महाराष्ट्राचे असे राज्यपाल, ज्यांचं नाव इथल्या हायवे आणि दवाखान्याला दिलेलं आहे.
महाराष्ट्राला आजवर अनेक राज्यपाल लाभले. यात भगतसिंग कोश्यारी यांच्यासारखी काही नाव बरीच वादग्रस्त ठरली. तर काही नाव लक्षात देखील येत नाहीत. लक्षात येत नाहीत कारण त्यांनी आपल्या कारकिर्दीत कोणताही वाद ओढवून घेतला नव्हता. मात्र फारचं कमी नाव अशी आहेत ज्यांची आठवण आवर्जून काढली जाते.
असचं एक आवर्जून आठवण काढलं जाणार नाव म्हणजे,
माजी राज्यपाल अली यावर जंग.
आणि भिडूंनों ही आठवण देखील अशी तशी काढली जात नाही तर इथल्या रस्ता आणि हॉस्पिटलला नाव देवून काढली जाते.
मुळात राज्यपाल हि व्यक्ती बाहेरच्या राज्यातील, आपलं सगळं राजकारण पुर्ण करुन ते या पदावर आलेले असतात. बऱ्याचदा त्यावरुन पुनर्वसनासाठीचे पद अशी टिका देखील होत असते. दुसऱ्या बाजूला एखादा मोठा प्रकल्प, संस्था किंवा रस्ता बांधून झाला की त्याच्या नामकरणावरुन वाद सुरु होतात. पण हे वाद सर्वसामान्यपणे इथल्याच म्हणजे महाराष्ट्रातील नावावरुन होत असतात. होय – नाय करत अखेरीस एक नाव फायनल होतं.
या सगळ्या कारणामुळे राज्यपालांच नाव इथल्या एखाद्या प्रकल्पाला देण्याची शक्यता कमीच असते. पण जंग मात्र या गोष्टीला अपवाद ठरतात. म्हणून त्यांच्याबद्दल जाणून घेणं महत्वाच ठरतं.
अली यावर जंग हे १९७१ ते १९७७ या काळात महाराष्ट्राचे राज्यपाल होते. पण त्याही आधी त्यांची राजकीय कारकिर्द चालू होते हैदराबाद मधून. ऑक्सफर्डच्या क्वीन्स कॉलेजमधून शिकून आलेले जंग १९४५ ते १९५२ या काळात हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठाचे व्हाईस चान्सलर होते.
याच दरम्यानच्या काळात म्हणजे १९४६ ते १९४७ मध्ये ते निजामच्या मंत्रिमंडळात घटनात्मक विषयाचे, गृह, शिक्षण, सार्वजनिक खात्याचे मंत्री होते. मात्र भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी एकात्म भारत मानून निजामच्या मंत्रीमंडळातील सर्व पदांचा राजीनामा दिला.
त्यानंतर जंग तत्कालिन पंतप्रधापन पंडित जवाहरलाल नेहरु आणि त्यानंतरच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे निकटवर्तीय बनले. नेहरुंनी त्यांना १९५२ मध्ये परराष्ट्रात भारताचे राजदूत म्हणून नियुक्त केले. यानंतर ते जवळपास १९७० पर्यंत याच पदावर होते. या काळात त्यांनी अर्जेंटिना, इजिप्त, यगोस्लाव्हिया, ग्रीस, फ्रान्स आणि अमेरिका अशा देशांमध्ये भारताचे राजदूत म्हणून भुमिका पार पाडली. आपल्या १८ वर्षांच्या परराष्ट्र सेवेच्या काळात जंग यांनी एकही वाद ओढावून घेतला नव्हता.
पुढे भारतात परतल्यानंतर देखील इंदिरा गांधींनी जंग यांच्या अभ्यास, अनुभव आणि हुशारीचा वापर भारतात करुन घ्यायचं ठरवलं. १९७१ साली गांधींनी अली यावर जंग यांना महाराष्ट्राच्या राज्यपालपदी आणले. महाराष्ट्रात आल्यानंतर जंग यांनी याला अगदी आपलचं राज्य मानले.
