शूर महादेव कोळी आणि त्यांच्या बलिदानाचे स्मरण करणारा शिवनेरीवरील कोळी चौथरा

महाराष्ट्रात सर्वत्र आढळणारा समाज म्हणजे कोळी समाज. यात त्यांच्या व्यवसायावरून प्रामुख्याने दोन वर्ग पडतात,  मासे मारणारे आणि शेती करणारे कोळी. शेती करणारे कोळी म्हणजे महादेव कोळी व मल्हार कोळी.

अनेक इतिहासकारांच्या मते बालाघाट किंवा महादेव डोंगरात वसतिस्थान असणारे कोळी म्हणजे महादेव कोळी.

या जमातीचे लोक पूर्वी पासून पराक्रमी म्हणून ओळखले जायचे. त्यांचा परंपरागत व्यवसाय शेती करणे व जंगलातले पदार्थ गोळा करण्याचा असला तरी दऱ्याखोऱ्यात राहणारे  महादेव कोळी धाडसी  व पराक्रमी होते. त्यांच्या या शौर्याच्या परंपरेमुळे डोंगरी किल्ल्यांच्या रखवालीची जबाबदारी त्यांच्याकडे दिली जात होती. 

विशेषतः कोकण किनारपट्टीच्या भागात कोळी समाज वर्चस्व राखून होता. तेराव्या शतकात पालघर येथील  जव्हार येथे महादेव कोळी समाजातील जायबा पोपेरे यांनी आपले वेगळे राज्य स्थापन केले व पुढे शेकडो वर्षे तिथला कारभार त्यांच्या वंशजांनी सांभाळला.

अहमदनगर पुणे भागात जुन्नर येथे महादेव कोळी समाजाचे मोठ्या वास्तव्य होते.

पुढे सतराव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांचा उदय झाला. त्यांनी बारा मावळात फिरून स्वाभिमानाचा हुंकार मराठी तरुणांमध्ये भरला. आपल्या जहागिरीमधील तोरणा, राजगड, पुरंदर हे किल्ले ताब्यात घेऊन स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. मुघलांना जरी त्या ठाऊक असल्या तरी अजून त्यांना त्यांचा थेट उपसर्ग होत नव्हता.

याच काळात शिवाजी महाराजांच्या पासून प्रेरणा घेऊन महादेव कोळ्यांनी जुन्नर भागात उठाव केला.

छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला व आसपासचा भाग अनेक वर्षे निजामशाहीकडे होता. निजामशाहीचा अस्त झाल्यानंतर या दुष्काळी प्रदेशाकडे आदिलशाहीचे व मुघलांचे थोडेसे दुर्लक्षच झाले होते. निजामशाहीच्या  राजवट कोणतीही असो शिवनेरी किल्ल्याच्या रखवालीची जबाबदारी महादेव कोळी समाजाकडे होती.

पण परकीय राजवटीची चाकरी करण्यापेक्षा स्वतःचा अमंल प्रस्थापित करण्याचा निर्णय या समाजातील तरुणांनी घेतला. या तरुणांना संघटित करण्याचं श्रेय इतिहासात काही ठिकाणी खेमू नाईक यांच्या कडे दिले जाते.

त्यांच्या नेतृत्वाखाली शिवनेरी किल्ला कोळ्यांनी ताब्यात घेतला.

गोष्ट १६५७च्या काळातली. तेव्हा दिल्लीत बादशहा होता शहाजहान. त्याने दक्षिणेचा सुभेदार म्हणून जबाबदारी आपला मुलगा औरंगजेब यांच्याकडे दिली होती. धर्मांध समजला जाणारा औरंगजेब क्रूर व कपटी देखील होता. त्याला जेव्हा शिवनेरी वरच्या उठावाची बातमी कळाली तेव्हा त्याने महादेव कोळ्यांना पस्त करण्यासाठी एक भली मोठी फौज पाठवली.

शिवनेरीला शाही मुघल सेनेचा वेढा पडला. खेमू नाईक व त्यांच्या सहकाऱ्यांची  सेना नवखी होती. बलाढ्य मुघलांनी त्यांचा पराभव केला. सुमारे १५०० महादेव कोळ्यांना जेरबंद करण्यात आले.

असा उठाव पुन्हा होऊ नये  म्हणून त्यांचे अतोनात हाल केले गेले. शिवनेरी वरच्याच माथ्यावर एका चौथऱ्यावर  या साऱ्यांचा शिरच्छेद करण्यात आला. या नरसंहाराची आठवण त्या चौथऱ्यावर  कवट्यांचा ढीग रचण्यात आला.

कोळी तरुणांनी बलिदान केले म्हणून त्या चौथऱ्याला कोळी चौथरा नावाने संबोधिले जाते. पुढे  त्या चौथऱ्यावर एक घुमटी बांधली गेली व त्यावर फारसीमधे दोन शिलालेखदेखिल आहेत.

पुढच्याच काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सहकाऱ्यांसह जुन्नर भागावर हल्ला केला व आदिलशाहीच्या सैन्याला परास्त करून प्रचंड लूट जमवली. शिवनेरीच्या नरसंहाराचा हा बदला घेण्यात आला.

हे हि वाच भिडू

3 Comments
  1. शरद कडाळी says

    आज खूप दिवसानंतर बोलभिडू मध्ये काही चूक आढळून आली, तीपण एव्हडी मोठी की व्याकरणातील झालेली चूक हा आपला आळस तर आहेच पण आपले पान भरण्यासाठी काहीपण छापू नये. यूट्यूब वर महादेव कोळी चौथर्याविषयी भरपूर व्हिडिओ बनवले आहेत, ते आपण बघू शकता. यातून आपण वाचक मंडळींचा तर अपमान करतच आहोत पण आपण त्या लोकांचाही अपमान करत आहोत ज्यांनी स्वराज्य रक्षणासाठी आपल्या जिवाचीही परवा केली नाही. कृपया ही माहिती edit करा किव्वा delete तरी करून टाका.

  2. Tushar Shelkande says

    जायबा पोपेरे हे खरे नाव नाही. जयदेवराव मुकणे हे खरे नाव आहे ही दुरुस्त करावी

  3. Tushar Shelkande says

    तसचे महादेव कोळी समाजाचे राजे महाराज जयदेवराव मुकणे यांच्यावर तसेच श्रीमंत महाराज यशवंतराव मुकणे ( First Flight lieutenant ) जव्हार संस्थानातील या दोन प्रसिद्ध राजावर कृपया पोस्ट करावी

Leave A Reply

Your email address will not be published.