महाबळेश्वर, माथेरान बोर झालं असेल तर मग या उन्हाळ्यात या ४ ठिकाणी अवश्य जा..

आपल्या महाराष्ट्रात ना उन्हाळा म्हणजे रेड अलर्ट असतो. अशा काय उन्हाच्या झळा लागतात की नको नकोस होतं. आताच बघा ना, उन्हाळयाचे हे सुरुवातीचे दिवस आहेत तरी एसीमधून बाहेर आलं तर सूर्याच्या तर जवळ पोहोचलो नाही ना आपण? असं वाटायला लागतं.

आमच्या ऑफिसमध्ये तर कुणी फॅन ५ मिनिटांसाठी जरी बंद केला तर त्याच्यावर काळच आला समजा. खैरच नाही काही भिडूची. मात्र एक आहे बॉस, उन्हाळा जसा उष्णता घेऊन येतो तसंच सुट्ट्या देखील घेऊन येतोच. मग अशात ऊन आणि सुट्ट्या यांचं समीकरण साधून ट्रॅव्हल डेस्टिनेशन आपल्याला ठरवायच्या असतात.

पण यातच खूप गफलत होते. म्हणून आम्ही तुमचा हा ताण जरा हलका करायचं ठरवलं आणि आलोय काही अशी ठिकाणं घेऊन जिथे तुम्ही गर्मीची चिंता न करता उन्हाळ्यात हमखास फिरायला जाऊ शकतात. 

पण हो, आता तुम्हाला वाटेल की हे तेच ठिकाण सांगतील महाबळेश्वर, अलिबाग, माथेरान, ताडोबा,  माळशेज घाट, लोणावळा, खंडाळा वगेरे वगैरे तर असं काही नाहीये.

अशी चार ठिकाण आहेत जी खूप कमी फिरण्यात, ऐकण्यात आहे. पण  फुल्लऑन धम्मालची गॅरंटी आहे. बघुयात कोणती… 

१) आंबोली

तुम्ही जर निसर्गप्रेमी असाल तर अंबोली ही जागा तुमच्यासाठी बेस्ट आहे. पश्चिम घाटातील सह्याद्री टेकड्यांवर 2260 फूट उंचीवर वसलेले आंबोली हे महाराष्ट्रातील काही मोजक्या हिल रिसॉर्ट्सपैकी एक आहे, जिथून अरबी समुद्राचा विस्तीर्ण भाग पाहता येतो.  गोव्याच्या किनाऱ्यावर जाण्यापूर्वी तुम्ही ज्या शेवटच्या हिल स्टेशनवरून जाता, तेच हे आंबोली. 

मुंबईपासून 490 किलोमीटर अंतरावरील हे हिल स्टेशन्स महाराष्ट्रातील सर्वात कमी एक्सप्लोर केल्या जाणाऱ्या ठिकाणांपैकी एक आहे. पण नैसर्गिक वैभवामुळे या हिल स्टेशनला महाराष्ट्राची ‘राणी’ मानले जाते. आंबोली धबधबा, शिरगावकर पॉइंट, माधवगड किल्ला, नांगरता धबधबा, सनसेट पॉइंट, सी-व्ह्यू पॉइंट, महादेवगड पॉईंट, बोटॅनिकल गार्डन, बॉक्साईट माईन्स, हिरण्यकेशी मंदिर, नागट्टा फॉल्स, नारायण गड ही इथली प्रमुख आकर्षणे आहेत.

तर दुर्ग ढाकोबा ट्रेक, रॉक क्लाइंबिंग, पक्षी निरीक्षण, कॅम्पिंग अशा बऱ्याच गोष्टी तुम्ही इथे करू शकतात.

२) काशीद

लहानसा समुद्र किनारा लाभलेलं उत्तर कोकणात हे शहर. पांढऱ्या- सोनेरी वाळूचे किनारे, स्वच्छ निळा समुद्र आणि घनदाट जंगलातील पर्वत यासाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण. मार्च ते जून हा भेट देण्यासाठीचा सर्वोत्तम काळ. आणि मुख्य आकर्षणं? काशीद बीच, मुरुड जंजिरा किल्ला, कोरलाई किल्ला, रेवदंडा बीच आणि किल्ला, आणि फणसाड पक्षी अभयारण्य.

