२०१४ पासून एक गोष्ट फिक्स झालेय, महाराष्ट्रासाठी सबकुछ अमित शहाच आहेत…

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात आहेत. पुण्यात सहकार परिषद, पुस्तक प्रकाशन, राजकीय भेटी झाल्यानंतर त्यांनी कोल्हापूरमध्ये भाजपच्या विजय संकल्प सभेला हजेरी लावली.

पुण्यात बोलताना त्यांनी, ‘राजकारणात हारजीत होत असते, पण धोका देणाऱ्याला सोडायचं नसतं’ असं विधान केलं.  कोल्हापुरात बोलताना, ‘शिवसेना-भाजप पुढच्या निवडणूक एकत्र लढवतील’ अशी घोषणाही केली.

शिवसेना कुणाची यावर निवडणूक आयोगाचा आलेला निर्णय, कसबा आणि चिंचवडमध्ये लागलेल्या पोटनिवडणुका या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर अमित शहांनी महाराष्ट्रात येण्याचं परफेक्ट टायमिंग साधलं असं बोललं जातंय,            

काही महिन्यांपूर्वी ‘ठाकरेंची सत्ता येऊ देणार नाही, मुंबईत १५० जागा निवडून आणणारच’ असा निर्धारच अमित शहांनी जाहीर केला होता. अमित शहांनी मुंबईची निवडणूक मनावर घेतली म्हणजे सगळं काही त्यांच्या निर्णयानुसारच होणार, अशीही चर्चा रंगली. 

सध्या महाराष्ट्रात भाजपचे राजकारण अमित शहांच्या म्हणण्यानुसार चालतेय हे तर मान्यच करायला लागेल.  मग मागे उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री बनवणं असो वा देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याचा निर्णय असो या सगळ्या निर्णयांमागे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भूमिका महत्वाची होती असं राजकीय जाणकार सांगतात.

महाराष्ट्रामध्ये भाजपच्या रणनीतीचाच नाही तर महाराष्ट्र भाजप संदर्भात कुठलाही निर्णय असुद्या यात अमित शहा यांची महत्वाची भूमिका राहिल्याचे पाहायला मिळते. 

याची सुरुवात होते ते २०१४ ची भाजपची सेना युती तुटण्यापासून. 

हिंदुत्व आणि राम मंदिराच्या मुद्द्यावर १९८४ मध्ये शिवसेना आणि भाजपची युती झाली. १९९५ मध्ये राज्यात भाजप सेना सरकार आलं. त्यानंतर १९९९, २००४, २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष सोबत लढले. मात्र २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्षात जागा वाटपावरून वाद झाला.

शिवसेना नेतृत्व २८८ पैकी १५१ जागेवर निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर ठाम होते. भाजपाला ११९ जागाच मिळणार होत्या आणि मित्रपक्षाच्या वाट्याला १८ जागा जाणार होत्या. राज्यातील भाजपच्या नेत्यांना हा निर्णय मान्य नव्हता. मग हा निर्णय भाजपचे तत्कालीन अध्यक्ष असणाऱ्या अमित शहा यांच्या समोर गेला. 

उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यावेळी अमित शहा यांनी जागा वाटपावर पुन्हा एकदा विचार करावा असे सांगितले होते. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे हे १५१ जागा लढवण्याच्या निर्णयावर ठाम होते. 

भाजपने आपल्याला हा निर्णय मान्य नसल्याचे सांगत युती तोडल्याची घोषणा केली. 

ज्यावेळी अमित शहा यांच्याकडे हा निर्णय गेला होता. त्याच वेळी अमित शहा यांनी राज्यातील भाजपच्या नेत्यांना प्लॅन बी तयार ठेवायला सांगितले होते आणि भाजपच्या मित्र पक्षाला सोबत घेऊन सरकार स्थापन करण्यासाठी सांगितले होते. 

२०१४ मध्ये २५ वर्षांपासून भाजप सेनेची युती तुटली. युती तोडण्याचा अंतिम निर्णय अमित शहा यांनी घेतल्याचे सांगण्यात आले होते. मात्र निवडणुकीनंतर सोबत येत, युतीचे सरकार स्थापन करण्यात आले. 

शिवसेनेला मुख्यमंत्रीपद

२०१९ विधानसभा निवडणुकीपूर्वी अमित शहा यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री येथे जाऊन भेट घेतली होती. यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये बंद खोलीत चर्चा झाली होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांना बाहेर ठेवण्यात आले होते. 

