झोपेमुळं तुमचं काय नुकसान झालयं? या साहेबांचं मुख्यमंत्रीपद गेलं होतं….

१९७७ सालच्या आणीबाणीनंतर लोकसभेत तर काँग्रेसचा पराभव झालाच होता, पण त्याच बरोबर देशातील काही राज्यांमध्ये देखील काँग्रेसेतर सरकार सत्तेवर आली होती. मध्यप्रदेशमध्ये देखील हा बदल झाला होता. १९५६ साली राज्यच पुनर्गठन झाल्यानंतर पहिल्यांदाच जनता पक्षाचं बिगर काँग्रेसी सरकार अस्तित्वात आलं होतं.

या सरकारचं नेतृत्व करण्याची जबाबदारी एकमताने राजकारणातील संत म्हणवले जाणारे कैलास जोशी यांच्याकडे दिली गेली. पण ते त्यांना केवळ सहाचं महिने टिकवता आलं. मुख्यमंत्रीपद जाण्याचं एकमेव कारण ठरलं होतं ते म्हणजे त्यांची झोप.

जनता दलाचे दिग्गज नेते असलेले कैलास जोशी आणीबाणीच्या कालखंडात मध्यप्रदेशमध्ये पक्षाचा प्रमुख चेहरा होते. त्या दरम्यान ते भूमिगत राहून देखील काम करत होते. पण एक महिनाभर भूमिगत राहिल्यानंतर त्यांच्या काय मनात आलं कोणालाच कळायला मार्ग नव्हता. त्यांनी विधानसभेच्या गेटवर पोलिसांना बोलवून स्वतःला अटक करवून घेतली. मीसा कायद्यांतर्गत १९ महिने जेलमध्ये देखील राहिले. 

१९७७ साली आणीबाणी मागं घेतल्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत जनता पक्षाने प्रचंड बहुमतात सत्ता स्थापन केली. कैलास जोशींची आधी विधिमंडळ नेतेपदी आणि नंतर मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली.

२६ जून १९७७ रोजी ते मध्यप्रदेशचे नववे आणि पहिले बिगर काँग्रेसी मुख्यमंत्री बनले. 

पण त्यानंतर काहीच दिवसात त्यांना एक विचित्र आजार जडला. तो होता झोपेचा. पदावर असताना दिवसातल्या २४ तासांपैकी ते तब्बल १८ – १८ तास झोपू लागले होते. सचिवालयात जाऊन आठवडा, पंधरवडा उलटलेला असायचा. इतकचं काय तर ऑफिसर्स जेव्हा फाईल घेऊन त्यांच्या सरकारी बंगल्यावर यायचे तेव्हा त्या फाईलींवर सही करताना देखील पेंगत असायचे.

त्यांच्या या अशा अवस्थेमुळं विरोधकांना तर संधी मिळालीचं होती, पण पक्षात देखील असंतोष वाढला होता.

इकडे मध्यप्रदेशातील राजकीय गोटात अशा पण चर्चा होऊ लागल्या कि विरोधकांनी त्यांच्यावर जादूटोणाचा प्रकार केला असावा. एकदा केंद्रीय मंत्री राज्याच्या दौऱ्यावर आले असताना मुख्यमंत्री कसेबसे उठून त्यांना भेटायला निघाले पण अर्ध्या वाटेत जाईपर्यन्त त्यांना झोप आवरली नाही. त्यांनी गाडी परत फिरवायला सांगितली. घरी गेले आणि पुन्हा झोपले. 

त्यांच्या ७ महिन्यांच्या कार्यकाळापैकी जवळपास पाच ते साडे पाच महिने झोपेतच गेले होते. अवस्था सुधारत नसल्याचं पाहून त्यांनी स्वतःच राजीनामा देत असल्याचं घोषित केलं. त्यावर तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी त्यांना तुम्ही घरीच थांबला तरी चालेल आम्ही तिकडे फाइली पाठवून देत जाऊ असं सांगत राजीनामा देण्याची गरज नसल्याचं स्पष्ट केलं.

पण १७ जानेवारी १९७८ रोजी अखेरीस त्यांनी आपला राजीनामा राज्यपाल निरंजन नाथ वांछू यांच्याकडे देऊ केला.

राजीनामा देताना देखील त्यांनी आपल्याला झोपेचा आजार झाला असल्याचचं कारण सांगितलं होतं. पण पदावरून पायउतार झाल्यावर काहीच दिवसात आश्चर्यकारक स्वरूपात त्यांचा आजार बरा झाला होता, आणि त्यानंतर १९९८ पर्यंत ते राज्याच्या विधानसभेवर तर २००४ नंतर भाजपकडून खासदार म्हणून निवडून देखील आले होते. 

आपल्या या विचित्र आजाराबद्दल त्यांनी अनेकवेळा वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये सांगितलं होतं. ते म्हणायचे मला आजार झाला होता हि गोष्ट खरीच आहे. मी कंटिन्यू झोपायचो. त्यामुळे मी स्वतः दिल्लीला गेलो आणि मोरारजी देसाई, चंद्रशेखर यांची भेट घेऊन मी राजीनामा देत असल्याचं सांगितलं.

त्यावर त्यांनी मला समजावलं होतं, पण मला हे पटत नव्हतं. मात्र हा आजार का आणि कसा झाला याबद्दल काहीच सांगता येतं नव्हतं. मी त्याबद्दल अनेक डॉक्टरांना भेटलो पण शेवट पर्यंत माहित झालं नाही. पण राजीनामा दिल्याच्या एका वर्षाच्या आताच माझा हा आजार बरा झाला.

हे हि वाच भिडू.  

Leave A Reply

Your email address will not be published.