देश जेव्हा संकटात असतो तेव्हा महाराष्ट्र धावून जातो हा इतिहास आहे

सध्या कोरोना काळात महाराष्ट्र अडचणीत आहे. रुग्ण संख्या वाढत असल्यामुळे परिस्थिती गंभीर आहे. मात्र तरीही यातून सहीसलामत बाहेर पडून महाराष्ट्र पुन्हा आपल्या पायावर उभा राहील याबद्दल तीळमात्र शंका नाही. पण या कोरोनाविरुद्धच्या सगळ्या लढाई दरम्यान सातत्यानं एक वाद पाहायला मिळतो, तो म्हणजे केंद्र राज्याला मदत करत नाही, सहकार्य करत नाही. इतर राज्यांपेक्षा केंद्र महाराष्ट्रासोबत दुजाभाव करत आहे.
तर केंद्राकडून आम्ही सर्व सहकार्य करत असल्याचं सांगितलं जात आहे.
अडचणीच्या काळात होत असलेला हा आरोप लक्षात घेऊन आपण थोडं महाराष्ट्राच्या आणि देशाच्या इतिहासात डोकावलो तर असे काही प्रसंग बघायला मिळतात जेव्हा देश अडचणीत असताना महाराष्ट्र स्वतः मदतीला धावला होता. आणि हे चित्र अगदी आपल्याला पानिपतापासून अलीकडील केरळच्या महापुरापर्यंत बघायला मिळतं.
महाराष्ट्र या प्रसंगी देशासाठी धावून गेला आहे…
१. पानिपत :
पानिपतची तिसरी लढाई म्हणजे मराठेशाहीच्या इतिहासातील भळभळती जखम. अफगाणिस्तानच्या अहमद शहा अब्दालीला दिल्लीवर विजय मिळवण्यासाठी नजीबखान रोहिल्याने भारतात आणले. त्याने तिथे महाप्रचंड लूट माजवली. भारताचा सर्वनाश करण्यासाठी आलेल्या अब्दालीला रोखण्याची जबाबदारी नानासाहेब पेशवे यांनी आपला चुलत भाऊ सदाशिवराव यांच्याकडे दिली.
सदाशिवराव भाऊ पेशवे यांच्या सेनेत मल्हारराव होळकर, जनकोजी शिंदे,पुरंदरे, विंचूरकर असे अनेक दिग्गज सरदार होते. खुद्द पेशवेपदाचा भावी वारस विश्वासराव सुद्धा सेनेत होता. लाखोंचं सैन्य घेऊन सदाशिवराव भाऊ उत्तरेत आले होते. जरी मराठे हि लढाई हरले तरी देशाचं संरक्षण करण्यासाठी मराठ्यांनी आपली एक आख्खी पिढी खर्ची घातली.
२. महादजी शिंदे :
मराठ्यांच्या पराभवाचा बदला घेतला महान सरदार महादजी शिंदे यांनी.
अठराव्या शतकात दिल्लीत रोहील्यांच राज्य होतं. पण उत्तरेतील जनता मुघल बादशाहलाच मानणारी होती. त्यांना रोहिल्याचं राज्य पसंद नव्हते. नजीब खान रोहिल्याचा नातू गुलाम कादिर हा त्यांचा प्रमुख होता. गुलाम कादिर स्वभावाने क्रूर आणि पाताळयंत्री होता. उत्तरेत मराठे इतर युद्धात गुंतलेले पाहून त्याने मुघल बादशहा शहा आलमला ताब्यात घेऊन कारभार हाकायला सुरवात केली.
मात्र गुलाम कादिरने या काळात दिल्लीच्या लाल किल्ल्यात अक्षरशः धुमाकूळ घातला होता. बादशहाच्या जनानखान्यातील महिलांची अब्रूवर हात टाकला, लाल किल्ल्यातील सगळं धन लुटलं. इतकंच नाही तर एकदा खुद्द बादशाह शाह आलम याला चाबकाने फोडून काढले.
अशावेळी बादशहा सकट अख्खा उत्तर भारत द ग्रेट मराठा महादजी शिंदे परतण्याची वाट पहात होता. १७८८ साली महादजी शिंदेंनी दिल्लीकडे कूच केली. फक्त हिंदूच नाही बरेचसे मुस्लिम सरदारही कादिरच्या वर्तवणुकीला कंटाळले होते. यामुळे इस्माईल बेग सारख्या अनेकांनी मराठ्यांना साथ देण्याचं ठरवलं.
