राजकारणात लागतात लठ्ठ, मठ्ठ, निगरगठ्ठ आणि इथंच मुख्यमंत्र्यांच्या मुलांचा कार्यक्रम गंडला

महाराष्ट्रामध्ये सध्या महाविकास आघाडीचे सरकार आहे आणि मुख्यमंत्री आहेत उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असले तरी त्यांच्याही पेक्षा जास्त चर्चा होते ती त्यांच्या मुलाची म्हणजेच आदित्य ठाकरे यांची. वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत आणि आजोबांच्या विचारांना सोबत घेऊन आदित्य ठाकरे यांनी त्यांचा राजकारणातला प्रवास सुरु केलाय.

यात सांगायचा मुद्दा हा की, आपल्याकडे राजकारणामध्ये घराण्यांची प्रथा दिसते. एखादं घराणं राजकारणात आलं की पुढेही ती परंपरा चालू असते. असे अनेक उदाहरणं पाहायला भेटतील. ठाकरे, पवार, गांधी ही त्यातील प्रचलित नावं. पण महाराष्ट्राच्या इतिहासात असाही एक मुख्यमंत्री होऊन गेला आहे की, त्यांची पुढची पिढी राजकारणात आली नाही आणि ते मुख्यमंत्री म्हणजे

‘बाबासाहेब भोसले’

बाबासाहेब भोसले हे महाराष्ट्राचे तेरावे मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्रीपदी त्यांचा काळ फार कमी राहिला, जवळपास १३ महिन्यांचा. पण त्यांची राजकीय कारकीर्द तितकीच जबरदस्त होती. हे सिद्ध होतं, ते किती कमी वेळात मुख्यमंत्री झाले होते यावरून. १९८० साली बाबासाहेब भोसले पहिल्यांदा आमदार झाले आणि दोनच वर्षात म्हणजे १९८२ ला थेट मुख्यमंत्री झाले.

बाबासाहेब भोसलेंना इतर मुख्यमंत्र्यांपेक्षा वेगळी करणारी गोष्ट म्हणजे त्यांची विनोदबुद्धी, हजर जबाबीपणा आणि सोबतच मनमोकळा, दिलखुलास आणि काहीसा फटकळ स्वभाव. याचे चर्चे भारतभर व्हायचे आणि आजही त्यांचं नाव काढली की त्यांची ही वैशिष्ठ्ये सगळ्यांना पहिले आठवतात.

त्यांच्या या स्वभाव गुणांची एकत्र अनुभूती अनेकांना आली होती. त्यातील एक नाव म्हणजे विद्याधर गोखले. विद्याधर गोखले हे माजी खासदार आणि दैनिक लोकसत्ताचे माजी संपादक.

विद्याधर गोखलेंनी जेव्हा भोसलेंना ‘तुमची पुढची पिढी राजकारणात का उतरली नाही?’ हा प्रश्न विचारला तेव्हा त्यांना भोसलेंच्या उत्तरावर याचा अनुभव आला. हा खूप गमतीदार किस्सा आहे.

बाबासाहेब गोखले मुख्यमंत्री असताना एकदा गोखले त्यांना भेटायला गेले होते. त्यांच्या चांगल्या गप्पा रंगल्या होत्या. तेवढ्यात बाबासाहेबांची तीन मुलं तिथे आली. आता आपले आई-वडील जसे घरात पाहुणे आले की आपली ओळख त्यांना करून देतात, अगदी तसंच बाबासाहेबानी त्यांच्या मुलांची ओळख गोखलेंना करून दिली. 

बाबासाहेबांच्या मोठा मुलगा अशोक. तो अमेरिकेवरुन आर्किटेक्ट इंजिनिअरचं शिक्षण पूर्ण करून आला होता आणि भारतात काम करत होता. दुसरा मुलगा दिलीप जो उच्च न्यायालयात वकिल होता. तर सर्वात लहान मुलगा म्हणजे राजन. राजन MBBS, MD गोल्ड मेललिस्ट होता. तिघेही जाम हुशार आणि स्वतःच्या हिमतीवर काम करत होते. त्यामुळे साहजिकच बाबासाहेबांनी खूपच अभिमानाने आपल्या मुलांची ओळख करुन दिली होती.

पण ओळख करून दिल्यावर गोखलेंना एक प्रश्न पडला. त्यांना आश्चर्य वाटलं की, एकही जण राजकारणात उतरलेलं नाहीये किंवा तशी इच्छाही त्यांची नाहीये. शेवटी न राहुन गोखलेंनी बाबासाहेबांना विचारून टाकलं की, तुमच्याप्रमाणे यातील एकही जण राजकारणात का नाहीये?

त्यावेळी बाबासाहेब खूपच गमतीशीर कारण दिलं. बाबासाहेब अगदी खंत वाटल्याचे भाव चेहऱ्यावर आणत म्हणाले, नाही ना… कुणीच नाही. कारण राजकारणात येण्यासाठी किंवा असण्यासाठी तुमच्याकडे तीन गुण असणे आवश्यक असते. ते म्हणजे लठ्ठ, मठ्ठ आणि निगरगठ्ठ! आणि यातील एकही गोष्ट माझ्या मुलांत नाही. 

बाबासाहेबांच्या या उत्तरावर तिथे उपस्थित असलेले सगळे खूपच हसू लागले. कितीतरी वेळ कुणाचंच पोट धरुन हसणं बंद होत नव्हतं. काहीसे असे होते आपले मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले.

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.