मध्यरात्री रेडिओवरून खासदारांना बोलवून घेण्यात आलं आणि रात्रभर संसद चालू राहिली..

साठ सत्तरच्या दशकामध्ये कागदांचा लखोटा बगलेत मारुन एक मराठमोळा खासदार संसदेत शिरायचा तेव्हा ट्रेझरी बेंचवर बसणाऱ्यांना अक्षरशः घाम फुटायचा की हे महाशय आज कुणाला धारेवर धरणार? ते भलभल्यांना आपल्या शब्दांनी पुराव्यानिशी गारद करत असत.

अखंड भारत त्यांना जेष्ठ समाजवादी नेता म्हणून ओळखतो. सोबतच आपल्या प्रखर विद्वत्तेसाठी आणि कमालीच्या प्रामाणिकपणासाठी देखील.

त्यांच्यामुळेच देशाच्या संसदीय इतिहासात कदाचित पहिल्यांदा आणि शेवटलाच खासदारांना रात्रीच्या वेळी रेडिओवरून बोलवून घेवून देशाचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला होता.

अशा या मराठमोळ्या नेत्याचे नाव म्हणजे,

मधू लिमये

मुळचे पुण्याचे असलेल्या मधू लिमयेंच्या खासदारकीचे आणखी एक वैशिष्ट्य सांगायच म्हणजे ते जवळपास चार वेळा लोकसभेचे खासदार म्हणून निवडून आले होते. पण चारही वेळेला बिहारमधून.

इतर राज्यांतुन राज्यसभेऐवजी थेट लोकांमधून निवडून येणाऱ्या काही मोजक्या लोकांपैकी एक असलेले मधू लिमये पहिल्यांदा १९६४ साली तिसऱ्या लोकसभेत निवडून गेले होते. बिहारमधील मुंगेर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक त्यांनी जिंकली होती.

त्यानंतर याच मतदार संघातुन १९६७ सालच्या सार्वत्रिक निवडणूकीत ते विजयी झाले. पुढे १९७१ मध्ये पराभूत झाले. पण १९७३ साली बिहारमधीलच बांका मतदारसंघातून ते विजयी झाले. पुढे १९७७ मध्ये याच मतदार संघामधून ते जनता पक्षाकडून विजयी झाले.

ते संसदेमध्ये संसदीय आयुधांचा वापर करुन अगदी पुराव्यानिशी मंत्रिमंडळाची चिरफाड करायचे. त्यामुळेच त्यांना जर संसदीय नियमांचा चॅम्पियन म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही.

त्यांचे सोबती आणि प्रसिद्ध समाजवादी नेता लाडली मोहन निगम यांनी अशीच एक घटना जिचा वर उल्लेख केलेला आहे ती गोष्ट एक ठिकाणी लिहून ठेवली आहे.

ज्यामुळे रेडिओ वरून संदेश पाठवून खासदारांना बोलवण्यात आलं आणि रात्रभर संसद चालू राहून देशाचा अर्थसंकल्प मंजूर झाला होता.

एकदा इंदिरा गांधी यांनी लोकसभेमध्ये अर्थसंकल्प सादर केला जे की मुळात आर्थिक लेखानुदान होते. भाषण संपताच मधून यांनी व्यवस्थेविषयी एक प्रश्न विचारण्याची परवानगी मागितली. पण अध्यक्षांनी नकार देत सभागृह पुढच्या दिवसापर्यंत स्थगित केले.

मधु लिमये एकदम रागात लालबुंद होवून अध्यक्षांच्या चेंबरमध्ये आले आणि म्हणाले आज एक मोठा घोळ झाला आहे. तुम्ही आजच्या कामकाजाचे सगळे रेकॉर्ड्स मागवा आणि ते पुन्हा तपासा. आज अर्थ विधेयक सादरच झालेलं नाही.

त्यामुळे यात सुधारणा केली नाही तर आज रात्री १२ नंतर सरकारचं सगळं काम थांबेल आणि सरकार एक रुपया देखील खर्च करू शकणार नाही.

जेव्हा अध्यक्षांनी सगळे रेकॉर्ड मागवले आणि बघितलं तेव्हा लक्षात आले की खरच अर्थ विधेयक सादरच झालेलं नाही. गोष्ट लक्षात आली तेव्हा ती खरचं गंभीर होती. कारण संसदेच्या आणि त्यातही विशेषतः लोकसभेच्या परवानगी शिवाय सरकार १ रुपया देखील खर्च करु शकत नाही.

त्यामुळे अध्यक्ष देखील घाबरून गेले. त्याचं मुख्य कारण होतं, सभागृह पुढच्या दिवसापर्यंत स्थगित झालं होतं.

तेव्हा मधू लिमये यांनीच यावर एक उपाय सुचवला. आणि म्हणाले हे आत्ता देखील सादर होऊ शकतं. तुम्ही तात्काळ विरोधी पक्षाच्या नेत्यांना बोलवा.

त्याच वेळी रेडिओवरुन घोषणा झाली की,

संसदेची आपात्कालीन बैठक बोलावली असून जे कोणी जिथे कुठे असतील त्यांनी तिथून त्वरित संसदेमध्ये पोहचा.

यानंतर सर्व खासदार संसदेमध्ये पोहचले आणि रात्रभर बसून कामकाज चालू झालं. त्यानंतरच देशाच अर्थ विधेयक संसदेमध्ये संमत झालं.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.