गोंडवनातील माडिया….

खरंतर भामरागड आणि एकूणच गडचिरोली हे काही पर्यटन स्थळ नाही. मी जे लिहतोय ती केवळ माहिती नाही. त्याकडे तसे बघू हि नये. अशी माझी अपेक्षा आहे. आदिवासी समाजजीवन पूर्णपणे वेगळं आहे. याच्या स्वतः च्या धारणा आहेत. त्यांना धक्का न लावता त्यांच्यासोबत काम करणे गरजेचं आहे.

त्यामुळे या लिखाणातून आदिवासींबद्दलचे असणारे अनेक पूर्वग्रह, कल्पना याला कुठेतरी फाटा मिळेल का, हा देखील यामागचा हेतू आहे.

भाग 1

सोबतच्या फोटोमधील झाडाच नाव ‘गोरगा’आहे. या झाडाला आदिवासी समाजजीवनात विशेष स्थान आहे. माडिया/गोंड आदिवासी समाजात या झाडापासून मिळणाऱ्या ‘गोरग्याला’ खूप आवडीने आणि नियमाने प्राशन केले जाते. या झाडापासून मिळणारा गोरगा हा पांढऱ्या रंगाचा असतो. साधारणतः ताडी सारखी याची चव असते. हा गोरगा सकाळी एकदम चविष्ट लागतो. याची साधारण तुलना एखाद्या डाएट कोकच्या चवीशी होऊ शकते. गोरगा काही तास ठेवला तर तो जास्त उग्र होऊन त्याची अल्कोहल होण्याची प्रक्रिया सुरु होते.

गोरग्यापासून बनवलेल्या दारूला ‘झेरॉक्स’ म्हणतात. झेरॉक्स खूप कडक असते आणि यापासून जोराची किक लागते.गोरग्याची झाडं गावातील प्रत्येक माडिया/गोंडांच्या घराच्या आवारात आणि गावात इतरत्र असतात. ह्या झाडाला नोव्हेंबर ते जून महिन्यापर्यंत गोरगा येत राहतो. गोरगा हे ऊन लागू देत नाही.

झाडाला गोरगा रस येण्यास येण्याची सुरवात त्याच्या वयाच्या 16 वर्षी होते आणि 46 व्या वर्षी रस येणे बंद होतो. त्यामुळे या झाडाला ‘स्त्री’ म्हणून पाहिलं जात.

ज्यापद्धतीने एखाद्या महिलेचं मासिक पाळीच चक्र होत तसेच या झाडाचं देखील आहे. या झाडावर एकदा एखादा व्यक्ती रस काढण्यासाठी चढला तर दुसऱ्या कुणालाही त्या झाडावर चढता येत नाही. त्या झाडाच्या कोंबाची त्या व्यक्तीला चांगली माहिती होते आणि तो चांगल्या रीतीने त्याला हाताळतो. या व्यक्तीला त्या झाडाचा ‘ड्रायव्हर’ म्हणतात. हा ड्रायव्हर रोज रात्री त्या झाडाच्या कोंबाला छेद देऊन मडके बांधून ठेवतो. सकाळी हे मडके/ कळशी उतरवतो.

थोडक्यात हे झाड पतिव्रता सारख असतं. समजा जर हा ड्रायव्हर मृत्यू पावला तर सर्वानुमते दुसरा ड्रायव्हर निवडला जातो. पण लोकांच्या सांगण्यानुसार त्याला पहिल्या सारख झाड सांभाळता येत नाही. शेवटी ज्यावेळी ह्या झाडाला 46 वर्ष पूर्ण होतात त्यावेळी त्याला फळ येत ते फुटल्या नंतर ह्या झाडाचा मृत्यू होतो.

 

भाग 2

सोबतच्या फोटोमध्ये दिसत आहेत त्यांचं नाव आहे “सायबी”.

सायबी हे बिनगुंडा, भामरागढ़ चा रहिवासी आहे. सायबी माडिया आदिवासी आहे. सायबीचे वय किमान 94 वर्ष आहे. सायबी फोदेवाडा, बिनगुंडा आणि इतर गावांचा मिळून धोडराज च्या राज्यांसाठी म्हणजेच ब्रिटिशांसाठी कर गोळा करत होते. सायबीचा चष्मा खूप खास आहे. ते बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाला तुम्ही चष्मा वापरता का असे विचारतात. त्यांचा सध्याचा चष्मा तुटला आहे. त्यांनी एकावर एक असे दोन जोडचष्मे तारेने, दोऱ्याने बांधले आहेत.

आपण सायबीशी हिंदी मध्ये संवाद साधला तर ते माडिया मध्ये उत्तर देतात. सायबी सांगतात, इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांनी सायबीला 26 जानेवारी साठी दिल्ली ला बोलावलं होत. सोबत मग ते नागपूर, मुंबई, पुणे, रायपूर, नाशिक आणि इतर शहरांची नावे घेतात. सायबी जिथे राहतो त्या भागात दरवर्षी 18 किमी चा कच्चा रस्ता पाड्यावरचे लोकं श्रमदानातून बनवतात.

