बर्ड फ्लू सोडा पण चिकुनगुनियाच्या भीतीने लोकांनी चिकन खायचं सोडून दिल होतं

गेला संपूर्ण वर्ष आपल्याला कोरोनाने छळल. घरात बसून लोकांनी अंडी उबवली. सोशल डिस्टंसिंग, मास्क है जरुरी गो कोरोना गोने अख्ख जग निनादून गेलं. कसबस ते २०२० संपलं आणि २०२१ मध्ये आपण प्रवेश केला.

नव्या वर्षात सुखद बातमी आली कि आता कोरोनावर लस येतेय. लगेच आम्ही चिकन कबाब बिर्याणीचा बेत आखला. सेलिब्रेशन तो बनता है. पण हाय रे दैया. वो चिकन हमारे नशीब में नही था. लस अजून पोहचली पण नाही तोवर या कोरोना पेक्षा घातक असा बर्ड फ्लू रोग दारावर आला. चिकनचे प्लॅन कॅन्सल करायला लागले.

 हिमाचल प्रदेश, राजस्थान, केरळ आणि पंजाब या राज्यात हा आजार प्रामुख्याने आढळून आला आहेच पण महाराष्ट्रात लातूर, बीड, परभणी या भागात  काही पक्ष्यांचे मृत्यू झाल्यामुळे  आपल्या इथेही रेड अलर्टची घोषणा करण्यात आली.

चिकन खाऊ नका म्हणून सोशल मीडियावर लोक आवाहन करताना दिसत आहेत.  चायनाच्या कोरोनाने तोंड पोळलेली माणसं आपण. गुजरात राजस्थानमध्ये बर्ड फ्लू आला म्हणून इथं चिकन खायचं बंद केलं.

असचं २००६ साली पण झालेलं ते ही आपल्या महाराष्ट्रात.

१९ फेब्रुवारी २००६, महाराष्ट्रातील नवापूर इथे काही कोंबड्याना बर्ड फ्लूची लागण झाल्याचं लक्षात आलं. मागच्या काही वर्षांपासून आशिया आणि युरोपमध्ये धुमाकूळ घालणारा हा रोग भारतात पहिल्यांदाच आला होता. हा फक्त कोंबड्याना होणारा रोग नसून तो त्यांच्यापासून माणसांना सुद्धा होऊ शकतो हे कळल्यावर तर संपूर्ण देशाला धडकी भरली.

नवापूर मधील पोल्ट्री फार्ममध्ये शेकडो कोंबड्या मृत अवस्थेमध्ये आढळत होत्या. त्यांची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली. बर्डफ्लू ला कारणीभूत ठरणाऱ्या एच१ एन१ विषाणूची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळे राज्यसरकारतर्फे युद्धपातळीवर उपाय योजना हाती घेण्यात आलोय.

नवापूर परिसरातील कोंबड्या आणि अंडी नष्ट करण्याची मोहीम हाती घेण्यात आली . फक्त पाच दिवसात अडीच लाख कोंबड्या आणि सहा लाख अंडी नष्ट करण्यात आली.

नवापूर परिसरात लोकांच्या येण्या जाण्यावर देखील कडक बंदी घालण्यात आली.

फ्ल्यू सारखी लक्षणे आढळून आलेल्या रुग्णांना तात्काळ इस्पितळात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर देखरेख ठेवण्यात आली. या रुग्णांचे नमुने पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलजी या संस्थेत तपासणीसाठी पाठवण्यात आले.

सरकारने औषधउत्पादकांना फ्ल्यूविरोधी औषधे उत्पादन करण्याचे देश आदेश दिले. आणीबाणीची स्थिती उदभवल्यास साहाय्यासाठी सज्ज राहण्याचे लष्कराला आदेश देण्यात आले. खबरदारीचे उपाय म्हणून देशातील इतर राज्यांनी महाराष्ट्रातून पोल्ट्री उत्पादनाच्या आयातीवर बंदी घालण्याचं पाऊल उचललं.

त्याकाळी महाराष्ट्रात विलासराव देशमुख यांचं सरकार होतं. त्यांनी तातडीने उचललेल्या पावलांमुळे माणसांमध्ये बर्ड फ्ल्यूचा प्रादुर्भाव होण्यापासून रोखण्यात आपल्याला यश मिळालं. आजच्या कोरोनापेक्षाही प्रचंड घातक समजला जाणारा हा बर्डफ्लू वेळीच नियंत्रणात आला.

