सोमण काय आत्ताच उघडा झालेला नाही, त्याचा अंगात लय आधीपासून किडे आहेत..!
मेक इन इंडिया येण्याआधी मेड इन इंडिया ला फेमस करणारा मिलिंद भाऊ सोमण. आज म्हाताऱ्या वयात देखील पोरीबाळींचे ठोके चुकवतो. परवा ५५व्या बड्डेला तो गोव्याला गेलेला. तिथं गेलं की बीचवर फोटो काढणं आलंच. पण गड्यान फोटो साठी कपडे काढले आणि बड्डे सूट मध्ये ( नग्नावस्था) धावतानाचा फोटो इन्स्टाग्रामवर टाकला.
त्याच्या बायकोने (हो तीच ती त्याच्या निम्म्या वयाची) हा फोटो काढला होता. पण इन्स्टाग्रामिण पब्लिक खवळली. कारण नुकताच पूनम पांडेवर न्यूड फोटो काढले म्हणून गोवेकरांनी केस टाकली होती मग मिलिंद भाऊला वेगळा न्याय का?
झाला की मग राडा सुरू. दोन्ही बाजू भांडू लागल्या. मोदींजींच्या ओळखी काढल्या गेल्या. बरच काय काय झालं आणि फायनली मिलिंद सोमणवर केस झाली.
मिलिंद भाऊ बद्दल आत्मीयता असणाऱ्यांनो अस पहिल्यांदा घडलेल नाही. खूप वर्षांपूर्वी पण असंच घडलेलं.
सोमणांचा मिलिंद आणि सप्रेंची मधु या मराठमोळ्या मॉडेलनी एका शूजची जाहिरात केली आणि अख्या देशात खळबळ उडाली. असं होतकाय त्या जाहिरातीत ? होत काय पेक्षा काय नव्हत ते विचारा ! तुम्हाला थोडा फार अंदाज आलाच असेल म्हणा, तर आम्ही तुम्हाला सगळ इस्कटून सांगतो.
तर झालं असं मधुताई सप्रे होत्या मॉडेल. साधी सुधी नाही तर १९९२ ला मिस इंडिया जिंकणारी सुपर मॉडेल.
मिस युनिव्हर्समध्ये सुद्धा तीनं तिसरा क्रमांक पटकावला होता. मिस युनिव्हर्स जिंकण्याच्या एवढ्या जवळ पहिल्यांदाच कोणी भारतीय मुलगी पोहचली होती. मग काय ताईकडे पिक्चर आणि जाहिरातीच्या ऑफर सुरूच होत्या. अशीच एक जाहिरात तीने साईन केली. जाहिरातीमध्ये तीच्या सोबत होता तीचा बॉयफ्रेंड मिलिंद सोमण.
दोघांच्या चर्चा या आधीच मुंबईच्या गॉसिप सर्कल मध्ये सुरु होत्या. दोघे तेव्हा लिव्हइन रिलेशनशिप मध्ये राहात होते. मिलिंद भाऊची सुद्धा त्याकाळात चारी बोटं तुपात होती. तो सुद्धा सुपर मॉडेल होता.
अलिशा चिनॉयचा मेड इन इंडिया अल्बम आठवतोय ? म्हणजे काय आठवणारच (न कळत तुम्ही सुद्धा गुणगुणलायला सुरवात केली ना?) हा तोच अल्बम ज्यात “ऑस्ट्रेलिया से लेके अमेरिका” पर्यंतचे लोक अलिशाच्या स्वयंवराला आलेली असतात. ती सगळ्यांना नकार देते आणि शेवटी “MADE IN INDIA” लिहिलेल्या बॉक्स मधून देखणा मिलिंद बाहेर पडतो. भारतातला आत्ता पर्यन्तचा सगळ्यात जास्त गाजलेला हा अल्बम असेल. अलिशा सोबतच मिलिंद सुद्धा लोकप्रियतेच्या शिखरावर होता.
अशातच “ती” जाहिरात आली.
जाहिरातीसाठी फोटोग्राफी केली होती प्रबुद्ध दासगुप्ता यांनी. प्रबुद्ध दासगुप्ता हे भारतीय फॅशन फोटोग्राफी मधले लिजंड. ब्लॅक अड व्हाईट फोटो ही त्यांची खास शैली. १९९१ ची पूजा बेदीची कामसूत्राची वादग्रस्त जाहिरातसुद्धा त्यांनी बनवलेली.
कितीही वाद झाले तरी प्रबुद्ध दासगुप्ता फोटो मधला दादा माणूस. त्यांनी विचारल्यावर त्यांच्यासाठी मॉडेलिंग करायला नकार कोण देणार?
त्यांनी विचारताच मधु आणि मिलिंद नी जाहिरात शुटींगसाठी होकार दिला. साल होते १९९५.
तर तो जगप्रसिद्ध फोटो असा होता की मिलिंद आणि मधु एकमेकाच्या मिठीत बिलगले आहेत. अंगात त्यांनी फक्त एक अजगर आणि पायात शूज एवढेच कपडे घातले आहेत. एखाद्या झाडावर जशी वेल चढते तसा अजगर त्यांच्या शरीरावर चिकटला होता.