सायबी ला मूल बाळ नाही. तो एकटाच राहतो. त्याचे जेवण आणि इतर गोष्टी भावाचा मुलगा पाहतो. मला माडिया यायला पाहिजे होती, म्हणजे सायबी कडून गोष्टी ऐकता आल्या असत्या.


भाग 3

सोबतच्या पहिल्या छायाचित्रात काही माडिया आदिवासी मुलं दिसत आहेत.

हि मूलं एका लग्नासाठी 25 किलोमीटर चालत गेली होती. आता ती परत घरी जात आहेत. ज्या दिवशी लग्न होते त्या दिवसाच्या आधी पोहचतील असे ते निघाले आणि लग्नाच्या दुसऱ्या दिवशी लग्न उरकून पुन्हा घरी निघाले आहेत. आम्हाला ते भेटले तेंव्हा साधारण 3 वाजले होते आणि त्यांचं अजून अर्धे अंतर चालणे बाकी होते. ते येताना जेवून निघाले होते. आणि आता नाला किंवा पाण्याचा साठा पाहून सोबत आणलेलं जेवण करतील. ह्या मुलांना मराठी आणि हिंदी समजत होते. त्यातली काही मुलं जवळ असणाऱ्या शाळेत जातात. त्यामधल्या दोघांनी आश्रमशाळेचा निळा गणवेश परिधान केला आहे.

दुसरा छायाचित्रात एकाच मुलाचे पाय दिसत आहेत.

उन्हातान्हात खूप अंतर चालत आल्यामुळे पायांची ती अवस्था झाली आहे. त्या सर्वांनी 60 एक रुपयाची रबराची काळी चप्पल घातली आहे. म्हणजे एव्हढं 47 तापमानाच उन्ह आणि रबरी चप्पल आणि सोबत चढ-उतार, दगड-गोटे आणि गरम माती.आपण फक्त विचार करू. ज्याचे पाय आहेत तो आणि दोघ जवळपास 14 ते 17 वयाची आहेत. हि मुलं छत्तीसगढ मधील महाराष्ट्राच्या सीमेलगतच्या पाड्यावर राहतात. ती मुलं बाजारहट करण्यासाठी महाराष्ट्रातील शेवटच्या मोठ्ठया बाजाराच्या ठिकाणी जात आहेत. हे अंतर साधारण 30 किलोमीटरच्या वर आहे.

हे अंतर पूर्णपणे जंगलातील पायवाटेसह टेकड्या पार करून करावे लागते.पाड्यावरून निघताना बांबूच्या काठीची कावड खांद्यावर अडकवून निघाली आहेत. यामध्ये जे काही जंगलातील वन उपज आहे ती आणि जेवण, पाणी सोबत असते. हि मुलं आज संध्याकाळ पर्यंत बाजाराच्या गावी पोहचतील. आज तिथेच कुठेतरी मुक्काम करतील. आणि उद्या सकाळी आपल्या जवळचे जे काही ते विकून पावसासाठीची पूर्व तरतूद म्हणून नवीन बाजार करतील. मग पुढच्या दिवशी परत पायी आपल्या पाड्याकडे निघतील.


भाग 4

सोबत दोन वेगवेगळ्या फोटोंमध्ये जो रस्ता दिसत आहे तो या डिसेम्बर मध्ये लोकांच्या श्रमदानातून बनवण्यात आला आहे. बाजाराच्या गावाहून म्हणजे जिथपर्यंत डांबरी सडक संपते तिंथपासून पुढे पाड्यापर्यंतचा किमान 22 किमी चा रस्ता दरवर्षी आजूबाजूच्या गावातील लोक पंधरा दिवस श्रमदान करून बनवतात. हा रस्ता दर पावसाळ्यामध्ये खराब होतो त्यामुळे पाऊस झाल्यानंतर पुन्हा त्या रस्त्याला व्यवस्थित कले जाते.

हा रस्ता फक्त पायदळ कामाचा आहे. इथून मोटारसायकल कशीबशी जाऊ शकते. कधीमधी ट्रॅक्टर आणि चारचाकी जाऊ शकते. मोटारसायकल जात नाही कारण वळणे खूप आहेत. सोबत मोठे दगड, सरकणारी माती आहे. रस्त्या लगतच्या पाड्यातील कोणाकडेही मोटारसायकल नाही. सायकल असते पण ती घेऊन जाणे म्हणजे तीच वेगळं ओझं ऊरावर घेण असा प्रकार आहे. त्यामुळे इथून पायदळ जाणेच लोक पसंद करतात.सामान्यतः लोक दर आठवड्याच्या बाजाराला एवढे अंतर कापून आपल्या पाड्यावरून बाजाराच्या गावापर्यंत येतात. सामान-सुमान खरेदी करून परततात. समजा येथे वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर त्या आजारी व्यक्तीस बांबू आणि चादरी मध्ये लपेटून डोली करून नेले जाते. या रस्त्याने थोडं आत आणि वर टेकडीवर पोहचल्यावर, तिथल्या गावात सातवी पर्यंत ची शाळा आहे. हि शाळा किमान 5 ते 8 पाड्यांची मिळून आहे. अलीकडे हि शाळा पटसंख्ये अभावी बंद होणार होती. लोकाग्रहास्तव झाली नाही. लोकांचे म्हणणे आहे कि, शाळेमुळे मुलांना शिक्षण मिळेल का? तर हा मुद्दा नाही, परन्तु त्यांचं पोट तर भरेल. यासाठी का होईना हि सातवी वर्गापर्यंतची शाळा सुरु राहिली पाहिजे. या पाड्यामध्ये राशन पोहचवणे म्हणजे मुश्किलीचे आहे. परंतु इथली देखील व्यवस्था चालते कशी-बशी.