इथे तुम्ही काशीद बीचवर कॅम्पिंग, बनाना बोट चालवणे, फणसाडचा ट्रेक, मुरुड जंजिराजवळ स्कुबा डायव्हिंग, पॅरासेलिंगअशा गोष्टींचा आनंद घेऊ शकतात. म्हणजेच प्रायव्हेट क्षण घालवण्यासाठी तसेच साहसाचा परिपूर्ण डोस मिळवण्यासाठी हे ठिकाण परफेक्ट आहे.

३) मालवण

स्टनिंग बीचेस, विस्तीर्ण बॅकवॉटर आणि प्राचीन किल्‍ल्‍यांमध्‍ये तुमच्‍यासाठी एक सुंदर कॅन्व्हास मालवण रंगवतं. राज्यातील सर्वात प्रसिद्ध मासेमारी बंदर म्हणून ओळखलं जाणारं मालवण हे प्रायव्हसी, मस्त सनसेट आणि अडव्हेंचरस वॉटरस्पोर्टससाठी तुम्ही प्रेफर करू शकतात. 

ऑक्टोबर एन्डपासून ते मेच्या मध्यापर्यंत तुम्ही जाऊ शकता. आणि तारकर्ली बीच, मालवण बीच, निवती बीच, रॉक गार्डन, देवबाग बीच, चिवला बीच, सिंधुदुर्ग किल्ला, मालवण सागरी अभयारण्य अशा ठिकाणांना भेट देऊ शकतात.

कारण इथे कार्ली बॅकवॉटरमध्ये बोटिंग, त्सुनामी बेटावर स्कूबा डायव्हिंग आणि डॉल्फिन सफारी अशा ऍडव्हेंचर सोबत झिंगा फ्राय, सोलकढी, घावन आणि मालवणी खाजा यांचा समावेश असलेल्या स्वादिष्ट मालवणी पदार्थांची चव तुम्ही घेऊ शकता. 

४) तोरणमाळ

उन्हाळ्या आलाय आणि तुम्ही तोरणमाळ फिरण्यासाठी चूज केलंय. बस्स. कमाल. ठिकाणाबद्दल जाणून घेण्याआधी नावाचं इतिहास बघू. तर हे नाव ‘तोरणा’ या शब्दावरून घेतले गेले आहे. तोरणा ही या भागातील आदिवासींची देवी आहे जिची ते पूजा करतात. इथे आदिवासी संस्कृती सोबतच अनेक सुंदर तलाव, कमी एक्सप्लोर केलेल्या गुहा आणि व्ह्यू पॉइंट्स आहेत.

सातपुडा टेकड्यांच्या सात रांगांच्या व्यतिरिक्त तोरणमाळमध्ये वेगवगेळ्या वनस्पती आणि जीवजंतूंचा इथे बघायला मिळतात. ऑक्टोबर ते मे ही भेट देण्याची सगळ्यात चांगली वेळ. लोटस लेक, यशवंत तलाव, सीता खाई, खडकी पॉइंट आणि मच्छिंद्रनाथ गुहा ही इथली काही लोकप्रिय ठिकाणे आहेत. जिथे तुम्ही ट्रेकिंग, पिकनिक  करू शकतात.

या चार ठिकाणांसोबतच तुम्ही कर्नाळा, कोरोली, जव्हार, लवासा, भंडारदरा, इगतपुरी अशा ठिकाणी देखील जाऊ शकतात. बघा.. निवडा.. आणि आम्हालाही नक्की सांगा तुम्ही काय निवडलंय ते.. शिवाय तुम्ही पण अशी काही हटके ठिकाणं इतर भिडूंसाठी सजेस्ट करा..

हे ही वाच भिडू 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.