नाना फडणविसांनी राजकारण केलं नसतं तर दिल्लीवर मराठ्यांचं राज्य असतं.
शिवकाळानंतर मराठ्यांच्या इतिहासाची ओळख म्हणजे “लढाईत जिंकले पण तहात हरले” अशीच आहे. आपल्या पराक्रमाच्या जोरावर मोठमोठी युद्धे जिंकली पण त्यानंतर करावा लागणारा धूर्तपणा नसल्यामुळे मराठी माणूस एकहाती अख्या भारतावर राज्य करू शकला नाही.
पण दिल्लीतील लाल किल्ल्यावर मराठ्यांचा जरीपटका फडकवला तो म्हणजे महादजी शिंदेनी.
अठराव्या शतकात मुघलसल्तनत खिळखिळी झाली होती. तेव्हाचा बादशहा शाह आलम फक्त नामधारी झाला होता. देशभरात छोट्या मोठ्या सत्तांनी आपली सरकारे स्थापन केली होती. ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनी तोपर्यंत मोठी ताकदवान झालेली होती.
दिल्लीत देखील रोहील्यांच राज्य होतं. पण उत्तरेतील जनता मुघल बादशाहलाच मानणारी होती. त्यांना नजीबाचे राज्य पसंद नव्हते.
हेच ते रोहिले ज्यांच्यामुळे मराठ्यांना पानिपतात मोठा पराभव स्वीकारावा लागला होता. त्याला हटवून दिल्ली व पर्यायाने अख्खा देश आपल्या हातात आणण्यासाठी मराठे आणि इंग्रज या दोन सत्तामध्ये स्पर्धा लागली होती. यात यशस्वी झाले महादजी शिंदे.
इस्ट इंडिया कंपनीचा गव्हर्नर वॉरेन हेस्टीगंने शाह आलमला गादीवर बसवून त्याच्या वजीरपदाचे अधिकार व चौथाई गोळा करण्याचे अधिकार मिळवण्याचे प्रयत्न चालवले होते. मात्र शहा आलम आला महादजी शिंदेंच्या छावणीमध्ये.
त्याला माहित होतं रोहिल्यांचा बदोबस्त करून आपलं संरक्षण करेल असा एकमेव व्यक्ती भारतात आहे तो म्हणजे महादजी शिंदे.
महादजीनी देखील त्याला अभय दिलं. आग्रा येथे जेव्हा दोघांची भेट झाली तेव्हा बादशाहाने महादजीनां आपल्या शत्रूंचा नायनाट करायची विनंती केली आणि त्याबदल्यात वकील मुतलखी व मीरबक्षीपद देऊ केले.
पण महादजींनी त्याला आधी पुण्यातून मराठेशाहीचा कारभार पाहणाऱ्या पेशव्यांची परवानगी घ्यावी लागेल असं सांगितलं. बादशाहाला तेवढा वेळ नव्हता. त्याने दोन्ही नायबतीची वस्त्रे पेशव्यांचे प्रतिनिधी म्हणून महादजीना स्वीकारायला लावली.
दिल्लीच्या वजिरीचे पद मराठ्यांच्या ताब्यात आले होते. संपूर्ण देशावर वचक बसणार होता. यातूनच उद्या इंग्रजाबरोबर राजपूत शिखांचा बंदोबस्त होऊन बादशाही ताब्यात आली असती. दिल्लीच्या सत्तेसाठीच मराठ्यांचं पहिल पाउल पडल होतं. अभिमानाने महादजींनी सगळा मानमरातब पुण्याला पाठवला.
तेव्हा सत्तेत होता अल्पवयीन सवाई माधवराव पेशवा. त्याच्या नावाने सगळा कारभार बारभाई सांभाळत होते. रघुनाथराव पेशव्यांना दूर करून सवाई माधवरावाला सत्तेत आणण्यासाठी महादजी शिंदेंच्या कवायती सैन्याचाच फायदा बारभाईनी उचलला होता.
रघुनाथ राव जेव्हा इंग्रजांना घेऊन पेशव्यांवर चालून आला होता तेव्हा देखील त्यांचा पराभव करून सालभाईचा तह करण्यात महादजीच पुढे होते. महादजी शिंदेंचे उपकार पुण्याच्या पेशव्यांवर होते. पण तरीही जेव्हा त्यांना मुघल बादशाहाच्या वजिरीची वस्त्रे मिळाली तेव्हा नाना फडणविसांना कोणी तरी गैरसमज करून दिला की
“पाटीलबाबामुळे पेशव्यास गौणत्व येत आहे.”
महादजी शिंदेच महत्व पेशव्यांपेक्षा वाढेल या भीतीने नाना फडणविसाने बादशहाचा मानमरातब स्वीकारण्यास नकार दिला. ही सगळी वस्त्रे उज्जैन येथे पडून राहिली. नाना फडणवीसांच्या आयुष्यातील ही सर्वात मोठी राजकीय चूक होती. नादात मराठेशाहीत दुफळी आहे, पेशव्यांचा आपल्या सरदाराना पाठींबा नाही असा संदेश देशभरात गेला.