पावसाच्या कालावधीमध्ये गावांचा संपर्क पूर्णपणे तुटतो. विचार करून बघू कि इतक्या वरणधार पावसात हे लोकं काय करत असतील. ना इथे लाईट असते, ना मनोरंजनासाठी इतर काही. काय करत असतील काय माहित. परंतु आदिवासी बांधव सक्षम आहेत. या पोस्टीतून वाटेल कि स्वातंत्र्यानंतर देखील अजून हि परिस्थिती आहे. मी मात्र वेगळे पाहतो. माझ्या विकासाच्या संकल्पना वेगळ्या आहेत. त्यामुळे रस्ते बांधून, गाडीची व्यवस्था झाली म्हणजे किंवा सुसज्ज बिल्डिंग उभी राहिली तरच आदिवासी बांधवांचा विकास होईलच असे नाही. त्यामुळे या सर्वांकडे भूतदये पेक्षा डोळस पणे पाहता आलं पाहिजे. अस माझं मत आहे.

भाग 5.

सोबतच्या फोटोंमध्ये दिसत आहेत त्यांचं नाव बंडे बेल्ला कोरामी आहे.

आजूबाजूच्या लोकांच्या सांगण्यानुसार त्यांचं सध्याच वय 107 वर्ष आहे. बंडे बेल्ला बीजा पंडुम मध्ये भेटले. त्यांचे डोळे अतिशय बोलके आहेत. त्यांची या वयातील शारीरिक लकब वाखणण्याजोगी होती. त्या दिवशी पंडुम निमित्ताने त्यांनी सफारी चा फक्त शर्ट आणि लंगोटी परिधान केली होती. इतर दिवशी ते फक्त लंगोटी वर असतात. त्यांच्या काखेला एक तंगूची पिशवी होती. त्यामध्ये पाणी आणि महुआ पिण्यासाठी एक खूप जुनी प्लास्टिक ची बॉटल होती. तिला दोरीनं बांधून लोंबकाळत सोडता येईल अशी व्यवस्था केली होती.

पंडुम च्या वेळी ते एका झाडाखाली निवांत पाय दुमडून बसले होते. आम्हाला पाहून ते जवळ आले. आणि माडिया मध्ये आमच्याशी संवाद साधू लागले. इतक्यात त्याचा पणतू आमच्या जवळ आला आणि त्याने आम्हाला ते काय म्हणता आहेत हे सांगत संवाद पुढे नेला. बंडे बेल्ला एकदा हिलिकॅप्टर मध्ये बसल्याचे सांगत होते. ते सांगताना ते आपला उजवा हात मनगटीमधुन गोलाकार फिरवत होते आणि म्हणत होते कि, हिलीकॅप्टर चे पाते असे फिरते. लगेच पुढे ते म्हणाले हिलीकॅप्टरचं पातं मोडलं म्हणजे, मला भीती वाटते.

आम्ही त्यांना विचारले कि तुमच्या जवानीच्या काळातील आणि आताच्या परिस्थिती मध्ये काय फरक वाटतो, तर ते म्हणाले आधी एक रुपयाला आठ कुडाम धान्य यायचं. आता काहीचं येत नाही. एक कुडाम म्हणजे 12 किलो. म्हणजे एक रुपयाला 96 किलो धान्य यायचं. आता ते येत नाही. पुढे ते म्हणाले पहिले आम्ही जंगलात कुठेही फिरत होतो, लागेल ते घेत होतो परंतु आता तसे नाही. आता संडासला देखील जाता येत नाही. ते सांगत होते, एकदा मोठा पूर आला आणि माझ्या घरासह पैशाचं संदूक देखील वाहून गेलं. त्यापासून माझ्याकडे जास्त पैसा नाही.

आमच्या अवती-भवति असलेल्या घोळक्यात कोणीतरी सांगू लागलं, बंडे चं पाहिलं लग्न झालं आणि ते आपल्या बायकोच्या घरी राहायला गेले. ते जवळपास 12 वर्ष तिच्या घरी थांबले. परंतु एव्हड्या वर्ष्याच्या कालावधीत ती यांच्याशी बोलली नाही. शेवटी तिने दुसरे लग्न केल. हे परत आले. त्यांनी दुसऱ्या मुलीच्या घरी आठ वर्ष घालवली आणि मग लग्न केले. काही वर्ष्यापूर्वी त्यांच्या बायकोच निधन झालं आहे. त्यांना पाच मुली आणि दोन मुले आहेत.

