महाराणा प्रताप यांच्या बहिणीला महाराष्ट्रात आश्रय देणारा किल्ला

जेव्हा बाकीचे राजपूत राजे अकबर बादशहाच्या आश्रयाला जाऊन आपले राजवाडे जपत होते तेव्हा महा राणा प्रताप यांनी मेवाडच्या स्वाभिमानासाठी मुघल साम्राज्याविरुद्ध लढा उभा केला. अनेक वर्षे अकबराला नाकी नऊ आणले.

मुघलांसोबत झालेल्या हळदीघाटीच्या लढाईत राणा प्रताप यांचा मोठा पराभव झाला. त्यांच्या सैन्याला डोंगर दऱ्यात लपावे लागले. राणा प्रताप यांच्या सोबत असलेल्या राजपूत योद्ध्यांना संपवण्यासाठी मुघलांची सेना जंग जंग पछाडत होती. क्रूरतेने थैमान घातले होते. मात्र राणा प्रताप यांनी पेटवलेली क्रांतीची ज्योत अशी सहजासहजी विझणारी नव्हती.

हळदी घाटीच्या लढाईत अकबराच्या सेनेपासून जीव वाचवून राजपुतान्यातले काही सैनिक महाराष्ट्रात आश्रयासाठी आले होते. यातील काही जणांनी सातपुडा पर्वतात आपले संस्थान स्थापन केले होते. याचेच नाव अक्राणी संस्थान.

आजच्या नंदुरबार जिल्ह्यात धडगाव तालुक्यात या महान इतिहासाची साक्ष देणारा अक्राणी किल्ला उभा आहे.

स्थानिक लोकांची मान्यता आहे की महाराणा प्रतापांची बहीण अक्काराणी व त्यांच्या सोबत काही राजपुत वीर यांनी या किल्ल्याची निर्मिती केली आहे. अक्काराणी यांच्या नावावरूनच नावावरून या किल्ल्याला व धडगाव तालुक्यास अक्राणी महल असे नाव पडले.

यावर मात्र काही इतिहासकारांचे दुमत आहे. ‘महाराष्ट्र ज्ञानकोश खंड-६’ मध्ये१७ व्या शतकात राणा गुमानसिंग याने अक्राणीचा किल्ला बांधल्याचा उल्लेख आहे. हे राणा गुमानसिंग काठीचे संस्थानिक होते. तर आर. ई. एन्थोव्हेन यांच्या मतानुसार उदयपूरच्या राणाने तेथून काही राजपुतांना हाकलून लावले, त्या राजपुतांनी पावागडचा आश्रय घेतला, कालांतराने तेथून ते जंगलाच्या आश्रयाने अक्राणी परिसरात आले व तेथेच रहिवास करू लागल्याचे नमूद केले आहे.

धडगावपासून सुमारे पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या जंगलात या महालाचे अवशेष दृष्टीस पडतात.

राजस्थानी पद्धतीने बांधलेल्या उभा महालाचे बांधकाम सुमारे सोळाव्या शतकात झाले आहे असं म्हटलं जातं. तत्कालीन भिल्ल लोकांच्या आक्रमणापासून तळोद्यासह सुलतानपूर व इतर जिल्ह्यांना संरक्षण द्यावे, या अटीवर राणा कुटुंबाचे मूळ संस्थापक प्रतापसिंग यांना शहाजहानने अक्राणी महल परगणा दिल्याचीही शक्यता धुळे गॅझेटमध्ये वर्तवली आहे.

या गॅझेट अनुसार १६३४ मध्ये शहाजहानने खान्देशातील सुलतानपूर आणि नंदुरबार हे जिल्हे माळवा प्रांताला जोडले आणि त्यांचे मुख्य केंद्र ब-हाणपूर ठेवले होते.

भग्नावस्थेत संपूर्ण विटांमध्ये बांधलेल्या या महालाचा बुरुज, प्रवेशद्वार ब-यापैकी सुस्थितीत असल्यासारखे आहेत. महालाच्या दक्षिण, पूर्व व पश्चिम दिशेच्या भिंती उभ्या आहेत. कुठे-कुठे पडझड झाली असली तरीही हे अवशेष तेथील राजेशाही थाट, त्यांचा डामडौल याची साक्ष देतात.

काही संशोधकांनी केलेल्या उत्तखननात या महालाच्या अवशेषांमध्ये उदयपूर, मेवाड संस्थानच्या मुद्रा , राजस्थानी बनावटीच्या वास्तूचे अवशेष आढळले आहेत, तर तेथील आदिवासींना चांदीची, तांब्याची नाणी सापडली आहेत.

