मधुराज रेसिपी चॅनेलच्या माध्यमातून घरोघरी पोहचलेल्या मधुरा बाचल ची ही गोष्ट

माझ्या रक्ताला वांग्याचा वास येतो. आईशप्पथ खरं सांगतोय. आयुष्यात एखाद्याने जितकी वांगी खाल्ली नसतील तितकी मी खाल्ली आहेत.

घरी विचारलं तर हमखास एकच उत्तर मिळतं, बाजारात काही वेगळं मिळत नाही.

आजपर्यन्त या वांगेपुराणाचं कधी टेन्शन आलं नाही. कारण बाहेरच्या गाड्यांवर वडापाव पासून पावभाजीपर्यन्तचा रतीब चालूच असायचा. पण त्यानंतर आला कोरोना. सगळं जग घरात बसलं आणि घरातल्या माणसांच लक्ष किचनमध्ये गेलं.

आत्ता वांग्याला ऑप्शन मस्ट होता. आहे त्या पदार्थात वेगळं काय करता येवू शकतं याचा शोध सुरु झाला आणि मदतीला आली मधुराज रेसिपी. घरोघरी मातीच्या चुली ही म्हण जशी प्रसिद्ध होती तशी कोरोनाकाळात घरोघरी मधुराज रेसिपी ही नवी म्हणं एस्टॉब्लिश झाली. मधुरा किचन पाहून १२ वर्षाचा मुलगा पण किचनमध्ये प्रयोग करु लागला. यात सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे हे प्रयोग यशस्वी होवू लागले.

निश्चितच जेव्हा कधी खाण्याचा इतिहास लिहला जाईल तेव्हा महाराष्ट्रात तरी मधुरा किचनचा वरचा नंबर लागेल. ही गोष्ट आहे, 

युट्यूब वरील प्रचंड लोकप्रिय ‘मधुराज रेसिपी’ या चॅनलची सर्वेसर्वा मधुरा बाचल.

मधुरा मुळची पुण्याची. तिचं मंगेश बाचल बरोबर लग्न झालं. मंगेश पेशाने इंजिनीयर. लग्नानंतर मधुरा अमेरिकेत स्थायिक झाली. मधुराही अमेरिकेत बँकेमध्ये नोकरी करत होती. दोघांचंही आयुष्य सुखवस्तु सुरु होतं. २००९ ला मधुराने मुलीला जन्म दिला.

यानंतर मधुरा प्रसुती रजेवर गेली. सर्वसामान्य गृहिणींप्रमाणे तिनेही घराकडे आणि छोट्या मुलीकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. अमेरिकेसारख्या देशात छोट्या मुलीला पाळणागृहात ठेवणं तिला मान्य नव्हतं. मुलीची संपुर्ण देखभाल करण्यासाठी तिने बँकेतला चांगला जाॅब सोडला.

जाॅब सोडल्यामुळे छोट्या मुलीचा सांभाळ करताना तिला दिवसभर असा भरपुर वेळ मिळायचा. या वेळात ती युट्युबवर अनेक रेसिपी बनवण्याचे व्हिडीओ बघायची. बघितलेले अनेक पदार्थ ती घरी बनवायची. युट्युबवर पदार्थांचे व्हिडीओ बघताना तिला पुरणपोळी, मिसळ असे अस्सल मराठी पदार्थांचे व्हिडीओ मात्र सापडायचे नाहीत.

इथेच मधुराच्या डोक्यात मराठी पदार्थांसाठी रेसिपी व्हिडीओ बनवण्याची कल्पना आली.

२००९ साली मधुराने स्वतःचं असं ‘मधुराज रेसिपी’ हे युट्युब चॅनल सुरु केलं.

घरातच असणारा डिजीटल कॅमेरा तिने वापरला. घरातलेच लँप आणि ब-यापैकी नैसर्गिक प्रकाशाचा वापर करुन तिने व्हिडीओ शूट करायला सुरुवात केली. तेव्हा युट्यूबची सुद्धा सुरुवात होती. युट्युबवरचे इतर व्हिडीओ इंग्रजी भाषेत असायचे. मधुराचं शिक्षण मराठी माध्यमातुन झालेलं. तिचं इंग्रजी तसं जेमतेम. तरीही तिने युट्युबच्या प्रवाहासोबत चालायचं ठरवलं.

घरातच असणारं किचन हा तिचा स्टुडिओ झाला. माईक नसल्याने आवाज मोठा करुन तोडक्यामोडक्या इंग्रजीत ती व्हिडीओ शूट करायची.

हि ‘मधुराज रेसीपी’ची सुरुवात होती.

सुरुवातीला तिच्या युट्यूब चॅनलला इतका प्रतिसाद नव्हता. तरीही मधुरा फावल्या वेळात व्हिडीओ युट्युबवर अपलोड करत होती. २०१२ ला तिने प्रादेशिक भाषेतलं चॅनल सुरु केलं. त्यानंतर २०१६ ला ‘मधुराज रेसिपी मराठी’ हे चॅनल सुरु केलं.

अस्सल मातीतले मराठी पदार्थ तिच्या खास शैलीत सोप्या पद्धतीने ती लोकांपर्यंत पोहोचवत होती. चिकाटीने २००९ पासुन काम करणा-या मधुराला मराठी युट्यूब चॅनलमुळे प्रसिद्धी मिळाली. २०१८ च्या मध्यावर मधुराच्या मराठी चॅनलचे १० लाख सबस्क्राईबर झाले. आज या चॅनेलचे ३.७८ मिलीयन सबस्क्रायबर आहेत.

