आपल्या अखेरच्या दिवसात मधुबाला दिलीप कुमारचे सिनेमे पाहत बसायची..

जुन्या दिल्लीत चांदणी चौक येथल्या वेश्या वस्तीत राहणाऱ्या अताउल्लाखान नावाच्या मुजोर, अति महत्वाकांक्षी आणि पैशाला देव मानणाऱ्या माणसाच्या घरात ही मधुबाला नावाची सौंदर्याची परी जनमाला आली. त्याने तिच्या बालपणातच तिच्या सौंदर्यावर पैसे मिळवण्याच्या लालसेने तिला मुंबईला आणून चित्रपटसृष्टीत दाखल केलं.

आपल्या सौंदर्याच्या आणि अभिनयाच्या जोरावर ती थोड्याच दिवसात भारतीय चित्रपट सृष्टीची सम्राज्ञी बनली.

पण पडद्याआडचे तिचे आयुष्य अजिबात सुखाचे नव्हते. उलट त्या आयुष्यातल्या अडचणी वाढायचं चालल्या होत्या. पत्रकार तिच्या मागावरच असायचे. वडिलांचा छळ, मोठमोठ्या सिनेस्टार्स, दिगदर्शकांच्या वखवखलेल्या नजरा या सगळ्यातुन मार्ग काढत ती फिल्मइंडस्ट्रीमध्ये पाय रोवून ठामपणे उभी होती.

अशातच ती प्रेमात पडली तेही ट्रॅजेडी किंग दिलीप कुमारच्या.

दिलीप कुमार भारतातला सगळ्यात मोठा सुपरस्टार होता. दोघांचेही परस्परांवर मनापासून प्रेम होते. लग्नाच्या आणाभाका देखील झाल्या होत्या. त्याचे गॉसिप तेव्हाच्या फिल्मी मॅगझिनमध्ये मीठमसाला लावून छापलं जायचं. या सुंदर जोडीचं लग्न व्हावं हे त्यांच्या फॅन्सना मनापासून वाटायचं.

पण इतक्यात दोघांच्या प्रेमात आडवे आले मधुबालाचे वडील. पैशांसाठी हपापलेल्या अताउल्ला खानला हि सोन्याची अंडी देणारी कोंबडी हातची जाऊ द्यायची नव्हती. त्याने प्रेमप्रकरणात आडकाठी आणली. दिलीप कुमार देखील लग्नानंतर मधुबालाला सिनेमात काम करू देण्याच्या विरोधात होता. नया दौर या सिनेमाच्या शुटिंगवेळी दोघांची भांडणे वाढत गेली पार न्यायालयापर्यंत प्रकरण पोहचलं.

तिथे देखील दिलीप कुमारने आपल्या प्रेमप्रकरणाची जाहीर कबुली दिली.

पण अताउल्लाखानने दोघांच्यात दर निर्माण केली. सुखासुखी चाललेलं प्रेमप्रकरण अर्ध्यावरती मिटून गेलं. दिलीप कुमार आणि मधुबाला दोघांनाही प्रचंड मनस्ताप झाला. त्यांच्यापेक्षाही या ब्रेकअप मुळे संपूर्ण भारत हळहळला.

अशातच मधुबालाच्या हृदयाला छेद आहे अशी बातमी पुढे आली. अशातच तिने अनेक वर्ष रेंगाळलेले मुघल ए आझमच शूटिंग पूर्ण केलं. या सिनेमातही दिलीप कुमार होता. अनेक सिन असे आहेत ज्यात ते दोघे एकमेकांशी बोलतही नव्हते मात्र तरीही रोमँटिक दृश्ये त्यांनी त्याच भावुकतेने पूर्ण केली होती.

मुघल ए आझम एक मास्टरपीस बनला. अनेक वर्षे त्याचे रेकॉर्ड कोणी मोडू शकले नाही.

या सिनेमाच्या शूटिंगवेळी मधुबालाचा आणखी एक सिनेमा बनत होता तो म्हणजे चलती का नाम गाडी. हा सिनेमा देखील मोठा सुपरहिट ठरला. एक लडकी भिगी भागी सी हे गाणं प्रचंड गाजलं. या सिनेमाचा हिरो होता किशोर कुमार.

किशोर कुमार म्हणजे अतरंगी व्यक्तिमत्व. नेहमी हसत खेळत गमतीशीर जोक मारत किशोर कुमार सेटवर वावरायचा. त्याच्या सोबत असणं मधुबालाला आवडायचं. त्याच्या गाणे गुणगुण्यावरून त्याच्या जोक वर ती खळखळून हसत राहायची.त्याच्या सहवासात आपली दुःखे ती विसरून जाऊ लागली.

दोघांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले, इतकंच नाही तर दोघांनी लग्न देखील केलं.

किशोर कुमारच या पूर्वी लग्न झालेलं पण मधुबालाशी लग्न करण्यासाठी त्याने धर्मही बदलला व ‘अब्दुल करीम’ हे नाव घेतलं. लग्नानंतर मधुबालाला वाटलं की तिचा संसार आनंदाचा होईल. पण किशोरचे आई-वडील त्याच्याकडे राहत असत, ते दादामुनींकडे गेले. दादामुनींनीही किशोरशी संबंध संपवले. लग्नानंतर ते हनिमूनसाठी यूरोपात गेले. मधुबालाच्या आजारावर उपाय करण्यासाठी त्यांनी तिथंही तिला दाखवलं. पण या रोगावर इलाज नाही असंच समोर आलं.

किशोरने तिची सेवाशुश्रूषा करण्याचे अनेक प्रयत्न केले पण काही उपयोग झाला नाही. हळूहळू दोघांच्यात अंतर पडण्यास सुरवात झाली. किशोर कुमार कामाच्या निमित्ताने घराबाहेरच राहू लागला. मधुबाला पुन्हा एकाकी झाली.

त्याच्या ‘गौरीकुंज’ नावाच्या घरामध्ये ती त्याची तासनतास वाट पाहत बसे. पण तो दिवसचे दिवस घरात उगवायचाच नाही. आपला एकाकीपणा दूर करायला तिने मीनाकुमारी हिच्याप्रमाणे दारूचा आश्रय मात्र घेतला नाही. एक तर ती पुस्तके वाचत बसायची किंवा दिलीपकुमारचे चित्रपट घरात बघत बसायची.

तिचे दिलीप कुमारचे सिनेमे बघणं किशोर कुमारला आवडायचं नाही. त्यावरून या दोघांची भांडणे होऊ लागली. हे टाळण्यासाठी मधुबाला आयडिया करायची. किशोरच्या कारचा आवाज आला कि ती पटकन दिलीप कुमारचा सिनेमा बंद करून त्या जागी किशोर कुमारचा सिनेमा लावायची. पण बऱ्याचदा ते शक्य व्हायच नाही. पुन्हा भांडणे ठरलेली.

अशातच तिची प्रकृती आणखी ढासळत गेली. किशोरने तिला तिच्या माहेरी आणून सोडलं.

मी दौऱ्यानिमित्ताने घराबाहेर असतो तिची काळजी घेणे मला जमत नाही असं त्याने सांगितलं. यावरून तिच्या वडिलांचे आणि त्याचे वाद देखील झाले. पण किशोर कुमार मनस्वी होता. तो परत फिरला नाही. अशाच मनस्थितीमध्ये मधुबालाचा अखेरचा काळ व्यतीत झाला.

२३ फेब्रुवारी १९६९ रोजी वयाच्या ३६ व्या वर्षी तिचे निधन झालं. एका शापित सौंदर्याचा अंत झाला होता.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.