आदिवासी माडिया/गोंड समाजात मुलगा हा मुलीच्या घरी लग्न झाल्यावर जाऊन राहतो. त्याला मुलीच्या घरी राहून आपली कला, कौशल्य आणि शक्ती-युक्ती दाखवावी लागते. त्यानंतर मग मुलगीला घेऊन तो आपल्या घरी येतो. काहीवेळेस मुली देखील आपल्याला आवडणाऱ्या मुलाच्या घरी जाऊन राहतात. त्याला ‘घरघूसाई (घरात घुसने)’ असा शब्दप्रयोग वापरला जातो. नंतर मग त्यांचे देखील लग्न लावले जाते.

तर पुढे त्यांना आमच्यासोबत आणलेली ‘गोरग्याची झेरॉक्स’ दिली. त्यानी पिऊन पहिली आणि बाटली ठेऊन घेतली. त्यांना झेरॉक्स आवडली होती. पुढे पंडुम च्या जेवणाला सुरवात झाली. ते आपल्या कुळाच्या ठिकाणी गेले. आणि एका थाळीत भात आणि मटणाचे कालवण घेऊन खात बसले. सोबत महुची दारू. त्यांनी मस्त जेवण केले. संध्याकाळ साठी आपला हिस्सा मागून घेतला. तो एका प्लास्टिक मध्ये बांधला आणि काखेतल्या पिशवीत ठेवला. त्यानंतर तिथून थोडं बाजूला होऊन बसूनच लघवी केली. आणि पुन्हा इकडे तिकडे फिरू लागले. नंतर सर्व लोक गावाकडे जाण्यासाठी उठले तसे बंडेबेल्लानी आपली पिशवी काखेला मारली आणि सगळ्यांसोबत चालू लागले.

 

भाग 6. 

सोबतच्या फोटो मध्ये दिसत आहे त्याच नाव सैनू आहे.

सैनू पंडुम मध्ये भेटला. सैनू साधारण 22 ते 25 वयाचा असेल. त्याने नववी पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. सध्या त्याला तीन मुले आहेत. त्याचे लग्न शाळेत असतानाच झाले होते. तो आणि त्याची बायको सोबत एकाच शाळेत शिकत होती. सैनू रोज महूची दारू पितो. तो म्हणतो सकाळी उठल्यावर मी चहा पित नाही तर थोडी दारू पितो. त्यानंतर माझे काम चालू होते. मला दारू लागते. दारू कमी झाली कि लगेच परत घ्यावी लागते. डोस कमी होऊन चालत नाही. तो म्हणतो कि, महुआ टॉनिक आहे. त्याने बॉडी एकदम मस्त राहते.

मी विचारले तू जी पितो ती दारू कोण काढत, तर तो माडिया लहेज्यात म्हणाला ‘तीनं दारू काढायची आणि मी प्यायची’. तो सांगत होता, मी खूप कष्ट करतो. रोज शेतात जातो.माझा मोठा मुलगा आता खांद्याला लागतो त्यामुळे मला कष्ट केले पाहिजे. आपण कष्ट करायचं महुआ प्यायची आणि झोपायचं.

सैनू गावातील लोकांना आजारपणात वनऔषधी देतो.

त्याला बरीच औषधाची झाडे आणि वेली माहित आहेत. आम्ही त्याच्याशी बोलत होतो तेंव्हा मी त्याला विचारले कि, ताप आल्यावर काय औषध देतो. त्यावर त्याने मडियात असे म्हंटले कि ‘ काही गोष्टी बाहेरच्यांना आणि सोबत सर्वांसमोर सांगू शकत नाही’. त्याने मला बाजूला नेऊन कमरेला बांधलेला करदोडा दाखवला. त्या कारदोड्याला एक छोट लाकूड बांधलं होत. त्यां सांगितलं कि हे बांधल्यामुळे साप, विंचू मला चावत नाही आणि जर चावलेच तर त्यांचा मृत्यू होतो पण मला काहीच होत नाही. तसेच त्याने गळ्यातली लाकडाची माळ दाखवली.

मला म्हणतो माणसाला वष करण्याचे सुद्धा माझ्याकडे औषध आहे. फक्त ते बोटावर घ्यायचं अली त्याच्या गुडघ्याला लावायचं कि बस, मग तो तुमचंच ऐकणार. मी म्हणालो दे मला, तर म्हणतो कि, तुम वापिस आओ फिर दे दूंगा. लेकिन किसीको बोलना नही. मी हो म्हटलो. सगळ्यांची पंडुमची जेवणं झाली. त्यानंतर सर्व गावाकडे जाण्यास निघालो. तो मस्त आपल्या धुंदीत चालत होता. माडिया भाषेत गाणे म्हणत होता. एकंदरीत सैनू खुप उत्साही होता.

भाग 7.

सोबतच्या फोटोमध्ये “महुआ” च झाड आहे. आदिवासींसाठी हे झाड कल्पवृक्ष आहे. यापासून खूप गोष्टी मिळतात. आदिवासी समाजात या झाडाला देव मानलं जातं. ह्या झाडापासून बनणारी महू ची दारू आपण ऐकली आहे मात्र या हि व्यतिरिक्त या झाडापासून महू फुल, तोडी, बिया, पुइंग, ई. गोष्टी मिळतात. महू फुलाचा उपयोग फक्त दारू गाळण्यापूरताच सीमित नाही तर त्यामध्ये शुद्ध, नैसर्गिक ग्लुकोज ची 60 टक्के मात्रा असते.