सुरुवातीला कमी प्रतिसाद मिळुनही मधुराने संयमाने आणि मेहनतीने तिचं काम सुरु ठेवलं.

संयम आणि मेहनत हे गुण मधुराला तिच्या आधीच्या खडतर प्रवासातुन सापडले असावेत. मधुरा बोर्डाच्या परीक्षेची तयारी करत असताना त्यांचं राहतं घर गेलं. तिचा मोठा भाऊ त्यावेळेस इंजिनीयरींग करत होता. अक्षरशः रस्त्यावर आलेलं मधुराचं कुटूंब नंतर जेमतेम ५० स्क्वेयर फुट इतकी जागा असलेल्या छोट्या घरात राहायला गेलं. मधुराने घराची ढासळलेली आर्थिक परिस्थिती सावरण्यासाठी १२ वीची परीक्षा झाल्यानंतर एके ठिकाणी नोकरी करायला सुरुवात केली.

पुढच्या काॅलेज जीवनात तिचा दिवस पहाटे ६ वाजता सुरु व्हायचा. ६ ते ९ काॅलेजात जाऊन पुढे एका दुकानात नोकरी करुन संध्याकाळी ती मेहंदी, रांगोळीचे क्लास घ्यायची. याच काळात मधुराने संयम आणि मेहनत हे दोन गुण अंगीकारले. आणि हेच गुण तिला स्वतःचं युट्यूब चॅनल चालवायला उपयोगी पडले.

‘मधुराज रेसिपी’ मुळे मधुराला घराघरात लोकप्रिय झाली.

युट्यूब चॅनल मध्ये यशस्वी मजल मारल्यानंतर ५ ऑक्टोबर २०१८ साली मधुराने पुण्यातील टिळक स्मारक मंदिरात ‘मधुराज रेसिपी’ हे खास रेसिपीचं पुस्तक लोकांसाठी आणलं. मराठी पदार्थ संग्रहित रित्या लोकांपर्यंत पोहचावेत या उद्देशाने तिने स्वतः हे पुस्तक लिहिलं.

सुबोध भावे, श्रृती मराठे, चिन्मयी सुमित हे मान्यवर या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित होते.

मधुराच्या रेसिपी फाॅलो करणारे असंख्य चाहते या प्रकाशन सोहळ्याला येऊन सभागृह हाऊसफुल झालं होतं. ॲमेझाॅनवर दोन दिवसात या पुस्तकाची ४००० प्रतींची पहिली आवृत्ती संपली होती. याचनंतर एक पाऊल पुढे जाऊन स्वतःचे मसाले तिने ॲमेझाॅनवर विक्रीसाठी उपलब्ध केले.

कांदा लसुण मसाला, गोडा मसाला, बेगडी मसाला हे मधुरा स्पेशल मसाल्यांचे प्रकार ॲमेझाॅनवर उपलब्ध आहेत. या मसाल्यांना सुद्धा प्रचंड मागणी आहे.

मधुराच्या या संपुर्ण प्रवासात तिचे पती मंगेश यांची सुद्धा मोलाची साथ आहे. बहुतेक व्हिडीओ मंगेश शूट करतात. व्हिडीओचं एडिटींग आणि इतर गोष्टींसाठी मधुराची ७ जणींची टीम काम करते. खुपदा महिला किटी पार्टीचं आयोजन करतात. तसं मधुराने ‘अंगत पंगत’ हि कल्पना राबवली.

यामध्ये घरी मित्रांना बोलावुन त्यांना कोणतेही इतर पदार्थ खायला न देता अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थ खायला द्यायचे, हा या कल्पनेचा मुळ उद्देश आहे.

मधुरा आज एक यशस्वी युट्यूबर आहे. 10 लाख सबस्क्राईबर चा टप्पा ओलांडणारं पहिलं मराठी युट्यूब चॅनल म्हणजे ‘मधुराज रेसिपी मराठी’. आज या चॅनलचे तीस लाखांपेक्षा अधिक सबस्क्राईबर आहेत लहानांपासुन मोठ्यांपर्यंत अनेक जण तिच्या रेसिपी घरी आवर्जुन करतात. देशातच नाही तर परदेशातील नागरीक सुद्धा पुरणपोळी सारखे महाराष्ट्रीयन पदार्थ घरी बनवुन त्याबद्दल मधुराचे आभार मानतात.

मधुरा काही अंशी व्यावसायिक झाली असली तरी कुटूंबाला ती तितकाच वेळ देते. तिची मुलं ८ वाजता शाळेत जातात. यानंतर ती व्हिडीओ शूट करणं, व्हिडीओ अपलोड करणं अशी कामं करते. मुलं ४ वाजता शाळेतुन घरी परतल्यावर ती सर्व कामं बंद करुन फक्त मुलांना वेळ देते. करियर आणि कुटूंब यांचा समतोल कसा साधावा, याचं एक उत्तम उदाहरण म्हणुन आज मधुराकडे पाहता येईल.

  • भिडू देवेंद्र जाधव

हे ही वाच भिडू

1 Comment
  1. Akash says

    ओ बोलभिडु वाले चाचा, मराठी मधले टॉप युट्युबर कोण आहेत त्यावार एखादा निबंध येऊद्यात की.

Leave A Reply

Your email address will not be published.