खान्देशात महंमदी सत्ता असताना त्यात धडगांवचाही समावेश होता. त्या वेळी प्रत्येक भाग स्थानिक मुख्य माणसांच्या ताब्यात असायचा. तेच तेथील कारभार बघत असत. परंतु इ.स. सतराव्या शतकामध्ये महंमदी राजवटीचा ऱ्हास झाल्यानंतर नर्मदेपलीकडील धुश्वयी येथील छावजी राणा यांनी या संस्थानचा ताबा घेतला.

छावजी राणा यांच्या मृत्यूनंतर अक्राणी हा सुभा त्यांचा मुलगा राणा गुमानसिंग यांच्याकडे वंशपरंपरेने आला. त्यांनीच हा महालवजा किल्ला बांधला व परिसरात शांतता प्रस्थापित केली. त्यांच्यानंतर त्यांचे सुपुत्र हिम्मतसिंग यांनी अक्राणी येथे २८ वर्षे राज्य केले.

या किल्ल्याचा इतिहास सांगताना भाऊसिंग राणा यांचा उल्लेख होतो. हे राणा मराठा साम्राज्याविरुद्ध ब्रिटिशांच्या  बाजूने होते. ईस्ट इंडिया कंपनीने सातपुड्यात चहाची लागवड केली होती. या चहाच्या मळ्यांची देखभाल राणा कुटुंबियांना करत होते. या भाऊसिंग राणा यांच्या मुलाचा भिकाजी भाऊ राणा यांचा शहादे तालुक्यातील भिल्लांशी सतत संघर्ष व्हायचा. या लढाईत चिखली येथील झुंझार नाईक यांचा मृत्यू झाला.

तर सूडाने पेटून उठलेल्या झुंझार नाईकांचा मुलगा दिव्या नाईक याने अक्राणीच्या राणा भिकाजी भाऊ यांचा खून केला.

पुढे पेशव्यांनी अक्राणी व रोषमाळ ताब्यात घेतले.त्यावेळी अक्राणीचा खरा वारसदार असलेले आनंदसिंग राणा हे सात ते आठ वर्षांचे होते. त्यांनी  कसाबसा जीव वाचवला. त्यांच्या आईला व काकांना पेशव्यानी बंदी बनवले होते.  

पुढे तीन  चार वर्षांनी आनंदसिंग राणा यांनी ब्रिटिश अधिकारी मेजर जार्डीन यांच्या मदतीने पेशव्याचा पराभव केला आणि दलेलसिंग राणा आणि आनंदीबाई कुंवर यांना सन १८१८ मध्ये मुक्त केले.

पुढे या किल्ल्याच्या बंदोबस्ताचा खर्च झेपत नसल्यामुळे आनंदसिंग राणा यांनी हा किल्लाच ब्रिटिशांच्या हवाली केला. १८२० सालापासून राणा कुटुंब गुजरातच्या प्रतापपूर व गोपाळपूरला स्थायिक झाले. 

पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात असलेल्या या किल्ल्यात राणांच्या पूर्वजांच्या समाध्या आहेत. पुरातन बारव, अत्यंत घोटीव, घडीव दगडात साकारलेले एक सुंदर छोटसे मंदिर आहे. प्रवेशद्वारावर श्रीगणेशाची मूर्ती आहे. मंदिराखालून अखंड पाण्याचा झरा आहे. जो उन्हाळ्यातही या परिसराची तहान भागवतो.

या मंदिराला ‘राणी का जल मंदिर’ असे ओळखले जाते. तेथील आदिवासी या मंदिराची नित्यनेमाने पूजा करतात.

अगदी काही वर्षांपूर्वी हा परिसर अत्यंत घनदाट जंगलांनी वेढलेला होता. फक्त घोड्यावरूनच या परिसरात दळणवळण करता येत होते. आता रस्ता झाल्यामुळे पर्यटकांची अक्राणी किल्ल्यात ये जा सुरु झाली आहे. मात्र गेली अनेक वर्षे सरकारी यंत्रणेचे दुर्लक्ष झाल्यामुळे हा किल्ला आता शेवटचे श्वास मोजत आहे. याच दुर्लक्षामुळे या गडाची संपूर्ण माहिती विस्मृतीत गेली.

इतिहासकारांच्यात मतभेद असले तरी गडावरचे आदिवासी हे अक्काराणी यांचाच हा किल्ला होता हे खात्रीपूर्वक सांगतात.

आता इतिहासात अक्काराणी यांचं नाव असो वा नसो शेकडो किलोमीटर प्रवास करून मुघलांच्या पासून संरक्षण करण्यासाठी राणा कुटुंबीय सातपुडा पर्वतात आले व त्यांना या महाराष्ट्राच्या भूमीने आश्रय दिला हे कोणी खोडू शकत नाही.

सन्दर्भ- अक्राणीचे अरण्यरुदन दिव्य मराठी 

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.