महादजी शिंदेनी राणेखानाच्या नेतृत्वाखाली तोफा व मोठं पायदळ देऊन आपलं एक दल दिल्लीवर पाठवलं तर दुसरीकडे रोहिल्यांच्या अंतर्वेदीवर हल्ला केला.
अंतर्वेदीचा बचाव करण्यासाठी गुलाम कादिर दिल्ली सोडून निघाला.
इकडे मराठ्यांनी दिल्लीवर पद्धतशीरपणे कब्जा केला.
मराठ्यांचा जोर पाहून गुलाम कादिर जीव वाचवून पळू लागला तर राणे खान त्याच्या मागावर होता. मिरज किल्ल्यामध्ये त्याने आश्रय घेतला होता पण मराठ्यांनी पराक्रमाने त्याची फौज कापून काढली आणि १९ डिसेंबर १७८८ रोजी त्याला उचलून पाटील बावा म्हणजेच महादजीच्या पायाशी आणून घातले. जुलमी गुलाम कादिरला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली आणि पानिपतच्या पराभवाचा बदला ही पूर्ण केला.
३. यशवंतराव चव्हाण :
१९६२ सलाच भारत – चीन युद्ध. या युद्धादरम्यान तत्कालीन संरक्षणमंत्री श्रीकृष्ण मेनन यांना १ नोव्हेंबर १९६२ ला राजीनामा द्यावा लागला. त्यानंतरचे १५ दिवस पंडित नेहरूंनी स्वतः हे पद सांभाळलं, पण भारताची युद्धातील पीछेहाट झालेली बघता देशाची आणि संरक्षण मंत्रालयाची प्रतिमा पुन्हा मिळवण्यासाठी नेहरूंनी हे पद यशवंतराव चव्हाण यांना देण्याचा निर्णय घेतला.
त्यावेळी महाराष्ट्रासारख्या राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा त्याग करून यशवंतराव चव्हाण दिल्लीत संरक्षण मंत्रालय सांभाळण्यासाठी गेले होते. त्यावेळी यशवंतरावांवर टीकेचे आसूड ओढणारे आचार्य अत्रे देखील कौतुकान म्हणाले,
“हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेला”
४. गुजरातला आपत्ती प्रसंगी मदत :
१९७९ साली गुजरातमधील मोरबी गावात पूर आल्यामुळे मोठं नुकसान झालं होतं. तेव्हाचे गुजरातचे मुख्यमंत्री बाबुभाई पटेल यांनी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांना मदत मागितली होती. त्यावेळी लगेच मुंबईत बैठक घेऊन सरकारनं काही रक्कम गोळा करुन त्यांना दिली होती.
तसचं २००१ साली आलेल्या कच्छ-भुज भूकंपाच्या वेळीही महाराष्ट्राने गुजरातला मोठी अर्थीक आणि वैद्यकीय मदत पाठवली होती. सोबतच त्यानंतर देशात स्थापन झालेल्या एनडीआरफच्या स्थापनेत देखील शरद पवार या महाराष्ट्राच्या माणसाची प्रमुख भूमिका होती.
५. त्सुनामी :
२००४ साली देशातील किनारपट्टी भागात त्सुनामीची लाट आली होती. भारतातील १३ राज्यांमध्ये याचा फटका बसला होता. महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागाला देखील याचा फटका बसला होता. मात्र त्यानंतर देखील महाराष्ट्रानं दक्षिण भारतातील राज्यांमध्ये वैद्यकीय मदत पाठवली होती. आणि ती अगदी शेवटच्या टोकाला असलेल्या अंदमान निकोबार पर्यंत पाठवली होती. त्या पथक त्यात १२ जण होते.
