भारतीय राजा जो इंग्लंडच्या टीमकडून खेळला आणि संपूर्ण जगाच्या क्रिकेटची टेक्निक बदलून टाकली.

भारताच्या मुख्य संघात समावेश व्हायचा राजमार्ग म्हणजे रणजी क्रिकेट. भारतात रणजी हे एक वेगळंच जग आहे. जगात प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये झालेले अनेकविध विक्रम रणजी क्रिकेटच्या नावे आहेत.

ह्याची सुरवात भारताच्या ब्रिटिश सरकारच्या ताब्यात असताना झाली.

भारतातील अनेक उच्चभ्रू घरातील तरुण, राजे व राजपुत्र एव्हढ्यापूरता हा खेळ मर्यादित होता. पारशी उद्योजक कुटुंबातील मोठे लोक हा खेळ आवडीने खेळत. मात्र त्यातही अनेकविध अडचणी येत. रंगावरून वा देशावरून त्यांना हिनवण्यात येई. त्याला मागे टाकून काही खेळाडू ह्यात नेत्रदीपक प्रगती करत.

इंग्लंडमध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटचा उत्सव म्हणजे कौंटी क्रिकेट.

देशाच्या विविध प्रांतातील नवं टॅलेंट कौंटीमधून बाहेर पडत असते. ह्यात अनेक आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळणारे खेळाडूही भाग घेत असतात. सचिन तेंडुलकर, रवीचंद्रन अश्विन असे कित्येक खेळाडू कौंटी क्रिकेट खेळले आहेत.

पण या स्पर्धेला रणजी हे नाव देण्यामागे एका राजघराण्यातील राजपुत्राचा व तितक्याच ताकतीच्या खेळाडूचा संदर्भ आहे.

ज्या माणसावरून या स्पर्धेला हे नाव मिळाले त्या माणसाने भारतात लोकांना क्रिकेटची गोडी लावली व भारताच्या इतिहासात भारतीय क्रिकेटला पडलेले दिव्य स्वप्न म्हणून नावलौकिक मिळवला ते म्हणजे सर रंजीतसिंहजी जडेजा हे होय.

त्यांचे नाव रणजीत सिंह जरी असले तरी त्यांना ऱणजी म्हणून ओळखले जायचे.

भारतात त्याकाळी असणाऱ्या शेकडो संस्थानामधील नवानगरच्या संस्थानाचे हे राजे होते.

वयाच्या दहाव्या वर्षी जेव्हा त्यांना मुंबईच्या राजकुमार कॉलेजमध्ये शिक्षणासाठी पाठवण्यात आले तेव्हा त्यांचा क्रिकेटशी पहिला परिचय झाला. ते 1883 मध्ये आपल्या शाळेचे कप्तान म्हणून क्रिकेट खेळणे व शाळेतून कॉलेजात जाईपर्यंत म्हणजेच 1888 सालापर्यंत या पदावर राहिले.

या काळात त्यांनी आपल्या शाळेसाठी अनेक पदके जिंकली व शतके झळकावली.

तेव्हा भारतात क्रिकेट इंग्लंड प्रमाणे खेळले जात नसे व खेळाचे नियमही फार वेगळे असत. स्वतः रणजीत सिंह यांना या खेळात जास्त रुची नव्हती व ते टेनिसकडे जास्त झुकलेले होते.खेळाडू बनण्याकडेही त्यांना जास्त रुची नव्हती म्हणून ते अभ्यासात जास्त रमत मात्र त्यांच्या अकादमिक कारकिर्दीत त्यांनी भरघोस यश प्राप्त केल्याने त्यांना पुढील अभ्यासासाठी इंग्लंडच्या केंब्रिज विद्यापीठात पाठवण्यात आले व तेथे त्यांच्या खेळाला खरा बहर आला.

सरे काउंटी क्रिकेट क्लबकडून त्यांनी आपल्या खेळाला सुरुवात केली व त्यांची फलंदाजी पाहून ते उत्तरोत्तर पायऱ्या चढत इंग्लंडच्या संघात निवडले गेले.

