चार्ल्स शोभराजला पकडणाऱ्या पुण्याच्या अधिकाऱ्याला भेटायला खुद्द पंतप्रधान आले होते….

“माझ्या आयुष्यात मला खूप साऱ्या लोकांची मदत करायची होती आणि ते शक्य झालं फक्त माझ्या पोलीस वर्दीमुळं”

लोकांप्रती अशी भूमिका असलेले पोलीस अधिकारी म्हणजे इन्स्पेक्टर मधुकर झेंडे.

मुंबई पोलिसांमधील मधुकर झेंडे हे असं नाव होतं ज्यांना बघून भल्या भल्या गुन्हेगारांच्या अंगावर काटा येत असे. त्यांच्या नुसत्या वावराने गुन्हेगार तिथून फरार होत असे.

मुंबई पोलीस काळातले सगळ्यात जबरदस्त आणि सामान्य लोकांना आपले वाटणारे असे अधिकारी म्हणजे मधुकर झेंडे. त्यांच्या पोलिसी भारदस्त आवाजाने हजार दोन हजारांचा जमाव चिडीचूप व्हायचा असा दरारा मधुकर झेंडेंनी धारावी आणि मुंबईत तयार केला होता.बोलण्याची शैली आणि धिप्पाड शरीर अशी विशिष्ट ओळख सामान्य जनता आणि मोठमोठ्या गुन्हेगारांना सुद्धा आकर्षक वाटायची.

पोलीस दलात भरती होण्याआधी मधुकर झेंडे हे वाडिया कॉलेजात रेडिओ अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होते. लोकांना मदत  पाहिजे हे त्यांच्या कायम डोक्यात असायचं आणि यातूनच ते पुढे पोलीस अधिकारी झाले. पोलीस म्हणून त्यांची शिस्त आणि प्रामाणिकपणा याची कायम चारचा होत असे.

मधुकर झेंडेंनी १५ नोव्हेंबर १९७१ मध्ये चार्ल्स शोभराज या आंतरराष्ट्रीय कुख्यात गुन्हेगाराला बेड्या ठोकल्या  होत्या.

हा त्याकाळी मोठा पराक्रम मानला गेला होता आणि झेंडेंच्या पराक्रमाच्या चर्चा झडू लागल्या. चार्ल्स शोभराज हा पट्टीचा दगाबाज आणि घातकी गुन्हेगार होता, आपल्या युक्तीच्या जोरावर मधुकर झेंडेंनी चार्ल्स शोभराजला गोव्यात अटक केली होती.

चार्ल्स शोभराजला पकडल्यावर त्याला अटक करण्यासाठी बेड्या नव्हत्या तर मधुकर झेंडेंनी पिस्तुलाच्या कॉर्ड्स वापरून चार्ल्स शोभराजला बंदी बनवलं होतं. दोन वेळा मधुकर झेंडेंनी शोभराजला पकडलं होतं. १९८६ मध्ये सुद्धा शोभराजला झेंडेंनी अटक केली, तेव्हा त्याला दमात घेत झेंडेंनी त्याला म्हटलं कि मीच तुला १५ वर्षांपूर्वी अटक केली होती. तेव्हा चार्ल्स शोभराज म्हणाला यु आर लकी…

मधुकर झेंडे मूळचे पुण्याचे, जरी मुंबईत त्यांनी २५ वर्षांहून अधिक काळ मुंबई पोलीस म्हणून काम पाहिलं तरी ते स्वतःला पुण्याचेच असल्याचं भासवायचे. गोव्याहून ज्यावेळी चार्ल्स शोभराजला अटक केली तेव्हा त्याला घेऊन मधुकर झेंडे मुंबईला निघाले होते. जाताना ते रायगडाच्या जवळून जात होते तेव्हा शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने त्यांची छाती अभिमानाने भरून आली आणि त्यांनी मोठा जल्लोष केला होता.

त्यांच्या आवाजाने समोरच्या व्यक्तीचा थरकाप उडायचा. एकदा एका टॅक्सीमधून चार पाच प्रवासी जात होते. काहीतरी गडबड असेल म्हणून एका पोलीस कॉन्स्टेबलने गाडी थांबवली तेव्हा त्या प्रवाशांनी त्या कॉन्स्टेबलवरच हल्ला चढवला. ते दृश्य पाहून मधुकर झेंडे पळत पळत तेथे पोहचले. त्यांच्याकडे तेव्हा शस्र काहीच नव्हतं.

वाघाच्या डरकाळीप्रमाणे झेंडे त्या प्रवाशांवर ओरडले आणि त्यांच्यावर चाल करून गेले. त्या प्रवाशांकडून चाकू काढून घेतले. हा प्रकार पाहून ते प्रवासी चक्रावून गेले. फक्त आवाजाच्या जोरावर त्यांनी लोकांना गारद केलं होतं. त्यांच्या या कर्तृत्वाबद्दल त्याकाळात त्यांच्या कमिशनर साहेबांनी २००० रुपयांचं रोख बक्षीस दिलं होतं.

मुंबईत स्वतःला टेरर समजणाऱ्या दादा लोकांचा बाजार मधुकर झेंडेंनी उठवला होता. त्या काळातील सर्वांना हवा असणारा गुन्हेगार चार्ल्स शोभराज याला मधुकर झेंडेंनी पकडला होता आणि हे त्यांच्या चार दशकाच्या कारकिर्दीतील सगळ्यात कामगिरी होती.

 मधुकर झेंडेंची कामगिरी आता वाचताना सोपी वाटेल पण शोभराजला ज्यावेळी पकडलं तेव्हा हे इतकं अवघड मिशन कोणी यशस्वी केलं ? कोण आहे तो अधिकारी ? मला त्याला भेटायचं आहे म्हणून राजीव गांधी खुद्द त्यांना भेटायला आले होते. त्यांचं खूप कौतुक केलं होतं.

लोकांची सेवा करणे आणि जनतेला काहीही त्रास होऊ न देणे हेच मधुकर झेंडेंच्या पोलीस अधिकारी होण्याचं उद्दिष्ट होतं आणि यावर ते कायम खरे उतरत राहिले.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.