महाराष्ट्राच्या नेत्याने फक्त फ्रेंडशिपचा हवाला देऊन मोरारजींचे सरकार पाडले..

भारतात स्वातंत्र्यापासून काँग्रेसची सत्ता होती. सर्वप्रथम जवाहरलाल नेहरू त्यांच्यानंतर त्यांचे वारसदार म्हणवले जाणारे लालबहादूर शास्त्री आणि मग त्यांच्या सुपुत्री इंदिरा गांधी. १९७१ साली पाकिस्तानचे दोन तुकडे करणाऱ्या इंदिराजींची लोकप्रियता शिखरावर पोहचली होती की काँग्रेस सोडून दुसरे सरकार येईल याचं स्वप्न देखील विरोधकांना नव्हतं.

अशातच इंदिराजींनी आणीबाणी लागू करण्याची चूक केली आणि त्यांची लोकप्रियता ढासळण्यास सुरवात झाली. विरोधकांना नव्याने एनर्जी मिळाली. जयप्रकाश नारायण यांच्या जनता पक्षाच्या झेंड्या खाली सगळे पक्ष एकत्र आले. त्यांनी निवडणूक जिंकली, इतकेच नाही तर खुद्द इंदिरा गांधी, संजय गांधी खासदारकीला पडले.

भारतात पहिल्यांदाच बिगर काँग्रेसी सरकार स्थापन झाले. या जनता प्रयोगाचे पंतप्रधान बनले मोरारजी देसाई.

खरे तर मोरारजी देखील एकेकाळचे काँग्रेसी. नेहरूंच्या आणि इंदिराजींच्या मंत्रिमंडळात मोठमोठी पदे भूषवलेले मोरारजी इंदिरा गांधींबरोबर असलेल्या मतभेदामुळे बाहेर पडले होते. खरे तर या विजयाचे शिल्पकार म्हणून जयप्रकाश नारायण यांनी पंतप्रधानपद स्वीकारावे अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती पण सत्तेपासून दूर राहण्याची भीष्म प्रतिज्ञा त्यांनी केली होती.

अखेरीस सत्ता चालवण्यात अनुभवी म्हणून मोरारजींच्या गळ्यात पंतप्रधानपदाची माळ पडली.

जनता सरकारात समाजवादीपासून जनसंघापर्यंत अनेक विचारांचे दिग्गज नेते सामील होते. इंदिरा गांधींच्या सरकारमध्ये यापैकी अनेक जण भूमिगत झाले होते, कित्येकांनी कारावास देखील स्वीकारला होता. यात प्रामुख्याने नाव घेतलं जात होतं जॉर्ज फर्नांडिस, मधु लिमये, अटलबिहारी वाजपेयी यांचं. हे सगळे नेते मंडळी मोरारजींच्या मंत्रिमंडळात सामील झाली पण मधु लिमये मंत्रिपदापासून दूर राहिले.

मुझे मंत्री नहीं बनना. आप मेरी जगह पुरुषोत्तम कौशिक को मंत्री बना दीजिए.”

मधु लिमये म्हणजे समाजवादी विचारांचा पुरस्कार करणारे मोठे नेते. राम मनोहर लोहियांच्या मृत्यूंनंतर प्रजा समाजवादी पक्षाची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली होती. स्वातंत्र्य लढ्यापासून ते गोवा मुक्तिसंग्राम पर्यंत प्रत्येक लढ्यात अग्रभागी राहून संघर्ष केलेल्या लिमयेंच्या अभ्यासू व्यक्तिमत्वाचा दबदबा लोकसभेमध्ये देखील होता.

ते भाषणासाठी उभे राहिले कि मोठमोठ्या नेत्यांना देखील घाम फुटायचा. मधु लिमये महाराष्ट्रात जन्मले असले तरी यांचा दबदबा एवढा मोठा होता की ते थेट बिहार मधून चार वेळा खासदार बनले होते. एका निवडणुकीत तर त्यांनी राजनारायण यांचा आणि काँग्रेसच्या दरोगा सिंग यांचा पराभव केला होता. पुढे जाऊन इंदिरा गांधींना पाडणाऱ्या राजनारायण यांचे डिपॉजिट मधु लिमयेंनी जप्त केले होते.

मधु लिमयेंच्या या विजयात सिंहाचा वाटा होता त्यांचे खास दोस्त जॉर्ज फर्नांडिस यांचा.

फर्नांडिस यांनी त्यांच्या प्रचारात केलेली भाषणे बिहार मध्ये प्रचंड गाजली होती. या विजयामुळे फर्नांडिस यांना एवढा आत्मविश्वास वाढला की आणीबाणी नंतर त्यांनी आपल्या हक्काच्या मुंबई मतदारसंघाऐवजी बिहारच्या मुझफ्फरपूर येथून  निवडणूक लढवली. एकदाही प्रचार न करता ते तीन लाखांच्या मतांनी निवडून आले.

