आणि महाराष्ट्राचे पंतप्रधानपद पुन्हा एकदा हुकले.

१ डिसेंबर १९८९, संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये जनता दलाचा नेता कोण असणार याची निवड सुरु होती. नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राजीव गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या तब्बल २१७ जागा कमी झाल्या होत्या. ते पंतप्रधानपदावरून पायउतार झाले होते.

याचाच अर्थ त्या दिवशी जनता दलाचा जो नेता निवडला जाईल तो पंतप्रधान बनणार होता.

या मिटिंगमध्ये काय घडत आहे याची संपूर्ण देशाला उत्सुकता होती. पण पत्रकारांना तिथे प्रवेश नव्हता. योगायोगाने रामबहादूर राय नावाचे एक वार्ताहर त्या दिवशी कुडता पायजमा घालून आले होते. दारावरच्या दरवानाने ते म्हणजे कोणी तरी समाजवादी नेते आहेत असं समजून आत प्रवेश दिला. रामबहादूर राय यांच्या मार्फत बाहेर उभ्या असलेल्या पत्रकारांना आतल्या खबऱ्या मिळू लागल्या होत्या.

जनता दलाच्या पंतप्रधानाची निवड करण्याचे अधिकार दिले होते त्यांच्या सर्वात जेष्ठ नेत्याकडे,

प्रा.मधु दंडवते.

मधु दंडवते म्हणजे १९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यापासून ते आणीबाणीपर्यंत प्रत्येक लढ्यात अग्रभागी असणारा समाजवादी कार्यकर्ता. या चळवळीच्या मुळे त्यांना अनेकदा जेलची हवा खावी लागली, पण मागे हटले नाहीत. ते मूळचे मुंबईच्या कॉलेजचे प्राध्यापक पण आयुष्य चळवळींसाठी वाहून घेतलं. पन्नास साठ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांच्यावर आरोपाचा एक डाग देखील उमटला नाही.

म्हणूनच जेव्हा मोरारजी देसाई यांचं पहिलं जनता सरकार आलं तेव्हा त्यांना रेल्वे मंत्रालय देण्यात आलं. त्यांच्याच कारकिर्दीत रेल्वेखात्याच्या आधुनिकतेची सुरवात झाली. दुसऱ्या वर्गाच्या लाकडी बाकड्याना बदलून पहिल्यांदाच कुशन्सवाले बाकडे करण्यात आले. कोकण रेल्वेच्या प्रोजेक्टचा पाया त्यांच्या प्रयत्नातूनच घातला गेला.

आजकालच्या राजकारणात  साधेपणा ही मिरवण्याची आणि मार्केटिंगची गोष्ट झाली आहे.  अशा वेळी आदर्शवादी मधूजींसाठी साधेपणा ही जगण्याची रीत होती. ते खासदार होते तेव्हा आणि भारताचे रेल्वेमंत्री अर्थमंत्री राहून गेले तेव्हासुद्धा त्यांच्या जवळ स्वतःची गाडी नव्हती.

त्यांच्या या साधेपणावर प्रेम करणारे लोक होते म्हणूनच अहमदनगर मध्ये जन्मलेला हा नेता तब्ब्ल वीस वर्षे कोकणातल्या राजापूर मधून एकहाती निवडून येत राहिला. अगदी इंदिरा गांधी राजीव गांधींना त्यांनी लोकसभेच्या विरोधी बाकांवरून अनेकदा खिंडीत पकडले.

दिल्लीच्या राजकारणात त्यांच्या शब्दाला मान होता आणि म्हणूनच १९८९ साली जनता दल जेव्हा सत्ता स्थापन करणार याची शक्यता निर्माण झाली तेव्हा पंतप्रधान निवडण्याची सगळी सूत्रं त्यांच्या हाती सोपवण्यात आली.

असं म्हणतात की या मागे त्यांचे नाव स्पर्धेतून कमी करावे हाच इतर नेत्यांचा हेतू होता. महाराष्ट्रात मात्र साध्या सरळमार्गी मधुजींनी पंतप्रधानपदासाठी प्रयत्न न केल्याबद्दल नाराजी पसरली.

१ डिसेंबरच्या त्या गाजलेल्या मीटिंगमध्ये मधु दंडवते यांनी हरियाणाचे शेतकरी नेते देवीलाल यांचं नाव जाहीर केलं. बाहेर उभ्या असलेल्या वार्ताहारांच्यात गडबड उडाली. त्यांनी गडबडीत आपल्या वृत्तसंस्थांकडे देवीलाल यांचं नाव पाठवून दिलं. पण दंडवतेंच्या नंतर देवीलाल बोलायला उभे राहिले. त्यांनी सांगितलं,

“चुनाव परिणाम राजीव गाँधी की सरकार के भष्टाचार के ख़िलाफ़ लड़ाई का नतीजा है और इसके सबसे बड़े पैरोकार वीपी सिंह हैं. हरियाणा में जहाँ लोग मुझे ताऊ कह कर पुकारते हैं, मैं वहाँ ताऊ बन कर ही रहना चाहता हूँ.”

पुन्हा वार्ताहर धावू लागले. किल द न्यूज! व्ही पी सिंग इज नेक्स्ट पीएम!!

