मराठी मल्लांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी हरिश्चंद्र बिराजदार पुढे आले..!

सत्तरच्या दशकात सतपाल नावाचं वादळ अख्या भारतात कुस्तीविश्वावर राज्य करत होत. हो वादळचं. कारण तो अजिंक्य होता. दिल्लीच्या हनुमान आखाड्यातल्या गुरु हनुमान यांचा हा चेला. उत्तरेतले पहिलवान त्याच्या बरोबर लढत तरी देत होते पण दक्षिणेतले पहिलवान त्याच्या पुढे उभेही राहू शकत नाहीत अशी परिस्थिती होती.

कोल्हापूरच्या खासबाग मैदानात झालेल्या कुस्तीत हिंद केसरी दादू चौगुलेंना त्याने ज्या पद्धतीने आसमान दाखवलं होतं ते लोक अजूनही विसरले नव्हते.

गोरापान देखणा अंगावर एक तोळासुद्धा चरबी नसलेला उंचापुरा परफेक्ट शरीरयष्टी असलेला असा हा सतपाल. कुस्तीशौकीन त्याचा उल्लेख महाबली सतपाल असा करायचे. महाबली सत्पाल असा गौरव त्याचा होतच होता पण सोबत मराठी मल्लांचा अपमान देखील होतं होता. एकामागून एक मराठी मल्ल त्याच्यापुढे पाठ टेकवत होते.

मराठी मल्लांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी हरिश्चंद्र बिराजदार पुढे आले.

खर तर बिराजदार आणि सतपाल यांची कुस्ती विजोड होती. सतपाल जवळपास सव्वा सहा फुट उंचीचा तर हरिश्चंद्र मामा पावणे सहा फुट. दोघांच्या वजनात देखील वीस किलोचं अंतर. तरीही हरिश्चंद्र बिराजदारांनी त्याला आव्हान दिले कारण फक्त महाराष्ट्राची अस्मिता जपायची म्हणून.

हरिश्चंद्र बिराजदार हे मुळचे मराठवाड्यातल्या लातूर जिल्ह्यातले. पिढ्यानपिढ्या कुस्ती त्यांच्या घरात चालत आलेली. हाच वारसा पुढे चालवण्यासाठी हरिश्चंद्र मामा वयाच्या पंधराव्या वर्षी कोल्हापूरच्या गंगावेस तालमीला आले. तिथं मेहनत करून त्यांनी आपलं नाव कुस्ती विश्वात बनवलं. एकोणिसाव्या वर्षी महाराष्ट्र केसरीची गदा मिळवली. राष्ट्रकुल स्पर्धेत देशाला सुवर्णपदक मिळवून दिल. दिल्लीला नेत्रपाल पहिलवानाला हरवून रुस्तुम-ए-हिंद ही पदवी सुद्धा मिळवली.

पण तरीही १०० किलोचा महाबली सतपाल ही त्यांच्यासाठी आवाक्याबाहेरचीच गोष्ट होती.

ठेकेदार सिद्राम पाटील यांनी ११ जानेवारी १९७७ या तारखेला बेळगाव मध्ये पै.हरिश्चंद्र बिराजदार विरुद्ध पै. सतपाल ही लढत आयोजित करण्यात आली. या कुस्तीसाठी बिराजदार यांनी जबरदस्त मेहनत केली होती. वस्ताद गणपत खेडकर यांच्यासोबत अनेक दिवस सतपालची कमजोरी काय असेल यावर चर्चा केली होती. अखेर सतपालवर औषध सापडले. हरिश्चंद्र मामा कुस्तीसाठी तयार होते.

कुस्तीच्या दिवशी बेळगावात मैदानाकडे जायला प्रेक्षकांची रीघ लागलेली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शौकीन बेळगावात दाखल झाले होते. कुस्तीला प्रारंभ झाला. सुरवातीला एकमेकाची ताकद अजमावण्यात आली. कमी वजनाच्या प्रतिस्पर्ध्या आपण सहज हरवू या अविर्भावात सतपाल होता. बिराजदारनी केलेली तयारी त्याला ठाऊक नव्हती. नेहमी प्रमाणे आपला हुकुमी डाव असलेला पट त्याने टाकला. बिराजदार यांनी त्याला कसे तर करून परतवून लावले. असे एक दोनदा झाले.

अखेर सतपालने परत पट काढायचा प्रयत्न केल्यावर सामने थंडरची शक्कल वापरून हरिश्चंद्र मामांनी त्याला उचलले आणि एका क्षणात त्याला चीतपट केले.

अख्या मैदानात न भूतो न भविष्यती असा जल्लोष सुरु झाला.

पंच असलेल्या मारुती मानेनी सुद्धा खुश होऊन बिराजदारांच्या पाठीवर थाप दिली. ते सुद्धा नाचू लागले. अवघ्या १९ मिनिटात महाबली सतपालचा निकाल लावण्यात आला होता. बेळगाव मध्ये बिराजदारनी सतपालला अस्मान दाखवल्याची बातमी कोल्हापुरात पोहचली आणि तिथे आख्ख्या गाव भर गुलाल उधळण्यात आले. लोकांसाठी हि दुसरी दिवाळीच होती.

दुसर्या दिवशी हरिश्चंद्र मामांच कोल्हापुरात आगमन झाल्यावर त्यांची हत्ती वरून मिरवणूक काढण्यात आली. संस्थानकाळानंतर पहिलवानाची हत्तीवरून मिरवणूक काढण्याची हि पहिलीच वेळ होती. गावभर साखर वाटली जात होती. जिथे जाईल तिथे “हरी रे हरी तुने मारी भरारी” या घोषणांनी परिसर दुमदुमून जात होता.सतपालच्या सुलतानीवर विजय मिळवून हरिश्चंद्र बिराजदारांनी मराठी पहिलवानांची प्रतिष्ठा परत मिळवली होती

Leave A Reply

Your email address will not be published.