वयाने वीस वर्षे लहान पाकिस्तानी तरुणाच्या प्रेमात पडली पण तो ISI चा एजंट निघाला.

गुप्तहेरांच्या जगतात हनीट्रॅप ही रेग्युलर गोष्ट आहे. सुंदर तरुणींचा वापर करून शत्रू देशातील हेराकडून गुप्त माहिती काढून घेणे म्हणजे हनीट्रॅप. पण यात एक भारतीय महिला अधिकारी अडकू शकेल असं कोणी स्वप्नात पण विचार केला नव्हता. पण ते घडलं होतं.

 गोष्ट आहे २०१० सालची.

मुंबईवरचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होऊन जास्त काळ लोटला नव्हता. आजवरच्या देशाच्या सिक्युरिटीमध्ये जो हलगर्जीपणा झाला, कोणत्या उणीवा राहिल्या यात संशोधन करून मोठे बदल केले जात होते. पाकिस्तानी आयएसआय व दहशतवादी संघटनांच्यावर कडक नजर ठेवली जात होती.

अशातच एक दिवस रॉला बातमी कळाली की पाकिस्तानमधल्या भारतीय दूतावासातून कोणीतरी सिक्रेट माहिती आयएसआयला पुरवत आहे. जवळपास सहा महिने लक्ष ठेवण्यात आलं. तपासांती नाव पुढे आलं माधुरी गुप्ता यांचं.

माधुरी गुप्ता मुळची दिल्लीची. १९८३ साली ती परराष्ट्र सेवेत असिस्टंट म्हणून दाखल झाली. 

अगदी सुरवातीपासून तिच व्यक्तिमत्व वादग्रस्त राहिलेलं. त्यांना पहिली पोस्टिंग रशियाची राजधानी मॉस्कोला हवी होती. कारण ज्यांना ती आपला गुरु मेंटॉर मानत होती ते आयएफएस ऑफिसर रशियात होते. त्यांना माधुरी सोबत पाहिजे होती. वरच्या लेव्हलवरून खूप प्रयत्न झाले पण ही नेमणूक झाली नाही.

माधुरी गुप्ताची रवानगी क्वालालंपूरमध्ये झाली. 

तिचा उर्दूवर जबरदस्त हातखंडा होता. सुफी संत रुमी यांच्या कवितांवर ती पीएचडीसुद्धा करत होती. माधुरीची गणना उर्दू विषयातील स्कॉलर लोकांच्यात केली जाई. यामुळेच की काय तिच्या संपूर्ण करीयरमध्ये बराच काळ अरब देशांमध्ये नेमणूक झाली होती.

इराकची राजधानी बगदादमध्ये असतानाही तिच्या वागणुकीबद्दल शंका उपस्थितीत केल्या गेल्या होत्या.

तिथल्या एका शीख अधिकाऱ्यासोबत सलगी वाढवून तिने अमेरिकेचे कॉसोवो देशातील मिशन पदरात पाडून घेतले होते.

यानंतर माधुरी गुप्ताची इंडियन कौन्सिल ऑफ वर्ल्ड अफेअर्स या संस्थेत नेमणूक झाली. तिथे देखील तिचं एका लग्न झालेल्या अधिकाऱ्याशी अफेअर असल्याच्या अफवा सुरु झाल्या. त्या अधिकाऱ्याच्या बायकोने तिच्यावर आरोप करणारी पत्रे पाठवली. याकाळात माधुरी आईची तब्येत बिघडली असल्याच्या कारणाने ऑफिसला जाने कमी केले.

द आउटलुक या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार ICWA मध्ये असताना माधुरीबद्दल ती गुटखा खाते याबद्दलही चर्चा केल्या जायच्या.

कालांतराने माधुरी आपली पाकिस्तानला बदली करून घेण्यात यशस्वी झाली.

