हितेंद्र ठाकूरांना हरवण्यासाठी स्वतः विजय तेंडुलकर वसईत मुक्काम ठोकून होते…
प्रसिद्ध माणसांभोवती अनेक वलयं असतात. ताकदीची, संशयांची, आरोपांची आणि आणखीही बरीच. सगळ्या राज्यात गाजलेलं असंच एक नाव म्हणजे, हितेंद्र ठाकूर. वसई-विरार आणि पालघर या पट्ट्यात हितेंद्र ठाकूर यांचं एकहाती वर्चस्व आहे, असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. आमदार आणि बहुजन विकास आघाडीचे संस्थापक म्हणून हितेंद्र यांचा दबदबा आजही कायम आहे.
हा किस्सा आहे, निवडणूकीच्या रिंगणाचा. ज्यात ठाकूर यांच्या विरोधात प्रचार करण्यासाठी… स्वतः बाळासाहेब ठाकरे, मधू दंडवते, मृणाल गोरे आणि ज्येष्ठ साहित्यिक विजय तेंडुलकर उतरले होते.
ज्येष्ठ पत्रकार ह. मो. मराठे यांनी किर्लोस्कर मासिकात एक मालिका लिहिली होती. विविध क्षेत्रातल्या लोकांसोबत एक दिवस व्यतीत करुन त्यांनी, त्याबद्दल लिहिलं. या मालिकेला नाव त्यांनी नाव दिलं होतं, ‘एक माणूस, एक दिवस.’ पुढे याच नावानी त्यांनी एक पुस्तक प्रकाशित केलं. त्यात त्यांनी हितेंद्र ठाकुर यांच्याबद्दलचा हा किस्सा लिहिला आहे.
झालं असं, की १९९५ च्या विधानसभा निवडणुकांवेळी वसई मतदार संघाच्या निवडणुकीचा विषय प्रतिष्ठेचा बनला होता. १९९० पर्यंत वसई हा जनता दलाचा बालेकिल्ला समजला जात होता. मात्र हितेंद्र ठाकूर यांनी ९० च्या निडवणुकीत जबरदस्त प्रचार करत जनता दलाच्या विद्यमान आमदाराचा पराभव करत विधानसभेत धडक मारली. पुढच्या काही वर्षात त्यांनी वसई मतदार संघाला आपला बालेकिल्ला बनवलं आणि ९५ च्या निवडणुकांची जोरदार तयारी केली.
९५ च्या निवडणुकांमध्ये बहुरंगी सामना होता. आधीची निवडणूक काँग्रेसकडून लढलेले ठाकूर अपक्ष लढत होते. त्यांच्यासमोर शिवसेनेचे दीपक गव्हाणकर, जनता दलाचे विलास विचारे, काँग्रेसचे अरुण पाटील आणि अपक्ष उमेदवार विवेक पंडीत अशा उमेदवारांचं आव्हान होतं. त्यातच मुख्य निवडणूक अधिकारी टी. एन. शेषन यांच्या कडक शिस्तीत आणि नियमांच्या दंडकाखाली या निवडणूका पार पडत होत्या. साहजिकच सगळ्या राज्याचं लक्ष संघर्षाची आणि वलयांची किनार असलेल्या वसईकडे लागून होतं.
शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सभा घेतल्या. अपक्ष उमेदवार विवेक पंडित आणि ख्यातनाम लेखक व नाटककार विजय तेंडुलकर यांचेही जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यामुळे विजय तेंडुलकर यांनी प्रचारात उडी घेण्याचं ठरवलं. तेंडुलकर यांची वैचारिक बैठक, जबरदस्त प्रसिद्धी आणि इतर प्रभावशाली व्यक्तींसोबत असलेले चांगले संबंध याचा फायदा पंडित यांना होईल अशी चर्चा होऊ लागली. तेंडुलकरांनी थेट वसईमध्येच मुक्का ठोकला. त्यातच जोडीला मृणाल गोरे, मधू दंडवतेही होते. त्यामुळं हितेंद्र ठाकुर यांचं निवडून येणं कठीण वाटू लागलं.
तरीही त्यांनी ८१ हजार ४६३ मतं मिळवून निवडणुकीत विजय मिळवला. दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या दीपक गव्हाणकर यांना ४७ हजार ८८८ मतांवर समाधान मानावं लागलं. तर, अपक्ष लढलेल्या विवेक पंडित यांना १५ हजार ५०२ मतं मिळाली.
या विजयाचं कारण सांगताना ठाकूर, मराठेंना म्हणाले होते, ‘माझा लोकसंपर्क आणि लोकसंग्रह ही मुख्य कारणं. आम्ही प्रचारासाठी तरुणांची फौज उभी करण्यावर भर दिला होता.आम्ही एक कला-क्रीडा महोत्सव भरवायचो, ज्यात जवळपास अकरा हजार एंट्रीज यायच्या त्यामुळे अनेक तरुण आम्हाला जोडलेले होते.आम्ही कुणाही विरुद्ध निगेटिव्ह प्रचार केला नाही, फक्त बैठक घेऊन मतदारांशी स्थानिक प्रश्नांबाबत बोललो. विवेक पंडितांच्या मागं मोठी मंडळी होती, वर्तमानपत्रं होती, पण त्यांचं डिपॉझिट जप्त होणार हे मी आधीच सांगितलं होतं.’
स्वतः बाळासाहेब ठाकरे आणि विजय तेंडुलकर अशी बडी नावं आपल्या विरोधात झुंज देत असताना, हितेंद्र ठाकूर यांनी विजय खेचून आणला, २००९ ते २०१४ ची टर्म सोडली तर १९९० पासून हितेंद्र ठाकूरच वसईचे आमदार म्हणून निवडून येत आहेत. बहुजन विकास आघाडी या नव्या पक्षाची स्थापना करुन त्यांनी आपला करिष्मा कायम ठेवला आहे, असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही.
हे ही वाच भिडू:
- बर्लिनमध्ये निळूभाऊ आणीबाणीवर टीका करत होते आणि काँग्रेस नेते ऐकून घेत होते
- त्या दिवशी गुरुशरण सिंगने जे काही केलं त्यासाठी सचिन आयुष्यात उपकार विसरणार नाही
- बाळासाहेब म्हणलेले, “UPA ला पाठिंबा देणे काळाची गरज आहे, कोणी आम्हाला गृहीत धरू नये “