याचाच फायदा धूर्त इंग्रजांनी उठवला.
त्यांनी शिंदेंचे प्रस्थ कमी करण्याच्या नादात राजकारण करणाऱ्या नाना फडणविसांशी संपर्क केला. त्यांनी देखील इंग्रज वकिलांना शनिवारवाड्यात प्रवेश देऊन त्याचं काम सोपे केले. महादजी शिंदे इंग्रजांना संपवण्याच्या प्रयत्नात होते आणि पुण्याचा दरबार त्यांच्या विरुद्धच इंग्रजांशी हातमिळवणी करत होता.
जेव्हा महादजी शिंदेनी थकलेली खंडणी व चौथाई गोळा करण्यासाठी ब्रिटीशांकडे तगादा लावला तेव्हा त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करण्याची गुस्ताखी केली.
यामागे नाना फडणविसांचा पाठींबा हे ही कारण असू शकते.
या राजकारणात गुंतून पडण्यास महादजीना वेळ नव्हता. त्यांनी दिल्लीकडे कूच केली. रोहील्याना पळवून लावून २७ जुलै १७८५ रोजी बादशहाला दिल्लीच्या गादीवर बसवले. दिल्लीच्या लाल किल्ल्यावर बादशहाच्या झेंड्याशेजारी शिवरायांचा जरीपटका लहरू लागला. स्वतः महादजी शिंदे संपूर्ण देशाचा कारभार पाहू लागले.
महादजींचा वाढता प्रभाव पाहून व पुणे दरबाराचे आणि शिंदेंचे पटत नाही हे पाहून राजपुतांनी उचल खाल्ली.
पानिपतात हरवणाऱ्या अब्दालीचा पुत्र तैमुरशहाला मराठ्यांवर हमला करण्याचे निमंत्रण दिले व त्यासाठी लागेल टी मदत करण्याचे आश्वासन दिले. एकीकडे इंग्रज, शीख, राजपूत शिवाय वरून अब्दाली या सगळ्यांचा सामना करणे महादजी शिंदेना अवघड होते. त्यांनी अखेर पुण्याकडे मदत मागितली.
दिल्लीतील पेशव्यांचे वकील असलेल्या हिंगणे वकिलांच्या मध्यस्तीमुळे अखेर नाना फडणविसांनी महादजीनां मदत पाठवली व मराठा साम्राज्यावरचे संकट गेले. मराठ्यांनी दगाबाजीसाठी माहीर असणाऱ्या रोहिल्यांचा नायनाट केला. पानिपताचा हिशोब म्हणून नजीब खानाचा नातू गुलाम कादिर रोहिला यास डोक्याचे पाच पट वाढून त्याला लष्करात मिरवण्यात आले, त्याचे डोळे काढून बादशहाला भेट म्हणून पाठवण्यात आले.
मराठा साम्राज्याची वचक देशभरात बसली यास महादजी शिंदे यांचा पराक्रम कारणीभूत होता हे नक्की.
त्यांच्याच काळात दिल्लीची घडी बसली. अनेक वर्षे त्यांनी मुघल बादशाहीवर वचक ठेवून राज्यकारभार पाहिला. ज्या दरबारात महाराजांचा औरंगजेबाने अपमान केला होता तिथे बादशहाच्या शेजारी बसून महादजी शिंदे देश चालवायचा आदेश देत होते. पेशव्यांच्या कारभाऱ्यांनी भाऊबंदकी केली नसती तर दिल्लीच्या बादशाहला हटवून कारभार शिवछत्रपतींच्या नावे चालवणे पाटीलबाबांना सहज शक्य झाले असते.
इतके होऊनही महादजी शिंदे जेव्हा १८९२मध्ये पुण्यास परतले तेव्हा त्यांनी आपल्याला मिळालेले फर्मान एका मोठ्या जाहीर समारंभात पेशव्यांना सुपूर्द केले. काही दिवसांनी पुण्यातच वानवडी येथे त्यांचा मृत्यू झाला.
संदर्भ : गर्जा महाराष्ट्र लेखक डॉ.सदानंद मोरे
हे ही वाच भिडू.
- एका मराठा मावळ्याने मुघलांच्या लाल किल्ल्यासमोर उभं केलं गौरीशंकर मंदिर.
- पेशवे १६ लाखांच्या कर्जात होते तेव्हा नाना फडणवीसांकडे ९ कोटी रुपये होते.
- होळकरांनी दान केलेल्या जमिनीवर भारताचं राष्ट्रपती भवन उभं आहे.
बोल भिडू ला माझी एक विनंती आहे , आले लेख छान असतात गेली दीड दोन वर्षे मी सातत्याने आपले लेख वाचतो ,
पण अलीकडे तुम्ही वादातले लेखक जे आहेत त्यांचे लेख प्रसिद्ध करत आहात , कृपया याकडे थोडं लक्ष द्या , सदानंद मोरे म्हणजे आत्ताच्या 2 दशकातले सर्वात वादग्रस्त लेखन केले ,
आपलं काम खूप चांगलं आहे असंच चालू राहुद्या 🙏