पोरांची भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढून लिमयेंनी दोन पंतप्रधान घरी बसवले…
भारतात स्वातंत्र्यापासून काँग्रेसची सत्ता होती. सर्वप्रथम जवाहरलाल नेहरू त्यांच्यानंतर त्यांचे वारसदार म्हणवले जाणारे लालबहादूर शास्त्री आणि मग त्यांच्या सुपुत्री इंदिरा गांधी. १९७१ साली पाकिस्तानचे दोन तुकडे करणाऱ्या इंदिराजींची लोकप्रियता शिखरावर पोहचली होती की काँग्रेस सोडून दुसरे सरकार येईल याचं स्वप्न देखील विरोधकांना नव्हतं.
अशातच इंदिराजींनी आणीबाणी लागू करण्याची चूक केली आणि त्यांची लोकप्रियता ढासळण्यास सुरवात झाली. विरोधकांना नव्याने एनर्जी मिळाली. जयप्रकाश नारायण यांच्या जनता पक्षाच्या झेंड्या खाली सगळे पक्ष एकत्र आले.
आंदोलने उभी राहिली. इंदिरा गांधींचा धाकटा मुलगा संजय गांधी हा राजकारणात सक्रिय झाला होता. त्याने आणि त्याच्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नसबंदी सारख्या कार्यक्रमातून उच्छाद मांडला. कित्येक विरोधकांना जेल मध्ये टाकलं, माध्यमांवर बंदी आणण्यात आली.
जयप्रकाश यांच्या शिलेदारांनी इंदिरा गांधींच्या हुकूमशाही विरुद्ध जोरदार लढा दिला. यात आघाडीवर होते महाराष्ट्राचे समाजवादी नेते मधु लिमये.
काँग्रेसच्या राजवटीत सुरु असलेल्या भ्रष्टाचारावर त्यांनी कडाडून हल्ला चढवला. विशेषतः संजय गांधी आणि त्यांचा मारुतीचा प्रयोग यात मोठा घोटाळा झाला आहे असं म्हणत त्यांनी इंदिरा गांधी सरकारचे वाभाडे काढले. पंतप्रधानांचा मुलगा असल्यामुळे अधिकाऱ्यांपासून मंत्री संजय गांधींच्या उद्योगांना त्यांच्या भ्रष्टाचाराकडे कानाडोळा करतात, उलट पैसे गोळा करण्यासाठी त्यांना मदतच करतात अशी टीका मधु लिमये यांनी केली.
या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचा परिणाम आणीबाणी नंतरच्या निवडणुकीत इंदिरा गांधींच सरकार कोसळलं. खुद्द इंदिराजी आणि संजय गांधी लोकसभेत पराभूत झाले.
भारतात पहिल्यांदाच बिगर काँग्रेसी सरकार स्थापन झाले. या जनता प्रयोगाचे पंतप्रधान बनले मोरारजी देसाई.
खरे तर मोरारजी देखील एकेकाळचे काँग्रेसी. नेहरूंच्या आणि इंदिराजींच्या मंत्रिमंडळात मोठमोठी पदे भूषवलेले मोरारजी इंदिरा गांधींबरोबर असलेल्या मतभेदामुळे बाहेर पडले होते. खरे तर या विजयाचे शिल्पकार म्हणून जयप्रकाश नारायण यांनी पंतप्रधानपद स्वीकारावे अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती पण सत्तेपासून दूर राहण्याची भीष्म प्रतिज्ञा त्यांनी केली होती.
अखेरीस सत्ता चालवण्यात अनुभवी म्हणून मोरारजींच्या गळ्यात पंतप्रधानपदाची माळ पडली.
जनता सरकारात समाजवादीपासून जनसंघापर्यंत अनेक विचारांचे दिग्गज नेते सामील होते. इंदिरा गांधींच्या सरकारमध्ये यापैकी अनेक जण भूमिगत झाले होते, कित्येकांनी कारावास देखील स्वीकारला होता. यात प्रामुख्याने नाव घेतलं जात होतं जॉर्ज फर्नांडिस, मधु लिमये, अटलबिहारी वाजपेयी यांचं. हे सगळे नेते मंडळी मोरारजींच्या मंत्रिमंडळात सामील झाली पण मधु लिमये मंत्रिपदापासून दूर राहिले.
मुझे मंत्री नहीं बनना. आप मेरी जगह पुरुषोत्तम कौशिक को मंत्री बना दीजिए.”
मधु लिमये म्हणजे समाजवादी विचारांचा पुरस्कार करणारे मोठे नेते. राम मनोहर लोहियांच्या मृत्यूंनंतर प्रजा समाजवादी पक्षाची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली होती. स्वातंत्र्य लढ्यापासून ते गोवा मुक्तिसंग्राम पर्यंत प्रत्येक लढ्यात अग्रभागी राहून संघर्ष केलेल्या लिमयेंच्या अभ्यासू व्यक्तिमत्वाचा दबदबा लोकसभेमध्ये देखील होता.
ते भाषणासाठी उभे राहिले कि मोठमोठ्या नेत्यांना देखील घाम फुटायचा. मधु लिमये महाराष्ट्रात जन्मले असले तरी यांचा दबदबा एवढा मोठा होता की ते थेट बिहार मधून चार वेळा खासदार बनले होते. एका निवडणुकीत तर त्यांनी राजनारायण यांचा आणि काँग्रेसच्या दरोगा सिंग यांचा पराभव केला होता. पुढे जाऊन इंदिरा गांधींना पाडणाऱ्या राजनारायण यांचे डिपॉजिट मधु लिमयेंनी जप्त केले होते.
