महाराष्ट्रात MIM कशी घुसली..?

१९ ऑक्टोंबर २०१४ साली लागलेले निकाल धक्कादायक होते. कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या राजकारण्यासाठी जितके ते धक्कादायक होते तितकेच ते सत्तेत आलेल्या युती आणि विशेषत: भाजप सरकारला देखील धक्कादायक ठरले. सेना भाजप कॉंग्रेस राष्ट्रवादी असा हा चौरंगी सामना झाला. नाही म्हणायला मोदी लाटेमुळे आघाडीच्या नेत्यांना पुर्वकल्पना आलीच होती.

सामना चौरंगी झाला. २००९ च्या इलेक्शनमध्ये १३ जागा मिळवणाऱ्या मनसेचा देखील या निवडणुकीत धुव्वा उडाला. नाही म्हणायला एक जागा आली ती पण व्यक्तिगत करिष्म्यावर.

पण या निकालात सर्वात महत्वाच काय होतं…

MIM च्या दोन जागा

MIM पक्षाने महाराष्ट्राच्या विधानसभेत पहिल्यांदा प्रवेश मिळवला. त्या दिवशी भारतीय जनता पक्षाच्या भल्यामोठ्या विजयात या दोन जागा झाकोळून गेल्या असल्या तरी राजकीय विश्लेषकांनी या प्रवेशाकडे दुर्लक्ष केलं नाही. काही माध्यमातून जणू काही दहशतवादीच घुसल्याप्रमाणे वर्णन या प्रवेशाचं वर्णन करण्यात आलं. MIM तसा महाराष्ट्रात यापुर्वी चर्चेत आला तो छोट्या ओवेसींच्या प्रशोभक व्हिडीओ क्लिपमुळे.

पण आत्ता महाराष्ट्रात MIM ला वेगळी ओळख मिळण्याची चिन्ह होती.  काल वंचित सोबत लढणारी MIM आज वंचितला जागेवरुन आव्हान देते हे पाहून नक्कीच म्हणता येईल की आज महाराष्ट्रातल्या MIM ने वेगळी ओळख निर्माण केलेय.

महाराष्ट्रात MIM चा प्रवेश नक्की कधी झाला यापुर्वी आपण MIM चा इतिहास पाहूया..

भारताला स्वातंत्र मिळायच्या अगोदरच नाव मजलिस ए इत्तेहाद उल मुसलमीन. काम काय तर निझामाला खूष करणं. निझामाच्या छत्रेछायेखाली वाढणारी संघटना. पुढे या संघटनेत कासीम रिझवी आला, त्यानेच वातावरण विखारी बनवलं. निझाम बाजूला राहिला आणि या रिझवीच्या रझाकारांनी हिंदू धर्मीयांचे अत्याचार करण्यास सुरवात केली. त्याने भारत सरकारला धमक्या द्यायला सुरवात केली. हैद्राबाद संस्थान भारतात विलीन करु नये म्हणून भारतासोबत युद्ध करायची त्याची तयारी होती.

हैद्राबाद संस्थानावर पोलीस कारवाई झाली. रिझवीला अटक करण्यात आली तर मजलिस ए इत्तेहाद उल मुसलमीनवर बंदी घालण्यात आली. पुढे पाकिस्तानला जाण्याच्या अटीवर रिझवीची सुटका करण्यात आली. तो पाकिस्तानात गेला पण विष पेरून.

रिझवीने काय केलं तर जाता जाता मजलिस ए इत्तेहाद उल मुसलमीनचं संघटनेच काम कुणीतरी सुरू ठेवावं म्हणून मिटींग घेतली. त्या बैठकीला कोण फिरकलच नाही, पण एक माणूस आला. त्याने हि जबाबदारी घेतली.

त्याच नाव अब्दुल वाहिद ओवेसी.

आजच्या असदुद्दिन ओवेसी आणि अकबर ओवेसीचे आजोबा. औवेसीच मुळ गाव लातूरजवळच औसा.  सल्लाउदिन हे औस्याचे तर कासिम रिझवी हा लातूरचा.

मजलिस ए इत्तेहाद उल मुसलमीन ने नवीन नाव घेतलं नवीन नावं म्हणजे नावाच्या पुढे फक्त ऑल इंडिया लागलं. त्याचा शॉटफॉर्म A.I.M.I.M पण लोकांसाठी उल्लेख करताना आजही ती नुसती MIM असेल, तिथे ऑल इंडिया नावाचा शब्द रुळलाच नाही.