त्यातुनच आजचा पश्चिम द्रुतगती मार्ग बनलेला, जो की वांद्रे ते दहिसरपर्यंत, पुढे पश्चिम उपनगरीय रस्ता आणि त्यानंतर मुंबई – दिल्ली नॅशनल हायवे ८ ला जोडला गेला आहे. या रस्त्याला अली यावर जंग यांच्या नावानं ओळखलं जातं. त्याचं कारण म्हणजे आज जी या रस्त्याच्या दुतर्फा काही झाडी दिसते आणि त्यातुन सौंदर्य उठून दिसते याला कारण जंग आहेत.
त्या काळात या रस्त्याचं स्वरुप एवढं मोठं नसलं तरी मुंबईतील एक महत्वाचा रस्ता म्हणून ओळखलं जायचं. कारण विमानतळावरुन मुंबईत यायचं म्हंटलं तर पहिला प्राथमिकता असलेला तो रस्ता होता. त्यामुळेच परदेशातील लोकांना शहरात येताना सुंदर दृष्य दिसवे असा हट्ट जंग यांचा होता.
यातुनच त्यांनी रस्ता सुशोभिकरणाच काम हाती घेतलं. स्वतः राज्यपाल म्हणून रस्त्यावर उतरुन दोन्ही बाजूंना वृक्षांची लागवड केली, पुढे हे वृक्षारोपणाचं काम व्यवस्थित चालू रहाव म्हणून त्यांनी सातत्यानं आढावा घेतला. जगावी, ती वाढावी यासाठी अधून – मधून जावून ते स्वतः या वृक्षांची पहाणी करुन यायचे.
आज जो काही थोडाफार रस्ता सुंदर दिसतो त्याचं एकमेव कारण म्हणजे जंग.
जंग यांचा पहिला विवाह अयशस्वी ठरला. मात्र त्यांचा दुसरा विवाह यशस्वी तर ठरलाचं पण, त्या विवाहामुळे या जोडीला अवघ्या भारतात ओळख मिळाली. जंग यांचा दुसरा विवाह जेहरा यांच्याशी झाला होता. त्यांची ओळख म्हणजे त्या मोठ्या समाजसेविका होत्या.
मुंबईत आल्यानंतर त्या वांद्रे पुर्वमध्ये नॅशनल सोसायटी फॉर क्लिन सिटी नावाचं एनजीओ चालवायच्या. यात त्या मुख्य काम करायच्या ते म्हणजे मुंबईतील झोपडपट्टी भागातील १८ वर्षाखालील मुलांच्या विकासासाठी काम करत असायच्या. अनेक दिवस काम केल्यानंतर जेहरा यांनी या सोसायटीला एक मुर्त स्वरुप देण्याचं ठरवलं.
त्यानुसार ११ डिसेंबर १९७६ साली पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते या सोसायटीचे अधिकृत उदघाटन झाले. मात्र त्याचं दिवशी रात्री इंदिरा गांधी राजभवनावर उपस्थित असताना त्यांच्या समोरचं अली यावर जंग यांच निधन झालं.
मात्र भारत आणि महाराष्ट्र या दोन्ही सरकारने अली यावर जंग यांच्या या कार्याची आठवण कायम ठेवली. जेव्हा १९८३ साली NATIONAL INSTITUTE OF SPEECH AND HEARING DISABILITIES DIVYANGJAN ला त्यांचं नाव दिले. त्यामुळेच जंग या दोन्ही ठिकाणांमुळे आज ही आठवण काढली जाते.
हे हि वाच भिडू.
- पंडित नेहरू यांच्या अस्थीकलशाच्या तांब्याचे बिल राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले होते.
- मध्यप्रदेशच्या राज्यपालांनी पुण्याच्या मारुतीचं नाव डुल्या मारुती केलं..
- मुख्यमंत्र्यांचं काय घेऊन बसला, हे राज्यपाल थेट पंतप्रधानांना नडायचे