पिचड यांच्यावरचे सगळे खटले मागे घेईपर्यंत दादांनी चार तास शपथविधी रोखला होता…

कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना लोकांच्या प्रश्नावर लढून आंदोलने करून उभं राहिलेलं नेतृत्व म्हणजे मधुकरराव पिचड. नगर जिल्ह्यातल्या अकोल्यासारख्या आदिवासी भागात पन्नास वर्षे विकासाची गंगा आणायचा  प्रयत्न त्यांनी केला. आधी काँग्रेस पुढे राष्ट्रवादी आणि मग आता भाजपमध्ये प्रवेश करून त्यांनी सर्व राजकीय प्रवाहात काम केलं.

मधुकरराव पिचड यांचा जन्म मौजे राजूर तालुका अकोला येथे झाला. १९६२ साली ते पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून बीए ही डिग्री घेऊन पास झाले. त्यानंतर सहज नोकरी मिळत असतानाही त्यांनी गावी परतण्याचा आणि आदिवासींच्या प्रश्नाला वाहून घेण्याचा निर्णय घेतला.

सामाजिक जीवनातील त्यांचे पहिले गुरु होते यशवंतराव भांगरे.

 त्यांच्या मार्गदर्शनाखालीच मधुकरराव पिचड यांनी गावोगाव फिरून सहकारी दूध उत्पादन व संकलन करणाऱ्या संस्था उभारल्या. त्यांच्यामुळेच आदिवासी शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून गाई म्हैशी पाळण्यास सुरवात केली. अमृतसागर दूध सहकारी संघाची निर्मिती देखील पिचड यांच्या मुळेच झाली. ते अनेक वर्ष या संस्थेचे अध्यक्ष देखील राहिले. दूध नासू नये म्हणून खेडोपाडी शीतकरण केंद्राची उभारणी देखील त्यांनीच केली.

१९७२ साली अहमदनगर जिल्हा परिषदेवर राजूर येथून ते निवडून गेले. यशवंतराव भांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची काँग्रेसमध्ये राजकीय वाटचाल सुरु होती. महादेव कोळी समाजाचा ते आवाज बनले.

पुढे काँग्रेसमध्ये फूट पडली. यशवंतराव भांगरे हे महाराष्ट्रातल्या इतर नेत्यांच्यासोबत रेड्डी काँग्रेसमध्ये गेले. अकोले येथे त्यांच्या विरुद्ध उमेदवारी मिळणार हा प्रश्न काँग्रेस नेतृत्वाला पडला होता.

अखेर दिल्लीपर्यंत प्रयत्न करून पिचड यांनी इंदिरा काँग्रेसचं तिकीट खेचून आणलं. इतकंच नाही तर जवळपास १० हजार मतांनी त्यांनी विजय मिळवून दाखवला. यशवंतराव भांगरे चक्क तिसऱ्या स्थानावर राहिले. तरुण उत्साही मधुकरराव पिचड यांच्या नावाची चर्चा राज्य पातळीवर गाजली.

आदिवासी भागात सहकारी साखर कारखाना सुरु करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न कौतुकास्पद होते. प्रवरेच्या पाण्यावर अकोला भागात शेती पिकावी, शेतकऱ्यांनी देखील उसासारखी पिके घ्यावेत यासाठी ते आग्रही होते. महाराष्ट्राच्या विधानसभेत  इतर आदिवासी आमदारांना सोबत घेऊन आदिवासी आमदार मित्रमंडळाची स्थापना करण्यात त्यांनी पुढाकार घेतला.

आपल्या अभ्यासू भाषणामुळे विधानसभेत छाप उमटवली. सहकारी संस्थांच्या मार्फत तालुक्याचा विकास सुरूच होता.

ऐंशीच्या दशकात अकोला तालुक्याला पाणी मिळावे यासाठी त्यांनी केलेले भातखंडे धरणाचे चाक बंद आंदोलन प्रचंड गाजलं. सत्ताधारी आमदार असूनही त्यांच्यावर अनेक खटले दखल करण्यात आले. पण मधुकरराव पिचड यांनी माघार घेतली नाही. 

१९८४ साली बाबासाहेब भोसले यांना हटवून वसंतदादा पाटील मुख्यमंत्री बनले. त्यांनी या तरुण चळवळ्या आमदाराला मंत्री करायचं ठरवलं. शपथविधीचा दिवस उजाडला. पण काही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मधुकरराव पिचड यांच्या नावावर फुली मारली. कारण होतं त्यांच्यावर आंदोलनादरम्यान असलेली खटले. हि गोष्ट वसंतदादांच्या कानावर पडली. त्यांनी तातडीने शपथविधी रोखला. 

दादांनी वेगाने सूत्रे हलवली. त्यांनी नगरच्या जिल्हाधिकार्‍यांशी बोलून हा खटला रद्दबातल करावा अशी सूचना केली. जवळपास चार तास मंत्रिमंडळाचा शपथविधी खोळंबून राहिला. 

शेवटी सगळे खटले रद्दबादल झाल्यावर दुपारी चार वाजता शपथविधी झाला आणि मधुकरराव पिचड आदिवासी विकास विभागाचे राज्यमंत्री बनले.

हे ही वाच भिडू.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.