याचा उपयोग बेदाणे किंवा गोडी आणण्यासाठी म्हणून खीरीत, पुरणात, पुडिंग आणि इतर पदार्थात करता येतो. महूचे फुल हे ऑरगॅनिक आहे. ते पिकविण्यासाठी कोणत्याही पद्धतातीचे रासायनिक खत वापरलं जात नाही. तुलनेनं जे आपण द्राक्षाच्या बेदाण्यासंदर्भात बोलू शकतो. यामध्ये प्रोटीन देखील उत्तम आहे. फुल पडल्यानंतर जे फळ राहते त्याचा गर गोड लागतो. आतील जी बी आहे तिला ‘तोडी’ म्हणतात. या तोडीपासून तेल काढले जाते. यामध्ये उरलेली जी ढेप आहे तिचा उपयोग भाताच्या शेतात खत म्हणून केला जातो. फुलाच्या आतील परागकनांना ‘पुइंग’ म्हणतात. जर महू चे फुल ओव्हन मध्ये ठेवलं तर ते फुलते आणि त्यावर साखरेचा तरंग येतो आणि आतील जे पुइंग आहे ते मस्त खरपूस लागते. याची चव कॅरामल पॉपकॉर्न सारखी लागते. या झाडाच्या पानाचे द्रोण आणि पत्रावळी बनवतात. हे झाले झाडापासून मिळणारे फायदे.

नंदुरबार मधील सातपुडा धडगाव मध्ये ‘याहमोगी’ मातेच मंदिर आहे. हि आदिवासींची देवी आहे. त्या देवीच्या एका हातात एक मडके आहे. त्यात महूची दारू आहे आणि दुसऱ्या हातातून धान्य लोकांना देत आहे, अशी या देवीची प्रतिमा आहे. या देवीला महूची दारू आणि कोंबडी किंवा बकरा चढवला जातो.

तसेच गोंडवनातील आदिवासीमध्ये देखील जन्म-मृत्यू, लग्न समारंभ, उत्सव आणि इतर वेळी महूच्या दारूला विशेष स्थान आहे. महूच्या दारू शिवाय आदिवासींमध्ये कोणताच कार्यक्रम होत नाही. धडगाव ला असताना लोकं असे सांगायचे कि,

एखाद्या घरी मूल जन्माला आलं कि त्याच्या नावाने एका मडक्यामध्ये महूची दारू भरून ते जमिनीत पुरून ठेवायचं. आणि त्या मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नात ते मडकं बाहेर काढायचं. त्यानंतर ते लग्न समारंभात वापरायचं. म्हणजे विचार करा साधारण 20 वर्ष मुरलेली महूची दारू…

परंतु ह्या सगळ्यानंतर देखील दारू हि नैतिक कि अनैतिक, चांगली कि वाईट या प्रश्नाला निश्चितच जागा राहते. पण हे लक्षात घ्यायला हवं कि, आदिवासी संस्कृती सोबत जोडलेल्या, रुजलेल्या काही गोष्टीना एकदम निकालात काढता येणार नाही. त्या समजून घेतल्या पाहिजेत. त्यानंतरच आपल्याला त्यावर कदाचित भाष्य करता येईल.

खरंतर आदिवासी ही एक स्वतंत्र नागरी संस्कृती आहे. त्यामुळे त्यांच्या विकासाच्या, संस्कृतीच्या स्वतंत्र संकल्पना आणि परंपरा आहेत. त्यामुळे ह्या विषयाकडे संयमी दृष्टीने पाहणे आणि विकास मार्गापर्यंत त्यांना नेताना काय अपेक्षित बदल आपल्यात करायला हवेत ह्याची उजळणी आपल्याला करावी लागेल. तेंव्हा कुठे हे कालानुरूप साजेसं ठरेल. अन्यथा आदिवासी आपल्याला संस्कृती शिकवत नाहीत. त्यामुळे आपण उगाच त्यांना बदलण्याचा अट्टाहास का धरावा?

भाग 8. 

सोबतच्या फोटोंमध्ये मरण पावलेल्या माडिया आदिवासींची स्मारके आहेत.

या स्मारकांवरती विमाने किंवा इतर नक्षी दिसतात. आदिवासींमध्ये आपल्या प्रियजनाच्या स्मृतीमध्ये स्मारकांवर असे विमाने आणि इतर नक्षी लावले जातात. याचा अर्थ असा आहे कि, सदर मृत्यू पावलेला व्यक्ती हा मृत्यू पश्चात विमानात बसून स्वर्गात किंवा दुसऱ्या दुनियेत जातो.

त्याच्या या प्रवासासाठी म्हणून हे विमान असते. माडिया आदिवासींमध्ये विमानात बसने हे एक मोठ्ठे नवलाचे मानले जाते. आमचे एक सहकारी रामा महाकू हे विमानात बसून एका कार्यक्रमाला गेले होते. ते आपल्या विमान प्रवासाचे किस्से सर्वांना सांगत असतात. त्या सांगण्यात नाविण्य, अचंबितपणा स्पष्ट जाणवते. ते चारचौघात ज्यावेळी गप्पा करत असताना नेहमी समोरच्याला उद्देशून म्हणतात कि, ‘तू विमानात बसलायस का, मी बसलोय मला माहित आहे. त्यामुळे मला जास्त माहिती आहे’.

