तेव्हा माधुरीला सलमान खान पेक्षा जास्त मानधन मिळालं होतं.

एक मोठी हवेली आहे, तिथे काही बुढ्ढे मंडळी पुल खेळत आहेत. तिथे दोन तरुण कोणाची तरी वाट बघत उभे आहेत.  पुल खेळणाऱ्यातला एक काका तोंडात पानाचा तोबरा भरून एक मस्त शायरी सुनावतो.

“काटे नही कटते है ये लम्हे इंतझार के नजरे जमा के बैठे है रस्ते पे यार के, दिल ने कहां देखे जो जलवे हुस्न यार के लाया है कौन इन्हे फलक से उतारके”

शायरी संपता संपता एक साग्रशृंगार केलेली पर्पल साडीमधली अप्सरा चेहेऱ्यावर खट्याळ हसू घेऊन त्या दिवाणखान्याच्या पायऱ्या उतरत अवतरीत होते. एखादं सुंदर स्वप्न असावं असा हा सीन होता हम आपके है कौन !! या सिनेमातला. भारताच्या इतिहासात सर्वात जास्त लोकांनी पाहिलेल्या सिनेमापैकी एक हा सिनेमा.

ती काळजाला हात घालणारी शायरी म्हणणारा तो सतीश शहा, तो वाट बघणारा सलमान, त्याची मज्जा बघणारा लक्ष्या आणि ती अप्सरेप्रमाणे भासणारी माधुरी. आजही डोळ्यासमोर ते चित्र उभे राहते. माधुरी तेव्हा सुपरस्टार होतीच. तेजाब, बेटा, दिल वगैरे तीचे अनेक सिनेमे हिट झाले होते. पण या पिक्चर मध्ये जेवढी भारी दिसलीय तेवढी ती पूर्वी कधी दिसली नव्हती आणि त्यानंतरही कधी दिसली नाही.

मैने प्यार कियाच्या मेगा सक्सेस नंतर कोणता सिनेमा करावा या विचारात सुरज बडजात्या पडला होता. दीडवर्षे झाले, स्टोरीच फायनल होत नव्हती. अखेर त्याच्या आजोबांनी ताराचंद बडजात्यानी त्याला सांगितलं की आपल्याच राजश्री प्रोडक्शनचा एखादा सिनेमा रिमेक का करत नाहीस??

मग सुरज बडजात्याने राजश्रीचे सगळे सिनेमे बघून काढले. त्याचा पहिला सिनेमा मैने प्यार किया हा राजश्रीच्या मानानं बंडखोर होता पण त्याला या वेळी फुलप्रुफ फॅमिली सिनेमा बनवायचा होता. सचिन पिळगावकर हिरो असलेल्या नदिया के पारचं रिमेक करायचं ठरलं. जवळपास दोन वर्षे सुरज या सिनेमाची स्क्रिप्ट लिहित होता.

मैने प्यारा किया प्रमाणे त्याच्या पिक्चरचा हिरो सलमानचं असणार होता. जेव्हा त्याने ही स्टोरी सलमानला ऐकवली तर सुरवातीला तर तो हसू लागला.

“इस स्क्रिप्ट मै कहाणी कहा है?”

पण सुरजला स्टोरीवर विश्वास होता. त्याने सलमानला रोल साठी तयार केले. सुरज बडजात्या पुढचा सिनेमा बनवत आहे कळल्यावर बॉलीवूड मध्ये खळबळ उडाली होती. जुही चावला सारख्या भरपूर नट्यांनी या सिनेमाच्या हिरोईनच्या रोल साठी लोबियिंग केली. पण सुरजने स्क्रिप्ट लिहितानाच ठरवलेलं हिरोईन असणार सुपरस्टार माधुरी.

माधुरीने जास्त खळखळ न करता होकार देऊन टाकला. तिच्या फिल्मी करीयरची सुरवातच राजश्री प्रोडक्शनच्या अबोध पासून झाली होती. सुरज बडजात्या त्यावेळी असिस्टंट होता. माधुरीला तेव्हा वाटलं पण नव्हतं हा लाजाळू छोटा मुलगा पुढे आपला डायरेक्टर बनेल. पण ती तयार झाली. या सिनेमाला बडजात्याचे लाडके रामलक्ष्मण संगीत देणारं होते.

