महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत एकदा चिठ्ठी टाकून आमदार निवडण्यात आला होता

आजवर महाराष्ट्रात अनेक अटीतटीच्या निवडणुका आपण पहिल्या आहेत. कार्यकर्ते फोडणे त्या नादात एकमेकांची डोकी फोडणे गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा हा राजकारणात कायमचा भाग झाला आहे.

मात्र याच महाराष्ट्रात एक निवडणूक अशी झाली होती जिथे उमेदवारांच्यामध्ये चिठ्ठी टाकून आमदार निवडावा लागला होता.

गोष्ट आहे १९६२ सालची. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मिती नंतर पहिल्यांदाच निवडणुका होत होत्या. पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण प्रचाराच नेतृत्व करत होते. यापूर्वीच्या निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसला संयुक्त महाराष्ट्र चळवळीमुळे मोठा फटका बसला होता.

यशवंतरावांच्या कुशल कारभारामुळे काँग्रेसवरचा जनतेचा राग कमी झाला होता.

राज्यात आपला गड पक्का बनवण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न चालू होते. त्यांना शेतकरी कामगार पक्ष व प्रजा समाजवादी पक्षाचे मोठे आव्हान निर्माण झाले होते. कोकणात या पक्षांचा मोठा प्रभाव होता.

रायगड जिल्ह्यातील महाड विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे तिकीट ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. शंकरराव बाबाजीराव तथा शं. बा. सावंत यांना देण्यात आले होते.

स्वातंत्र्य लढ्याच्या काळापासून राजकारणात सक्रिय असलेले महाड नगरपालिकेचे नगराध्यक्ष पद भूषविलेले शंकरराव सावंत हे अभ्यासू नेते होते.

त्यांच्या विरोधात प्रजासमाजवादी पक्षाचे सखाराम विठोबा साळुंखे, संयुक्त महाराष्ट्र समितीचे र. बा. मोरे , जनसंघाचे लक्ष्मणराव मालुसरे, तर बा. गो. मोरे हे अपक्ष उमेदवार रिंगणात होते.

त्यामुळे महाडची निवडणूक पंचरंगी बनली होती

प्रजासमाजवादी पक्षाच्या सखाराम साळुंखे यांचा मतदारसंघात जोर होता. त्यांनीदेखील या भागात चांगलं काम केलं होतं. संयुक्त महाराष्ट्र चळवळीवेळी ते आघाडीवर होते.

काँग्रेसच्या शंकरराव सावंतांच्या तोडीस तोड तुल्यबळ उमेदवार प्रजा समाजवादी पक्षाने दिला होता.

या व अशा अनेक कारणांनी ही निवडणूक अटीतटीची झाली होती. विविध आरोप प्रत्यारोपांनी प्रचार गाजला होता.सगळ्याच उमेदवारांनी जोर लावला होता, विक्रमी मतदान झाले.

एकूण ५८ हजार १६२ मतदारांपैकी ३४ हजार १३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. सगळ्या महाराष्ट्राचे लक्ष या मतदारसंघाकडे लागले होते. निवडणुकीत कोण विजयी होणार याची खात्री कोणीच देवू शकत नव्हते.

मतदानानंतर प्रत्यक्ष मतमोजणीचा दिवस उजाडला आणि त्यात धमाकेदार आकडे समोर येऊ लागले.

निकालाच्या अगदी पहिल्या फेरीपासून शं. बा. सावंत आणि सखाराम साळुंखे यांच्यात चुरस होती. कधी काँग्रेस पुढे तर कधी प्रजासमाजवादी पुढे असा घोळ सुरू होता. गुलाल घेऊन निकाल ऐकत असणाऱ्या कार्यकर्त्यांची धडधड वाढत चालली होती.
तब्बल दोन दिवस ही मतमोजणीची प्रक्रिया सुरू होती.

अपक्ष उमेदवार बा.गो. मोरे यांनी देखील अनपेक्षितपणे चांगली मुसंडी मारली होती. संयुक्त महाराष्ट्र समितीचे आणि जनसंघाचे उमेदवार प्रभाव पाडू शकले नव्हते.

फायनल फेरीचा निकाल हाती आला तेव्हा सावंत आणि साळुंखे या दोन्ही उमेदवारांना नेमके १२ हजार ६६४ अशी समान मते मिळाली होती.

अपक्ष मोरे यांना ५,६०९ तर समितीच्या मोरेंना २,०५० मते मिळाली होती. जनसंघाकडून लढणाऱ्या लक्ष्मण मालुसरे यांना १०२७ मते मिळाली होती.

प्रमुख दोन उमेदवारांना समान मते मिळाल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांपुढे पेच निर्माण झाला होता.

दोन वेळा फेरमोजणी झाली तरी तशीच स्थिती कायम राहिली.

गंमत म्हणजे निवडणुकीच्या वेळी पोलादपूर तालुक्यातील एका मतदान केंद्रावर मतदानाची वेळ संपल्याने उशिरा आलेल्या १९ मतदारांच्या मतपत्रिका मतदार केंद्रस्थानी बंद लखोट्यात ठेवल्या होत्या.

मात्र या मतपत्रिकांची मतमोजणी करता येणार नसल्याचा त्यावेळी निवडणूक अधिकाऱ्यांनी निर्णय दिल्याने ही १९ मते विचारात घेतली नव्हती.

या पेचप्रसंगातुन मार्ग काढण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांनी शंकरराव सावंत आणि सखाराम साळुंखे यांच्यात चिठ्ठ्या टाकून निकाल घोषित करण्याचा निर्णय घेतला.

यात काँग्रेसच्या शं.बा.साळुंखे यांना नशिबाने साथ दिली व त्यांची चिठ्ठी निघाली. त्यांचा विजय झाला. काट्यावर बसलेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. अगदी थोडक्यात विजय मिळवून शंकरराव साळुंखे आमदार बनले.

महाडची निवडणूक ही आजवरची वैशिष्ट्यपूर्ण निवडणूक ठरली.

आजवर आपण ग्रामपंचायत, जिल्हापरिषद, नगरपालिका यात चिठ्ठी टाकून निवडणूक पाहिली होती पण विधानसभेच्या निवडणुकीत चिठ्ठी टाकायला लागणे हे महाराष्ट्रच नाही तर भारताच्या राजकीय इतिहासात त्यापूर्वी व त्यानंतर कधी झालं नसेल.

या निवडणुकीतील काठावरच्या नशीबवान विजयानंतर शंकरराव सावंत यांचा महाडमध्ये जम बसला. पुढे ते लोकसभेच्या निवडणुकीत देखील निवडून आले.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.