तिच्या उर्दू वरील कमांड मुळे पाकिस्तानच्या भारतीय दुतावासात प्रेस आणि सूचना खात्याची द्वितीय सचिव म्हणून नेमणूक झाली होती. पाकिस्तानमध्ये रोज घडणाऱ्या बातम्या यांचे इंग्रजीमध्ये भाषांतर करून दिल्लीला पाठवून देणे हे तिचे मुख्य काम असायचं.

एकदा तिथल्या एका पार्टीमध्ये माधुरीने जोरजोरात बडबड केल्यामुळे आयएसआयच तिच्यावर लक्ष गेलं. माधुरी अविवाहित आहे व तिच्या चारित्र्याबद्दल शंका आहेत अशी बातमी त्यांनी काढली व याचा फायदा उठवायचं ठरवलं.

मुबशार रजा राणा नावाच्या एका पत्रकाराच्या वेशातील आयएसआय एजंटने तिच्याशी संपर्क केला व तिची जमशेद नावाच्या देखण्या तरुणाशी ओळख करून दिली. जमशेद उर्फ जिम्मी याने आपल्या गोड बोलण्याने माधुरी गुप्ताला घोळात घेतले.

प्रेमाची भुकेली माधुरी आपल्या पेक्षा वयाने वीस वर्षाने कमी असलेल्या तरुणाच्या हनीट्रॅपमध्ये अडकत गेली.

सुरवातीला अजाणतेपणे तिने त्यांना मदत केली, नंतर आयएसआय ने तिला ब्लकमेल करून इतर माहिती गोळा करण्यास सुरवात केली. माधुरी गुप्ताने आपल्या इमेलआयडी वरून बरीच गोपनीय माहिती आयएसआयला पुरवली.

याच इमेलमधून जमशेदशी ती लग्नाची तयारी करत होती हे देखील समजते. जमशेद तिला इतर पाकिस्तानी लोकांशी बोलण्याबद्दल रागवायचा व तिला बेवफा म्हणायचा.

जमशेद आपल्याला फसवतोय हे माहित असूनही माधुरी गुप्ता यातून बाहेर पडू शकली नाही.

तिच्यामुळे पाकिस्तानमध्ये काम करत असलेल्या बऱ्याच भारतीय रॉ एजंट्सचा पत्ता आयएसआयला लागला. एवढच नाही तर भारतीय दूतावासाचे प्रमुख राकेश शर्मा हे आयएफएस ऑफिसर नसूनही ते रॉचे अधिकारी आहेत ही महत्वाची बातमी तिने आयएसआयला पुरवली.

माधुरी गुप्ताचे कारभार रॉ पर्यंत पोहचलेच. त्यांनी तिच्यावर सहा महिने करडी नजर ठेवली. मुद्दामहून तिला चुकीची माहिती देऊन मिसलीड केले. ती चुकीची माहिती आयएसआयपर्यंत गेल्यावर हे कन्फर्म झाले की माधुरी गुप्ताने देशाच्या संरक्षणासाठी तडजोड केलेली आहे.

मग तिला अटक करण्याची तयारी सुरु झाली.

तिला किंवा आयएसआयला जराही शंका लागू नये यासाठी प्रचंड खबरदारी घेण्यात आली. भूतानमध्ये होणाऱ्या सार्क मिटिंगसाठी निवड झाली आहे अस सांगून तिला भारतात बोलवण्यात आले. २१ एप्रिल २०१० रोजी माधुरी गुप्ता दिल्लीला पोहचली. दुसऱ्या दिवशी पहाटे सीबीआयने तिला ताब्यात घेतले.

पुढे माधुरी गुप्ताने आपला गुन्हा मान्य केला. तिने बरीच माहिती पाकिस्तानला दिली पण त्यात अतिमहत्वाची कोणती माहिती नव्हती हे समोर आले. गेली दहा वर्षे ती तिहारमधील तुरुंगात बंद आहे. भारताला फटका बसलेला हा सर्वात मोठा हनीट्रॅप ठरला.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.