बडोद्याच्या नरेशांनी दिलेल्या देणगीतून उभी राहिलेली इमारत म्हणजे मुंबईचे पोलीस मुख्यालय

मुंबईच्या फोर्ट भागात उभं असलेलं महाराष्ट्राचे पोलीस मुख्यालय. महाराष्ट्राचे मुख्य पोलीस आयुक्त इथे बसून राज्याची कायदा व सुव्यवस्था सांभाळतात. महाराष्ट्राच्या सुरक्षिततेचा हा मुख्य खलबतखाना आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही.

पण या इमारतीचं खास वैशिष्ट्य म्हणजे तिला जवळपास दीडशे वर्षांचा ऐतिहासिक वारसा आहे.

साधारण १८७० साली याच्या निर्मितीस सुरवात झाली. तेव्हाची इंग्लंडची राणी आणि भारताची साम्राज्ञी क्वीन व्हिक्टोरियाचा लेक इंग्लंडचा राजकुमार ड्युक ऑफ एडिनबर्ग भारत भेटीसाठी येणार होता. त्याच्या या भेटीची आठवण म्हणून ही इमारत बांधण्याची कल्पना आली.

इमारतीचा पाया ड्युक एडिनबर्ग यांनी त्यांच्या भेटीदरम्यान हॉर्नबाय रॉच्या खालील भागात घातला. अर्थात हे स्थळ नंतर बदलण्यात आले आणि ड्युक यांनी ठेवलेली कोनशिला उचलून नवीन स्थळी ठेवण्यात आली.

इमारतीचे बांधकाम १८ फेब्रुवारी, १८७२ रोजी सुरू झाले.

तो काळ मुंबई बंदराच्या सागरी व्यापाराच्या भरभराटीचा होता. विदर्भातील कापूस भरून जहाज युरोपला जात होते आणि तिथून प्रचंड पैसा मुंबईला परतत होता. अमेरिकन यादवी युद्धाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दशकभरात मुंबई हे कापसाचे प्रमुख केंद्र बनलं होत. इंग्रजांची भारतावर सत्ता होती पण इथल्या कापूस व्यापाऱ्यांचा जगभरात बोलबाला सुरु होता.

व्यापाराच्या निमित्ताने मुंबईत समुद्री खलाशांच्या राबता वाढला होता. या आजारी पडलेल्या मुक्कामाचं ठिकाण म्हणून ही  इमारत बांधायचं ठरलं.

पुढे जाऊन व्हीटी अर्थात आजचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस याचं डिझाईन केलेल्या फेड्रिक विल्यम स्टीव्हन्स या आर्किटेक्टला दिलेलं पहिलं काम म्हणजे हे सेलर्स होम. या इमारतीच्या बांधकामाला जवळपास ३ लाख रुपये खर्च अपेक्षित होता.

पण त्याच्या निर्मितीसाठी मोठी देणगी दिली ती बडोद्याच्या दुसरे खंडेराव महाराजांनी.

खंडेराव गायकवाड यांची ओळख जगभरात एक उदार अंतःकरणाचा राजा अशी होती. ते स्वतः साध्या राहणीचे पुरस्कर्ते होते. आपल्या रयतेला फायदा व्हावा यासाठी ते सदैव प्रयत्नशील असायचे. त्यांनीच आपल्या संस्थांनमध्ये बैलाला जुंपलेल्या रेल्वेची निर्मिती करून भारतात रेल्वे उभारणीचा पाया रचला.  संस्थानात रस्ते बांधले, रुग्णालये उभारली.

त्यांच्या या कार्याचा आदर्श पुढे त्यांचे दत्तक सुपुत्र सयाजीराव गायकवाड महाराजांनी घेतला आणि आपल्या सामाजिक कार्यामुळे देशभरात क्रांतिकारी काम केलं.

खंडेराव महाराजांचे ब्रिटिश राणी व्हिक्टरियाशी चांगले संबन्ध होते. या उदार अंतःकरणाच्या भारतीय राजाचा ती आदर करायची. या कारणामुळेच बडोदा संस्थानासाठी ब्रिटिश सत्तेचे नियम व बंधने शिथिल होती. या मैत्री व सद्भावनेतूनच महाराजानी मुंबईत व्हिक्टोरिया राणीच्या पुतळ्यासाठी व तिच्या मुलाच्या भारत भेटीच्या स्मरणार्थ बांधल्या जात असलेल्या सेलर्स होम साठी त्याकाळी प्रचंड समजली जात असलेली दोन लाखांची देणगी दिली.

सेलर्स होमला मुंबईची त्याकाळची सर्वात देखणी इमारत बनवायचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं.

इमारतीच्या दर्शनी भागात अत्यंत कल्पकतेने निळ्या बेसॉल्ट दगडाचा वापर करण्यात आला आणि तपशिलांमध्ये विविध नैसर्गिक रंगांचे दगड वापरण्यात आले. यामुळे एक अविश्वसनीय असा विविधरंगी (पोलिक्रोमॅटिक) प्रभाव साधला गेला. स्टीव्हन्स यांनी रचना केलेल्या अनेक इमारतींमध्ये नंतर ही कल्पना वापरण्यात आली.

इमारतीचे विभाजन दोन विंग्जमध्ये करण्यात आले होते. उत्तरेकडील विंग ११० फूट बाय ५८ फूट होती. दक्षिणेकडील विंगची रचना मुळात अधीक्षकांचे निवासस्थान म्हणून करण्यात आली होती.