मधु लिमये सत्तेपासून जरी दूर राहिले असले तरी त्यांचे खास मित्र जॉर्ज फर्नांडिस मोरारजींच्या मंत्रिमंडळात उद्योग मंत्री झाले.

त्यांची उद्योगमंत्री म्हणून कारकीर्द अनेक अर्थानी गाजली. त्यांनी आयबीएम, कोका कोला या अमेरिकी कंपन्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. लालफितीचा लायसन्सराज कडक केले. अनेक सरकारी उद्योग सुरु केले.

हे सगळं सुरु होतं मात्र जनता सरकारमध्ये सगळं काही आलबेल नव्हतं.

मोरारजींचा कारभार हा हुकूमशाही थाटाचा आहे असे अनेक सहकारी म्हणू लागले होते. मंत्रिमंडळात वाद होऊ लागले. ठरलेल्या ही भांडणे सोडवायला जयप्रकाश नारायण देखील नव्हते. भ्रष्टाचार विरोधी आंदोलन करून आलेलं हे सरकार आपल्या मूळ उद्दिष्टापासून ढळलं आहे अशी टीका केली जात होती.

खरं तर मधु लिमये व इतर अनेक नेते काँग्रेसी पार्श्वभूमी असणाऱ्या मोरारजी देसाई यांच्या कारभाराबद्दल खुश नव्हते. मधु लिमये यांचा सरकारमध्ये सामील असणाऱ्या जनसंघाबद्दल देखील राग होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी त्यांना पटत नव्हती. ते म्हणायचे,

” उनके दिमाग का किवाड़ बंद है. उसमें कोई नया विचार पनप नहीं सकता. बल्कि  RSS की यह विशेषता रही है कि वह बचपन में ही लोगों को एक खास दिशा में मोड़ देता है. पहला काम वे यही करते हैं कि बच्चों और नौजवानों की विचार प्रक्रिया को ‘फ्रीज़’ कर देते हैं. उन्हें जड़ बना देते हैं. जिसके बाद कोई नया विचार वे ग्रहण ही नहीं कर पाते” 

त्यांनी जनसंघाच्या नेत्यांच्या दुहेरी सदस्यत्वाच्या मुद्द्यावरून रान पेटवले. एकत्र आरएसएस सोडा अथवा जनता सरकार सोडा असं त्यांचं म्हणणं होतं. या वादातूनच त्यांनी मोरारजी देसाई यांचे सरकार पाडण्याची तयारी सुरु केली. खरं तर मोरारजी यांचा दबदबा मोठा होता. अनेक नेते दोन्ही गटात विभागले गेले. मोरारजींच्या विरोधकांचे नेतृत्व चरणसिंग करत होते.

सुरवातीला जॉर्ज फर्नांडिस हे मोरारजींच्या गटात होते. उद्योग मंत्री पदी त्यांचा कारभार जोरात सुरु होता. सरकार पाडण्याच्या ते विरोधात होते. अखेर एक दिवस मधु लिमये त्यांच्या भेटीला आले. दोघे मित्र रात्रभर या विषयावरून भांडत राहिले. शेवट्पर्यंत त्यांचे एकमत झाले नाही.

अखेर मधु लिमये यांनी शेवटचे ब्रम्हास्त्र उपसले. जॉर्ज फर्नांडिस यांना आपल्या फ्रेंडशिपचा हवाला दिला. जॉर्ज फर्नांडिस तेव्हा मात्र वितळले. मोरारजी यांच्या पायी आपली मैत्री तुटायला नको म्हणून त्यांनी मधु लिमये यांच्या बरोबर जाण्याचा निर्णय घेतला.  

जेव्हा १९७९ साली केंद्रात पावसाळी अधिवेशन सुरु झालं तेव्हा  मोरारजी देसाईंच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला. २७ जुलै १९७९ रोजी मोरारजी यांचे खास विश्वासू जॉर्ज फर्नांडिस यांनी उद्योग मंत्रिपदाचा राजीनामा दिला. बनवले.त्याच क्षणी मोरारजी देसाई यांना कळून चुकले आपले सरकार आता पडले आहे.

आणि तसेच घडले. जॉर्ज फर्नांडिस यांच्या विना मोरारजी अविश्वास प्रस्ताव जिंकू शकले नाहीत. मधु लिमये यांनी फक्त मैत्रीचा हवाला देऊन त्यांचे सरकार पाडले आणि चरणसिंग यांना पंतप्रधान बनवले.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.