महाराष्ट्रातील या आयएएस अधिकाऱ्यामुळे देशभरात संविधान दिन साजरा होऊ लागला.

२६ नोव्हेंबर १९४९ या दिवशी भारतीय संविधान दिन साजरा केला जातो, या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान देशाला अर्पण केले अशा अनेक ठोकळ गोष्टी आपल्याला तोंड पाठ असतात. स्पर्धा परीक्षा करणारा असेल तर जास्तीत जास्त संविधानाची वैशिष्ट्ये आणि त्यातील तरतुदी अशा गोष्टी माहित असतात.

पण २००५ पर्यंत २६ नोव्हेंबरला संविधान दिन साजरा करणे सोडा त्याची साधी ओळख देखील नव्हती. त्यापूर्वी हा दिनच साजरा होत नव्हता. अगदी सरकार दरबारी सुद्धा. 

आजचा हा दिवस संविधान दिन म्हणून देशभरात साजरा करावा या विचाराचे पहिले शिल्पकार ठरले, नागपूर जिल्हा परिषदेचे २००५ सालचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे.

संविधान हा देशाचा राष्ट्रग्रंथ आहे. त्यामुळे संविधानाची ओळख प्रत्येक भारतीय नागरिकांना माहीत असणे ही भावना खोब्रागडे यांच्या मनात आली. ते स्वतः संविधानाचे आणि आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक होते.

त्यांनी सीईओंच्या अधिकाराचा वापर करून जिल्हा परिषदेची यंत्रणा मदतीला घेतली आणि सर्व शिक्षा अभियान अंतर्गत ३ डिसेंबर २००५ पासून जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन सुरू केले.

शाळांमध्ये दैनिक परिपाठाच्या वेळी दररोज संविधानाचे वाचन हा उपक्रम सुरू करण्यात आला. तसेच शाळांच्या इमारतीच्या दर्शनी भागात संविधानाच्या प्रास्ताविका लावण्यात आली. खोब्रागडे यांनी स्वतः सुद्धा आपल्या कार्यालयात संविधानाची प्रास्ताविका दर्शनी भागावर लावून घेतली.

या उपक्रमाची माहिती त्यांनी शासनाच्या विविध विभागांनाही दिली. पण काही कारणास्तव हा उपक्रम इतर जिल्ह्यात सुरू होऊ शकला नाही. मात्र आदिवासी विभागाने ९ मार्च २००६ पासून विभागाच्या सर्व आश्रमशाळेत परिपाठाच्या तासाला संविधानाचे वाचन सुरू केले.

पुढे २००६ मध्ये ई. झेड. खोब्रागडे हे वर्धा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी झाले. संविधान ओळख आणि प्रास्ताविक वाचन हा उपक्रम त्यांनी वर्धा जिल्ह्यात देखील राबवला. योगायोगाने राज्याचे तत्कालीन शिक्षणमंत्री वसंत पुरके हे वर्ध्याचे पालकमंत्री होते. खोब्रागडे यांनी राज्यातील सर्व शाळांमध्ये संविधान वाचनाचा उपक्रम चालू करण्याची मंत्री महोदयांना विनंती केली.

त्यानुसार १४ जून २००७ च्या पत्रान्वये संविधान प्रास्ताविक वाचन हा उपक्रम राज्यातील सर्व शाळांमध्ये २००८ च्या सत्रापासून सुरू केला. समाजकल्याण विभागाचे संचालक असताना खोब्रागडे यांनी सर्व वसतिगृहात हा उपक्रम सुरू केला.

राज्य सरकारने २००८ पासून लागू केला संविधान दिन

२००८ मध्ये ई. झेड. खोब्रागडे यांनी संविधानाची प्रास्ताविका शाळांसोबतच सर्व शासकीय-निमशासकीय कार्यालये, ग्रामपंचायती अशा सर्व ठिकाणी दर्शनी भागात लावण्यात यावे, ग्रामसभा, जि.प., नगरपालिका, महापालिकेच्या सर्वसाधारण सभा सुरू होण्यापूर्वी संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन व्हावे, राष्ट्रीय सण व शासकीय समारंभात वाचन व्हावे, अशी मागणी शासनाला केली.

शासनाने देखील हि विनंती मान्य केली. २४ नोव्हेंबर २००८ ला सामान्य प्रशासन विभागाने आदेश काढून ‘२६ नोव्हेंबर’ हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यात यावा असे आदेश दिले.

२०१५ मध्ये केंद्र सरकारकडून मंजुरी

महाराष्ट्रात संविधान दिन लागू झाल्यानंतर ई. झेड. खोब्रागडे थांबले नाहीत. २०१५ मध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संविधान दिन साजरा करण्यात यावा यासंदर्भात पत्र पाठविले.

केंद्र सरकारने त्याची दखल घेऊन २०१५ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्त संविधान दिवस साजरा करण्याला मंजुरी दिली. आणि २६ नोव्हेंबर २०१५ रोजी पहिला अधिकृत संविधान दिन साजरा केला. तेव्हापासून संविधान दिन प्रत्येक सरकारी कार्यालयात साजरा करणे बंधनकारक झाले.

देशाला स्वातंत्र्य, समता, बंधूता, न्याय, दर्जाची व संधीची समानता, व्यक्तींची प्रतिष्ठा, राष्ट्रीय एकता अशी अनेक मुल्य देणारे संविधान हा भारतीयांसाठी जगातील सर्वात सुंदर राष्ट्रग्रंथ आहे. ई. झेड. खोब्रागडे यांच्यामुळे देशभरात या २६ नोव्हेंबर या संविधान दिनाची ओळख होऊन तो साजरा देखील करण्यास सुरुवात झाली आहे.

निवृत्तीनंतर देखील त्यांनी हा जागर चालूच ठेवला आहे. संविधान फाऊंडेशन ही संस्था स्थापन करुन संविधान ओळख आणि वाचन हे काम नियमीत चालू असते.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.