अधिकारी व खलाशांसाठी भोजनगृहे नॉर्थ विंगच्या तळमजल्यावर होती, तर मध्यभागी विशाल प्रवेशदालन होते. याच्या पॅनल्सवर सागवानी लाकडाचे काम होते. निळ्या बेसॉल्ट दगडात तयार केलेल्या जिन्यांचे रक्षण करण्यासाठी कमानींवर नेटकेपणाने लोखंडी कठडे चढवण्यात आले होते. दक्षिणेकडील तळजमजल्याच्या अर्ध्या भागात एक मोठे वाचनालय, अधीक्षकांचे कार्यालय आणि स्टोअररूम्स होत्या. पहिल्या मजल्यावरील उत्तरेकडील सर्व भाग अधिकाऱ्यांच्या डॉर्मिटरीसाठी राखून ठेवलेला होता.

ही इमारत २० अधिकारी व १०० खलाशांना पुरेशी होईल अशी बांधण्यात आली होती आणि गरज भासल्यास अतिरिक्त निवासाची तरतूदही ठेवण्यात आली होती.

इमारतीच्या दर्शनी भागातील वरील टोकाच्या त्रिकोणामध्ये नेपच्युनचे शिल्प विराजमान होते, तर छतावर लाल मंगळुरी फरशा होत्या. ही शिल्पे जेजे स्कूल ऑफ आर्टमधील विद्यार्थ्यांनी जॉन लॉकवूड किप्लिंग (प्रख्यात लेखक रुदयार्ड किप्लिंग यांचे वडील) यांच्या मार्गदर्शनाखाली केली होती.

इमारतीचे संपूर्ण काम फेब्रुवारी ते नोव्हेंबर १८७२ या काळात जेएचई हार्ट, माइस यांच्या, तर नोव्हेंबर १८७२ ते फेब्रुवारी १८७६ या काळात कर्नल जे. ए. फ्लुलर, आरई यांच्या पर्यवेक्षणाखाली पार पडले. एफ. डब्ल्यू. स्टीव्हन्स हे कार्यकारी इंजिनीअर होते, सीताराम खंडेराव वैद्य यांनी ओव्हरसीयर म्हणून काम बघितले.

अनेक वर्षे ही इमारत मुंबईचा गळ्यातील कोहिनुर हिरा म्हणून ओळखली गेली.

ही इमारत सरकारने १९२८ मध्ये, कमिटी ऑफ द रॉयल आल्फ्रेड सेलर्स होमकडून मुंबई विधानपरिषद म्हणून उपयोगात आणण्यासाठी, स्वत:कडे घेतली.

१९३०च्या दशकाच्या अखेरीस सेलर्स होम ही विधानपरिषदेची इमारत झाली. सुमारे १४८ सदस्यांना सामावून घेऊ शकेल असा कौन्सिल हॉल इमारतीच्या पाठीमागे बांधण्यात आला आणि मुख्य इमारतीला एका पॅसेजद्वारे जोडण्यात आला. सरकारचे सल्लागार आर्किटेक्ट जे. मेर्सर यांनी रचना केलेल्या कौन्सिल हॉलच्या भिंती या पिवळ्या बेसॉल्टमध्ये आणि दगडात बांधण्यात आल्या होत्या, तर लोखंडी सळ्यांवर काँक्रिटची बांधणी करून छत तयार करण्यात आले होते.

या इमारतीमधील एक अनन्यसाधारण वैशिष्ट्य म्हणजे मुख्य दालनातील, रबर एस्बेस्टोसमध्ये तयार करण्यात आलेल्या फरशा होय. वातानुकूलन (एसी) प्लाण्टने सुसज्ज अशी कौन्सिल हॉल ही कदाचित मुंबईतील पहिली इमारत असावी. त्यानंतर अनेक वर्षे मुख्य इमारतीचा वापर विधानसभेची इमारत म्हणून करण्यात आला.

तेव्हापासून १९८२ पर्यंत महाराष्ट्राचे विधानभवन म्हणून याच इमारतीमध्ये भरले. भारताला मिळलेले स्वातंत्र्य, संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचा लढा, राज्याच्या १४८ आमदारांचा खणखणीत आवाज या इमारतीने अनुभवला.

संयुक्त महाराष्ट्राचे मंगलकलश यशवंतरावांनी विधानसभेला अर्पण केला तो याच इमारतीमध्ये. पुढे हि जागा मंकी पडत आहे म्हणून वसन्तराव नाईक, शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांच्या सारख्या नेत्यांच्या प्रयत्नातून नवे विधिमंडळ भवन उभे राहिले. त्याच्या उदघाटनासाठी स्वतः पंतप्रधान इंदिरा गांधी नऊवारी साडी परिधान करून आल्या होत्या.

नव्या विधानभवनाच्या निर्मिती नंतर महाराष्ट्राचे पोलीस मुख्यालय या ओल्ड कौन्सिल हॉल मध्ये आणण्यात आले. गेली चाळीस वर्षे ते इथेच आहे. मुंबईच्या व महाराष्ट्राच्या एकूण स्थित्यांतराचा हि इमारत साक्षीदार आहे. काही वर्षांपूर्वी तिचा समावेश युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज मध्ये केला आहे.

अशा या ऐतिहासिक इमारतीच्या निर्मितीमध्ये प्रमुख जबाबदारी बजावलेल्या खंडेराव गायकवाड महाराजांच्या आठवणी तिथे जपल्या पाहिजेत हे नक्की.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.