पुढे काय झालं तर MIM ने १९६० मध्ये पहिल्यांदा महानगरपालिका लढवली, पुढे विधानसभा लढली, चारमिनार हा मतदारसंघ कायम केला.  सलाहुद्दीन ओवेसी १९८४ साली पहिल्यांदा खासदार राहिले ते २००४ अखेर सलग निवडून आल. २००४ पासून असुउद्दीन ओवेसी हे त्यांचे पुत्र सलग खासदार म्हणून निवडून आले.

आत्ता हा इतिहास का सांगायला लागतो तर फक्त इतकच सांगायला की MIM वर निरंकुश सत्ता फक्त ओवेसी कुटूंबाची आहे. बर पक्ष फोडून अंतर्गत बंडाळ्या करुन देखील त्यांनी ती मिळवली नाही तर कासीम रिझवीच्या पाकिस्तानात जाण्यानंतर त्यांनी पक्षाची जबाबदारी घेवून हा पक्ष वाढवला आहे.

भारताच्या प्रत्येक भागात कमीजास्त फरकाने MIM आहेच.

२०१२ साली नांदेड महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये MIM ने आपले उमेदवार उभा केले. या इलेक्शनमध्ये ४१ जागांपैकी ११ जागांवर विजय मिळवला. त्यावेळी सत्तेत असणाऱ्या कॉंग्रेस पक्षाने या विजयाचे वर्णन तात्पुरती आलेली भरतीची लाट असे केले. MIM च्या प्रवेशाकडे, एका राजकिय पक्षाच्या कामगिरीबद्दल विरोधक म्हणून उहापोह न करता MIM वरती टिका करुन दुर्लक्ष करण्याचं धोरण कॉंग्रेसने स्वीकारल.

यानंतरचा काळ येतो तो थेट २०१४ च्या विधानसभा इलेक्शनचा या दरम्यान ओवेसींना औरंगाबादमध्ये व्यासपीठ मिळालं होतं. MIM ने २०१४ च्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये २४ उमेदवार उभा केले होते. पैकी त्यांचे दोन उमेदवार विजयी झाले तर ३ जागांवर ते दूसऱ्या क्रमांकावर राहिले. ९ जागांवर ते तिसऱ्या क्रमांकावर होते. पराभूत होणाऱ्या उमेदवारांचा आकडा काढला तर तो खूपच कमी असल्याचं दिसून येतं. म्हणजे २४ पैकी १४ जागांवर ते पहिल्या तीन मध्ये होते.

२१ ऑक्टोंबर २०१४ रोजी इंडियन एक्सप्रेसमध्ये सांगितलेल्या आकडेवारीनुसार २००९ मध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने उभा केलेल्या मुस्लीम उमेदवारांना मुस्लीम समाजाची ७० टक्याहून अधिक मते पडली होती तर २०१४ च्या निवडणुकीत  हा टक्का ५० टक्यांवर घसरला, २०१४ च्या इलेक्शनमध्ये मुस्लीम उमेदवारांना मुस्लीम समाजाच्या पडलेल्या मतांची आकडेवारी २१ टक्के असल्याच या बातमीत सांगण्यात येतं.

मुस्लीम बहुल भागात MIM ने चांगलीच मुसंडी घेतली. त्यांची मशागत ३० टक्के भाग मुस्लीम लोकसंख्या असणाऱ्या नांदेडपासून करण्यात आली.

पण लोकांना मुख्य प्रश्न पडतो तो म्हणजे महाराष्ट्रात MIM कशी रुजली.

विश्लेषक त्याच कारण कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या पुरोगामी धोरणात आणि उजव्या पक्षांच्या हिंदूत्ववादी धोरणात असल्याचं सांगतात. सातत्याने आघाडी शासन सत्तेत आहे, तरिही गुजरातहून अधिक मुस्लीम मुले कारागृहात आहेत. त्यांच्यावर खोटे आरोप करुन ते तुरूंगात खितपत पडतात असे गृहितक MIM सारख्या पक्षाकडून पुढे करण्यात आले. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी मुस्लीम समाजाची संख्या जास्त आहे अशा ठिकाणी या पक्षास पाठिंबा मिळत गेला.

