राम असो, संयुक्त महाराष्ट्र चळवळ असो किंवा आणीबाणीच्या धोपटशाहीविरुद्धचा लढा असो, प्रत्येकवेळी हा समाजवादी सैनिक  प्रत्येक लढ्यात अग्रभागी होता. या चळवळीच्या मुळे त्यांना अनेकदा जेलची हवा खावी लागली, पण मागे हटले नाहीत.

पण मधू दंडवते मुंबईत कधी राजकारणी बनायला आलेच नव्हते, खरं तर त्यांना क्रिकेटपटू व्हायच होत.

तर ते साल होत १९४६चं. तेव्हा भारतीय नाविक बंड सुरू होत. मधू दंडवते त्यावेळी २२ वर्षांचे होते. रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे अतिशय हुशार विद्यार्थी. नगरला त्यांचं शालेय शिक्षण झालं होतं. विश्वास बसणार नाही पण मधू दंडवते शाळेच्या क्रिकेट टीमचे कॅप्टन होते.

उत्तम बॅट्समन ! स्पिन बोलर !!

उत्तम क्रिकेटपटू म्हणून दंडवतेंना नाव कमावता यावं या हेतूनं त्यांच्या वडिलांनी त्यांना उच्च शिक्षणासाठी मुंबईला पाठवलं होतं पण मुंबईच्या त्यावेळच्या ध्येयधुंद वातावरणात ते संपूर्णपणे चळवळीत गुरफटले गेले.

नाविक बंडाच्या वेळी दक्षिण मुंबईत वातावरण तंग होतं. ब्रिटिशांनी रस्त्यावर सैन्य आणलं होतं. मफतलाल शहा भुलेश्वरला गोळीबारात ठार झाला होता. लोक चेतावले होते. गिरगावात रस्त्यावर बॅरिकेड्स उभे करून गोऱ्या सोजिरांना घेऊन येणाऱ्या ट्रक्सना अडवलं जात होतं. एका प्रसंगी गिरगावातील गायवाडीच्या आसपास असे अडथळे उभे करण्यात आले तेव्हा नाविकांनी सांगितलं

असं करू नका, गोळीबार होईल. अडथळे काढा.

हे अडथळे काढण्यात इतरांबरोबर दंडवतेही होते. दगडविटा हालवेपर्यंत गोऱ्या सोजिरांचा ट्रक आला तेव्हा पळापळ झाली. मधूही धावत गायवाडीपाशी एका भिंतीला टेकून उभा राहिले. त्यांच्या बाजूला गोखले नावाचा मुलगा तसाच भिंतीला घट्ट टेकून उभा होता. ट्रकमधून येणाऱ्या सोजिरांनी जमाव पांगविण्यासाठी गोळीबार सुरू केला. गोळी शेजारी उभ्या असलेल्या गोखलेला लागली. बंदूक एक दोन इंच दुसऱ्या बाजूला झाली असती तर गोळी दंडवतेंना लागली असती. पण त्यांचं नशीब सिकंदर.

हा दिवस सोडला तर त्यांनी क्रिकेटपटू होण्याचं स्वप्न सोडलं आणि ते चळवळीत ओढले गेले. १९७१ साली कोकणच्या राजापूर लोकसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले.

दिल्लीच्या हवेत गेल्यावर भल्या भल्या विश्वामित्रांची तपस्या भंग होते पण मधुजींच्या बाबतीत तसे घडले नाही. लोकसभेमध्ये मधु दंडवते बोलयला उभे राहिले की आता अभ्यासपूर्ण भाषण ऐकावयास मिळणार म्हणून पूर्ण सभागृहात शांतता निर्माण होई. इंदिरा गांधीच्या पासून राजीव गांधींच्यापर्यंत अनेकांना त्यांनी विरोधी बाकावरून खिंडीत पकडले.

आणिबाणीच्या लढ्यानंतर इंदिरा गांधींचा पराभव करण्यात जनता पक्षाला यश मिळाले. मोरारजी देसाई पहिले गैरकाँग्रेसी पंतप्रधान बनले. या मंत्रिमंडळात मधु दंडवते यांचा रेल्वेमंत्री म्हणून समावेश करण्यात आला होता. जेव्हा ही बातमी मधुजीना सांगण्यासाठी कोणीतरी त्यांच्या घरी गेले तेव्हा ते आपल्या बाथरूममध्ये स्वतःचे कपडे धुण्यात व्यस्त होते.

आयुष्यभर विरोधी बाकांवर काढलेल्या जनता पक्षाच्या नेत्यांनी सरकार मध्ये आल्यावर भ्रष्टाचार आणि अनागोंदीचे प्रस्थ माजवले अपवाद फक्त मधु दंडवते. आजकालच्या राजकारणात  साधेपणा ही मिरवण्याची आणि मार्केटिंगची गोष्ट झाली आहे.  अशा वेळी आदर्शवादी मधूजींसाठी साधेपणा ही जगण्याची रीत होती.

सत्ता गेल्यावर खासदारांना संसदेत न्यायला येणाऱ्या मिनी बसनेच ते प्रवास करत. संसदेतून जेव्हा एखाद्या खासदाराची अथवा मंत्री संसदेतून बाहेर जाण्यासाठी निघत तेव्हा मुख्य सुरक्षा अधिकारी  माईकवर घोषणा करीत की “अमुकसाब कि गाडी ले आईये.”

माजी केंद्रीय मंत्री असले तरी बसने प्रवास करणाऱ्या मधुजीच्या बाबतीत कधी अशी वेळ यायची नाही. याचे त्यांचे मित्र आणि जेष्ठ पत्रकार अशोक जैन यांना वैषम्य वाटे.

अशोक जैन यांनी एकदा एक सेकंड हँड कार खरेदी केली. एक दिवस ते मधु दंडवते यांना संसदेतून आणण्यासाठी ते कार घेऊन गेले. मधुजीना पार्लमेंटच्या पोर्चमध्ये उभं केलं आणि दरवानाला सांगितलं की दंडवतेची गाडी आहे. त्या दिवशी संसदेत पहिल्यांदा घोषणा झाली की ,

“दंडवते साब की गाडी आ रही है.”

मधु दंडवते यांच १२ नोव्हेंबर २००५ रोजी निधन झालं. त्यावेळी त्यांच्या शेवटच्या इच्छेप्रमाणे त्यांचे पार्थिव कोणतेही अंत्यसंस्कार न करता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास दान देण्यात आले. याप्रसंगी माजी पंतप्रधान व्ही.पी.सिंग म्हणाले,

“मृत्यूनंतरही  त्यांनी शरीर दान करून देशाची आणि मानवजातीची सेवा करण्याचं व्रत अखंड ठेवलं “

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.