तामिळनाडू आत्ता चर्चा करतायेत पण पंढरपुरच्या मंदिरात २०१४ पासूनच महिला पुजारी नेमल्या आहेत

अलीकडेच तामिळनाडू सरकारने एक ऐतिहासिक निर्णय जाहीर केला कि, पुढील १०० दिवसांमध्ये इच्छुक महिलांना मंदिरांमध्ये पुजारी म्हणून नियुक्त केले जाईल. या महिलांना धर्मादाय सहाय्य विभागातर्फे प्रशिक्षण दिले जाणार आहे. आता हा मुद्दा वेगळा कि, तामिळनाडूच्या या निर्णयाला तेथील लोकांनी मात्र विरोध केला आहे.

याबद्दलचा मद्रास उच्च न्यायालयाच्या २००८ चा एक निकाल महत्वाचा ठरतो.

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, २००६ मध्ये मद्रासमधील मदुराई मंदिरातल्या पुजाऱ्याचे निधन झाल्यानंतर त्याच्या मुलीने पुढे हा वारसा चालवण्याचे ठरवले परंतु त्याला गावकऱ्यांनी विरोध केला. त्यानंतर मुलीने मद्रास उच्च न्यायालयाने याचिका दाखल केली. कोणताही कायदा महिलांना मंदिरात पुजारी होण्यापासून रोखत नाही, ज्या मंदिराबद्दल बोलले जातेय त्या मंदिरात देवीचा पुतळा असून तिथे  एका महिलेला पुजारी होण्यापासून रोखले जात आहे हे अगदी विरोधाभासी आहे, असे म्हणत कोर्टाने त्या मुलीला मंदिरात पूजा करण्याचे अधिकार दिले होते.

तामिळनाडू सरकारने फक्त निर्णय घेतला त्याची अंमलबजावणी अजून बाकीच आहे, परंतु अशा प्रकारचा निर्णय पुरोगामी महाराष्ट्राने केंव्हाच घेतला होता.

१५ जानेवारी २०१४ मध्ये सुप्रीम कोर्टाने दिलेल्या ऐतिहासिक निर्णयानुसार पंढरपूर मंदिर समितीने विठ्ठलाची पूजा करण्यासाठी बहुजन समाजातील पुजारी व रुक्मिणीदेवीच्या पूजेसाठी महिला पुजारी नियुक्त करण्याची परवानगी दिली होती.

इतिहासात प्रथमच पंढरपूरच्या विठ्ठलाची पूजा बहुजन समाजातील पुजाऱ्याने तर रुक्मिणीदेवीची पूजा महिला पुजाऱ्याने केली होती.

याबाबतीत पंढरपूर मंदिराचे पुजारी अभिजित कुलकर्णी यांनी बोल भिडूशी बोलतांना सांगितले कि,

“न्यायालयाने आदेश दिल्यानंतर मंडळ समितीने मंदिरातील बडवे, उत्पात, सेवाधारी यांचे अधिकार संपुष्टात आणले आणि मग मंदिर समितीने सर्व जाती-जमाती आणि महिला पुजाऱ्यांची नियुक्ती केली. फक्त नियुक्ती केली नाही तर, या नवीन पुजाऱ्यांकडून मंदिरातील पूजेस सुरुवात केली होती. या १० पुजाऱ्यामध्ये माझाही समावेश होता”.

तर या १० पुजाऱ्यामध्ये २ महिला पुजारी होत्या त्या म्हणजे, परिमला भाटे आणि हेमा नंदकुमार अष्टेकर.

हा निर्णय झाला २०१४ मध्ये परंतु आजही तिथे त्या महिला पुजारी कार्यरत आहेत , याबाबतीत आम्ही पंढरपूर मंदिराच्या महिला पुजारी हेमा अष्टेकर यांच्याशी चर्चा केली असतांना त्यांनी सांगितले कि,

“माझ्यासोबत नियुक्त झालेल्या परिमला भाटे या अलीकडेच पुजारी पदावरून निवृत्त झाल्यात आणि  मी अजून कार्यरत आहे.  रुख्मिणी माईची रोज पहाटची नित्यपूजा, दुपारचा महानैवेद्यची जबाबदारी मीच सांभाळते, माझी पहाटे ४ वाजल्यापासून ते दुपारी २ पर्यंतची शिफ्ट असते. एवढ्या पवित्र पंढरपुराच्या  मंदिरात महिला पुजारी होण्याचा मान मला मिळाला याबद्दल खूप धन्यता वाटते”.

महाराष्ट्राला पुरोगामी म्हणलं जातं ते अशाच धाडसी निर्णयामुळे !

भाटे या पुरोहितपदावरून जरी निवृत्त झाल्या तरी त्यांच्या जागेवर दुसऱ्या महिला पुजारीचा मंडळ समितीने अद्याप विचार केला नाही कारण कोरोनामुळे आता भाविकांची जास्त गर्दी नसते त्यामुळे सध्या तरी त्याबाबत विचार केला नसल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच पंढरपूर मंदिराच्या बरोबरच २०१८ मध्ये कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरामध्ये सुद्धा सर्व जातीचे पुजारी नेमण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तेंव्हा पुजारीपदाची भरती करण्यात आली तेंव्हा ५५ पुजर्यांपैकी ६ महिला पुजारी होत्या. तसेच माहूर मधील रेणुकामातेच्या मंदिरात ५० टक्के महिला पुजारी हव्यात, अशी मागणीही मंदिर विश्‍वस्तांकडे करण्यात आली आहे. लवकरात लवकर हि मागणी देखील पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

तसेच उत्‍तराखंड मध्ये असणाऱ्या फ्यूंलानारायण येथील मंदिरात सुरुवातीपासूनच असा नियम आहे कि, दर वर्षी पुरुष पुजाऱ्याची नियुक्ती करतांना एका महिला पुजारी ची नियुक्ती केलीच जाते.

मात्र हे मोजके अपवाद वगळता देशभरात काही ठिकाणी या महिला पुरोहित नेमण्यावर वाद होताना दिसत आहेत. महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर  १०० वर्षांपूर्वी मंदिरांमध्ये सर्व जातींचे पुजारी असावे, तसेच त्या पुजाऱ्यांना धार्मिक शिक्षण मिळावं, यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी वैदीक स्कूलची स्थापना केली होती.

छत्रपतींनी दूरदृष्टीने पुरोगामी विचारांची पायाभरणी केली. खूप वर्षानंतर का होईना शाहू महाराजांच्या प्रयत्नांना यश मिळालं हेच समाधानकारक आहे.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.