महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या शिलालेखाचे हे रहस्य तुम्हाला माहित आहे का..?

2000 वर्षांपूर्वी व्यापार करण्यासाठी नाणेघाट येथे हा मार्ग ‘खोदून’ तयार करण्यात आला. त्याकाळातील Nation highway जरी म्हणले तरी वावग ठरणार नाही.

पतीच्या निधनानंतर सक्षमपणे राज्य चालवणाऱ्या सम्राज्ञी नागणिकाचे कर्तृत्व म्हणजे नाणेघाट येथील गुहेत कोरलेला शिलालेख.

एवढंच नव्हे, तर सातवाहन राजा-राणी, युवराज यांचे पुतळेही या लेणीत कोरले होते, अगदी त्यांच्या नावासकट, आज मात्र त्यांच्या पायांचा काही भागच आपल्याला दिसतो.

या शिलालेखाचे ऐतिहासिकदृष्ट्या महत्व सर्वात प्रथम उजेडात आणले साइक्स यांनी.

1833 साली मुंबई येथे असणाऱ्या ‘Bombay Literary Society’ मध्ये त्यांनी या शिलालेखाविषय आपला शोधनिबंध सादर केला. खरेतर त्यांना हा शिलालेख वाचता आला नव्हता. तसेच नाणेघाट येथे असणारी लेणी ही ‘बुद्ध लेणी’ आहे असे त्यांनी मत मांडले.

पुढे, सन 1837 साली साइक्स यांनी जॉन माल्कम यांच्यासोबत रॉयल एशियाटिक सोसायटीच्या जर्नलमध्ये ‘ Insciption from Boodh caves near Joonar’ या सदराखाली शोधनिबंध प्रकाशित केला.या शोधनिबंधामुळे जेम्स प्रिन्सेप याचे लक्ष नाणेघाटकडे वळाले. साइक्स यांनी काही अक्षरांचा छाप घेतला होता, तो प्रिन्सेपला पाठवून दिला. तेव्हा समजले सदरील शिलालेख हा ब्राम्ही लिपीतील आहे.

पुढे, सन 1883 साली जेव्हा जेम्स बर्गेस यांनी ‘Report on the Elura cave temple and Bramhanical & Jain caves’ हा रिपोर्ट प्रकाशित केला तेव्हा त्यामध्ये जॉर्ज बुल्हर यांनी सर्वप्रथम संपूर्ण शिलालेखाचे वाचन केले.

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे,

सदरील लेणी ही हिंदू असल्याचे मत त्यांनीच सर्वप्रथम लिखित स्वरूपात मांडले. ‘पश्चिम भारतातील सर्वात महत्वाचा लेख’ या शब्दात नाणेघाटाच्या शिलालेखाचे महत्व त्यांनी अधोरेखित केले.

डाव्या बाजूच्या भिंतीवर दहा तसेच उजव्या बाजूच्या भिंतीवर दहा ओळी.. मधल्या बाजूला सातवाहन राजवंशातील नऊ महत्वाच्या व्यक्तींचे पुतळे..त्यांची ओळख करून देण्यासाठी कोरण्यात आलेले शिलालेख..सर्वकाही अद्भुत आहे. या नागणिका राणीचा उल्लेख शिलालेखात ‘नाग वरदायिनी’,’मासोपवासिनी’,’गृहतापसी’,’चरित ब्रम्हचार्या’ या गौरवपर शब्दांनी केला आहे.

या शिलालेखाचे काही वैशिष्ट्ये आहेत :

शिलालेखाच्या सुरुवातीस धर्म,इंद्र,संकर्षण,वासुदेव,चंद्र,सूर्य,दिक्पाल,वरून,यम,कुबेर या देवांचा उल्लेख आढळतो. एवढ्या संख्येने देवांचा उल्लेख असणारा हा सर्वात प्राचीन शिलालेख.

अशोकाच्या शिलालेखानंतर याच शिलालेखामध्ये फार मोठ्या प्रमाणात संख्यांचा वापर करण्यात आला. १,२,६,७,१०,१२,१७,१००,२००,४००,७००,१०००,४०००,६००० एवढेच नव्हे तर १० हजार आणि २० हजार ह्या संख्याही इथे आढळून येतात. (थोडक्यात काय तर ज्याला ब्राम्ही शिकायची आहे त्यासाठी नाणेघाट सर्वोत्तम शिलालेख.मी स्वतः इथेच ब्राम्ही खऱ्या अर्थाने शिकलो आणि पुढे बऱ्याचजणांना इथे ब्राम्हीही शिकवली..त्यांना समजण्यासही सोपी गेली.या शिलालेखाचे ते वैशिष्ट्य आहे.)

महाराष्ट्राच्या तत्कालीन परिस्थितीवर प्रकाश पडतो. त्याचबरोबर प्राचीन काळी होत असणाऱ्या यज्ञविधींचेही उल्लेख या शिलालेखात आढळतात. या राजवंशाने अश्वमेध,राजसूय,अंगिरस अशा 15 यज्ञांचे आयोजन केले होते. पुष्कळ प्रमाणात दानधर्मही केला होता. एकप्रकारे हा लेख राणीचे जीवनचरित्र म्हणले तरी वावगे ठरणार नाही.

त्याचबरोबर, ‘कार्शापण’ आणि ‘प्रसर्पक’ या नाण्यांचा लिखित स्वरूपातील हा पहिला पुरावा..

‘सिमुक सातवाहन’ ‘सिरी सातकर्णी’ आणि ‘देवी नागणिका’ यांच्यासहीत परिवारातील इतर सहा महत्वाच्या व्यक्ती,असे एकूण नऊ व्यक्तींचे पुतळे आता नष्ट झाले आहेत. जर आज ते अस्तित्वात असते, तर बहुदा सातवाहन राजवंशातील महत्वाच्या व्यक्तींना आपण ‘याची देही याची डोळा पाहू शकलो असतो.

एकूणच काय,तर नाणेघाटाच्या शिलालेखातून बऱ्याच चकित करणाऱ्या गोष्टी सहजतेने उलगडत जातात आणि त्याचे सर्वस्वी श्रेय जॉर्ज बुल्हर, भगवानलाल इंद्रजी, वा.वि.मिराशी, दिनेशचंद्र सरकार आणि शोभना गोखले यांनाच..

  •  केतन पुरी

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.