या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक १०५ जागा मिळाल्या. तर शिवसेनेचा ५६ जागांवर विजय झाला होता. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्ष वर्ष मुख्यमंत्री पद आणि सत्तेत ५० टक्के वाटा मागितला होता. 

मातोश्रीत बंद दाराआड केलेल्या चर्चेत अमित शहा यांनी शिवसेनेला मुख्यमंत्री पद देण्यात येईल असे आश्वासन दिल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. मात्र, अमित शहा यांनी आपण उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचे आश्वासन दिले नसल्याचे सांगितले होते.

पुढं याच वादावरून शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडीत गेली. सेनेच्या मुख्यमंत्री पदाबाबतचा निर्णयही शहांनी घेतल्याचे बोलले जाते.    

अजित पवार यांच्या सोबत जाण्याच्या निर्णयात महत्वाची भूमिका 

उद्धव ठाकरे भाजपा सोबत येण्यासाठी तयार नसल्याचे समजतात राष्ट्रवादीला सोबत घेऊन सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली राज्यातील भाजप नेत्यांकडून करण्यात आल्या. या सगळ्यात २३ नोव्हेंबर २०१९ रोजी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. तसेच आपल्या सोबत राष्ट्रवादीचे २८ आमदार असल्याचा दावा सुद्धा केला.  

प्रियम गांधी यांनी ट्रेडिंग पॉवर या पुस्तकात केलेल्या दाव्यानुसार… 

या शपथविधी सोहळ्यापूर्वी शरद पवार, देवेंद्र फडणवीस, प्रफुल्ल पटेल, अजित पवार यांनी दिल्लीत जाऊन अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यांनी होकार दिल्यानंतरच फडणवीस आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. या सगळ्या सत्तास्थापनेच्या खेळात अमित शहा यांची भूमिका सगळ्यात महत्वाची राहिली होती.  

एकनाथ शिंदे बंडात अमित शहा यांचे नियोजन 

विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारत समर्थक आमदारांसह सुरत गाठले होते. या आमदारांनी मुंबई सोडल्यानंतर त्यांची सगळी जबाबदारी गुजरात भाजपचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे होती. चंद्रकांत पाटील हे अमित शहा यांचे जवळचे समजले जातात. 

शिवसेना आमदारांची सगळी व्यवस्था पाहण्याचे काम चंद्रकांत पाटील करत होते. जेव्हा सेना नेतृत्वाला आमदारांच्या बंडखोरी बद्दल समजले त्यानंतर मिलिंद नार्वेकर यांनी सुरत येथील हॉटेलमध्ये जाऊन त्यांची भेट घेतली होती. सुरत जवळ असल्याने अजूनही काही शिवसेनेचे नेते आमदारांशी संपर्क साधतील, यामुळे त्यांना दुसरीकडे हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांना गुवाहाटी येथे हलवण्यात आले.   

२४ जून रोजी गुवाहाटीतील हॉटेलमधला एकनाथ शिंदे यांचा एक व्हिडिओ समोर आला होता.

त्यात आपल्या पाठीमागे एक महाशक्ती उभी असून ज्यावेळी गरज असेल त्यावेळी आपल्याला ती साथ देईल, असं ते म्हणाले होते. यानंतर दुसऱ्या दिवशी अमित शहा, एकनाथ शिंदे यांची भेट वडोदरा येथे झाल्याचे सांगण्यात येते. इतरवेळी वडोदरचे विमानतळ रात्री बंद असते, मात्र फक्त गुरुवारी हे विमानतळ सुरु ठेवण्यात आले होते, अशीही चर्चा आहे.    

तर दुसरीकडे राज्य सरकारने बंडखोर आमदारांची सुरक्षा व्यवस्था काढून घेतली होती. यानंतर लगेच केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने या आमदारांना वाय दर्जाची पुरविण्यात आली होती. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासूनच अमित शहा त्यांच्याशी संपर्कात होते.

त्यामुळे सेनेसोबत युती करायची की नाही, राज्यात सत्ता स्थापन कुणासोबत करायची, ते अगदी महत्त्वाची पद निवडण्याची वेळ येते, तेव्हा अमित शहा यांचीच भूमिका महत्वाची ठरते. म्हणूनच येत्या महानगरपालिका निवडणुका, पोटनिवडणूका आणि शिवसेनेमुळं सुरु असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा महाराष्ट्र दौरा आणि महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपचाच दबदबा राहिला पाहिजे असं स्टेटमेंट पाहता, “महाराष्ट्रासाठी सबकुछ अमित शहाच आहेत” हे स्पष्ट होते…

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.