आपल्या शिक्षण काळात ते पहिल्यांदा युनिव्हर्सिटी ऑफ केंब्रिजच्या विद्यापीठाकडून स्थानिक मॅचेस खेळून त्यानंतर त्यांनी ससेक्स काउंटीसाठी फलंदाज म्हणून धुरा सांभाळली. यानंतर त्यांची फलंदाजी मधील प्रगती पाहून त्यांना इंग्लंडच्या राष्ट्रीय संघात खेळण्याची संधी मिळाली.

आपल्या कर्तृत्वाला साठी त्यांना इंग्लंडचा राजघराण्याचा हस्ते देण्यात येणारा नाईटहूड हा किताबही मिळाला.

महाराजा रणजी यांना क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये अजूनही गणले जाते. त्यांच्या फलंदाजीची प्रशंसा अनेक देशी व विदेशी समालोचक क्रिकेट तज्ञ व अभ्यासकांनी केली आहे.

आपल्या नैसर्गिक खेळाने व कुठलेही तंत्रशुद्ध प्रशिक्षण नसताना मुक्त अंदाजाने दिलखुलास बॅटिंग करणारा हा गडी आपल्या आक्रमक बॅटिंग स्टाईलने नावाजला गेला व त्यांनी क्रिकेटच्या इतिहासातच मोठी क्रांती घडवून आणली.

जुन्याकाळी क्रिकेटमध्ये फ्रंट फूट वरती म्हणजे पुढच्या पायावर जास्त भर देत बॅटिंग करायची प्रथा होती , म्हणूनच चपळ पदलालित्य दाखवणाऱ्या फलंदाजीचा अभाव खेळात होता. तेव्हा मैदानातील खेळपट्ट्याही जास्त चांगल्या नसत व म्हणून नेहमी संरक्षणात्मक पद्धतीने खेळणे फलंदाजांच्या अंगवळणी पडले होते.

नंतरच्या काळात पिच व खेळपट्ट्यांची गुणवत्ता वाढल्यानंतरही फलंदाज त्याच पद्धतीने फलंदाजी करत राहत.

मात्र रणजी यांनी पहिल्यांदाच या बदललेल्या परिस्थितीचा फायदा घेतला व मागच्या पायावर जास्त भर देत नव्या पद्धतीची फलंदाजी आक्रमक पद्धतीने सुरू केली. डिफेन्स आणि आक्रमक अशा दोन्ही शॉटसाठी त्यांनी मागच्या पायावर जास्त भर द्यायला सुरुवात केली, यामुळे पिचचा पूर्ण वापर करून घेता येई तसेच फलंदाजीचा पल्ला देखील वाढत असे.

लेग ग्लान्स या फटक्याचा शोध त्यांनी लावला.

सुरुवातीच्या काळात त्यांना वंशभेदाचाही सामना करायला लागला. म्हणून ते इंग्लंडमध्ये स्मिथ हे नाव वापरून तसेच प्रिन्स या नावाने खेळत.

त्यांचे पुतणे दुलीपसिंग यांनीही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत इंग्लंडच्या राष्ट्रीय संघात आपली जागा बनवली.

क्रिकेटमधून बाजूला झाल्यानंतर रणजी आपल्या नवा नगरच्या संस्थानाचे महाराजा बनले व नंतर त्यांनी इंडियन चेंबर ऑफ प्रिन्सेस या भारतातील सर्व संस्थांच्या राजपुत्रांच्या सभेच्या सचिवपदाची सूत्रे आपल्या हाती घेतली.

लिग ऑफ नेशन्स या पहिल्या महायुद्धानंतर तयार झालेल्या जगातील सर्व देशांच्या जागतिक परिषदेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले.

भारतात क्रिकेटला लोकप्रिय करण्यामागे असणारे एकमेव आणि महत्त्वाचे कारण म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वात त्यांचा गौरव केला गेला. म्हणून त्यांच्या स्मरणार्थ भारतातील प्रथम श्रेणी क्रिकेटला रणजी असे संबोधले जाते.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.