झारखंड मधलं काँग्रेस सरकार पाडण्यासाठी महाराष्ट्रातनं हालचाली सुरु आहेत.
”एक बार, उन्होंने मुझे 1 करोड़ रुपये से ज्यादा कैश की पेशकश की. उन्होंने मुझसे यह कहते हुए संपर्क किया था कि पैसे के अलावा, मुझे अल्पसंख्यक और आदिवासी मामलों से जुड़ा मंत्री पद मिलेगा.’
हे म्हणणारे दुसरे तिसरे कोण नसून झारखंडमधील कोलेबिराचे कॉंग्रेसचे आमदार नमन बिक्सल कोंगारीसे आहेत. त्यांनी झारखंडच्या हेमंत सोरेन सरकारला पाडण्यासाठी काही अज्ञात लोकांनी त्यांच्याशी अनेकदा संपर्क साधला आणि १ कोटी रुपये आणि मंत्रीपदाची ऑफर दिली, असा दावा केलाय.
वास्तविक हा आरोप अशा वेळी झालाय जेव्हा झारखंड पोलिसांनी सोरेन यांच सरकार पाडण्याच्या कटाच्या आरोपाखाली तीन जणांना अटक केली आहे. आता या प्रकरणात ट्विस्ट म्हणजे यात महाराष्ट्रातल्या काही जणांचं नाव आलंय.
ही अटक झाल्यापासून झारखंडच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. भाजप आमदार विकत घेणार असल्याचा आरोप करत द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना आमदार नमन बिक्सल कोंगारीसे म्हणाले,
माझ्या पक्षातील कार्यकर्त्यांमार्फत तीन लोकांनी मला संपर्क साधला होता की ते काही कंपन्यांसाठी काम करतात. माझा नकार असूनही त्यांनी ऐकले नाही. एकदा त्यांनी मला १ कोटी रुपयांहून अधिक रोख रकमेची ऑफर दिली. मी ताबडतोब कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आलमगीर आलम आणि कॉंग्रेस झारखंडचे प्रभारी आरपीएन सिंग यांना कळवले. मी मुख्यमंत्री हेमंत सोरेन जी यांनाही याबद्दल माहिती दिली होती.
मात्र, यासंदर्भात हेमंत सोरेन यांच्या बाजूने अद्याप कोणतेही विधान आले नाही.
वास्तविक, नुकतेच झारखंडमधील हेमंत सोरेन यांच्या जेएमएम, कॉंग्रेस आणि आरजेडी युती सरकारला पाडण्याच्या कटाच्या आरोपाखाली पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. कॉंग्रेसचे बर्मोचे आमदार कुमार जयमंगल यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी रांचीच्या कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर दोन दिवसांनी अभिषेक दुबे, अमित सिंग आणि निवरण प्रसाद महतो यांना अटक करण्यात आली.
या तिघांवर आयपीसी कलम ४१९ (गुन्हेगारी कट रचणे), ४२० (फसवणूक), १२४ ए (देशद्रोह), १२० बी (गुन्हेगारी कट रचणे) आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातील तरतुदींखाली गुन्हा दाखल झाला आहे.
पण, या प्रकरणात अनेक समस्या आहेत. झारखंडची राजधानी रांची येथील एका हॉटेलमधून पोलिसांनी तीन जणांना पकडल्याचा दावा केलाय. परंतु अटक केलेल्यांपैकी एकाच्या नातेवाईकाने आरोप केलाय की पोलिसांनी त्यांना घरूनच अटक केलीय. मीडिया रिपोर्टनुसार, पोलिसांनी अटक केलेल्या लोकांपैकी एक फळांचा गाडा चालवतो, तर दुसरा कंत्राटी कामगार असून तिसरा कंत्राटी काम घेतो.
आता अशा परिस्थितीत हेमंत सोरेन यांच्या सरकारला पाडण्यासाठी खरोखरच एखादा कट रचला जात आहे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
आता या संपूर्ण प्रकरणावर विरोधी पक्ष म्हणजेच भाजप स्वत: एसआयटी चौकशीची मागणी करत आहे. भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की,
हेमंत सरकार महाराष्ट्रातल्या वाझे प्रकरणाच्या धर्तीवर पोलिसांना पैसे कमावण्यासाठी कठपुतळी बनवून कारवाई करीत आहे. हायकोर्टाच्या न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करून चौकशी करावी अशी मागणी मरांडी यांनी केली आहे.
या प्रकरणात आता महाराष्ट्राचं कनेक्शन असल्याचा दावाही केला जात आहे.
असा दावा केला जात आहे की महाराष्ट्रातील दोन भाजप आमदारांनी झारखंडच्या कॉंग्रेसच्या आमदारांना एक कोटी रुपयांच्या ऑफर दिल्या आहेत. झारखंड पोलिसांचा हवाला देत मीडिया रिपोर्टमध्ये असा दावा केला जात आहे की, अटक करण्यात आलेल्या आरोपींनी पोलिसांना सांगितलय कॉंग्रेसचे आमदार डॉ. इरफान अन्सारी, उमाशंकर अकेला आणि अपक्ष आमदार अमित कुमार यादव अमित सिंह, निवरण महतो आणि अभिषेक दुबे आमदार दिल्लीला गेले होते.
अभिषेक दुबे यांची कॉंग्रेसच्या ११ आमदारांशी डील सुरु होती, असा पोलिसांचा दावा आहे. त्यांना एक कोटी रुपये अॅडव्हान्स देण्याची चर्चा सुरु होती. दिल्ली विमानतळावरून जय कुमार नावाच्या व्यक्तीने तिन्ही आमदारांचे स्वागत केले. आमदार अमित कुमार यादव यांचे तिकिटही जय कुमार नावाच्या व्यक्तीने रांचीहून दिल्लीला जाण्यासाठी पाठवले होते.
जय कुमार महाराष्ट्र भाजपच्या आमदाराचे पुतणे आहेत.
२०१९ च्या विधानसभा निवडणुका जिंकल्यानंतर हेमंत सोरेन पुन्हा सत्तेत आले. जेएमएम, कॉंग्रेस आणि आरजेडी यांनी एकत्र निवडणुका लढवल्या. ज्यामध्ये ग्रँड अलायन्सने ८१ पैकी ४७ जागा जिंकल्या. जेएमएमच्या खात्यात ३० जागा होत्या, कॉंग्रेसने १५ जागा जिंकल्या आणि आरजेडीला फक्त एक जागा जिंकता आली. तर भाजप २५ जागांसह दुसरा सर्वात मोठा पक्ष होता.
अशा परिस्थितीत आकडेवारीवर नजर टाकली तर महागठबंधन सरकार धोक्यात असल्याचे दिसून येत नाही. परंतु कॉंग्रेस आणि जेएमएमच्या काही आमदारांच्या नाराजीची बातमी दररोज सरकार पडण्याच्या बातमीला हवा देत असते. मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याबद्दल जेएमएमचे काही आमदार संतापले, परंतु ही नाराजी उघडकीस कधी दिसली नाही.
दुसरीकडे, सरकार पाडण्यासाठी भाजपला १६ आमदारांची गरज भासणार आहे. जे याक्षणी घडताना दिसत नाही.
हे हि वाच भिडू
- मिळुनी सात जणी! मोदींच्या कॅबिनेट मध्ये सात महिलांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतलीय
- कोरोना लसीच्या मागणीसाठी जगन रेड्डी देशभरातल्या मुख्यमंत्र्यांचा एक आवाज बनू पाहताहेत..
- झारखंड राज्याने आदिवासींसाठी बनवलेला धर्म कोड बिल काय आहे?