हे वाचा…अन पुढच्या वेळेला “एलियन्स आले” म्हणून गावभर बोंबलू नका

काही दिवसांपूर्वी विदर्भातल्या लोकांना आकाशातून कोसळणारे फायर बॉल दिसले त्याला लोकांनी एलिएन्स असल्याचा समज करून घेतला.

आता हॉलिवूडचे पिक्चर पाहून एक बालिश गैरसमज आपण पक्का करून घेतलाय, आकाशात काहीही दिसलं कि त्याला एलिएन्स म्हणायचं, यात भर पडली कालच्या घटनेची. 

कोल्हापुरातला एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्या व्हिडीओत एक पांढरी शुभ्र तबकडी सदृश्य वस्तू आकाशातून उडताना दिसतेय. सलग दोन तास ही वस्तू पन्हाळा गडाच्या पश्चिमेकडून उत्तरेकडे स्लो मोशनमध्ये आकाशात उडत होती. आणि अचानक आकाशातच गायब झाली. 

झालं कोल्हापूरकरांनी कोल्हापुरात एलिएन्स आलेत अशी थेअरी मांडायला सुरुवात केली. ही वस्तू नेमकी काय आहे याचं कुतूहल तर होतंच शिवाय काही ठिकाणी भीतीचं वातावरण देखील होतं. पण काही काळाने त्या रहस्यामागचं सत्य समोर आलं. 

ते म्हणजे हे एलियन्स वैगेरे काही नसून गोवा हवामान खात्याने आकाशात सोडलेले फुगे होते. 

हवामान खात्याने हे फुगे का सोडले याचा आम्ही शोध घेतला तर खूप इंटरेस्टींग माहिती समोर आली. 

गोवा हवामान खात्यानं हवामानाचा अंदाज घेण्यासाठी जे फुगे आकाशात सोडले होते ते फुगे उडत उडत कोल्हापुरात पन्हाळ्यापर्यंत आले होते. 

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, हवामानाचा अंदाज घेण्यासाठी फुग्यांचा कसा काय उपयोग होतो ?

याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी बोल भिडूने हवामान शास्त्रज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांच्याशी चर्चा केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 

आपल्याला जमिनीवरच्या हवामानाची माहिती मिळवण्यासाठी तापमापकसारखे काही इंस्ट्रुमेंट्स असतात. मात्र हवेतील वेगवेगळ्या उंचीवरील हवामानाच्या नोंदी घ्यायच्या असतील तर आपल्याकडे सॅटेलाईट, रडार असतो मात्र रडारचं क्षेत्र एका मर्यादित कक्षेत असतं. म्हणून हवामान खात्यातर्फे आकाशात फुगे सोडले जातात.  

त्यात दोन प्रकारचे फुगे असतात. 

एक असा फुगा असतो ज्याला इंस्ट्रुमेंट्स बांधलेले असतात.. त्यात एक सिग्नल वापरलेला असतो. ट्रान्समीटर देखील जोडलेला असतो. हा फुगा एका ठराविक उंचीवर गेला कि, हवेचा दाब कमी होत जातो. वेगेवेगळ्या उंचीवर गेलं की यातले इंस्ट्रुमेंट्स, त्या -त्या उंचीवरचे तापमान किती आहे? हवामानातील आद्रता किती आहे? वाऱ्याचा वेग किती आहे ? वाऱ्याची दिशा काय आहे ? हे सगळे अपडेट्स त्या फुग्यातील ट्रान्समीटर खाली बसलेल्या हवामान खात्याला पाठवत असते.  

हे फुगे सकाळी ८:३० आणि सायंकाळी ५:३० या वेळेतच सोडले जातात. 

आता हीच वेळ का ठरवली गेली त्यामागचं कारण म्हणजे जागतिक हवामान संघटनेने काही नियम घालून दिलेत. जगभरातल्या प्रत्येक देशातील हवामानखात्याने याच वेळेत हवामान तपासून निरीक्षणे नोंदवायची. जेणेकरून या तपासण्या आणि निरीक्षणे मागे-पुढे होता कामा नये. 

आता फुगे आकाशात सोडल्यानंतर वाऱ्याचा वेग जास्त असतो म्हणून हे फुगे लांब-लांब पर्यंत देखील जाऊ शकतात. जसं गोव्यातल्या पणजीहून सोडलेले फुगे महाराष्ट्राच्या कोल्हापुरात सहज प्रवास करतात. 