देवाने वेळ घेऊन बनवलेली या दोघांची बॉडी फोटो मध्ये आणखीन जास्त सेक्सी दिसत होती. पॅरीसच्या म्युजियम मध्ये ठेवलेल्या ग्रीक मूर्ती सारखे प्रमाणबद्ध दिसणारे हे दोघे पुढे एवढ्या मोठ्या अडचणीत सापडतील त्यांना स्वतः ला ही ठाऊक नसेल. टफ कंपनीच्या स्पोर्ट्स शूजची ही जाहिरात होती.
२३ जुलै १९९५ ला ही जाहिरात संडे मिड डे या नियतकालिकात छापून आली, आणि देशात एकच खळबळ उडाली.
एवढी महान परंपरा असणाऱ्या देशात दोन मॉडेल न्यूड फोटोशुट करतात म्हणजे काय ? आणि तेही मराठी मॉडेल ? शांतम पापम् !!
हा राष्ट्रीय चर्चेचा विषय झाला. पेपर मध्ये मोठमोठाले लेख छापून आले. जे काही एक दोन न्यूज चॅनल होते तिथं कसं जागतिकीकरण भारतीय संस्कृतीला धोकादायक आहे याचे घमासान वाद झाले. त्याकाळातल्या अर्बन नक्षलवाद्यांनी खजुराहोच्या नग्नमुर्त्यांचा विषय काढून मिलिंद सोमण आणि मधु सप्रेला भक्कम पाठींबा दिला.
शिवसेनेन तर त्या दोघांच्या विरुद्ध आंदोलन छेडलं. मधूच्या घराबाहेर बायकांनी आंदोलन केलं आणि तीच्या बाबांना साडी भेट दिली. वन्यजीवप्रेमी संघटना सुद्धा त्यांच्या विरोधात उभ्या राहिल्या.
मुंबई पोलिसांच्या समाजिक सेवा शाखेने मधु सप्रे, मिलिंद सोमण प्रबुद्ध दासगुप्ता सह आठ जणांवर अश्लीलता पसरवल्याचा गुन्हा दाखल केला गेला.
एक फोटो एवढा चर्चेत जाण्याचा हा पहिलाच प्रसंग होता. पुढे १४ वर्षांनी न्यायालयाने सगळ्यांना निर्दोष ठरवले. पण तोपर्यंत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते. मधु सप्रे आणि मिलिंद सोमण यांच्यावर बोल्डचा शिक्का बसला होता.
त्यांच्या पब्लिक इमेज मूळ पूर्वी जेवढी त्यांची हवा होती तेवढे काही त्यांना पिक्चर मिळाले नाहीत.
पुढे दोघांचा ब्रेकअप देखील झाला. ज्यांनी त्यांना साईन केलं होत त्यांनी देखील ते प्रोजेक्ट काढून घेतले. नाही म्हणायला मिलिंद कॅप्टन व्योम सारख्या टीव्ही सिरीयल मध्ये आणि १६ डिसेंबर सारख्या मुव्ही मध्ये दिसला. मधुच्या नशिबी एव्हडे भाग्य नव्हते. कतरिना च्या पदार्पणाचा मुव्ही म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या “बूम” मध्ये ती अनेक सुपर मॉडेलच्या गर्दीत दिसली.
ती सध्या काय करते?
बॉलीवूडच्या दुतोंडी दुनियेला कंटाळून तीने रुपेरी पडद्याला बाय बाय केला. एका इटालियन आईस्क्रीम व्यावसायिकाशी लग्न करून इटलीच्याच एका छानश्या शहरात ती संसार करतेय. इंदिरा नावाची तीला एक गोड मुलगी आहे. फोटोग्राफर प्रबुद्ध त्याची बंडखोर फोटोग्राफी करतच राहिला. अनेक आंतरराष्ट्रीय सन्मान त्याने मिळवले. २०१३ साली गोव्यामध्ये हार्ट अटॅकने त्याचा मृत्यू झाला.
मिलिंद सोमण आजही रॉकिंग आहे. बाजीराव मस्तानी मध्ये तो एका छोट्या भूमिकेत दिसला मात्र त्याच्या पेक्षाही तो एका नवीनच गोष्टी मुळे चर्चेत आलाय. ऑस्ट्रेलिया मध्ये होणाऱ्या स्विमिंग, सायकलिंग, रनिंग याची कसोटी पाहणाऱ्या आयर्नमन या स्पर्धेच चलेंज पूर्ण करून त्याने तो किताब मिळवलाय. आजही कुठल्या ना कुठल्या मॅरेथॉन मध्ये तो धावताना दिसतोय. टफ कंपनीचे शूज तो घालत असेल का माहित नाही? बहुदा नसेलच घालत. तो आत्ता लग्न करुन सेटल पण झालाय.
आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न त्या अजगराच काय झालं?
एवढ्या सगळ्या गोष्टींचा साक्षीदार ते अजगर राहिलं होतं, सगळ्यात जास्त एन्जॉय त्यानेच केलं. त्या काळातल्या सगळ्या सिंगल भिडूंच्या शिव्या त्याने खाल्ल्या असतील. त्याच पुढ काय झालं आम्हाला पण ठाऊक नाही. तुमचा काय अंदाज ?
हे ही वाचा –
- ३ रुपयाच्या तिकीटावर ३ कोटींचा व्यवसाय करणारा “अशी ही बनवाबनवी” आज तिशीत पोहचला !
- नो स्मोकिंग बनवणाऱ्या अनुरागला सिगरेटपासून घटस्फोट घ्यायला २५ वर्षे जावी लागली !!!