६. सियाचीनमध्ये सैन्यासाठी हॉस्पिटल :
कारगिल युद्धानंतर सियाचीन या भारताच्या सर्वोच्च युद्धभूमीवर हॉस्पिटल नसल्याचं प्रकर्षांनं जाणवलं होतं. कोल्हापूरच्या दै. पुढारीचे संपादक प्रतापसिंह जाधव यांच्या हि गोष्ट लक्षात आली, आणि त्यांनी हे हॉस्पिटल बांधण्याचं मनावर घेतलं. पुढारी आणि संपूर्ण महाराष्ट्रातून निधी गोळा करण्यात आला आणि पुढच्या २ वर्षात सियाचीनमध्ये १०० बेड्सच अत्याधुनिक हॉस्पिटल उभं राहील.
अब्दुल कलाम राष्ट्रपती असताना त्यांनी सियाचीनला भेट दिली होती, तोपर्यंत १ लाख ४८ हजार सैनिक उपचार घेऊन बरे होऊन बाहेर पडले होते. आजही हे हॉस्पिटल भारतीय सैन्याच्या शौर्याचे प्रतिक म्हणून ताठ मानेने उभे आहे.
७. राम प्रधान, शरद पवार, शंकरराव चव्हाण या तिघांनी मिळून पेटलेला पंजाब, आसाम आणि मिझोराम शांत करून दाखवला :
राजीव गांधी पंतप्रधान असताना जेष्ठ आणि सर्वात अनुभवी सनदी अधिकारी असलेले राम प्रधान हे केंद्रीय गृह सचिव होते. त्यावेळी नुकतीच इंदिरा गांधी यांची हत्या, दिल्लीमधील शीख दंगल यामुळे पंजाबमधील वातावरण पेटलेल होतं. राम प्रधान यांनी सरकारचे विरोधक असून देखील शरद पवार यांना हाताशी धरून पंजाबच्या अकाली दलाशी चर्चा करून लोंगोवाल व राजीव गांधी यांच्यात करार झाला आणि पंजाब शांत होण्याच्या दिशेनं पहिलं पाऊल पडलं.
त्यानंतर १९८० च्या दशकात आसाममध्ये बांगलादेशी घुसखोरांच्या प्रश्नावरून आसामी तरुणांनी शस्त्र हाती घेतले होते. प्रचंड मोठ्या दंगलीच सत्र सुरु होतं. त्यावेळचे गृहमंत्री शंकरराव चव्हाण आणि राम प्रधान यांनी अथक प्रयत्न करून, तिथल्या नेत्यांशी बैठका घेऊन आसामचा प्रश्न सोडवला.
मिझोराम राज्याच्या प्रश्न देखील राम प्रधान यांनी निवृत्तीच्या शेवटच्या दिवसापर्यंत प्रयत्न करून सोडवला. अगदी ते मिझोरामचा प्रश्न सोडवूनच, तसा करार करून रात्री निवृत्त झाले.
८. केरळ मदत :
२०१८ साली केरळला आलेल्या आपात्कालीन परिस्थितीत महाराष्ट्रानं केरळला मदतीचा हात दिला होता. महाराष्ट्र सरकारकडून त्यावेळी जवळपास २० कोटी रुपये दिले होते. जसे पैशांची मदत महत्वाची होती अगदी तशीच वैद्यकीय सुविधा देण्यासाठी महाराष्ट्रातून १०० डॉक्टरांची टीम केरळला रवाना झाली होती. या डॉक्टरांमध्ये मुंबईतील सर जे.जे समूह रूग्णालय आणि पुण्यातील ससून जनरल रूग्णालयातील डॉक्टरांचा समावेश होता.
यासोबत तात्कालीन वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन देखील डॉक्टरांसोबत केरळला गेले होते. सोबतचं पुण्यातून केरळसाठी सात लाख लिटर पिण्याचे पाणी ट्रेनने पाठवले होते. तसेच अन्नाची पाकिटे, दूध पावडर, ब्लँकेट, बेडशीट्स, कपडे, साबण, सॅनिटरी नॅपकिन्स असे जवळपास ४० टन सामान पाठवलं होतं.
हे हि वाच भिडू.
- ७२ च्या दुष्काळात मफतलालच्या सुखडीने अख्ख्या महाराष्ट्राला जगवलं
- महाराष्ट्रासारखीच परिस्थिती, पण हे राज्य ऑक्सिजनसाठी धडपडत नाही तर निर्यात करत आहे
- परदेशातील मदत तर नाकारलीच, उलट स्वतः इतर उध्वस्त देशांना उभं राहण्यासाठी निधी दिला.