मराठा फौजेचा बंदोबस्त करण्यासाठी औरंगजेबाने आपल्या सरदारांना मंतरलेला ताईत दिला होता
भारतीय इतिहासाला ज्याप्रमाणं योद्ध्यांनी झळाळी आणली होती अगदी त्याचप्रमाणे त्या इतिहासाला पराक्रमाच्या एका मोठ्या उंचीवर नेऊन ठेवण्याचं काम भारताच्या कित्येक वीरांगणांनी केलं होतं.
त्यातल्याचं एक होत्या महाराणी ताराबाई भोसले !
स्वराज्यावर जेव्हा मुघलांच्या रूपानं टाच आली तेव्हा याच महाराणींनी शिवरायांचा वारसा पुढं नेला होता. उत्तर, पूर्व आणि दक्षिण भागावर आपले वर्चस्व राखून असणाऱ्या मुघल बादशहा औरंगजेबाची नजर जेव्हा पश्चिम भारताकडे वळली, तेव्हा त्यांच्या मनसुब्यांना सुरंग लावायच काम महाराणी ताराबाईंनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि स्वराज्याच्या कित्येक सेनापतींकडून मार खाल्लेल्या औरंगजेबाला पुन्हा अद्दल घडवून स्वराज्यातल्या स्त्रिया देखील पुरुष योद्ध्यांपेक्षा कमी नाही हे त्यांनी दाखवून दिले.
पश्चिम भारतामध्ये कितके वर्षांपासून आपला दबदबा कमावून ठेवणाऱ्या मराठा साम्राज्याची ताकद काहीशी कमी होत चालली होती. स्वराज्याला कोणाचं ही खंद नेतृत्व नाही असा विचार करून औरंगजेबाने पुन्हा एखादा स्वराज्याची संपत्ती असलेले गड-कोट काबीज करण्यास सुरुवात केली. इतरही शत्रू टपून बसले होतेच.
बादशहाने जिंकलेली सर्व दक्षिणेची भूमी मोठ्या संकटात सापडली होती. दुष्काळ रोगराई आणि मराठ्यांच्या मोहिमा यांनी दक्षिणेतील लोकांची मोठी दयनीय गत झाली होती. १७०३ ते १७०४ या काळात दक्षिणेच्या सुभ्यात पाऊस झाला नाही.
उलट दुष्काळानं धुमाकूळ घातला. दोन वर्षात वीस लाख माणसं मृत्युमुखी पडले. भुकेनं हैराण झालेले आई-बाप दोन वेळच्या जेवणासाठी आपल्या पोटची मुलं विकायला तयार असत. पण विकत घेणार कोणी मिळत नव्हतं.
दक्षिणेतल्या लोकांची स्थिती अशा प्रकारची झाली असताना बादशहानं मराठी मुलुखात आपली मोहीम सुरूच ठेवली होती. १७०४ च्या डिसेंबरात त्यान प्रसिद्ध किल्ला राजगडला वेढा दिला.
वाकीनखेड्याच्या मोहिमेत बादशाहा गुंतल्याचे पाहून तिकडं महाराष्ट्रात ताराबाईंनी बादशाहाने जिंकलेले लोहगड, सिंहगड आणि राजमाची हे किल्ले परत जिंकून घेतले आणि आपल्या रणनीतीचा प्रत्यय आणून दिला.
औरंगजेबाच्या निष्क्रिय स्थितीचा फायदा घेऊन महाराणी ताराबाईंनी उत्तरेकडील मुघल प्रदेशांना लक्ष्य केले आणि त्यांना मोठी हानी पोहचवली. या खेळीने औरंगजेब पुरता क्रोधीत झाला. पण मुठ्या आवळत बसण्याशिवाय त्याच्याकडे कोणताही पर्याय नव्हता आणि इकडे महाराणी ताराबाई त्याच्या साम्राज्याची वाताहत करीत होत्या.
बादशहा वाकीनखेड्या वरून परतत असताना मराठ्यांनी पुन्हा त्याच्या लष्करावर हल्ले चढवले.
एका प्रसंगी बादशाहाने मराठ्यांचा प्रतिकार करण्यासाठी हमीदूद्दीन खान आणि मतलब खान या दोन सरदारांना मंतरलेले ताईत देऊन पाठवलं.
हा मंतरलेला ताईत कशासाठी ? तर मंतरलेल्या ताईताच्या साह्यानं ताराबाईच्या फौजांपासून मुघलांच्या सैन्याच रक्षण करता येईल म्हणून. ताराबाईंची इतकी दहशत बादशहाला बसली होती.
मोगली सैन्याचा संरक्षण आता ताईताच्या साह्यान करण्याची पाळी हिंदुस्तानच्या बादशहावर आली होती. हे त्याच मोठं दुर्दैव होत. मराठ्यांच्या हल्ल्याचा कसाबसा प्रतिकार करीत बादशाह वाकिनखेड्याच्या मोहिमेवरून अहमदनगरला आला. तिथं त्यानं आपल्या सैन्याची छावणी केली. हा त्याच्या जीवन यात्रेचा अंतिम टप्पा होता. तो फार दिवस जगण्याची शक्यता नव्हती. तरीही तो मराठी मुलुखावर आपल्या फौजा पाठवित राहिला. मराठ्यांचे किल्ले जिंकण्याच्या उद्योग त्यान शेवटपर्यंत काही सोडला नाही.
हे ही वाच भिडू
- ताराराणींच्या पराक्रमामुळे औरंगजेबाची कबर मराठी मातीत खोदली गेली.
- पंतप्रधानांनी ताराबाईंच्या अंगणवाड्या पाहिल्या आणि देशभरात हा उपक्रम चालू केला.
- छ. शिवाजी महाराज म्हणाले, शेतकऱ्याचे नुकसान करून धर्मकार्य करणे हे अधर्मास कारण आहे
औरंगजेब 1707 मध्येच वारला. वर दिलेल्या आर्टिकल मध्ये औरंगजेबने 1734 मध्ये राजगडला वेढा दिला अस नमूद केलं आहे. तिथे तेवढा चेंज करावा.