आकाशात सोडला जाणारा हा फुगा साधारण फुग्यासारखा नसून ३० किमी उंचीवर जावा लागतो त्यासाठी स्पेशल फुगा बनवला जातो. जास्तीत जास्त वर जावा म्हणून त्या फुग्यात हायड्रोजन गॅस भरला जातो कारण तो हवेपेक्षा हलका असतो. 

हवेच्या वेगामुळे हे फुगे कधी कधी फुटतात आणि त्यातील इंस्ट्रुमेंट्स जमिनीवर पडतात. फुग्यात जे इंस्ट्रुमेंट्स असतात ते खूप महाग असतात, त्याची जवळपास १ ते २ लाखापर्यंत किंमत असते. ते इंस्ट्रुमेंट्स पुन्हा तपासणीसाठी वापरलेही जातात. 

पण जर गोव्यात सोडलेला फुगा महाराष्ट्रात कुठे तरी पडला असेल तर मग त्यातले इंस्ट्रुमेंट्स परत कसे मिळवायचे ? 

त्यासाठी  हवामान खातं काय करते ? त्या इंस्ट्रुमेंट्सवर एक चिट्ठी लावललेली असते. “हा फुगा किंव्हा इंस्ट्रुमेंट्स सापडले तर तुम्ही नजीकच्या पोलीस ठाण्यात सोपवा आणि त्याबद्दल तुम्हाला काही रक्कम बक्षिस म्हणून दिली जाईल”. 

पोलीस खातं ते इंस्ट्रुमेंट्स संबंधित हवामान खात्याला पाठवून देतात हा नियमच आहे. 

यातला दूसरा प्रकार म्हणजे साधारण फुगा.

मोठ्या आकाराचे साधे फुगे पुणे, औरंगाबाद इत्यादी सारख्या निवडक जिल्ह्यात सोडतात. त्याला इंस्ट्रुमेंट्स जोडलेले नसतात मात्र हे फुगे सोडल्यावर खाली एक दुर्बीण असते त्याला थेरो लाईट म्हणतात. त्या थेरोलाइ द्वारे फुगा कुठल्या दिशेने जातो हे निरीक्षण केलं जातं आणि गणितीय प्रक्रिया वापरून वाऱ्याची दिशा ठरवली जाते. मात्र यात तापमान आणि आद्रता मिळत नाही फक्त वाऱ्याची दिशा आणि वाऱ्याचा वेग समजू शकतो. 

जिथे जिथे इंटरनॅशनल विमानतळ आहेत, उदा. मुंबई, गोवा, कोचीन इत्यादी ठिकाणी या चाचणी होतात.

या फुग्यांद्वारे नोंदवलेले हवामानाचे निरीक्षणं कशासाठी उपयोगाला पडतात?

पावसाचा अंदाज येण्यासाठी तर याचा वापर होतोच शिवाय सर्वात महत्वाचं म्हणजे याच फुग्यांद्वारे मिळालेल्या माहितीनुसार इंटरनॅशनल फ्लाईट ठरवल्या जातात. म्हणून या फुग्यांद्वारे मिळालेली निरीक्षणे, हवामानाची माहिती या वैमानिकांना देणं बंधनकारक असतं. 

उदा. मुंबईहून दुबईला जाणाऱ्या फ्लाईटच्या आधी त्या वैमानिकाला मुंबई आणि दुबईतील हवामान आणि त्या दोन्ही मधील मार्गातील हवामानाची आधीच माहिती मिळणं आवश्यक असते. 

यातला दुसरा फुगा म्हणजे,

इतर काही निवडक जिल्ह्यात जसं कि, पुणे, औरंगाबाद इत्यादी जिल्ह्यात साधे फुगे सोडतात. त्याला इंस्ट्रुमेंट्स जोडलेले नसतात मात्र हे फुगे सोडल्यावर खाली एक दुर्बीण असते त्याला थेरो लाईट म्हणतात. त्या थेरोलाइट द्वारे बघता येते कि फुगा कुठल्या दिशेने जातो हे निरीक्षण केलं जातं आणि गणितीय प्रक्रिया वापरून वाऱ्याची दिशा ठरवली जाते. 

मात्र यात तापमान आणि आद्रता मिळत नाही फक्त वाऱ्याची दिशा समजू शकते. 

ही सगळी माहिती वाचून तुमच्या ज्ञानात भर पडलीच असेल, आता इथून पुढे एक गोष्ट धान्यात घ्या.. आकाशात अशा प्रकारच्या काही कृती दिसलीच तर लग्गेच “एलियन्स आले” म्हणून अफवा पसरवू नका म्हणजे झालं.

हे ही वाच भिडू :

 

  

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.