आलोकनाथ, अनुपम खेर, रीमा लागू, लक्ष्मीकांत बेर्डे, अजित वाच्छानी, सतीश शाह, बिंदू आणि  मोहनीश बहल  अशी तगडी स्टारकास्ट होती. भाभीच्या महत्वाच्या रोलसाठी नवख्या रेणुका शहाणेला निवडल होतं. राजश्रीच्या सिनेमामध्ये बरेच मराठी कलाकार असतात ही परंपरा सुरजही पाळत होता.

सिनेमाची स्टोरी सलमान म्हणतो त्याप्रमाणे काहीच नव्हती. एका मोठ्या कुटुंबातल्या वेगवेगळ्या घटना ज्या त्या कुटुंबाला एकत्र जोडून ठेवतात एवढाच काय तो प्लॉट होता. पण सुरजची मांडणी एकदम नवीन होती.  सिनेमामध्ये व्हिलन, मारामाऱ्या तर सोडाच पण एकही निगेटिव्ह कॅरेक्टरही नव्हतं. भारतीय एकत्र कुटुंबातला परंपरा, साधेपणा, निरागसता संस्कार वगैरे गोष्टी त्याला आपल्या पद्धतीने दाखवल्या होत्या. 

सिनेमाचं शुटींग उटीमध्ये करण्यात आलं होतं. तिथे एका कुटुंबांप्रमाणेच हे कलाकार राहत होते, सेट वर क्रिकेट खेळत होते, जेवण बनवून खात होते. याचंच प्रतिबिंब प्रत्येकाच्या अभिनयातही उतरलं. सुरजने प्रत्येक सीन विचार करून डिझाईन केला होता. संपूर्ण सिनेमात बघितलं तर फ्रेम मध्ये येणारा प्रत्येकजण काहीही ना काही करत असलेला दिसेल.  छोट्यात छोटा रोल असणाऱ्याचाही कॉस्च्युम डिझाईन केलेला होता.

52ad765e55b108cf5f20f5e445168c9b

पिक्चर तयार झाला. यात जवळपास १५ गाणी होती. सिनेमाची लांबीही तीन तासाच्या वर होती. अनेकजणानी सुरज बडजात्याला खुळ्यात काढलं. सिनेमा आहे की लग्नाचा व्हिडीओ आणि तेही सव्वा तीन तास बसून कोण पाहेल. पिक्चरची गाणी कमी कर. पण सुरजचे आजोबा ताराचंद बडजात्या यांनी सांगितलं गाण्याला हात लावायचा नाही. त्यांना तर धिकताना धिकताना हे गाण एवढ आवडल की ते सिनेमाच नाव धिकताना ठेवा म्हणून बसले होते. पण हम आपके है कौन हेच नाव फायनल झालं.

सुरवातीला या सिनेमाचे फक्त २६ प्रिंट बनवण्यात आले. ५ ऑगस्ट १९९४ रोजी दक्षिण मुंबईच्या लिबर्टी सिनेमागृहात हम आपके है कौन रिलीज केला. एक गाण कमी करून सिनेमात १४ गाणी ठेवण्यात आली होती. सुरवातीपासूनच सिनेमा आणि त्यातली गाणी सुपरहिट झाली.

वेगवेगळ्या ठिकाणाहून  वितरक बडजात्याना आम्हाला सिनेमा लावू द्या म्हणून मागे लागले होते. पण थिएटरचं रिन्युएशन झालं असेल तरच त्या तिथे सिनेमा रिलीज करायचा अशी अट राजश्री प्रोडक्शनने घातली. भारतभर सगळे सिनेमागृह नव्या नवरीप्रमाणे सजले आणि मगच हम आपके है कोण तिथे रिलीज झाला. याच सिनेमापासून पिक्चरचं तिकीट महागलं.

मुंबई दिल्ली युपी राजस्थान पंजाब तामिळनाडू सगळी कडे हम आपके है कौनची जादू पसरली. केबल टीव्हीच्या आगमनामुळे थिएटरकडे दुर्लक्ष करणारे मध्यमवर्गीय परत सिनेमागृहाकडे वळले. गावागावातून गाड्या भरून भरून लोक हा पिक्चर बघायला गर्दी करत होते. ब्लॉकबस्टर म्हणजे काय हे खूप दिवसांनी बघायला मिळालं.