असाच अजून एक विमानाचा किस्सा मी जव्हार(पालघर) मध्ये ऐकला होता. जव्हार येथे राजे श्री.मोकाणे यांचा मोठ्ठा महाल आहे. त्या महालात काही भित्तिचित्र आहेत.त्यामधील एक भित्तिचित्रात राजाचा मुलगा लढाऊ विमाना सोबत आहे. तिथल्या माणसाकडून असे कळले कि, ह्या राज्यांनी इंग्लड साठी म्हणजे ब्रिटिशांसाठी दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी विमान उडवले होते. त्यांचं शिक्षण देखील त्याकाळात इंग्लड ला झाले होते.

माडिया आदिवासी जमातीमध्ये प्रकार पडतात. उदाहरणार्थ सहादेव, पाचदेव वगैरे. या कुळानुसार यांच्या स्मारकाच्या जागा ठरलेल्या असतात. काही ठिकाणी स्मारकाच्या बाहेर पांढरे कपडे गुंडाळलेले असते. मृत्यू पावलेल्या व्यक्तीला ज्या काही गोष्टी आवडत होत्या त्या गोष्टी त्याच्या स्मारकाजवळ ठेवलेल्या असतात. इथे फिरताना बऱ्याच स्मारकांवर विमान दिसते.मग ते विमान लाकडाचे किंवा लोखंडापासून बनवलेले असते. जे लोक या स्मारकांना भेटी देतात ते कापड आणून या स्मरकाभोवती लपेटतात.

या स्मारकांसोबतच पोलीस आणि नक्षल चकमकीत मृत्यू झालेल्या व्यक्तींची दोन्ही गटांकडून स्वतंत्रपणे स्मारके उभारली जातात. त्यावरती ‘शाहिद’ असे लिहलेल असते. काही स्मारके फक्त एक उभा आणि एक आडवा दगड लावून उभारलेली असतात. स्मारकांवर विमान लावण्याची पद्धत केव्हा पासून सुरु झाली हे समजले नाही. पण यातून माडिया बांधव आपल्या प्रियजनाला स्मृतीत चांगल्या प्रकारे ठेवतात हे लक्षात येते.

 

भाग 9.

सोबतच्या छायाचित्रामध्ये मध्ये मोर आणि कोंबडी दिसत आहे.

हे बिनगुंडा पाड्यावरचे छायाचित्र आहे. यामध्ये जमिनीवर पडलेले धान्याचे दाणे मोर आणि कोंबडी सोबत टिपत आहेत. आदिवासी पाड्यांवर खासकरून माडिया आणि गोंड आदिवासी मध्ये प्राण्यांची स्वतंत्र निवासस्थाने असतात. म्हणजे डुक्कर, कोंबडी, गायी या प्रत्येकाचा सोयीनुसार त्यांचे निवास तयार केले जाते. हि निवास बांबूं पासून बनवलेली असतात. उदाहरणार्थ कोंबड्यांचे निवास हे थोडं उंचीवर असत. डुक्करांच्या निवासाच्या जाण्या-येण्यासाठी एक दार आणि साधारण 4 फूट ऊंच मध्ये थोडी जागा असलेली, अश्या पद्धतीने कुंपण केलेले असते. तसेच गायी आणि बैलांच्या बाबतीत आहे.फक्त ते उंची नुसार बदलतं.

माडिया लोकं गायीचं दूध पित नाहीत. त्यांचं म्हणणं अस आहे कि हे दुध गायीच्या वासरासाठी आहे. जर आपण ते दूध काढलं तर ते वासरू काय पिणार, हा एक भाग. आणि दुसर म्हणजे दूध काढल तर गायीच्या थानातून रक्त येते /येईल. या मुळे देखील माडिया लोकं दूध खात-पित नाहीत.

माडिया आदिवासीं निसर्गाला देव मानतात. त्यातला एक महत्वाचा घटक म्हणू ते झाडाकडे पाहतात. त्यामुळे झाडाचे फळ जोपर्यंत परिपक्व होत नाही तोपर्यंत ते फळ खाल्ले जात नाही. कच्चा आंबा माडिया खात नाहीत. ज्यावेळी आंबा पिकतो, पाड येऊन खाली पडतो. त्यानंतर त्या झाडासाठी ‘पंडुम’ केला जातो. त्यानंतर मग ते फळ खाल्ले जाते. सध्या फिरताना अवकाळी वादळामुळे आंब्याच्या झाडाखाली अक्षरशः आंब्याचा सडा दिसतो.

फिरताना ऐके ठिकाणी फणसाच झाड पहिल. त्याला भरपूर फणस लागले होते. मी सहकाऱ्याला विचारले कि, इथे फणस कोणी खात नाही का? तर तो म्हणाला, ‘काहीजण खातात पण काही खात नाही. कारण काही लोकांची श्रद्धा अशी आहे कि, फणस मूळचा हा आपल्या इथला नाही. तर त्या हा पंडुम कसा करायचा.याची काही माहिती नाही आणि पंडुम झाल्याशिवाय काही खाता येत नाही.’ असा प्रश्न आहे. त्यामुळे फणस तसेच राहतात.

