यवतमाळची वाघीण वनखात्याच्या सुगंधी सापळ्यात अडकणार काय..?

तापसी पन्नूची ‘वाईल्ड स्टोन’ पर्म्फ्युमची जाहिरात आठवते का?

हो तीच जाहिरात ज्यात तिचा पतंग वाइल्ड स्टोनचा परफ्युम मारलेला एक मुंडा काटतो. मग ‘दिल बेईमान है’ म्हणत ती त्या परफ्युमच्या दिशेने ओढली जाते.

असल्या हजार जाहिराती येऊन गेल्या. आम्हीसुद्धा रोज डीओमध्ये आंघोळ करून कॉलेजला जायचो. पण तापसी पन्नूच काय तर गेला बाजार आमच्या वर्गातली आर्चीसुद्धा आमच्यापासून १०० फुट लांब राहायची.

तेव्हाच आम्ही आयुष्याचं सूत्र ठरवलं की एमपीएससी पास होऊन लाल दिव्याच स्वप्न दाखवणाऱ्या “मन मै है विश्वास”सारखे व्हिडिओ आणि ‘परफ्युम मारून पोरी पटवा’ असल्या जाहिराती या दोन्हीपासून लांबच राहायचं. पण तेवढ्यात काल एक बातमी वाचली आणि आमची झोप उडाली.

आधी जाणून घ्या की आमची झोप उडवणारी बातमी काय होती ते. तर बातमी अशी होती की

“यवतमाळ मधील नरभक्षक वाघिणीला आकर्षित करण्यासाठी वनखाते ‘केल्व्हिन क्लेन’ परफ्युमचा वापर करणार”

आईच्या गावात आणि बाराच्या भावात. आमचं परफ्युम बद्दलच सूत्र चुकीचंच  म्हटल पाहिजे. आमच्या वर्गातल्या वाघिणीने कधी आमच्या परफ्युमला कधी साद दिली नाही. आम्ही कधी  ‘केल्व्हिन क्लेन’ सारख्या महागड्या ब्रँडचा परफ्युम वापरला नाही असं सुद्धा असू शकते. असो.

तर विषय असा की जंगलातल्या वाघिणीला पकडण्यासाठी हे आंतरराष्ट्रीय पातळीवरच लक्झरी परफ्युम वापरलं जाणार आहे.

टी-१ उर्फ ‘अवनी’ या वाघीणीनं गेली दोन-तीन वर्ष यवतमाळ जिल्ह्यातल्या पांढरकवडा परिसरात घबराट पसरवली आहे. सहा वर्षाच्या अवनीला दोन बछडे आहेत. त्यांनी केलेल्या हल्ल्यात १० पेक्षा अधिक गावकऱ्यांचा मृत्यू झालाय.

गावकऱ्यांचं म्हणणं असं की त्या वाघिणीला मानवी रक्ताची चटक लागलीये. ऑगस्टच्या महिन्यात तिने केलेल्या हल्ल्यात जणांचा मृत्यू झालाय आणि त्यामुळे अखेर भयग्रस्त गावकऱ्यांनी वाघिणीला मारण्याची मागणी केलीये.

दरम्यान ही  वाघीण खरोखर नरभक्षक आहे का याबद्दल वन्यप्राणी संरक्षण संघटनांनी आवाज उठवलाय. साहजिकच हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलं आणि न्यायालयाने “नाईलाज झाला तर वाघिणीला मारावे अन्यथा तिला जिवंत पकडावे” असा निकाल दिला.

न्यायालयाच्या आदेशानंतर महाराष्ट्र शासनाने सूत्रे आपल्या हाती घेतली आणि नवाब शाफत अली खान या आंध्रमधल्या सुप्रसिध्द भाडोत्री शिकाऱ्याला या कामी नियुक्त केले. त्यावरही भरपूर टीका झाली. अखेर केंद्रीय मंत्री  मनेका गांधीनी नवाब साहेबांना घरी जाण्याचा आदेश दिला. तेव्हापासून अवनीला पकडण्याची पूर्ण जबाबदारी महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश राज्याच्या वन्यखात्याकडे दिली.

अवनीला पकडण्याच्या मोहिमेत १०० पेक्षा अधिक अधिकारी कामाला लागले आहेत. शिवाय ५० व्याघ्र रक्षक दलाचे सशस्त्र कमांडो आणि एके ४७ घेतलेले पोलीस युद्ध पातळीवर तिचा शोध घेत आहेत. ठिकठिकाणी लावलेले कॅमेरे, ड्रोन विमाने, पॉवर ग्लायडर या आधुनिक तंत्राच्या सहाय्याने तिचा माग काढला जात आहे.

एकदा वनखाते तिला पकडण्याच्या जवळ आले होते मात्र गुंगीचं औषध असलेली गोळी मारूनही अवनी तिथून पळून जाण्यात यशस्वी ठरली. आपल्या बछडयांच्या संरक्षणासाठी आता ती जास्तच आक्रमक बनली आहे. अतिशय चलाख असलेली ही वाघीण वनखात्याने विविध ठिकाणी ट्रॅप लावले पण तरी  सापडली नाही. अखेर खूप विचारांती वन अधिकाऱ्यांनी हा ‘केल्व्हिन क्लेन’ परफ्युमचा प्रयोग करण्याचे ठरवले आहे.

न्यूयॉर्क मधल्या ब्रोंक्स या प्राणीसंग्रहालयात बिबट्यावर केलेल्या प्रयोगात हे सिद्ध झाले की मार्जारकुळातील प्राणी या विशिष्ट सुवासाकडे आकर्षित होतात. यापूर्वी कर्नाटक, तामिळनाडू इथे हा प्रयोग यशस्वी ठरला आहे. यवतमाळमध्ये देखील तो यशस्वी व्हाव यासाठी तेथील  गावकऱ्यांनी प्रार्थना सुरु केली आहे.

भिडूंसाठी विशेष सूचना: तुम्ही सुद्धा ‘केल्व्हिन क्लेन’ परफ्युम वापरण्याचा प्रयोग करू शकता फक्त जंगलात जाताना हे परफ्युम लावू नका नाही तर खऱ्याखुऱ्या वाघिणीच्या जाळ्यात सापडाल.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.