ज्यांच्या हातात हि सत्तेची दोरी होती ते मधु दंडवते राजकारणाचा डाव प्रतिडाव न समजण्याइतके भोळे असल्यामुळे सर्वोच्च पदाची संधी असूनही लांबच राहिले. व्ही.पी.सिंग हे अगदी काही दिवसांपूर्वी काँग्रेसमध्ये असलेले नेते होते. बोफोर्सचा मुद्दा विरोधकांनी लावून धरल्यावर त्यांनी राजीव गांधींच्या विरुद्ध भ्रष्टाचाराचा आरोप करत काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती.

व्ही पी सिंग यांची राजा म्हणून उत्तर भारतात लोकप्रियता अफाट होती. मात्र जयप्रकाश नारायण यांच्या समाजवादी विचारांच्या जनता पक्षात व्ही.पी.सिंग यांचं नाव कार्यकर्त्यांना तितकस पसंद नव्हतं. त्यांच्या ऐवजी दंडवते यांनी पंतप्रधानपद स्वीकारावं अशी कित्येकांची अपेक्षा होती पण महत्वाकांक्षा नसलेल्या मधुजींनी तसे प्रयत्नच केले नाहीत.

या सगळ्यामागे पडद्याआडून खेळी करणाऱ्या अरुण नेहरूंचा मोठा हात होता.

पुढे भाजपचा पाठिंबा घेऊन व्ही पी सिंग पंतप्रधान बनले. देवीलाल यांना उपपंतप्रधान पद देण्यात आलं. मधु दंडवते या मंत्रिमंडळात अर्थमंत्री बनले. पण दुर्दैवाने हे सरकार फक्त एकच वर्ष टिकलं. रामरथ यात्रे ला अडवल्याच्या मुद्द्यावर भाजपने त्यांचा पाठिंबा काढून घेतला, त्यांच्या नंतर काँग्रेसची मदत घेऊन चंद्रशेखर पंतप्रधान बनले. हे सरकार देखील अल्पकालीन ठरलं.

१९९१ सालच्या निवडणुका आल्या. जनता दलामध्ये व्ही.पी.सिंग यांची लोकप्रियता उतरणीस लागली होती. राम मन्दिराच्या मुद्द्यावर भाजपचा वारू जोरात दौडू लागला होता. काँग्रेससुद्धा पुनरागमनाच्या तयारीत होती. पण ऐन प्रचारात राजीव गांधींची हत्या झाली.

निवडणुकीचे निकाल हाताने आले तेव्हा कोणालाच बहुमत मिळाले नाही. जनता दलाचा तर धुव्वा उडाला होता. अगदी कोकणात देखील मधु दंडवते यांचा पराभव झाला होता. नव्यानेच हिंदुत्वाची शाल पांघरलेल्या शिवसेनेने तिथे जोरदार मुसंडी मारली होती पण मत विभाजनाने काँग्रेसचे सुधीर सावंत निवडून आले होते.

त्रिशंकू सभागृह अस्तित्वात आले. राजीव गांधींच्या मृत्यूच्या सहानुभूतीच्या लाटेत काँग्रेसचे सर्वाधिक २४४ खासदार निवडून आले होते मात्र त्यांच्यात नेता कोण होणार याचीच भांडणे सुरु होती. भाजपला पाठिंबा देण्यास कोणी तयार नव्हतं. जनता दलाचे ६९ खासदार निवडून आले होते. डाव्या व इतर तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा घेऊन त्यांना सत्ता स्थापनेची संधी होती.

जनता दलाकडून पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून सर्वात जेष्ठ असलेल्या मधु दंडवते यांचं नाव पुढं आलं.

कट्टर समाजवादी विचारांच्या कार्यकर्त्याला इच्छा होती की मधुजींच्या सारखा स्वच्छ चारित्र्याचा व्यक्ती पंतप्रधानपदी बसावा. यावेळी त्यांच्या स्पर्धेत व्ही.पी.सिंग यांचं नाव देखील नव्हतं. सर्व तरुण नेत्यांनी मधु दंडवते यांची भेट घेऊन त्यांना पंतप्रधानपद स्वीकारावे अशी विनंती केली. 

पण आपल्या हक्काच्या मतदारसंघात झालेल्या पराभवामुळे दुखावलेल्या मधु दंडवते यांनी  ‘मागच्या दरवाजाने (राज्यसभा) जाऊन मी पंतप्रधान होऊ इच्छित नाही’ असे त्यांनी स्पष्ट केले.

त्या वेळी लालूप्रसाद यादव व अन्य नेत्यांनी त्यांना ‘बिहारमधला कोणताही मतदारसंघ निवडा, आम्ही तुम्हाला निवडून आणून लोकसभेवर पाठवतो’ अशी खात्री दिली. तेव्हा मधु दंडवते म्हणाले,

‘माझ्या लोकांनी मला निवडणुकीत नाकारले, त्यामुळे देशाचे सर्वोच्च पद भूषविण्याचा नैतिक अधिकारच मला प्राप्त होत नाही.’

मधु दंडवते यांनी आपल्या कठोर तत्वांमुळे हाती आलेले पंतप्रधानपद नाकारले. त्यांच्या जागी तिसऱ्या आघाडीची मोट बांधू शकेल असा एकही नेता जनता दलाकडे नसल्यामुळे त्यांची सत्ता स्थापन होऊ शकली नाही आणि काँग्रेसचे नरसिंहराव पंतप्रधान बनले. महाराष्ट्राने पंतप्रधान पदाची संधी पुन्हा एकदा गमावली.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.