दूसरी महत्वाची गोष्ट अशी सांगितली जाते की,

मुस्लीम समाजाचं इतक्या वर्षात स्वतंत्र अस नसणारं नेतृत्व. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर मुस्लीम लोकसंख्या असून देखील मुस्लीम समाजाचे नेतृत्व तयार होवू शकलं नाही. आकडेवारी सांगते २००९ च्या विधानसभेत ११ आमदार मुस्लीम समाजाचे होते. पैकी ३ मंत्री होते. तरिही यापैकी कोणत्याच मंत्र्याकडे स्वतंत्र मुस्लीम समाजाचा नेता म्हणून मुस्लीम समाजातील तरुण पाहू शकत नव्हता. त्याचाच परिणाम म्हणजे मुस्लीम समाजातील तरुणांच्या राजकिय महत्वकांक्षा वाढत गेल्या. आपले राजकारण करणारा पक्ष असावा यातून MIM ला तरुणांची पसंती मिळत गेली.

यासाठी औरंगाबादचे उदाहरण पाहीले तर संपुर्ण महाराष्ट्रात MIM मार्फत कोणता दृष्टीकोन ठेवून राजकारण केले जावू शकते हे लक्षात येईल. 

बच्चा बच्चा मीम का, अकबरभाईके काम का…!

२००९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत देखील MIM ने आपले उमेदवार उभा केले होते. पण त्यांची अनामद रक्कम देखील जप्त झाली २०१४ च्या इलेक्शनमध्ये व्यापक ओवेसींनी चांगले चेहरे देण्याचा प्रयत्न केला.

औरंगाबाद मध्य मतदारसंघ हा सेनच्या स्थापनेपासून सेनेकडे राहिला होता. मात्र २००९ च्या स्थानिक राजकारणात सेनेचे तिकीट विकास जैन यांना मिळाले. प्रदिप जैस्वाल अपक्ष उभा राहिले आणि निवडून आले. जैस्वाल परत सेनेत आले. २०१४ च्या निवडणुकीत प्रदिप जैस्वाल यांना तिकीट देण्यात आले. त्यामुळे नाराज झालेले किशनचंद तणवाणी आणि जैस्वाल असे हिंदू मतांचे विभागीकरण झाले. यामध्ये MIM च्या इम्तियाज जलील यांचे पारडे जड झाले आणि ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले.

औरंगाबाद मध्य मधून राष्ट्रवादीकडून इच्छुक असणाऱ्या डॉ. गफ्फार कादरी यांना पूर्व मधून MIM ने उमेदवारी दिली ते दूसऱ्या क्रमांकावर राहिले. मतमोजणीच्या एकूण १९ फेऱ्या झाल्या त्यामध्ये डॉ. कादरी पहिलाय आठ फेऱ्यात ३८ हजार मतांनी लीडवर होते.

MIM ला दूसरी जागा मिळाली ती भायखळ्याची.

भायखळ्यातून MIM च्या तिकीटावर अॅड वारिस पठाण १३५७ मतांनी विजयी झाले. भाजपतर्फे मधू चव्हाण तर कॉंग्रेसतर्फे मधूकर चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली होती. नावसाधर्म्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचं सांगण्यात येत असलं तरी इथे असणारी मुस्लीम समाजाचे ४३ टक्के मतदान हे अॅड. वारिस पठाण यांच्या विजयाचे मुख्य कारण बनले.

MIM दोन आमदारांमुळे महाराष्ट्रात फोकसमध्ये आली. मात्र त्यामध्ये सर्वाधिक जादू चाचली ती इम्तियाज जलील यांची. इम्तियाज जलिल नुकतेच खासदार झाले. कट्टर मुस्लीम तरुणांच्या बाहेर MIM घेवून जाणारे नेते म्हणून त्यांची ओळख प्रस्थापित होत आहे. पहिल्या पाच वर्षात MIM म्हणजे भिती हे हिंदू मतदारांवर प्रभाव टाकणारे अस्त्र इम्तियाज जलील यांच्यामुळे पुसण्याची देखील चिन्ह निर्माण होत आहे.

प्रकाश आंबेडकरांनी इम्तियाज जलील यांच्यावर केलेली टिका आणि ओवेसींनी इम्तियाज जलील यांची केलेली पाठराखण यातून इम्तियाज जलीलच महाराष्ट्रातल्या MIM चे नेतृत्व असणार आहेत यात कोणतीच शंका नाही.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.