महाराष्ट्राचा १४०० वर्ष जुना उल्लेख असलेलं कर्नाटकातलं मंदिर

ऐहोळे म्हणजे चालुक्यांचे वैभवशाली साम्राज्य दाखवणारी नगरी.मलप्रभेच्या किनाऱ्यावर जागतिक दर्जाच्या स्मारकांची निर्मिती करणाऱ्या चालुक्य वंशातील महापराक्रमी राजा ‘पुलकेशी दुसरा’ याचे आयुष्य एका शिलालेखात बंद करून ठेवले आहे. मेगुति मंदिराच्या पूर्वेकडील भिंतीवर असणारा शिलालेख ‘ऐहोळे प्रशस्ती’ म्हणून प्रसिद्ध आहे.

चालुक्य राजा जयसिंह,पुलकेशी,किर्तीवर्मन, मंगलेश यांच्या कर्तुत्वाला वंदन करत पुलकेशी दुसरा याने त्याचे राज्य कशाप्रकारे नर्मदेपर्यंत वाढवले,या सर्व घटना अतिशय सुंदरपणे मांडण्यात आल्या आहेत.

हा लेख लिहीणारा ‘रवीकीर्ती’ हा कवी त्या काळात फार प्रसिद्ध असावा,कारण त्याची तुलना कालिदास आणि भारवी यांच्याशी केली आहे.

या लेखामध्ये अनेक गमती जमती आहेत. जसे की, हा लेख भारतीय युद्धाच्या 3735 वर्षे लोटल्यानंतर लिहिण्यात आला.भारतीय युद्ध म्हणजे महाभारत.पुढच्या ओळीत ‘कलीयुगातील शक राजाची 556 वर्षे पूर्ण झाल्यावर’ असे वाक्य कोरल्यामुळे हा लेख इसवी सन 634-35 या वर्षी लिहिण्यात आला हे स्पष्ट झाले. त्याचबरोबर,महाभारताच्या काळाचा उल्लेख आल्यामुळे या लेखाचे महत्व वाढले.

या 19 ओळींच्या लेखातील एक महत्वाची गोष्ट.
ओळ क्र. 12 मध्ये रवीकीर्ती लिहीतो,

‘अगमदधिपतित्वम् यो महाराष्ट्रकाणाम् नवनवति-सहस्त्र-ग्राम-भाजां त्रयाणाम् ।।’
म्हणजेच,

नव्याण्णव हजार गव्युतिक्षेत्र असलेल्या तीन महाराष्ट्र प्रदेशाचा अधिपती झाला.

सम्राट पुलकेशी हा त्याकाळी 99 हजार गावांनी युक्त असणाऱ्या तीन महाराष्ट्र प्रदेशांचा अधिपती झाला,असे त्या वाक्याचा अर्थ होतो.

पण आजवर ह्या ‘तीन महाराष्ट्र’ विषयी ठोसपणे कोणत्याही संशोधकाने मत मांडले नाही.

‘महाराष्ट्र’ या नावाचा जवळ जवळ चौदाशे वर्ष जुना उल्लेख असणारा हा शिलालेख..

  • केतन पुरी

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. vishal kadam says

    अश्मक, गोप आणि विदर्भ ही ती तीन महाराष्ट्र आहेत. याचा महाभारतात स्पूटीक उल्लेख आहे. जाणत्या मराठी वाचकांना माहिती असेल याचा मृत्युंजय मध्ये सुद्धा उल्लेख आहे. मृत्युंजय मध्ये जेव्हा कर्ण अश्वमेघा साथी राज्य जिंकण्यासाठी निघतो तेव्हा दक्षिणेकडे आल्यानंतरचा हा उल्लेख आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.