तर मुद्दा हा आहे कि, जंगल, जंगलातले प्राणी, झाडे यांना आदिवासीपासून वेगळे पाहता येत नाही. ते सर्व एकमेकांसोबतच जगू शकतात. हा जो मोर आहे तो गावात सहज फिरतो. कोंबड्या, डुकरांसोबत तो खातो. त्याला भीती नाही. फक्त त्याने माझ्यासारख्या बाहेरच्याला ओळखल, त्याच्या फोटो काढण्याच्या धडपडीवरून आणि तो उडून गेला.

 

भाग 10.  

सोबतच्या फोटोमध्ये नदी पात्रामध्ये ‘तेंदूची’ पाने वाळत टाकलेली दिसत आहेत. सध्या तेंदूचा सीझन आहे. तेंदूचे पान बिडी बनविण्यास वापरतात. गोंडवनातील आदिवासींचे मासे, तेंदू, महूचे फुल, दारू, इतर वन उपज, धान आणि यासोबत मरणाची शारीरिक मजुरी इतकेच काय ते आर्थिक उत्पन्नचे प्रमुख स्रोत. यांपैकी आदिवासींच्या एकूण आर्थिक कमाईच्या हिस्यामध्ये तेंदू पत्त्यापासून मिळणारे आर्थिक उत्पन्न जास्त आहे.

तेंदू च्या झाडाच्या मध्यम कोवळ्या पानांपासून बिडी बनवली जाते. तेंदूच्या झाडापासून तेंदू पत्ता काढण्यासाठी/मिळवण्यासाठी हे झाड वारंवार छाटावे लागते. म्हणजे त्याला जी नवीन पालवी फुटते ती तेंदूच मार्केट सुरु होईपर्यंत तयार होते. आमचे सहकारी सांगत होते कि, अलीकडे लोकं झाडांना आग लावतात. यामुळे वणवा पेटतो. जंगलाचे नुकसान होते. ह्या पद्धतीतवर बंदी आहे परंतु जास्त उत्पादनासाठी हि पद्धती अवलंबली जाते. तेंदू पत्ता गोळा करण्याच्या कामात बऱ्यापैकी माडिया कुटुंब सहभागी असतात. तेंदू पत्ता या भागातुन आंध्रप्रदेश,राजस्थान, हैद्राबाद, भोपाळ आणि इतर बिडी पिल्या जाणाऱ्या भागात जातो. यासाठी हैद्राबाद, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र या भागातील व्यापारी भामरागढ़ आणि इतर गडचिरोली भागातील तेंदूची खरेदी करतात.

तेंदू विकताना त्याचे पुडके तयार केले जातात. त्याला तेंदूचे पुडे म्हणतात. एका पुड्यामध्ये साधारण सत्तर पानं असतात. ठेकेदार लोकांनी निविदा काढता वेळी या पुड्यांची स्टॅंडर्ड साईझ ठरवलेली असते. एका स्टॅण्डर्ड गोणीमध्ये सातशे ते एक हजार पुडे असतात. सध्या तेंदूच्या एक हजार पानांसाठी सातहजार रुपयाचा भाव आहे. हा भाव पानाच्या क्वालिटी नुसार बदलत राहतो. ह्या मालासाठी ठेकेदार कंपनी कडून आगाऊ रक्कम उचलतात. त्यातलीच काही रक्कम हि लोकांना आगाऊ देतात. आणि एकदा माल गेल्यानंतर साधारण दोन ते चार महिन्यात त्याची राहिलेली रक्कम आणि थोडाबहुत बोनस भेटतो. बोनस म्हणजे समजा माल ठरलेल्या राकमेपेक्षा काहीश्या रुपयांनी जास्त गेला तर ती रक्कम लोकांना दिली जाते. पण एकदा ठरलेल्या किमतीच्या कमी किंमत ठेकेदाराला देता येत नाही.

या तेंदू च्या व्यवसायातून काही रक्कम मडियांच्या हाती येते. ते यातून शेतीसाठी, घरासाठी आणि स्वतःसाठी लागणारे साहित्य/समान खरेदी करतात. या भागातील लोकांच्या हातात पैसा खूप कमी असतो. कारण जास्त काम नसल्यामुळे खेळते वारंवार भांडवल असणे अवघड आहे. अजून हि बऱ्याचदा देवाण-घेवाण स्वरूपात व्यवहार होतात. या मध्ये आदिवासी बांधव फसवले जातात. म्हणजे शिळे मासे, बिस्किटे तेल मिठ यांसाठी व्यापारी त्यांच्याकडून वन उपज घेतात. आमचे सहकारी सांगतात, तीन पार्ले च्या बिस्कीट पुड्या साठी एक किलो महूचे फुल द्यावे लागते. तसेच मिठाच्या बाबतीत पण आहे. या वन उपज करिता योग्य मार्केट उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.

 

भाग 11.

