कोल्हापूरच्या पैलवानाने बाहेरच्या देशातून पदक आणल्याशिवाय मी डोक्यावर फेटा बांधणार नाही..

कुस्ती म्हटलं की पैलवानांची एकमेकांच्या अंगाशी झुंज, शड्डू ठोकल्याचा मैदान दणाणून सोडणारा आवाज आणि महत्वाचं म्हणजे बेंबीच्या देठापासून ओरडत प्रोत्साहन देणारे प्रेक्षक.

एकूणच काय तर, महाराष्ट्राच्या मातीतल्या खेळाचा कुस्ती हा आत्मा आहे.  

या कुस्तीला थोरले छत्रपती शाहू महाराज यांनी राजाश्रय दिला आणि महाराष्ट्राच्या मातीत कुस्ती रुजू लागली. पुढच्या काही दशकातच कुस्तीने मोठ्ठी उभारी घेतली. गावागावात पैलवान तयार होऊ लागले. लोकं कुटुंबातील एकातरी मुलाला पैलवान करायचं असं ठरवून, त्याला तालमीत पाठवू लागली.

असाच कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या नगरीत, लाल मातीत कसलेला एक अजिंक्य योद्धा होता . ज्याचा एकेकाळी संबंध हिंदुस्तानात दबदबा होता.

९० च्या दशकात महाराष्ट्राचं नाव सर्वदूर पोहचवणारा हा पैलवान गडी म्हणजे आप्पालाल शेख होते. ज्यांनी १९९१ चे राष्ट्रकुल सुवर्णपदक आणि १९९२ ची महाराष्ट्र केसरीची गदा खांद्यावर घेतली होती. हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे आणि महमंद हनीफ, वस्ताद मुकुंद करजगार यांच्या मार्गदर्शनाखाली शाहुपुरी तालीमत तयार झालेल्या हा अजिंक्य योद्धा.

या योध्याने आपल्या भावाची आर्त साद ऐकून कोल्हापूर महापौर केसरी कुस्ती स्पर्धेची गदा आपल्या खांद्यावर घेतली होती. 

तर १९८१ सालात कोल्हापूरच्या खासबागला ‘कोल्हापूर महापौर केसरी कुस्ती स्पर्धांचं आयटोजन करण्यात आलं होत. या स्पर्धेसाठी अंतिम कुस्ती ही मोतीबाग तालमीचे पैलवान दत्ताजी शिंदे विरुद्ध शाहुपुरी तालमीचे आप्पालाल शेख अशी लागली.

शेवटचा एक मिनिट राहिला असता दत्ताजी शिंदे यांनी तीन गुण मिळवले. ही कुस्ती बघण्यासाठी आप्पालाल यांचे मोठे बंधू पैलवान इस्माईल शेख आले होते. १३५ किलो वजनाचे दत्ताजी शिंदे हे आप्पालाल यांना भारी पडायला लागले. तेवढ्यात एक मिनीट शिल्लक असलेला दिसला आणि  ईस्माईल शेख यांनी आरोळी ठोकली,

आप्पा कुस्ती कशी करतोयस. नीट डाव टाक नाहीतर तर रेल्वेखाली उडी मारुन जीव देईन.

हे शब्द कानी पडताच आप्पाच्या अंगात दहा हत्तीचं बळ शिरलं. जेवढा राग होता तो बाहेर काढून   करुन बाजी मारली भावाचा शब्द पूर्ण केला. आणि महापौर गदा आपल्या खांद्यावर घेतली.

आणि आप्पालाल शेख यांच्या हातून राजे विक्रमसिंह घाटगे यांना फेटा बांधला.

असचं १९९१ साली न्यूझीलंड येथे झालेल्या राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत आप्पालाल यांनी भारतासाठी सुवर्ण पदक जिंकले होते. पण ते जिंकण्याआधी एक किस्सा घडला होता.

तर त्यावेळचे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदचे सचिव बाळासाहेब लांडगे हे काही कामानिमित्त कोल्हापूरला आले होते. त्यावेळी कुस्तीगिरांचे आश्रयदाते महादेवराव महाडिक यांना ते भेटले. बोलता बोलता लांडगे महाडिकांना म्हणाले, आज आपल्या महाराष्ट्राचा संघ दिल्लीला जाणार आहे. आणि मी पण उद्या विमानाने दिल्लीला जाणार आहे.

लागलीच महादेवराव महाडिक म्हणाले, आमचा एक पैलवान तुमच्या सोबत विमानाने घेऊन जा. तेव्हा आप्पालाल शेखना बोलवून महाडिकांनी विचारल, विमानात कधी बसला आहेस का ? त्यावर  आप्पालाल नाही म्हणाले. पुढं महाडिक म्हणाले,

तू उद्या विमानाने चाचणीसाठी सरांच्या सोबत जायचं आणि पदक घेतल्याशिवाय कोल्हापूरला यायचं नाही.

त्याचवेळी कुस्तीगिराचे आश्रयदाते विक्रमसिंह घाडगे यांनी मनाशी निश्चय केला होता की,कोल्हापूरच्या पैलवानाने बाहेरच्या देशातून पदक आणल्याशिवाय मी डोक्यावर फेटा बांधणार नाही.

यावर अप्पालाल शेख यांनी परदेशी मल्लांना चारी मुंड्या चीत करुन न्यूझीलंडवरून पदक आणले. त्यावेळी ताराराणी चौकातून त्यांची मिरवणूक काढण्यात आली. आणि आप्पालाल शेख यांच्याच हस्ते राजे विक्रमसिंह घाटगे यांना फेटा बांधण्यात आला.

या मोठ्या यशानंतर देखील त्यांना महाराष्ट्र केसरीचे विजेतेपद खुनावत होते. आपल्या भावाप्रमाणे आपण ही महाराष्ट्र केसरीची गदा जिंकावी असे स्वप्न बाळगुन त्यांनी जोरात तयारी केली आणि १९९२ साली महाराष्ट्र केसरीची गदा त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली.

महाराष्ट्रात अनेक कुस्तीसाठी वाहिलेली अनेक घराणी आहेत. त्यामध्ये काहीजणांनी डबल महाराष्ट्र केसरी, पिता-पुत्र, भाऊ तसेच नातेवाईक असे दोघेजण महाराष्ट्र केसरी आहेत. पण राज्यात एकाच कुटुंबातील तीन महाराष्ट्र केसरी असलेले आप्पालाल शेख यांचे एकमेव घराणे. बंधू इस्माईल हे १९८० मध्ये, आप्पालाल १९९२ मध्ये, तर २००२ साली त्यांचे पुतणे मुन्नालाल शेख हे महाराष्ट्र केसरी झाले.

आप्पालाल लंगोट लावुन आखाड्यात उतरले की चांगल्या चांगल्या मल्लांची धडकी भरायची. शड्डू ठोकुन प्रतिस्पर्धी मल्लाच्या मनगटाची पकड घेतली की त्या मल्लाला चित करुनच ते मैदान सोडायचे अशी त्यांची खासीयत होती. सध्या गौसपाक,अशपाक आणि अस्लम ही त्यांची मुल कुस्तीचा वारसा पुढे चालवत आहेत. वडीलांचं ऑलिम्पिकचं स्वप्न त्यांना पुर्ण करायचं आहे. आप्पालाल यांच्या जाण्यानं कोल्हापुरच्या तांबड्या मातीत तयार झालेला एक तारा निखळलाय.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.