पण या रोगामुळे पोल्ट्री उद्योगाचे प्रचंड नुकसान झाले. देशभरात लोकांनी चिकन खाणे बंद केले होते. कोट्यवधींचे नुकसान झाले. विशेषतः नवापूर येथे पोल्ट्री उद्योग हेच अनेकांचे उपजीविकेचे साधन आहे. तिथे तर कित्येकजण देशोधडीला लागले.

त्याकाळचे मंत्री सुरूपसिंग नाईक यांनी प्रयत्नाने तब्बल पंचवीस कोटींची नुकसान भरपाई नवापूरला मिळवून दिली.

१६ ऑगस्ट २००६ रोजी सरकारने भारत बर्डफ्लू मुक्त झाला आहे हे जाहीर केले.

पण मधल्या काळात आणखी गोंधळ झाला. बर्ड फ्ल्यू आला नाही पण चिकुन गुनिया रोगाने देशभरात थैमान घातलं. फेब्रुवारी महिन्यापासूनच याची कुणकुण लागली होती. ऑगस्टमध्ये राजस्थान येथे अतिवृष्टी झाली. यामुळे आलेल्या पुरामुळे भिलवाडा, उदयपूर, चित्तोड या भागात चिकुनगुनियाची साथ पसरली. हळूहळू गुजरात मध्यप्रदेश मार्गे हि लाट महाराष्ट्रात देखील दाखल झाली.

खाली केरळ मध्ये तर ७१ जणांचा मृत्यू झाला. तिथल्या अलापुझा या जिल्ह्यात चिकुन गुनिया रोगाने थैमान घातले. संपूर्ण देशात सुमारे सडे बारा लाख रुग्ण आढळून आले. यातील कर्नाटकात सर्वाधिक म्हणजे सडे सात लाख तर महाराष्ट्रात अडीच लाख चिकुनगुनिया पेशन्ट होते.

हातपाय सांधे दुखणे चालायला देखील मुश्किल करणार्या या रोगावर त्याकाळी प्रभावी औषध नसल्यामुळे केंद्र आणि राज्यसरकारांनी या रोगाविषयी लोकशिक्षण, सार्वजनिक स्वच्छतेचा प्रचार व प्रसार अशा प्रतिबंधात्मक उपायांच्या माध्यमातून रोगाचा प्रसार रोखण्यासाठी प्रयत्न केले गेले.

हे सगळं चाललं होतं आणि त्यात महाराष्ट्रात वेगळीच समस्या उभी राहिली.

बर्ड फ्लूच्या धोक्याने घाबरलेली माणसं चिकुनगुनियाच्या नावात चिकन आल्यामुळे व्हेजिटेरियन झाली. हा रोग कोंबड्यांमुळे नाही तर एडिस इजिप्ती आणि एडिस अल्बोपिक्ट्स या डासांमुळे होतो हे सुद्धा  जनजागृती करून सांगावं लागलं. पोल्ट्री उद्योग वाले देखील घाबरले. बर्ड फ्ल्यू मध्ये उघड्यावर आले होते आणि त्यात हे काय संबंध नसलेल्या चिकुनगुनिया मुळे नागडं होण्याची वेळ आली होती.

सरकारला चिकन खावा म्हणून सांगायची वेळ आली होती.

त्याकाळी काय फेसबुक व्हाटसप सारखे सोशल मीडिया नव्हतं. मग अखेर त्यांनी एक जाहिरात बनवली. यात मराठी सिनेमाइंडस्ट्रीमधले सगळे दिग्गज कलाकारांना पाचारण करण्यात आलं. आपल्यापैकी अनेकांना या जाहिरातीच गाणं आठवत असेल ,

“चिकुनगुनिया रोग डासांमुळे होई, भरपूर चिकन खायाचं ढेकर देऊन पडायचं.” 

सह्याद्री वाहिनीवर दिवसरात्र हि जाहिरात दाखवण्यात आली. मस्तपैकी हिरो हिरोईन चिकन लेग पीस मारत आहेत हे बघून गोरगरीब जनतेच्या मनात विश्वास आला. आणि चिकनच्या दुकानाकडे हळूहळू लोकांची पावले वळू लागली. पोल्ट्रीवाल्यांच्या जीवात जीव आला. हे सगळं आपल्या लहानपणी घडलं होतं.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.