महाराष्ट्रासाठी प्राण अर्पण करणारा पहिला “हुतात्मा”

 

१५ जानेवारी १९५६- भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी विदर्भासह महाराष्ट्र, मुंबईला केंद्राशासित प्रदेश आणि कच्छ-सौराष्ट्रासह गुजरात राज्याच्या निर्मितीची घोषणा आकाशवाणीवरून केली. नेहरूंच्या या घोषणेनंतर संतप्त जनता निदर्शने देत रस्त्यावर उतरली. दुसऱ्या दिवशी मुंबईत उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आला होता. पुढच्या ७ दिवसात मोरारजी देसाई यांच्या आदेशावरून ४४२ वेळा आंदोलनकर्त्यांवर गोळीबार करण्यात आला, ज्यात ९० जणांनी  मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी निर्मितीसाठी  हौतात्म्य पत्कारलं.

१७ जानेवारी १९५६- बेळगावचा समावेश  कर्नाटकात करण्यात आल्यामुळे त्या भागातील मराठी जनतेतही जवाहरलाल नेहरूंविरोधात प्रचंड आक्रोश होता. याविरोधात जागोजागी निदर्शने होत होती. लोकांचा विरोध मोडून काढण्यासाठी जागोजागी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांवर अनन्वित अत्याचार करण्यात येत होते. लहान मुले आणि स्त्रियांवर सुद्धा पोलिसी कारवाईचा बडगा उचलण्यात आला होता. बेळगावचा समावेश संयुक्त महाराष्ट्रात करण्याची मागणी घेऊन आणि नेहरूंच्या  निर्णयाविरोधात हुतात्मा चौकात मोर्चा काढण्यात आला होता. सायंकाळच्या वेळी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. पै. मारुती बेन्हाळकर हे देखील या मोर्चात सहभागी होते. ‘बेळगाव-कारवार- निपाणी भालकी-बिदरसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे..!’ या घोषणेनं हुतात्मा चौक परिसर गजबजून गेला होता.

आंदोलनकर्त्यांना थोपवण्यसाठी सर्वप्रथम पोलिसांनी या मोर्चावर लाठीमार केला परंतु आंदोलक त्याला दाद द्यायला तयार नव्हते. मारुती बेन्हाळकर हे तर “रहेंगे तो महाराष्ट्र में, नही तो जेल में” अशी घोषणा देत आणि ‘चालवा बघू गोळ्या’ असं म्हणत थेट पोलिसांना आव्हान देत होते. शेवटी पोलिसांनी बेन्हाळकर यांच्यावर गोळीबार केला आणि ३ ते ४ गोळ्या पैलवान असणाऱ्या बेन्हाळकर यांच्या छातीतून आरपार गेल्या. पैलवानी देहयष्टी असणारे बेन्हाळकर धाडकन जमिनीवर कोसळले आणि त्यानंतर मोर्चात सहभागी इतर आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा नळकांड्याचा वापर केला. त्यानंतरच अश्रुधुरामुळे आणि  गोळीबाराच्या भीतीने मोर्चात सहभागी झालेले इतर आंदोलक सैरावैरा धावायला लागले, अशी आठवण या प्रसंगाचे साक्षीदार राहिलेले महादेव निंगप्पा टिकेकर हे सांगतात. ही आठवण सांगताना आजही ते भावनाविवश होतात आणि त्यांचा उर भरून येतो.

संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी मारुती बेन्हाळकर या तरुण पैलवानाने पत्करलेल्या हौताम्यानंतर सीमावर्ती भागात संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीने अजून मोठ्या प्रमाणात जोर धरला, पण या प्रयत्नांना आजतागायत यश मिळू शकलेलं नाही.  आजही या भागातील मराठी भाषिक बांधवांना हा लढा लढावाच लागतो आहे, अशी खंत देखील महादेव निंगप्पा टिकेकर व्यक्त करतात.

Leave A Reply

Your email address will not be published.