मधु लिमयेंना सर्व विरोधी पक्षांना एकत्रित करून जनता पक्षाचा अध्यक्ष करण्याचा निर्णय झाला होता. मात्र जेव्हा मोरारजी देसाई ही घोषणा करण्यासाठी उभे राहिले इतक्यात लिमयेंच्या विरोधी गटाने उचल खाल्ली आणि निर्णय बदलण्यात आला.
मधु लिमये यांना कोणत्याही पदाची अथवा खुर्चीची अपेक्षा नव्हतीच. त्यांनी मात्र सत्तेवर अंकुश ठेवण्याचं काम मात्र स्वतःच्या शिरावर घेतलं.
मोरारजींचा सुरवातीचा काळ सरकारची घडी बसवण्यात गेला. इंदिरा गांधींच्या काळातली भ्रष्टाचार शोधणे, त्याचन्हे जुने निर्णय फिरवणे यात वेळ गेला. मात्र जसे जसे दिवस उलटू लागले तशी जनता पक्षात देखील कुरबुरी सुरु झाल्या. भ्रष्टाचार विरोधी आंदोलन करून सत्तेत आलेल्या मोरारजींच्या सरकारमध्ये देखील बरीच अफरातफरी होत आहे असे आरोप होऊ लागले.
यात सर्वात आघाडीवर नाव आलं पंतप्रधानांचे चिरंजीव कांती देसाई यांचं.
ज्या प्रमाणे इंदिरा गांधींच्या सरकारमध्ये संजय गांधीची दादागिरी चालायची त्याप्रमाणे मोरारजींच्या काळात कांती देसाई कुरघोडी करत आहेत अशा चर्चा दबक्या आवाजात होत होत्या. कांती देसाई यांच्या दोस्त मंडळींना सरकारी कॉट्रॅक्ट मिळत होते. अधिकारी वर्ग त्यांच्या आज्ञेचं पालन करत होता. त्यांच्या विरोधात बोलायचं धाडस कोणाला नव्हतं.
अशा वेळी पुढे आले मधु लिमये.
स्वतः जनता पक्षाचे मोठे नेते असूनही त्यांनी कांती देसाई यांच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण थेट संसदेत उभे केले. कांती देसाई यांचे डॉडझल कंपनीशी संबन्ध आहेत आणि त्यांनी त्यातून भ्रष्टाचार झाला असल्याचे त्यांनी राज्यसभेत आरोप केले. याची चौकशी करण्याचे आदेश देण्याची मागणी केली. जनता पक्षाच्या मिटिंग मध्ये देखील त्यांनी हा मुद्दा उचलून धरला.
त्यावेळी मोरारजी देसाई यांचे समर्थक म्हणवले जाणारे रामधन यांनी मधु लिमयेंच्यावर जोरदार टीका केली. सार्वजनिकरित्या पंतप्रधानांच्या मुलावर आरोप करणे आपल्या पक्षाच्या छबीवर डाग लावण्यासारखे असून मधु लिमये यांना पक्षातून निलंबित केले पाहिजे असे थेट आरोप त्यांनी केले. पण मधुजी मागे हटणाऱ्यातले नव्हते. त्यांनी पक्षाच्या नेत्यांच्या समोर राम धन यांची कानउघडणी केली.
कांती देसाई यांच्यावर भारतीय हवाई दलासाठी इंग्लंडवरून मागवल्या जाणाऱ्या जग्वार विमानाच्या खरेदी मध्ये दलाली घेतल्याचा देखील आरोप झाला.
मोरारजी देसाई यांच्यावरील दबाव वाढत गेला. अशातच जनसंघाच्या नेत्यांच्या दुहेरी सदस्यत्वाच्या मुद्द्यावरून जनता पक्षात रान उठवण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते जनता पक्षात आपला वेगळा सवता सुभा मांडून बसलेत आणि आपली हिंदुत्वची विचारसरणी पुढे रेटत आहेत यावर मधु लिमयेंनी आपत्ती जाहीर केली.
अखेर चरणसिंग, चन्द्रशेखर, जॉर्ज फर्नांडिस या नेत्यांनी मधु लिमयेंच्या म्हणण्याला दुजोरा दिला आणि मोरारजी देसाईंना पंतप्रधान पदावरून पायउतार व्हायला लावलं. खरं तर मोरारजींच पंतप्रधानपद जाण्यामागे त्यांच्या मुलाच्या भष्टाचाराचं प्रकरण हे केंद्रस्थानी होतं पण देताना कारण जनसंघाच्या दुहेरी सदस्यत्वाचं देण्यात आलं.
फक्त विरोधकांचे नाही तर कोणत्याही लाभाची अपेक्षा न बाळगता स्वतःच्या पक्षातील नेत्यांचीही सरकार भ्रष्टाचारामुळे पाडणारा, स्वच्छ चारित्र्य साधी विचारसरणी खऱ्या आयुष्यातही आचरणात आणणारा मधु लिमयेंसारखा नेता भारताच्या राजकारणात दुर्मिळच मानला जातो.
हे ही वाच भिडू.
- महाराष्ट्राच्या नेत्याने फक्त फ्रेंडशिपचा हवाला देऊन मोरारजींचे सरकार पाडले..
- मध्यरात्री रेडिओवरून खासदारांना बोलवून घेण्यात आलं आणि रात्रभर संसद चालू राहिली..
- हाफ चड्डी बंद करणारे भाई..