सोबतच्या फोटोमध्ये लाल मुंग्याचे घरटं आहे. याला माडिया मध्ये “तेडा” म्हणतात. हा तेडा पानांपासून बनलेला असतो. लाल मुंग्या झाडाची मध्यम कोवळी पान असलेली फांदी पाहून तिथे आपले घरटे बनवतात. गोड रस असणाऱ्या झाडावर मुंग्या सहसा घरटे बनवतात. त्यांच्या तोंडातून चिकट स्त्राव निघतो, त्याच्या चिपचिपीत पणामुळे पाने आपसात कचिकटली जातात. लाल मुंग्या ना माडिया मध्ये”धामोडे” म्हणतात.

या मुंग्यांपासून प्रत्येक माडिया च्या घरी लाल मुंग्यांची चटणी बनवलेली असते.

या चटणीला “लाईन्ग” म्हंटल जात. हि चटणी विशेषतः गोरगा, महूची दारू आणि भाताची आंबील यासोबत खाल्ली जाते. लाल मुंग्यांमध्ये फॉर्मिक ऍसिड असल्यामुळे चटणीची चव चटपटी होते. लाल मुंग्यांचा फायदा लोक असा सांगतात कि, उन्हामध्ये फिरताना ऊन लागत नाही. वास्तविक पाहता लाल मुंग्यांमध्ये प्रोटीन मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे हि चटणी अशीही पोषक आहेच. तसेच तापावर देखील हि उपाय कारक आहे. लहान मुलं हि चटणी भातासोबत किंवा अशीच खातात. परंतु मोठ्ठी लोकं सहसा गोरगा, महू आणि आंबील यासोबतच घेतात.

हि चटणी तयार करण्यासाठी मुंग्या गोळा कराव्या लागता. सोबत छायाचित्रात जे घरटे दाखवले आहे ते उतरवून टोपलीत ठेवले जाते. हि टोपली बांबूच्या साहाय्याने उंच सूर्याकडे नेली जाते जेणेकरून कडक उन्हामुळे मुंग्या मरून जातील. काहीवेळेस झाडाखाली कापड अंथरल जात आणि मग झाडाच्या फांद्या हलवून मुंग्या गोळा केल्या जातात आणि नंतर त्या वाळवतात. त्यानंतर त्या मुंग्या सुपात टाकून पाखडून घेतल्या जातात. मग एका कुटनी मध्ये लाल मुंग्या, लसूण, आलं, हिरव्या मिरच्या, मीठ आणि तिखट टाकून कुटलं जात. सर्व एकजीव झाल्यानंतर हि चटणी तयार होते.

याशिवाय अंबाड्याच्या झाडाचा उपयोग देखील माडिया जास्त करतात. अंबाड्याच्या ओल्या फुलाची चटणी बनते. अंबाड्याच्या सुकलेल्या लाल फुलाची पावडर केली जाते. ती पावडर मासे किंवा इतर पातळ पदार्थ बनवताना आंबट चवीसाठी टोमॅटो ऐवजी वापरली जाते. अंबाड्याच्या फुलांपासून सरबत तयार केला जाती. त्याला माडिया मध्ये ‘बिरागुंडा’ म्हणतात. अंबाड्याच्या पाला भाजी म्हणून खाल्ला जातो.

आदिवासींसाठी जंगल महत्वाचे आहे. जंगलातून वनउपज मिळते. त्यावर बऱ्यापैकी उदरनिर्वाह अवलंबून असतो. सध्या सुप्रीम कोर्टाचा आदिवासी जमिनीच्या संदर्भातील निर्णय असो किंवा केंद्रातील वनहक्क कायद्यातील बदलची अमलबजावणी म्हणून महाराष्ट्र्रातील वनांच्या हक्कासंदर्भातील बदल आणि त्याच्या पूर्ततेसाठी फोरेस्ट विभागाला मिळालेले आदेश असोत. यावर लक्ष द्यायला हवे. नाहीतर काही काळाने अश्या पद्धतीच्या गोष्टी फक्त माहिती म्हणून सांगण्या/वाचण्या पुरत्या मर्यादित राहतील.

ह्या लेखनातील निरीक्षणे जरी माझी असली तरी यातील रोजच्या जीवनातील प्रॅक्टिस मात्र तिथल्या लोकांची आहे. ह्या गोष्टी जाणून घेण्यासाठी सुरवातीला डॉ. शिवाली ने संधी दिली. अमर सारखा फिलॉसॉफर,अभ्यासक सोबत आहेच. नंतर पुन्हा हि संधी डॉ. हातेकर सरांनी, श्री. बारहाते सरांनी दिली. या दोन्ही वेळी दुवा म्हणून लालसू भाऊ होतेच. तसेच संदीप भाऊ, सदुराम आणि इतर यांच्यामुळे मला हे समजून घेता आलं. 

धन्यवाद.

राजरत्न कोसंबी. 

लेखक आर्थिक-सामाजिक, मानवंशशास्त्र विषयांवर लेखण करतात. ते सध्या मुंबई विद्यापीठाच्या प्रकल्पावर अर्थतज्ञ म्हणून कार्यरत आहेत. ( Mobile 9028494138 Email -rajkosambi@gmail.com )

 

2 Comments
  1. मामा says

    छान उपक्रम आहे . माहीत नसलेली माहीती मिळाली शुभेच्छा

Leave A Reply

Your email address will not be published.