पुण्याच्या घड्याळामास्तरांच्या अंत्ययात्रेत बैलगाडा मिरवणूक काढण्यात आली..

बैलगाडा शर्यत हा महाराष्ट्राचा पारंपारिक खेळ म्हणून ओळखला जातो. ग्रामदेवतेच्या यात्रेत धार्मिक आणि संस्कृती परंपरा म्हणून बैलगाडा शर्यती आयोजित केल्या जातात. पण गेल्या कित्येक वर्षांपासून बैलगाडा शर्यतिच्या आयोजनावर बंदी घातली गेली आहे. प्राणी छळ प्रतिबंधक कायदा १९६० च्या कलम २२(२) नुसार सर्वोच्च न्यायालयाने ही बंदी घातली आहे.

दरम्यान, अनेकांच्या खास करून शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेली ही बैलगाडा शर्यत पुन्हा सुरु व्हावी यासाठी आंदोलन सुरु आहेत. खासकरून पश्चिम महाराष्ट्रात याचे पडसाद मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात. ज्यात राजकारणी मंडळींचा देखील मोठया प्रमाणावर सहभाग आहे.

अश्यातचं, बैलगाडा शर्यत पुन्हा सुरु व्हाव्यात यासाठी प्रत्येक आंदोलनात सहभाग घेणारे पुण्याचे घड्याळमास्तर महादुशेठ पोखरकर माडीवाले यांचं काल आजाराने निधन झाले. महत्वाचं म्हणजे त्यांच्या निधनानंतर माडीवाले  यांना श्रद्धांजली म्ह्णून त्यांची अंतयात्रा बैलगाडा मिरवणुकीसोबत वाजत-गाजत काढण्यात आली.

बैलगाडा शर्यतीला अद्यापतरी मान्यता काही देण्यात आली नाही , पण आयुष्यभर त्यांची मागणी लावून धरलेल्या महादुशेठ यांना गावच्या मंडळींनी ही अनोखी श्रद्धांजली वाहिली. ते  पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव खडकी इथले रहिवासी होते. जे बेगड क्षेत्राची पंढरी म्हणून अख्ख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. 

महादुशेठ पोखरकर माडीवाले यांचे भाचे रामनाथशेठ बांगर यांच्याशी बोल भिडूने संवांद साधला असता. त्यांनी सांगितले कि,

 बैलगाडा मालक महादुशेठ यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात बैलगाडा शर्यतीला पुन्हा मान्यता द्यावी यासाठी झालेल्या प्रत्येक आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. मग ते आंदोलन माजी शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या नेतृत्वातील असो, किंवा राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील यांच्या नेतृत्वातील असो,  बैलगाडा शर्यत चालू होण्यासाठी जिथे जिथे आंदोलन झाली तिथे अग्रेसर राहून त्यांनी मागणी उचलून धरली.

 १९५६ साली त्यांच्या वडिलांनी गणपतराव पोखरकर माडीवाले यांनी महाराष्ट्रात पहिल्यांदाचं ईनामी बैलगाडा शर्यत पिपंळगावात भरवली. त्यांच्या पिढ्यानपिढ्या बैलगाडीचा नाद आहे. आंबेगाव तालुक्यातील बैलगाडा शर्यतीतील बहुमान माडीवाले घराण्याकडे आहे. 

गणपतराव माडीवाले यांच्यानंतर महादुशेठ माडीवाले यांना बैलगाडा शर्यतीत घड्याळच अर्थात घाटात निषाणाचे मानकरी म्हणून त्यांनाच बहुमान देण्यात यायचा. जे काम त्यांनी आजतागायत काटेकोरपणे सांभाळलं. त्यामुळे त्यांना घड्याळामास्तर आणि जुपनी बहाद्दर म्हंटल जायचं.

अश्या या बैलगाडी शर्यतीसाठी आपलं आयुष्य घालवणाऱ्या जुपनी बहाद्दराला अखेरचा निरोप देण्यासाठी आंबेगाव तालुका आणि आसपासच्या गावातील मंडळींनी त्यांच्या अंत्ययात्रेला बैलगाडा मिरवणूक काढून श्रद्धांजली वाहिली.

 सोबतच बैलगाडा मालकांनी शोकसभेत बैलगाडा शर्यत अजूनही सुरु न झाल्याचे सरकारविरुद्ध आपला रोष व्यक्त केला आणि या शर्यतीला मान्यता द्यावी अशी जोरदार मागणी केली. 

हे ही वाचं भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.