दीदी तेरा देवर दिवाना या गाण्याने लोकांना वेड लावल. पिक्चर मध्ये सलमानने घातलेला ड्रेस, माधुरीची पर्पल कलरची साडी वगैरे खूप फेमस झाली. गौतम राजाध्यक्ष यांनी माधुरी सलमानचे काढलेले फोटोज पोस्टरवर झळकले आणि काही दिवसात घराघरात दिसू लागले. सलमानने या सिनेमानंतरचं फिल्म इंडस्ट्रीमध्ये नंबर वनवर दावेदारी सांगितली. 

पण या सिनेमामध्ये सलमान पेक्षा जास्त हवा माधुरीने केली होती. सहज सोपा अभिनय पण त्यातही सौंदर्य तिने दाखवलं होतं. फक्त तिचा डान्स तीचे भावविभ्रम, तिची अदा बघायला पब्लिक परत परत सिनेमा बघत होती.  प्रत्येकाने कमीतकमी दोन वेळा हा पिक्चर थिएटरमध्ये जाऊन बघितला होता. पब्लिकच काय तर जगद्विख्यात चित्रकार एमएफ हुसेन यांनी तर माधुरी साठी हा सिनेमा ८५ वेळा बघितला होता.

माधुरीला या सिनेमासाठी जवळपास अडीच कोटी मानधन मिळालं होत जे की त्याकाळी रेकॉर्ड होता. यासिनेमासाठी सलमानपेक्षा तिला जास्त पैसे मिळाले होते. हिरो पेक्षा जास्त हिरोईनला पैसे मिळतात हे पहिल्यांदाच घडलेलं. तिला या सिनेमासाठी फिल्मफेअर मिळालं. हम आपके है कौनला २ नॅशनल आणि तेरा फिल्मफेअर अवाॅर्ड मिळाले.

download

माधुरी सलमान तर सोडाच पण पिक्चरमध्ये रोल केलेला टफी कुत्रा देखील सुपरस्टार झाला. अख्ख्या भारताचे विवाह समारंभाच्या पद्धती बदलून गेल्या. त्यात बूट चोरायचा विधी अॅड झाला. लग्न, डोहाळे जेवण, रिसेप्शन सगळ ग्रँड करायची पद्धत आली. हम आपके है कौन ने त्याकाळातले सगळे रेकॉर्ड मोडले. शोलेचा कमाईचा विक्रम वीस वर्षांनी मोडला होता. या सिनेमाची जवळपास ७१लाख तिकिटे विकली गेली होती. अजूनही हा विक्रम अबाधित आहे . 

या सिनेमाने ओव्हरसीज केलेला बिझनेस बघून अनेक निर्मात्यांनी हम आपके है कौनचा ट्रेंड फॉलो करायचं ठरवलं. कौटुंबिक सिनेमाची लाट परत आली. त्याच्या पुढच्या वर्षी आलेला डीडीएलजे, करण जोहरचा कुछ कुछ होता है असे अनेक सिनेमे आधुनिक एनआरआय पब्लिक परदेशात जाऊनही भारतीय संस्कृती, जुनी मुल्ये वगैरे कसे जपत आहेत हे दाखवून देत होते. हे सिनेमे देखील सुपरहिट झाले. पण त्यांना हम आपकेचा रेकॉर्ड मोडता आला नाही. अखेर 7 वर्षांनी सनी देओलच्या गदरने सर्वोच्च कमाईचा रेकॉर्ड मोडला.

आजही कधी टीव्हीवर हम आपके है कौन लागला असला तर चॅनल बदलू वाटत नाही. त्यातले ते लक्ष्याचे जोक, टफीचं अम्पायरिंग, उशी फेकायचा गेम आणि माधुरीचं ‘उहूउह्हू ‘ वगैरे पाहिलं तर दिवसभराचा शीणवटा निघून जातो. वाटत जिंदगी गुलझार है. ते सगळ खोट आहे प्रॅक्टिकल नाही हे माहित असत पण ते काही क्षण हातातून सुटू द्यायचे नसतात. तुम्हालाही तो अनुभव आला असेल, बरोबर ना?

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.